डिजिटल अर्काईव्ह

ग. प्र. प्रधान : आदर्शांचा पाठपुरावा करणारा लेखक

तरुण वयात वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांचा गाढा प्रभाव त्यांच्यावर होता हे समजते, तेव्हा त्यांच्यातील उदात्त ध्येयवादाचे उगमस्थान सापडते. त्याच काळात चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यांनी त्यांना प्रभावित केले, परिणामी तळागाळातील समूहांबद्दल त्यांच्या मनात कायम सॉफ्ट कॉर्नर राहिला. साने गुरुजींनी त्यांना झपाटून टाकले, एस. एम. व ना.ग. गोरे यांनी समाजवादाची दीक्षा दिली, गांधींनी जीवनदृष्टी दिली हे सर्व त्यातून फार नेमकेपणाने स्पष्ट होते. प्राध्यापकीची दोन दशके आणि विधान परिषदेतील दीड तप किती रोमांचक ठरले असेल हेही त्यातून कळते, आणि असे बरेच काही. हे पुस्तक पूर्ण वाचून होते तेव्हा प्रांजळ व पारदर्शी आत्मनिवेदन कसे असू शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण पुढे येते. विशेष म्हणजे या आत्मनिवेदनातून त्यांनी स्वत:च्या मर्यादा व क्षमता नेमकेपणाने मांडल्या आहेत.

26 ऑगस्ट 1922 ते 29 मे 2010, असे 88 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या गणेश प्रभाकर प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. स्वातंत्र्यसैनिक, इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते, समाजवादी पक्षाचे नेते, विधान परिषदेचे सदस्य, साधना साप्ताहिकाचे संपादक आणि मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये विपुल लिहिणारे लेखक- अशी त्यांची सप्तरंगी ओळख सांगता येईल. त्यांचे घराणे मूळचे मुरबाड (जि.ठाणे) येथील, पण वडील महसूल खात्यात नोकरी करीत होते, त्यामुळे ते सातारा येथे असताना ग. प्र. यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण पुणे येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर बी. ए. फर्ग्युसन महाविद्यालयातून केले. त्याच दरम्यान 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभागी होऊन त्यांनी तुरुंगवास भोगला. तुरुंगातून सुटल्यावर फर्ग्युसनमधून एम. ए. इंग्रजी पूर्ण केले आणि तिथेच अध्यापन-कार्य सुरू केले.

सन 1945 ते 65 अशी वीस वर्षे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्या दोन दशकांच्या काळात ते राष्ट्र सेवा दलाची बौद्धिके घेण्याचे काम करीत होते आणि त्याच काळात त्यांचे समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले. मात्र प्राध्यापकाची आचारसंहिता म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करायचे नाही हे त्यांनी ठरवले होते. अर्थात, प्राध्यापक म्हणून काम करताना, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य म्हणून निवडून जाताना निवडणुकीचे राजकारण त्यांनी अनुभवले होते. आणि त्या निमित्ताने राज्यभरातील अनेक ठिकाणचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षणसंस्था चालक यांच्याशी त्यांचा संपर्क वाढत गेला होता.

परिणामी, 1965 मध्ये त्यांनी प्राध्यापकीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ समाजवादी पक्षाला देण्याचे ठरवले, तेव्हा त्यांना पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले आणि आधीच्या दोन दशकांच्या संपर्क जाळ्याच्या आधारावर ते सहज निवडून आले. त्यानंतर आणखी दोन निवडणुका त्यांनी लढवल्या आणि जिंकल्या. म्हणजे तब्बल 18 वर्षे ते विधान परिषदेवर सदस्य होते. त्यातील अखेरच्या काळातील दोन वर्षे त्यांच्याकडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही होते. 1984 मध्ये चौथी टर्म घेण्याचे त्यांनी नाकारले तेव्हा ते 62 वर्षांचे होते.

सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन साधना साप्ताहिकासाठी काही वर्षे काम करायचे असे तेव्हा त्यांनी ठरवले. त्यानंतर लगेच ते (वसंत बापट यांच्यासह) साधना साप्ताहिकाचे संपादक झाले आणि पुढील 14 वर्षे म्हणजे 1998 पर्यंत त्या पदावर राहिले. वयाच्या पंचाहत्तरीनंतरचा म्हणजे 1998 ते 2010 हा त्यांच्या आयुष्यातील खऱ्या अर्थाने निवृत्तीचा काळ म्हणता येईल, कारण त्या काळात कोणत्याही संस्थात्मक कामाच्या जबाबदाऱ्या त्यांनी घेतल्या नाहीत. मात्र काही चळवळी व आंदोलने यांना पाठिंबा, काही सभा-समारभांमध्ये भाषणे आणि दीर्घ काळ खुणावत असलेल्या- पण वेळेअभावी राहून गेलेल्या विषयांवरील लेखन, असा तो एक तपाचा निवृत्तीचा काळ होता.

