Diwali_4 डाटा इज न्यू ऑईल ॲन्ड सॉईल!
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

एव्हाना आपणा सर्वांना याची जाणीव झाली असेल की, या जगात फुकट असे काही नसते. पण आपण तर फेसबुक, व्हॉट्‌सॲपसाठी एक पैसाही देत नाही, गुगलसाठीही नाही; तरीही इतके उत्तम तंत्रज्ञान आपल्याला फुकट का मिळते? हे बनवायला आणि सांभाळायला जो अफाट खर्च येतो, तो कोठून निघतो, याचा आपण कधी तरी विचार केला आहे का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण त्यांचे गिऱ्हाईकच नाही आहोत. आपण गिऱ्हाईक असतो, तर त्यांनी आपल्याकडून पैसे घेतले असते. उलट आपण त्यांचे खरे उत्पादक आहोत; आपल्या माहितीच्या स्वरूपात आपली विक्री करून त्यावर ते पैसे कमावतात आणि जाहिरातदार व इन्फल्युन्सर हे त्यांचे खरे गिऱ्हाईक आहेत, जे त्यांना आपल्या माहितीचे बक्कळ पैसे देतात.

गेल्या महिन्याभरात सगळ्यात जास्त चर्चा जगात कशाची सुरू असेल, तर ती फेसबुक डाटा लीक प्रकरणाची. हे प्रकरण तसे जुने, डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली त्या वेळचे. त्या वेळी केंब्रिज ॲनॅलिटिका या कंपनीमधल्या काही शास्त्रज्ञांनी फेसबुकवरच्या काही युजर्सचा खासगी डाटा (म्हणजे त्या माध्यमांवर असणारी त्यांची वैयक्तिक माहिती) मिळवला, त्याचा अभ्यास करून प्रत्येक व्यक्तीची मनोवैज्ञानिक जडण-घडण ओळखली आणि त्यानुसार ट्रंप यांचे ऑनलाईन प्रचारधोरण आखले. थोडक्यात काय, तर काहीशा गैरमार्गाने मिळवलेल्या माहितीमुळे व त्याच्या अफाट पृथक्करणक्षमतेमुळे अमेरिकेसारख्या देशातील राष्ट्राध्यक्षनिवडीवर प्रभाव पाडता आला. खरे तर असे काही झाले याची माहिती निदान तंत्रज्ञान व राजकीय क्षेत्रातील सगळ्यांनाच फार आधीपासून होती. फेसबुकने परवा ते अधिकृतरीत्या मान्य केले, इतकेच.

मग आता गेल्या तीन आठवड्यांत फेसबुकला एकूण बसलेला 100 बिलियन डॉलरचा फटका, फेसबुकचा जाहीर माफीनामा आणि अगदी गेल्या आठवड्यात अमेरिकी सिनेटसमोर झालेली झुकेरबर्गची उलटतपासणी आदी आनुषंगिक बाबी घडून आल्या. पण झाले असे की, यानिमिताने कित्येकांना असे प्रायव्हसी नावाचे काही असते, याची अचानक जाणीव झाली आणि जणू जॉर्ज ऑर्वेलच्या ’1984’ या कादंबरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे, सगळी कशी बोंबाबोंबच आहे, आता जगाचे कसे होणार वगैरे वगैरे वाटायला लागले. तर, दुसऱ्या बाजूला काही लोकांना अजून या सगळ्याचा अंदाजच आलेला नाही की, ऑनलाईन डाटा चोरणे म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम खरेच एवढे खोल आहेत का- इत्यादी.

पण या सगळ्या गदारोळामुळे आपण नक्की कोणते तंत्रज्ञान वापरायचे आणि काय करायचे, याचा प्रचंड गोंधळ त्यांच्या मनात तयार झालेला आहे. खरे सांगायचे तर परिस्थिती या दोन्हींच्यामध्ये आहे. डिजिटल अभ्यासकांच्या वर्तुळात आजकाल गाजणारी ‘डाटा इज न्यू ऑईल’ ही जी म्हण आहे, ती आजच्या परिस्थितीला चपखल लागू पडते; किंबहुना, ही म्हण हे जे काही प्रकरण घडले आहे, त्याचा परिणाम समजून घेण्यास पुरेशी आहे. या म्हणीत ‘डाटा’ व ‘ऑईल’ असे दोन शब्द आहेत. हे दोन्ही शब्द आधी आपण नीट समजून घेऊ या.