अशा या ग. प्र.प्रधान यांनी लहान-मोठी अशी दीड डझन मराठी पुस्तके आणि डझनभर इंग्रजी पुस्तके लिहिली. त्यांनी स्वत:च असे म्हणून ठेवले आहे की, ‘माझे लेखन स्वातंत्र्याची चळवळ आणि त्यानंतर या देशाची वाटचाल या संदर्भातच प्रामुख्याने झाले आहे. आणि मी कुठेही गेलो तरी समाजशिक्षकच होतो.’ त्यांच्या सर्व पुस्तकांवर नजर टाकली तर त्यांची वरील दोन्ही विधाने पूर्णतः खरी आहेत याचा प्रत्यय येतो. एवढेच नाही, तर त्या त्या कालखंडांत निर्माण झालेल्या गरजेतून किंवा विशिष्ट निमित्त मिळाले म्हणून, किंवा प्रस्ताव चालत आले म्हणून त्यांनी ते लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात व देशाच्या संदर्भात जुळून आलेले काही घटनाप्रसंग व कालखंड समोर ठेवले, तर त्यांचे लेखन आणि त्यातून आलेली पुस्तके अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील.

प्राध्यापक म्हणून ते काम करायला लागून सात-आठ वर्षे झाली तेव्हा, लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे (1956) वेध लागले होते. साहजिकच इतर अनेकांप्रमाणेच प्रधान सरही त्याकडे ओढले गेले; कारण टिळक व आगरकर या दोघांचेही त्यांना आकर्षण होते. त्याच दरम्यान त्यांच्याकडे साहित्य अकादमीसाठी निवडक आगरकर हा लेखसंग्रह संपादित करण्याचे काम आले. आगरकरांचे ‘सुधारक’मधील लेख विषयानुसार वर्गीकरण करून आणि त्यातील प्रातिनिधिक म्हणावेत असे निवडून, ‘आगरकर लेखसंग्रह’ हे पुस्तक विवेचक प्रस्तावनेसह आले. त्याला निमित्त जन्मशताब्दी वर्षाचे होते, पण ते पुस्तक प्रकाशित व्हायला 1960 हे वर्ष उजाडावे लागले. आगरकरांचा बुद्धी-प्रामाण्यवादी विचार, व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य आणि त्यांना अभिप्रेत सामाजिक सुधारणा यांचे महत्त्व आणि वेगळेपण अधोरेखित करण्याचे काम त्या पुस्तकातून झाले. प्रधान सरांना विचारांच्या दृष्टीने आगरकर जवळचेच होते, पण या पुस्तकाच्या निमित्ताने ते त्या जीवनदृष्टीवर अधिक दृढ झाले.

मात्र, त्याच वेळी लोकमान्य टिळक यांचे इंग्रजी चरित्र लिहिण्याचे काम प्रधान यांनी त्यांचे मित्र इंग्रजीचे प्राध्यापक अ. के. भागवत यांच्यासह हाती घेतले (तेव्हा ते दोघेही वयाने पस्तिशीच्या आत होते), त्याला दोन कारणे होती. एक - तोपर्यंत, न. चिं. केळकर आणि न. र.फाटक यांनी लिहिलेली टिळकांची दोन मोठी व प्रतिष्ठित अशी चरित्रे प्रकाशित झाली होती, पण ती स्वातंत्र्यपूर्व काळात लिहिली गेली होती. आणि दुसरे कारण असे की, आचार्य जावडेकर यांनी ‘आधुनिक भारत’ या ग्रंथातून टिळकांचे राजकारण आणि गांधींचे राजकारण यांच्यातील प्रबळ धागे दाखवून दिले होते. त्यामुळे गांधींच्या चळवळीत सहभागी झालेल्या आणि गांधीविचारांचा प्रभाव असलेल्या प्रधान यांना, टिळक समजून घेण्यासाठी ती संधी घ्यावी असे वाटले. शिवाय, टिळकांवर चांगले इंग्रजी चरित्र तोपर्यंत प्रकाशित झालेले नव्हते.

या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून, प्रधान व भागवत यांनी आचार्य जावडेकर यांचे मार्गदर्शन घेत ते पुस्तक लिहायला घेतले. त्याच दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीने टिळक चरित्रलेखनाची स्पर्धा घोषित केली. त्यामुळे प्रधान व भागवत यांचे पुस्तक अधिक विस्तृत झाले. त्या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक शि. ल. करंदीकर, त्र्यं. वि. पर्वते आणि भागवत-प्रधान यांनी लिहिलेले अशा तीन पुस्तकांना विभागून देण्यात आले. प्रधान व भागवत यांच्या पुस्तकाला त्या वेळचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची छोटी प्रस्तावना मिळाली. मात्र ते पुस्तकही बरेच उशिरा म्हणजे टिळकांचे जन्मशताब्दी वर्ष संपल्यावर, 1959 मध्ये जयको पब्लिशिंग हाउस यांच्याकडून (एकतृतीयांश भाग कमी करून) ‘लोकमान्य टिळक : अ बायोग्राफी’ या नावाने प्रकाशित झाले. त्या अनुभवामुळे त्या पुस्तकाची मराठी आवृत्ती करण्याचा विचार प्रधान-भागवत यांनी केला नाही (पुढे 2008 मध्ये संपूर्ण संहिता जयकोने प्रकाशित केली). त्यानंतर नॅशनल बुक ट्रस्टने छोटे टिळक चरित्र इंग्रजी व मराठीत लिहायला प्रधान यांना सांगितले, त्यामुळेही तो विचार मागे पडत गेला.

मात्र, त्यानंतर तब्बल 65 वर्षांनी म्हणजे टिळकांचे मृत्युशताब्दी वर्ष संपत आले तेव्हा (2020 मध्ये) प्रधान व भागवत यांचे ते इंग्रजी पुस्तक मराठीत आणण्याचा निर्णय साधना प्रकाशनाने घेतला. अनुवादाचे काम अवधूत डोंगरे यांच्याकडे सोपवले गेले आणि टिळकांच्या 101व्या पुण्यतिथीला ते साडेसहाशे पानांचे मराठी पुस्तक ‘लोकमान्य टिळक चरित्र’ या नावाने प्रकाशित झाले. मराठी आवृत्तीला डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ हा द्विखंडांत्मक ग्रंथ लिहिणाऱ्या डॉ. मोरे यांनी त्या प्रस्तावनेत त्या पुस्तकाचे वेगळेपण सांगताना दोन मुद्दे अधोरेखित केले आहेत. एक - आगरकरांकडे कल असणाऱ्या लेखकद्वयीने लिहिलेले हे पुस्तक आहे. आणि दुसरा, आशिया खंडाला केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिले गेले आहे.

या व्यतिरिक्त आणखी दोन मुद्दे हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येतात. एक, इंग्रजी वाचक समोर ठेवून हे पुस्तक लिहिले गेले आहे आणि दुसरा, हे पुस्तक लिहीत असतानाच्या काळात केलेल्या अभ्यासामुळे प्रधान व भागवत यांचा टिळकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक वस्तुनिष्ठ होत गेला आणि प्रधान यांचा तर एकूणच राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक विकसित होत गेला. याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर प्रधान सरांनी उत्तरायुष्यात लिहिलेल्या दोन छोट्या पुस्तकांकडे वळावे लागेल. टिळकांच्या संदर्भात लिहिलेल्या दोन नाटिका आणि टिळकांवर दिलेली तीन व्याख्याने यांची ती पुस्तके आहेत. 1956 चे इंग्रजी चरित्र लिहिल्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनी आलेली ही दोन छोटी पुस्तके आहेत. त्यामुळे, टिळक चरित्रलेखन प्रक्रियेचा प्रधान यांच्या विचारप्रक्रियेवर बराच गंभीर परिणाम झाला, असे म्हणायला वाव आहे.