यातला ‘डाटा’ म्हणजे काय, तर आपली सर्व माहिती. कोणती माहिती? तर, आपल्याबद्दलची जी माहिती तंत्रज्ञानामुळे मिळवता येते, साठवता येते व त्याच्यावर प्रक्रिया करता येते- अशी माहिती. उदा. आपल्यातील बहुतांश लोक हातात जो पाच-सहा इंचाचा स्मार्टफोन वापरतात, त्याला अँड्रॉइड फोन असे म्हणतात. म्हणजे काय, तर या फोनमध्ये जी प्रणाली आहे- जी हा सर्व फोन चालवते- तिचे नाव ‘अँड्रॉइड’ असे आहे. या मुख्य प्रणालीला अनुसरून आपण बाकीचे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करून वापरतो. उदा. व्हॉट्‌सॲप. आता या अँड्रॉइड कंपनीचा मूळ मालक आहे गुगल. हे स्मार्टफोन वापरण्यासाठी आपले जी-मेलवर अकाऊंट असायला लागते. ते जी- मेलही गुगलचेच. आणि या सर्वांवर कडी म्हणजे, गुगल सर्च. नेटवर काही शोधायचे असेल तर आपण जो सर्च करतो, तो गुगलवरूनच. जणू काही शोधणे या शब्दाला गुगल हा प्रतिशब्द झाला आहे. या गुगलशिवाय तर इंटरनेटवर जणू काहीच करता येत नाही. (बिंग, याहू, इन अशा बाकीच्या सर्च इंजिनची नावे तरी पटकन्‌ आठवतात का आजकाल?)

थोडक्यात काय, तर आपण डिजिटल जगात सध्या जे काही करतो, ते 100 टक्के या गुगलच्या माध्यमातून करतो. आपण जे काही करत असतो, म्हणजे अगदी मोबाईलवरून कोल्हापूर-पुणे तिकीट काढण्यापासून ते एखाद्या वीकएंडला रात्री कोणत्या हॉटेलला जेवायला जायचे ते निवडण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी आपण स्मार्टफोन किंवा इंटरनेट वापरून करत असतो. आपल्या या सर्व गोष्टींची नोंद गुगल त्याच्याकडे ठेवत जाते. हा झाला सगळा आपला डाटा. आणि आपल्या नक्की कोणकोणत्या गोष्टींची गुगल नोंद करून ठेवते, ते आपल्याला बघायची सोय आहे- बरं का! याच लेखाच्या शेवटी दिलेल्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमचा हा डाटा डाउनलोड केलात तर, आपल्याबद्दलची किती अवाढव्य माहिती जनरेट केली गेली आहे व साठवली गेली आहे, ते तुमच्या पटकन्‌ लक्षात येईल.

जी गोष्ट गुगलची, तीच गोष्ट फेसबुकची. आपण फेसबुकवर जे काही लिहितो, चेक-इन करतो, कोणाकोणाला लाईक करतो, कोणावर कॉमेंट करतो, कोणकोणते फोटो टाकतो या सगळ्यांची नोंद फेसबुक तयार करते. आपण गेली साधारणतः 15 वर्षे गुगल आणि 10 वर्षे फेसबुक वापरत आहोत. या कालावधीतील या माध्यमांवरील आपल्या प्रत्येक हालचालीची नोंद त्यांच्याकडे आहे बरं. गुगल आणि फेसबुक या झाल्या दोन प्रमुख कंपन्या. पण अशा इतरही कंपन्या आहेत. ज्यांची सेवा आपण छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी वापरतो. ती प्रत्येक कंपनी- मग ती ऑनलाईन खरेदीसाठी आपण ज्या साईट्‌स वापरतो त्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट असोत वा ज्यांचे मोबाईल हँडसेट आपण वापरतो त्या अँपल, सॅमसंग किंवा एम.आय. असोत- आपली माहिती सतत साठवत राहतात. या सगळ्यांतून जी तयार होते, ती म्हणजे आपली प्रत्येकाची डिजिटल फूटप्रिंट.

जगातल्या प्रत्येक माणसाची एवढी अवाढव्य माहिती साठवून ठेवणे नव्या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य आहे. इतकेच नव्हे, तर आता या डाटावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोसेसिंग करायची सोय सहज उपलब्ध आहे. ती वापरून या रॉ डाटामधून बरेचसे निष्कर्ष काढता येतात. जसे की, या अबक व्यक्तीची खायची-प्यायची आवड-निवड काय आहे, तो नेहमी कोणकोणत्या ठिकाणांना भेट देतो, त्याला कोणते विचार आवडतात, त्याचे लग्न झाले आहे की तो एकटा आहे वगैरे. हे सर्व निष्कर्ष आपल्याबाबत सतत काढले जात असतात आणि या निष्कर्षांचा वापर आपण जास्तीत जास्त प्रभावित होऊ शकू अशा जाहिराती दाखवण्यासाठी केला जातो. आपल्या प्रत्येक निर्णयावर- जसे की, आज साबण कोणता विकत घ्यावा इथपासून ते अगदी मी कोणाला मतदान करावे, इथपर्यंतच्या- सर्व निर्णयांवर प्रभाव पाडायचा प्रयत्न केला जातो.