प्रधान यांनी 1965 मध्ये प्राध्यापकी सोडली आणि समाजवादी पक्षात जाऊन पूर्ण वेळ राजकारण करायचे ठरवले. त्यानंतरच्या सात-आठ वर्षांत त्यांनी लिहिलेली ‘हाजीपीर’, ‘कांजरकोट’, ‘सोनार बांगला’ अशी तीन छोटी पुस्तके महत्त्वपूर्ण आहेत. एका मर्यादित अर्थाने त्यांना प्रवासवर्णने म्हणता येईल, पण त्यांना ‘रिपोर्ताज’ म्हणणे अधिक योग्य ठरेल. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले तेव्हा पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर जाऊन सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून लिहिलेले पुस्तक म्हणजे ‘हाजीपीर’. वस्तुतः तेव्हा ते केसरी दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून सीमेवर गेले होते आणि नंतर केसरीत लिहिलेल्या लेखमालेचे ते पुस्तक आहे. त्यानंतर 1968 मध्ये आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेल्या निर्णयानुसार भारताच्या कच्छ सीमेवरील काही भूभाग पाकिस्तानला देण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला, तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी दोन्ही समाजवादी पक्ष व जनसंघ यांनी सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहात सहभागी होऊन, दोन आठवडे तुरुंगवास पत्करून परत आल्यावर प्रधानांनी छोटी लेखमाला महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिली, त्याचे पुस्तक आहे ‘कांजरकोट’. त्यानंतर 1971 मध्ये बांगलादेश मुक्तिसंग्राम झाला तेव्हा भारताच्या पूर्व सीमेवर जाऊन प्रधान यांनी सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद साधला होता. त्यावरील लेखमाला सकाळ दैनिकातून प्रसिद्ध झाली आणि मग ‘सोनार बांगला’ हे पुस्तक त्यातून आले.

या तिन्ही पुस्तकांतून प्रधान यांच्यातील देशभक्त दिसतो, लोकशाहीप्रेमी नागरिक दिसतो, समाजवादी कार्यकर्ता दिसतो, तसाच ललित साहित्याचे अंग असलेला लेखकही. ही तिन्ही पुस्तके त्या काळात चांगली चर्चिली गेली, पण नंतरची तीन दशके आउट ऑफ प्रिंट राहिली, मात्र 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाला डिसेंबर 2021 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होणार असल्याने, साधना प्रकाशनाकडून त्यांच्या नव्या आवृत्त्या येत आहेत.

1975 मध्ये भारतात राष्ट्रीय आणीबाणी लादली गेली, तेव्हा विरोधी पक्षातील ज्या नेत्यांना दोनेक वर्षे तुरुंगवास भोगावा लागला, त्यात प्रधान सरही होते. येरवड्याच्या तुरुंगात असताना एक छोटे पुस्तक त्यांच्याकडून लिहून झाले आणि एका मोठ्या पुस्तकाचे बीज त्यांच्या मनात पडले. ते छोटे पुस्तक म्हणजे ‘भाकरी आणि स्वातंत्र्य’. ते पुस्तक स्वतंत्र नाही, विल्यम मॅकॉर्ड या अर्थशास्त्रज्ञाच्या ‘स्प्रिंगटाइम ऑफ फ्रीडम’ या इंग्रजी पुस्तकावर आधारित आहे. ते इंग्रजी पुस्तक त्यांना जी.जी.पारीख यांनी दिले होते. ‘विकसनशील राष्ट्रांचा आर्थिक विकास साधण्यासाठी त्या राष्ट्रांतील स्वातंत्र्याचा संकोच करण्याची आवश्यकता नाही, किंबहुना आर्थिक विकास आणि राजकीय स्वातंत्र्य यांची फारकत केल्यास आर्थिक विकासालाही खीळ बसते’, हा सिद्धांत मॅकॉर्ड यांनी त्यात मांडला आहे. त्यामुळे प्रधानसर प्रभावित झाले. आणि मग युरोप-अमेरिकेच्या परिप्रेक्ष्यातील ते पुस्तक, तुरुंगातील तरुण कार्यकर्त्यांना भारतीय परिप्रेक्ष्यात समजावून सांगण्यासाठी त्यांनी पाच व्याख्याने दिली (त्याआधी ती लिहून काढली), त्याचेच हे पुस्तक आहे. ते लिहिताना अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले सदानंद वर्दे यांची त्यांना मदत झाली होती. अर्थात ते पुस्तक लिहिताना ‘अर्थशास्त्र हा आपला विषय नाही’ याची जाणीव प्रधानांना होती आणि तशी त्यांनी ती व्यक्तही केली आहे. आणि नंतर त्यांनी अर्थशास्त्राशी संबंधित लेखनाला हात कधी घातला नाही. प्रधानांच्या त्या पुस्तकातील आशय किती प्रभावी आहे हा भाग बाजूला ठेवला तरी, मूळ विषय किंवा सिद्धांत मात्र तेव्हा आणि आजही महत्त्वाचा आहे हे खरे!

तुरुंगात असताना त्यांना विविध राजकीय प्रवाहांतील नेते व कार्यकर्ते यांचा अधिक निकटचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या मनात मोठी राजकीय कादंबरी आकार घेऊ लागली. वामन मल्हार जोशी यांची ‘रागिणी’ अर्थात ‘काव्यशास्त्र विनोद’ ही कादंबरी प्रधान यांच्यावर तरुण वयात मोठा प्रभाव टाकून गेली होती. त्यामुळे त्यांच्या मनातील राजकीय कादंबरी वैचारिक चर्चामंथन करणारी अशीच होती. त्यातून पुढील पाच वर्षांच्या काळात लिहिले गेलेले पुस्तक म्हणजे ‘साता उत्तराची कहाणी’ (याला त्यांनी ‘राजकीय बखर’ असे संबोधले आहे.)

या पुस्तकात 1940 ते 80 या काळात देशातील सात प्रमुख विचारप्रवाहांची वाटचाल कशी राहिली याचे चित्रण, सात व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रंगवले आहे. समाजवादी, साम्यवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी, रॉयवादी, आंबेडकरवादी आणि क्रांतिकारी (पत्री सरकार) हेच ते सात प्रवाह. 1940 मध्ये वयाच्या विशीत असलेले पुण्यातील सात प्रामाणिक व ध्येयवादी मित्र वरील सात वेगवेगळ्या प्रवाहांसोबत जातात आणि पुढील चाळीस वर्षे कार्यरत राहतात. त्या काळात राज्यात, देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर ज्या प्रमुख घडामोडी होतात, तेव्हा त्या त्या प्रवाहांचा प्रतिसाद कसा होता किंवा त्यांच्या भूमिका कशा राहिल्या याचे मार्मिक विवेचन व विश्लेषण म्हणावे असे ते पुस्तक आहे. त्या पुस्तकातील सर्वच व्यक्तिरेखा इतक्या प्रामाणिक कशा, असा प्रश्न साहित्याच्या क्षेत्रातील लोकांकडून विचारला गेला आणि तो रास्तच आहे. शिवाय, त्या पुस्तकात त्या काळात देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या काँग्रेसची व्यक्तिरेखा नाही हे त्यातील मोठेच न्यून आहे, असे प्रधान यांनीच नोंदवून ठेवले आहे. मात्र तरीही, ते प्रधानसरांचे सर्वोत्तम पुस्तक आहे. कारण भारताच्या संदर्भात, त्या 40 वर्षांतील ते सात प्रवाह समजून घेण्यासाठी इतके सम्यक व सकारात्मक पुस्तक मराठीत तर अन्य कोणते नाहीच, पण अन्य भाषेतही क्वचितच एखादे असावे.

‘साता उत्तराची कहाणी’चा इंग्रजी अनुवाद करायला हवा- अशा प्रकारची सूचना अधून मधून पुढे येत होती, मात्र प्रधान सरांनी ते मनावर घेतले नव्हते. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांचे मित्र व विद्यार्थी श्रीकांत तांबे यांनी तो अनुवाद केला आणि नॅशनल बुक ट्रस्टने ते साडेपाचशे पानांचे पुस्तक ‘अ टेल ऑफ सेव्हन ॲन्सर्स’ या नावाने प्रकाशित केले. पण तोपर्यंत प्रधान सरांचे निधन झाले होते.