आता तुम्ही विचाराल की, हे असे का केले जाते? याचे कारण हे आहे की, या सर्व कंपन्यांचा प्रमुख व्यवसाय जाहिरात व इन्फल्युएन्सिंग हा आहे. या सर्व जाहिरातींच्या कंपन्या आहेत आणि जितकी उत्तम जाहिरात ते दाखवतील व जितके जास्त लोक त्या जाहिरातींना भुलून निर्णय घेतील, तितका त्यांचा फायदा जास्त!!! एव्हाना आपणा सर्वांना याची जाणीव झाली असेल की, या जगात फुकट असे काही नसते. पण आपण तर फेसबुक, व्हॉट्‌सॲपसाठी एक पैसाही देत नाही, गुगलसाठीही नाही; तरीही इतके उत्तम तंत्रज्ञान आपल्याला फुकट का मिळते? हे बनवायला आणि सांभाळायला जो अफाट खर्च येतो, तो कोठून निघतो, याचा आपण कधी तरी विचार केला आहे का? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, आपण त्यांचे गिऱ्हाईकच नाही आहोत. आपण गिऱ्हाईक असतो, तर त्यांनी  आपल्याकडून पैसे घेतले असते. उलट आपण त्यांचे खरे उत्पादक आहोत; आपल्या माहितीच्या स्वरूपात आपली विक्री करून त्यावर ते पैसे कमावतात आणि जाहिरातदार व इन्फल्युन्सर हे त्यांचे खरे गिऱ्हाईक आहेत, जे त्यांना आपल्या माहितीचे बक्कळ पैसे देतात.

उदाहरण द्यायचे झाले तर- आपली सर्च हिस्टरी जाणून घेऊन वा आपले चॅट पडताळून फेसबुक व गुगलला जाणवते की, आपल्याला नवे कपडे घ्यायचे आहेत. ते लगेच आपल्या आवडीच्या कपड्यांची जाहिरात सुरू करतात, ती पाहून आपण पाघळतो व फ्लिपकार्टवरून शर्ट खरेदी करतो. त्याच वेळी आपल्याच पैशातले काही पैसे फेसबुक व गुगलला फ्लिपकार्ट देते. थोडक्यात काय, तर आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक सुविधेची किंमत, आपण पैशांच्या रूपात नव्हे तर आपल्या माहितीच्या रूपात (खासगी व सार्वजनिक दोन्ही) मोजलेली असते. माहिती हे नव्या जगाचे सर्वांत मोठे चलनी नाणे आहे!

आता या सर्व नव्या रिॲलिटीचा ऑईलशी म्हणजे तेलाशी काय संबध? तर, जग बदलायची आणि जगाला दिशा द्यायची जी ताकद एकविसाव्या शतकात डाटाकडे आहे, तीच ताकद गेल्या शतकात खनिज तेलाकडे होती. म्हणजे मध्य-पूर्वेत जी काही युद्धे झाली किंवा अमेरिका व रशिया यांसारखे देश कारण नसताना ज्या विविध युद्धांत उतरले; त्याला प्रमुख कारण खनिज तेलावर मालकी कोणाची, हे होते. अगदी अलीकडच्या सद्दाम हुसेन प्रकरणापर्यंत हेच सुरू होते. पॅसिफिक स्टँडर्डने एका मोठ्या रिसर्च पेपरद्वारे हे संबंध सप्रमाण सिद्ध केले आहे. त्याचा निष्कर्ष एकच होता की, ज्याच्याकडे जास्त खनिज तेल तो जगावर राज्य करत होता. तो खरा महासत्ता होता. आणि जगातल्या सर्व माणसांचे आयुष्य अप्रत्यक्षपणे तेलावर अवलंबून होते. आज हेच सर्व डाटाबद्दल घडत आहे. म्हणजे काय, तर आजच्या सर्व लढाया डाटासाठी आणि डाटा वापरून खेळल्या जातात. अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत डाटा वापरूनच रशिया प्रभाव पाडू शकली ना!