‘साता उत्तराची कहाणी’ ही प्रधान यांची ‘प्रधान शिल्लक’ राहणार हे उघड होते, आणि म्हणूनच कदाचित त्यांनी आपल्या अखेरच्या काळात ‘आठा उत्तराची कहाणी’ हे छोटे पुस्तक लिहायला घेतले. ‘साता उत्तराची कहाणी’ नंतरच्या पाव शतकातील म्हणजे 1980 ते 2005 या काळातील आठ विचारप्रवाह मध्यवर्ती ठेवून ते पुस्तक लिहिले आहे. काँग्रेस, समाजवादी, साम्यवादी, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पक्ष हे पाच राजकीय प्रवाह आणि सर्वोदयी, नक्षलवादी व मुस्लिम कार्यकर्ती हे तीन उपप्रवाह यांचा प्रतिसाद त्या पाव शतकातील घडामोडींना कसा राहिला, हे त्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘साता उत्तराची कहाणी’ लिहिली तेव्हा प्रधान सर वयाने साठीच्या आत होते आणि त्या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांनी पाच वर्षे दिली होती. ‘आठा उत्तराची कहाणी’ लिहिली तेव्हा त्यांच्या वयाची पंचाऐंशी वर्षे उलटली होती आणि अवघ्या पाच महिन्यांत ते पुस्तक त्यांनी लिहिले होते. त्यामुळे त्या दोन्ही पुस्तकांच्या दर्जात मोठा फरक राहणार हे साहजिक होते आणि ते त्यांनाही पूर्ण माहीत होते. पण तरीही एक मुद्दा शिल्लक राहतोच, तो असा की 1940 ते 2005 या 65 वर्षांचे देशाचे राजकारण- समाजकारण समजून घ्यायचे असेल तर प्रधानांची ही दोन्ही पुस्तके अभ्यासकांनी एकदा तरी नजरेखालून घालायला हवीत. (ही दोन्ही पुस्तके मौज प्रकाशनाकडून आली.)

1984 मध्ये सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यावर प्रधान यांनी साधना साप्ताहिकाचे संपादकपद (वसंत बापट यांच्यासह) घेतले. पुढील 14 वर्षांत, राजकीय विषयांवरील साधनातील संपादकीय लेख प्रामुख्याने प्रधान यांनी लिहिले आहेत. त्याच काळात ते पुण्यातील अनेक सभा-समारंभांना प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष या नात्याने जात असत. त्या निमित्ताने होणारी भाषणे आणि प्रासंगिक लेख साधनातून व अन्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होते, ते लेखन पुस्तकरूपाने आलेले नाही. मात्र, त्या काळात त्यांना तीन इंग्रजी पुस्तके लिहिण्यासाठी निमित्ते मिळाली. त्यातील दोन प्रस्ताव साहित्य अकादमीकडून आले. एक- राम गणेश गडकरी यांचे जन्मशताब्दी वर्ष आले तेव्हा त्यांच्यावर छोटे पुस्तक लिहिण्याचा आणि दुसरा प्रस्ताव कदाचित प्रधान सरांनीच दिला असावा, तो म्हणजे साने गुरुजी यांच्यावर छोटे पुस्तक लिहिण्याचा; कारण गुरुजींचीही जन्मशताब्दी जवळ आली होती.

तिसरे पुस्तक मात्र मोठे होते. 1987 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 40 वर्षे पूर्ण होणार होती, तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सांगणारे इंग्रजी पुस्तक लिहिण्याची स्पर्धा अखिल भारतीय स्तरावर घोषित झाली. त्या स्पर्धेसाठी प्रधान यांनी ‘इंडियाज फ्रीडम स्ट्रगल’ हे पुस्तक लिहिले, त्याला पारितोषिक मिळाले आणि 1990 मध्ये ते प्रकाशित झाले. प्रामुख्याने शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी समोर ठेवून लिहिलेल्या त्या पुस्तकाची विस्तारित अशी मराठी आवृत्ती स्वतः प्रधान यांनीच केली, ते पुस्तक ‘स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत’ या नावाने प्रकाशित झाले. त्याच्या अनेक आवृत्त्या साधना प्रकाशनाकडून आल्या. (पुढे त्या पुस्तकाचा हिंदी अनुवादही आला.)

त्या पुस्तकात 1857 ते 1947 हा 90 वर्षांचा देशाचा स्वातंत्र्यलढा आला आहे. त्यात एका बाजूला क्रांतिकारकांचे योगदान आणि दुसऱ्या बाजूला ‘टिळकपर्व’ व ‘गांधीपर्व’ असे दोन्ही प्रवाह आले आहेत. काँग्रेस अंतर्गत उपप्रवाहांची नोंदही घेतली आहे आणि पहिले व दुसरे महायुद्ध यांच्या परिप्रेक्ष्यात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे विवेचन केले आहे. शिवाय परिशिष्टामध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम (1948) आणि गोवा मुक्तिसंग्राम (1960) यावरही एकेक प्रकरण आहे. म्हणजे पूर्ण शंभर वर्षांचे विहंगमावलोकन करणारे ते पुस्तक आहे. प्रधानांनीच लिहून ठेवले आहे की, राष्ट्र सेवा दलात बौद्धिके घेताना तरुण विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढा समजावून सांगण्यासाठी मी नवनव्या स्त्रोतांचा अभ्यास करून व सोप्या पद्धतीने मांडणीसाठी तयारी करून जात असे. त्याचा फायदा हे पुस्तक लिहिताना झाला.

प्रधान सरांच्या आयुष्यातील अखेरचा टप्पा म्हणजे 1998 ते 2010 या बारा वर्षांचा. त्या काळात त्यांची डझनभर पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतील एक जयप्रकाश नारायण यांचे चरित्र व कार्य. ते पुस्तक जयप्रकाश यांच्या जन्मशताब्दी वर्षात 2001 मध्ये साधना प्रकाशनाकडून आले. त्यानंतर एम. एम. जोशी व नानासाहेब गोरे यांचे जन्मशताब्दी वर्ष अनुक्रमे 2004 व 2007 मध्ये आले तेव्हा, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून त्या दोघांवरील पुस्तके प्रकाशित झाली. त्याच दरम्यान ‘सत्याग्रही गांधीजी’ हे छोटे पुस्तक प्रेस्टिज प्रकाशनाकडून आले. प्रधान यांच्यासाठी एस. एम. व गोरे हे राजकीय गुरू होते, जयप्रकाश हे सार्वजनिक जीवनातील आदर्श होते आणि गांधीजी हे दैवत होते. त्यामुळे त्या चौघांविषयी लिहिताना प्रधानांच्या मनात भारावलेपण असणे साहजिक होते, तरीही वस्तुनिष्ठ म्हणावे असे ते लेखन झाले आहे. नसलेले गुण चिकटवण्याचा प्रयत्न त्यात केलेला नाही आणि त्यांच्या मर्यादा वा त्यांच्याकडून झालेल्या चुका दाखवण्याचा प्रयत्न सौम्य शब्दांत का होईना केलेला आहे.

अखेरच्या याच काळात प्रधानसरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचायला घेतले होते. आणि त्यातही चांगदेव खैरमोडे यांनी आंबेडकरांच्या साहित्याचे संपादित केलेले खंड वाचून प्रधानसरांनी ‘डॉ. आंबेडकर त्यांच्याच शब्दांत’ असे मुलाखतींचे सदर साधना साप्ताहिकात 2006 मध्ये लिहिले, नंतर त्याचे पुस्तक आले. ते काही प्रधानांचे स्वतंत्र लेखन म्हणता येणार नाही, पण डॉ. आंबेडकर यांच्या संदर्भात आपण काही लिहू शकलो नव्हतो ही त्यांची खंत काही प्रमाणात त्यामुळे कमी झाली. किंबहुना ते लेखन करताना प्रधानांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी झाली असावी किंवा कर्तव्यभावना प्रबळ झाली असावी.

असाच काहीसा प्रकार, ‘भारतीय राजकारणाचे दोन पैलू : लोकशाही आणि समाजवाद’ या पुस्तकाबाबतही झाला. लोकशाही आणि समाजवाद या दोन्ही आपल्या जीवननिष्ठा आहेत, असे मानणाऱ्या प्रधान सरांना अखेरच्या काळात त्या दोन्ही आघाड्यांवर भारतीय समाजाची झालेली पिछेहाट त्रासदायक वाटत होती, म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिले. पण त्या दोन्हींमधील बिघाड समजून घेण्यात व पुढील दिशा शोधण्यात आपल्याला अडचण येत आहे, असे त्यांना वाटत होते आणि दरम्यानच्या काळात त्यांच्या तब्येतीनेही असहकार पुकारायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते पुस्तक तसे अपूर्ण आहे, अस्पष्ट आहे.

याच काळात त्यांनी आणखी दोन छोटी पुस्तके इंग्रजीत लिहिली. एक ‘आचार्य जावडेकर : सत्याग्रही सोशलिस्ट’ आणि दुसरे ‘लेटर्स टु शिवानी’. पहिल्यात आचार्यांच्या विचारसृष्टीचा गाभा दाखवण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या पुस्तकात त्यांनी साने गुरुजींच्या ‘भारतीय संस्कृती’ या पुस्तकाचा गाभा, अगदी सोप्या पद्धतीने (इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या) आपल्या नातीला ‘पत्र’ या स्वरूपात मांडला आहे. ही दोन्ही पुस्तके लिहिताना आपल्याकडे साठलेले आणि जरा महत्त्वाचे व उपयोगी आहे ते बाहेर काढून ठेवले पाहिजे, अशी कर्तव्यबुद्धी प्रबळ झालेली दिसते आणि ती विशेष स्वागतार्ह आहे.