आजच्या जगात नव्या महासत्ता कोणते देश नसून, गुगल आणि फेसबुक या कंपन्या आहेत. गेल्या आठवड्यात झुकेरबर्गला अमेरिकेच्या सिनेटमध्ये बोलावून जे काय उलटतपासणीचे नाटक रचले गेले, त्यामागची मूळ प्रेरणा फेसबुक ही महासत्ता नसून, तर अमेरिकन सरकारच आहे, हे समाजमनावर बिंबवणे ही आहे. ज्या पद्धतीचे या तपासणीचे फोटो नेटवर प्रकाशित झाले, त्यावरून या मुद्याला पुष्टीच मिळते. बलाढ्य कोण- अमेरिका देश का अमेरिकेतील कंपनी? असा हा  मुद्दा!! या निमिताने आपण हे लक्षात घेऊ या की, एकविसाव्या शतकात जगातील सर्वाधिक प्रभावी पाच कंपन्या गुगल, फेसबुक, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट व ॲपल या आहेत आणि या पाचही कंपन्यांचे मूळ डाटामध्ये आहे. डाटा आणि ऑईलमध्ये आणखी एक साम्य आहे. ज्याप्रमाणे फक्त खनिज तेलाचा काही उपयोग नाही, पण त्यावर प्रोसेसिंग करून अगदी ग्रीसपासून ते विमानातल्या इंधनापर्यंत हजारो उत्पादने निघू शकतात; अगदी त्याप्रमाणे नुसत्या डाटाचा उपयोग नाही, पण त्यावर प्रोसेसिंग म्हणजे डाटा ॲनॅलिटिक्स किंवा व्हिज्युअलायझेशनचा वापर केला तर वेगवेगळी शेकडो उत्पादने निघतात. म्हणजे प्रोसेसिंग केल्याशिवाय या दोहोंचाही उपयोग करता येत नाही!! या सर्व साम्यस्थळांमुळेच असे म्हणता येते की, ‘डाटा इज न्यू ऑईल.’

आता तुमच्यातील काही जण म्हणतील की, हे सगळं कळलंय आम्हाला गेल्या काही दिवसांत. याच्यापुढे काय, ते सांग. तर, पुढच्या प्रवासातला पहिला मुद्दा हाच आहे की- ही नवी रिॲलिटी आहे, हे आपण आधी मनापासून मान्य करू या आणि ती आपल्याला बदलता येणार नाही हेही मान्य करू या. पण झाले आहे असे की, हे डाटा लीक प्रकरण आणि त्याचे गांभीर्य समजल्यापासून एक नवं फॅड आलंय की- आपला डाटा वापरणारे किंवा भविष्यात जिथून आपली माहिती लीक व्हायची शक्यता आहे, ते काही वापरूच नका!! म्हणजे फेसबुक बंद करा, आधारला विरोध करा वगैरे. काही महान लोक तर ‘डिलिट फेसबुक’ नावाची कॅम्पेन फेसबुकवरच प्रसारित करत आहेत. तर मुद्दा असा आहे की, भविष्यात आपल्या माहितीचा गैरवापर व्हायची शक्यता आहे किंवा आत्ता काही प्रमाणात वापर होतोय, म्हणून ते साधनच वापरायचे नाही, असा विचार केला; तर नक्की काय काय वापरायचे बंद करणार आपण?

तसे जर ठरवले तर अश्मयुगात जाऊन राहावे लागेल आपल्याला. कारण, आजकाल रोजचे जगणेच डिजिटल झाले आहे. प्रत्येक ठिकाणी डाटा तयार होतो आणि प्रत्येक ठिकाणी त्यावर लक्ष ठेवून गैरवापर करता येतो. त्यामुळे अशा काही अवास्तव आणि अतार्किक मांडण्या करत कुढत बसण्यापेक्षा, नव्या जगात आपली वैयक्तिक माहिती ही वैयक्तिक नाही आणि तिचा कोठेही वापर होऊ शकतो, हे वास्तव मान्य करून पुढे जाऊ या ना! त्याने जास्त प्रॅक्टिकल होऊन या नव्या प्रश्नाला भिडता येईल. तर यावर उपाय समोर येतो तो कॉन्शिअस डाटा शेअरिंगचा. म्हणजे काय, तर सजगपणे आपला डाटा या कंपन्यांना वापरायला देणे. सध्याच्या जगातला खरा त्रागा, आपली माहिती वापरली जात आहे याचा नसून, ती का वापरली जात आहे आणि कोण वापरत आहे- हे आपल्याला माहीत नसणे, हा आहे. अगदी डाटा लीकच्या फेसबुकच्या प्रकरणातही खरी चूक हीच आहे की, माहिती घेतली गेली एका क्विझसाठी म्हणून आणि वापरली गेली ट्रंपसाठी, इतकेच. हेच जर का, ट्रंप यांची नीट प्रसिद्धी व्हावी यासाठी आम्ही ही माहिती विकत घेत आहोत असे सांगून फेसबुककडून ती घेतली गेली असती, तर हा विषय एवढा मोठा झालाच नसता कदाचित.