अखेरच्या काळातील दोन पुस्तके प्रधान यांच्या व्यक्तिमत्त्वातील एका महत्त्वाच्या गाभा-घटकाकडे लक्ष वेधणारी तर आहेतच, पण त्यांनी त्याकडे राजकारणाच्या धकाधकीमुळे दुर्लक्ष केले अशी खंतही वाटायला लावणारी आहेत. त्यातील एक आहे ‘टॉलस्टॉयशी पत्रसंवाद’. 2006 मध्ये त्यांनी 16 भागांची पत्रमालिका साप्ताहिक ‘सकाळ’मधून लिहिली आणि नंतर ती पुस्तकरूपाने ‘साधना प्रकाशना’कडून आली. तारुण्याच्या काळात त्यांनी रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांचे बरेच साहित्य वाचले होते आणि अखेरच्या काळात ते पुन्हा वाचले. त्यातून आलेली ही हृदयस्पर्शी व मार्मिक पत्रे आहेत. हे पुस्तक नंतर प्रधान सरांनी इंग्रजीत केले, ते पॉप्युलर प्रकाशनाकडून आले आणि त्यानंतर रशियन भाषेतही आले. असेच दुसरे छोटे पुस्तक म्हणजे ‘लेखणीचे ललित’. यात दोन विभाग आहेत. पहिल्या विभागात शेक्सपियरच्या सात नाटकांचे रसग्रहण करणारे लेख आहेत. तर दुसऱ्या विभागात सात गोष्टी आहेत, त्यातील तीन (सॉमरसेट मॉम, आंद्रे मोर्वा, चेकोव्ह यांच्या कथांवर) आधारित आहेत, तर चार स्वतंत्र आहेत. या दोन पुस्तकांतून प्रधान सरांचा इंग्रजी वाङ्‌मयाचा व्यासंग दिसतो आणि ते विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होते म्हणजे नेमके काय, याचा अंदाज बांधता येतो.

प्रधानांच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यातील विशेष महत्त्वाचे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मकथन ‘माझी वाटचाल’. कमालीचे वाचनीय असलेल्या या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचे धावते समालोचन चित्तवेधक पद्धतीने केले आहे. आईला संतचरित्रे वाचून दाखविण्याच्या निमित्ताने, महिपती या चरित्रकाराच्या सुबोध व रसाळ मराठी भाषेचा झालेला प्रभाव आणि हायस्कूलमध्ये असताना इंग्रजीचे शिक्षक वाय.जी. पटवर्धन यांचा प्रभाव, कुमारवयातील प्रधान यांच्यावर पडला हे त्यातून समजते. आणि त्यांच्या मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांतील अचूकतेची व प्रवाहीपणाची कारणमीमांसा हाती लागते. तरुण वयात वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्यांचा गाढ प्रभाव त्यांच्यावर होता हे समजते, तेव्हा त्यांच्यातील उदात्त ध्येयवादाचे उगमस्थान सापडते. त्याच काळात चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यांनी त्यांना प्रभावित केले, परिणामी तळागाळातील समूहांबद्दल त्यांच्या मनात कायम सॉफ्ट कॉर्नर राहिला. साने गुरुजींनी त्यांना झपाटून टाकले, एस. एम. व गोरे यांनी समाजवादाची दीक्षा दिली, गांधीनी जीवनदृष्टी दिली हे सर्व त्यातून फार नेमकेपणाने स्पष्ट होते. प्राध्यापकीची दोन दशके आणि विधान परिषदेतील दीड तप किती रोमांचक ठरले असेल हेही त्यातून कळते. आणि असे बरेच काही. हे पुस्तक पूर्ण वाचून होते तेव्हा प्रांजळ व पारदर्शी आत्मनिवेदन कसे असू शकते याचे उत्कृष्ट उदाहरण पुढे येते. विशेष म्हणजे या आत्मनिवेदनातून त्यांनी स्वत:च्या मर्यादा व क्षमता इतक्या नेमकेपणाने मांडल्या आहेत की, ‘आता यांच्यावर काय टीका करणार’, असा प्रश्न वाचकांच्या मनात येऊन जाईल. या पुस्तकाचा थोडा संक्षेप करून त्याची इंग्रजी आवृत्ती प्रधानांनीच केली आहे. ‘परसुट ऑफ आयडियल्स’ (आदर्शांचा पाठपुरावा) हे त्याचे नाव अधिक अन्वयार्थक आहे.!