म्हणून कॉन्शिअस डाटा शेअरिंग म्हणजे- माझी माहितीच वापरू न देण्याऐवजी ती वापरा, पण का आणि कशासाठी वापरत आहात याची संपूर्ण जाणीव मला असू द्या. एकदा कळले की, ही माहिती मला जाहिराती दाखवण्यासाठी किंवा माझे राजकीय मत वळवण्यासाठी वापरली जाणार आहे; तर मग मी सजग राहीन आणि सजग मनाने निर्णय घेईन. एकदा माझ्या मनात हे फिट बसले की, मला नेटवर दिसणारे जे काही आहे ते मला आवडावे याच प्रकारे दाखवले जात आहे; तर कदाचित याहीपेक्षा वेगळी बाजू असेल एखाद्या गोष्टीची, हे मनात तरी येईल माझ्या. मुद्दा आपल्या मेंदूला ट्रेन करण्याचा आहे. आणि तरीही त्यातून एखाद्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडला, तर मग त्याचे मार्केटिंग स्किल्स उत्तम आहेत! पण ते योग्यच आहे ना. कारण आजही आपण खऱ्या जगात ज्याचे उत्तम मार्केटिंग आहे, त्याचेच ऐकतो ना? तसेच इथे होईल, इतकेच.

यासंदर्भात अजून एक सोपे उदाहरण देतो. आजकाल जिथे-जिथे सी.सी.टीव्ही लावलेला असतो, तिथे-तिथे ‘हा परिसर कॅमेराच्या अख्यत्यारित आहे’ असे लिहिलेले असते. ते वाचल्या-वाचल्या नकळत आपले मन सजग होते आणि आपली वर्तणूक बदलते. असेच काहीसे डाटाबाबत व्हायला हवे. खरे तर यात या कंपन्यांपेक्षा आपलीच चूक अधिक आहे. कारण या कंपन्यांनी ‘आम्ही तुमचा डाटा वापरणार आहोत, हे आपल्याला आधीच सांगितलेले असते. पण ते असते बारीक अक्षरांत आणि ‘आय ॲग्री’ नावाच्या बटणावर क्लिक करताना आपण एकही टर्म आणि कंडिशन न वाचताच ते बटण दाबतो. त्यामुळे आपण आपला डाटा वापरायला परवानगी देऊन बसतो.  पण नक्की कशाकशाची परवानगी देत आहोत, ते पाहण्याची सजगता आणणे आणि आपली कोणकोणती माहिती, का वापरली जात आहे हे आपल्याला ठळकपणे व सहज समजेल असे कळावे यासाठी या कंपन्यांवर दबाव आणणे- या दोन गोष्टी ठरवाव्या लागतील.

जॉन हॅवन्स नावाचा एक अमेरिकन डाटा सायंटिस्ट आहे. त्याचे ‘हॅकिंग हॅपिनेस : व्हाय पर्सनल डाटा काउंट्‌स’ नावाचे पुस्तक याबाबत मुळापासून वाचण्यासारखे आहे. त्यात तो एक भन्नाट मुद्दा मांडतो. तो असा की, आपली माहिती वापरून या कंपन्या गब्बर फायदा मिळवतात; पण आपल्या हातात काय लागते, तर शून्य! कारण का तर आपल्या माहितीच्या जीवावर हे लोक पैसे मिळवत आहेत, हे आपल्याला जाणवतच नाही; जाणवले तरी ते आपण मान्य करायचे धाडस करत नाही. हा असा डाटाचा वापर थांबवला पाहिजे, असे आपण बोलत राहतो आणि रोज नवनवीन ॲप, त्यांना आपल्या मोबाईलचे सर्व ॲक्सेस देऊन डाऊनलोड करत राहतो. जॉन म्हणतो की, ‘असा दुट्टपीपणा करण्याऐवजी असे करू या, आपली माहिती आपण स्वखुषीने थेट या कंपन्यांना बिनधास्त देऊ या आणि ते जर का या माहितीच्या जिवावर 10 रुपये मिळवत असतील, तर त्यातला 1 रुपया आपला हिस्सा म्हणून मागू या. म्हणजे आपल्या माहितीची योग्य किंमतही आपल्याला मिळत राहील आणि सर्वांनाच माहिती उपलब्ध झाल्याने माहितीवर ठरावीक लोकांचीच मक्तेदारी आहे असे आपल्याला वाटते, तेही नाहीसे होऊन जाईल.

भारतीय परिप्रेक्ष्यात जरी असे घडणे आपल्याला फार पुढचे वाटत असले किंवा अतिशयोक्ती वाटत असेल, तरी याच दिशेनं आपल्याला जावे लागेल. कारण तसे केले, तरच या नव्या जगाची विश्वासार्हता टिकून राहील. तंत्रज्ञानातील बदलानंतर खरं तर ही जी नवी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे, ती सगळी ट्रस्ट इकॉनॉमी आहे. मुद्दा माहिती चोरीचा नाहीच आहे खरं तर. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, हा मुद्दा आहे. उदाहरणार्थ- ‘ओला’तून येणाऱ्या अनोळखी टॅक्सी ड्रायव्हरवर आपण विश्वास टाकतो, एअर बीएनबी नावाचे ॲप वापरताना ॲपवरून मिळणाऱ्या अनोळखी घरी आपण विश्वासाने राहायला जातो. फेसबुकवरच्या मित्र-मैत्रिणींशी लग्नही करतात काही लोक. जेव्हा डाटा लीक होतो तेव्हा माहिती चोरीला जाण्याचे काही वाटत नाही आपल्याला. आपण काही कोणी राष्ट्राध्यक्ष वा रॉ एजंट नाही की, आपल्या माहितीने फार काही फरक पडेल. खरा राग येतो तो  विश्वासघात झाल्याचा!!! ज्याच्यावर आपण विश्वास टाकला, त्यानेच फसवल्याचा राग.

आता या नजरेने गेल्या महिन्यातील घटनाक्रमावर पुन्हा थोडी दृष्टी वळवू या. खरे तर फेसबुक आपली माहिती वापरते, हे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे उघड गुपित आहे. त्यासाठीच त्यांनी व्हॉट्‌सॲपमधून शून्य रुपये मिळत असताना 19 बिलियन डॉलर्स मोजले. त्या व्हॉट्‌सॲपमधून मिळणारा अगणित माहितीसंच मिळावा म्हणून. मग मार्क झुकेरबर्गने आत्ताच माफीनामा का सादर केला? हा माफीनामा सादर करण्याआधी एक महिना त्यांनी फेक न्यूज वाढू नयेत म्हणून स्वतःचा प्रोग्राम बदलला. या दोन्हींमुळे फेसबुकला आधी मांडल्याप्रमाणे 100 बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. आपल्या या योजनेमुळे इतके नुकसान होणार आहे, याची पूर्वकल्पना फेसबुकला नक्कीच असणार , तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. कारण जर का एखादा युजर लाँगटर्म त्यांच्यासोबत राहायचा असेल, तर त्याचा विश्वास हीच खरी संपत्ती आहे, याची जाणीव या सगळ्या लोकांना झालेली आहे.

गुगलनेसुद्धा गेले काही दिवस अँड्रॉइड फोनवर कोणते ॲप वापरताना आपला काय-काय डाटा वापरला जातो, यांच्या परमिशन्स अगदी ठळकपणे मागायला सुरुवात केली आहे. हे सगळे या ट्रस्ट इकॉनॉमीचे निदर्शक आहेत. फेसबुकचा झुकेरबर्ग असो वा गुगलचा लॅरी पेज, हे सगळे चाळिशीच्या आतले तरुण आहेत. एवढ्या कमी वयात त्यांच्याकडे महासत्तेच्या चाव्या तर आल्या; पण त्यासोबत येणारी जबाबदारी त्यांना आता जाणवत आहे, त्याप्रमाणे ते बदलतही आहेत, जे स्वागतार्ह आहे.

पण याबाबतीतसुद्धा पुन्हा आपणा भारतीयांची भूमिका थोडीशी विचित्र म्हणावी अशी आहे. जो डाटा भारत सरकार गोळा करत आहे, जो भारतीय कायद्याच्या अधीन आहे- असा आधारचा डाटा द्यायला आपण विरोध करत आहोत, दुसरी आणीबाणी आणल्यासारख्या गप्पा मारत आहोत. त्याच वेळी ॲपलच्या आयफोनवरून आणि चायनीज स्मार्टफोनवरून आपले अगदी हातांचे आणि डोळ्यांचे ठसे या कंपन्यांना देत आहोत. यातल्या कोणत्याही कंपनीचा डाटा हा भारतीय कायद्याच्या अख्यत्यारितसुद्धा येत नाही. म्हणजे आपला नक्की कोणावर विश्वास आहे? ज्यात कायद्याने रक्षण आहे अशा सरकारी व्यवस्थेवर, का अनोळखी कंपनीवर? बाकीच्या देशांत फेसबुक, गुगलने सर्व्हर त्या-त्या देशात ठेवावेत, यासाठी लढे सुरू आहेत आणि आपल्याकडे आपण नॅशनल सोशल मीडिया हवा, या विषयावर आंदोलन करण्याऐवजी आधारवर राजकीय भांडणे खेळत बसलो आहोत. एकटे आनंद महिंद्रा तेवढे या विषयावर मूलभूत काही करण्यात गुंतले आहेत; बाकीच्यांचे काय? एक समाज म्हणून आपली प्रायॉरिटी चुकल्याचे याहून मोठे द्योतक काय हवे?

या सर्व प्रकारातून असे लक्षात येते की, माहिती अर्थात डाटा हा जसा ऑईल आहे, तसा तो सॉईलही आहे. मातीत जे पेराल ते उगवते, तसेच या माहितीचे आहे. माहितीच्या पायावर जे पाहिजे ते उभे करता येते, त्यासाठी हवा असतो चांगला माळी. अर्थात क्युरेटर. माहिती नीट क्युरेट केली, तर त्यातून असाध्य आजारांवर उपचार निघतात आणि चुकीच्या पद्धतीने वापरली तर त्यातून केम्ब्रिज ॲनॅलिटिकाही तयार होते. शेवटी ते एक टूल आहे आणि सुदैवाने ते प्रत्येकाला उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या देशात असा एकही राजकीय पक्ष नाही, ज्यांनी डाटा ॲनॅलिटिक्सच्या सुविधा घेतल्या नव्हत्या. तर, आता हे डाटाचे हत्यार सर्वांना उपलब्ध आहे, कोण्या एकाची ती मक्तेदारी नाही.

मग पुढचा प्रश्न असा येतो की, आपल्याकडील माहितीची ताकद आपण ओळखली आहे का? जसे ॲनॅलिटिक्स वापरून फेसबुक व गुगल जगावर राज्य करत आहेत, तर तीच टूल आपण आपल्या डाटासाठी का वापरत नाही? डाटा हा फक्त फेसबुक वा गुगलच तयार करते असे नाही. आपल्या सर्वांकडे खूप सारी माहिती पूर्वीपासून होती व आहे. बदल इतकाच झाला आहे की, आता त्याचे पृथक्करण करण्यासाठी वेगवेगळी साधने मिळाली आहेत. उदा.- हेच डाटा ॲनॅलिटिक्स वापरून कॅन्सर खूप आधी डिटेक्ट करायचे तंत्रज्ञान काढले आहे, शेतकऱ्यांची वर्षानुवर्षांची माहिती गोळा करून त्यानुसार सस्टेनेबल फार्मिंगचे मॉडेल याच डाटातून निघाले आहे. अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे या डाटाच्या पॉझिटिव्ह वापराची देता येतील.

पण आपल्याकडे निगेटिव्ह गोष्टींना पटकन्‌ प्रसिद्धी मिळत असल्याने, डाटामुळे झालेले चांगले चमत्कार अजून लोकांना माहीतच नाहीत. पण आता ती वेळ आली आहे, प्रत्येकाने ही ताकद समजून घेऊन तिचा भल्यासाठी वापर करायची. तो वापर नाही केला, तर आपण एक मोठी संधी वाया घालवू. आजही सरकारचे किती तरी विभाग असोत वा अगदी  साप्ताहिक साधनासारख्या हजारो सामाजिक संस्था; या सर्वांचा इतिहास एवढा मोठा आहे की, तो सगळा डाटा जर का आंतरजालावर आणला आणि त्यावर नीट प्रोसेसिंग केले, तर ही माहिती या संस्थांसाठी सोन्यासारखी मोलाची ठरेल. एकुणात, आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे की, माहितीची मालकी आणि मांडणी यावर उद्याचे भविष्य अवलंबून असणार आहे. अशा वेळी आपल्या मालकीचा डाटा अधिक सिक्युअर बनवणे आणि सहज उपलब्ध असणारी यंत्रणा वापरून तो सुटसुटीतपणे लोकांपुढे मांडण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करणे, ही काळाची गरज आहे.

यासंदर्भात परवा पुण्यात झालेला एक प्रयोग नोंद घेण्याजोगा आहे. एखाद्या महापालिकेचे बजेट म्हणजे सरकारी विषय. सामान्यांना त्यात काय कळणार? पण पुण्याच्या पाच वर्षांच्या बजेटचे पृथक्करण साहिल देव व त्यांच्या डाटा टीमने केले आणि अत्यंत सुंदर प्रकारे माहितीची मांडणी करून ती लोकांपुढे मांडली, जी बघून एका क्लिकवर सामान्य नागरिकांनाही बजेट समजू लागले. फेसबुकचा वाईट वापर- आणि असा चांगला वापर, दोन्हींच्या मागचे तंत्रज्ञान एकच, पण मातीला पाणी घालणारा क्युरेटर वेगळा, इतकाच मुद्दा. अशा वेळी प्रत्येक संस्थेने एखादा चांगला डाटा क्युरेटर नेमणे, आपली वेबसाईट अद्ययावत बनवणे, आपल्याकडे असणारी सर्व माहिती नीट मांडणी करून कॉपीराईट करून आंतरजालावर सर्वांना सहज उपलब्ध होईल असे पाहणे, इंटरनेटवर असणारे डाटा व्हिज्युअलायझेशनचे चार-सहा आठवड्यांचे कोर्स संस्थेत कोणाला तरी करायला लावून आपल्याकडील माहितीची सुटसुटीत मांडणी करणे व ती स्वतःहून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल असे पाहणे, अशा बऱ्याच गोष्टी करता येतील.

यानिमित्ताने अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आज प्रत्येकाकडे दिवसाला एक जीबी इतके इंटरनेट उपलब्ध आहे. त्या इंटरनेटने तरुणाईची मती गुंग झालेली आहे. कंपन्यांना माहिती चोरण्यासाठी तेही एक प्रमुख कारण आहे. रोज जर का तुमच्याकडे वेळ व इंटरनेट आहे, तर तुम्ही या माहिती चोरण्याच्या ट्रॅपमध्ये नकळत अडकणारच. सध्या एक प्रकार सुरू आहे फेसबुकवर की- तुम्ही कोणते राजकारणी व्हाल, 20 वर्षाने कसे दिसाल वगैरे माहिती मिळवा. लोक रिकामे असल्याने अशा ॲप्सचा वापर क्षणिक आनंदासाठी करत बसतात. या टाइमपास ॲपचा एकच उद्देश असतो ती म्हणजे तुमची माहिती चोरणे.

पण इथे या तरुणाईला का दोषी धरायचे? त्यांना तो एक जीबी इंटरनेट संपवायला आपण काही चांगले पर्याय दिले आहेत का? महाराष्ट्रात एवढ्या व्याख्यानमाला आहेत, त्यातले किती जण ती व्याख्याने ऑनलाईन अपलोड करतात? किती चांगले रिसर्च पेपर ऑनलाईन येतात? महत्त्वाच्या विषयांवर चांगले इन्फोग्राफिक्स किती येतात? हे सगळेसुद्धा डाटाचेच प्रकार आहेत. हे काही तरुणाईला मिळत नाही म्हणून, अपरिहार्यता म्हणून त्यांना नको त्या डिजिटल ठिकाणी वेळ घालवावा लागतो. लोक फालतू डाटावर अब्जावधी कमावतात, हे एव्हाना लक्षात आले असेलच. मग आपण आपला चांगला, महत्त्वाचा डाटा न वापरायचा कर्मदरिद्रीपणा का करायचा?

या फेसबुक प्रकरणामुळे एक चांगले झाले की, अनेकांना डाटाची किंमत कळली. आता तरी निदान या नव्या ऑईलकडे वेगळ्या नजरेने पाहून त्यातून उद्याचे उज्ज्वल भविष्य पेरण्यासाठी प्रयत्न करू या. तसे झाले तर झुकेरबर्गचे पाण्यात गेलेले 100 बिलियन डॉलर्स आणि आपला चोरीला गेलेला डाटा सार्थकी लागेल. 

1. आपला फेसबुक डाटा नक्की काय काय आहे, हे पाहण्यासाठी फेसबुकच्या अकाउंट सेटिंगमध्ये जाऊन download copy of your data वर क्लिक करा. डाऊनलोड झालेला डाटा पाहिल्यावर तुम्ही स्तिमित व्हाल.

2. गुगल आपला काय काय डाटा घेते, हे पाहण्यासाठी www.google.com/takeout या लिंकवरून आपला सर्व डाटा आणि मॅप्स तुम्ही डाऊनलोड करू शकता.
 

Tags: फेसबुक डेटा गुगल facebook data google weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनायक पाचलग
vinayakpachalag@gmailcom


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात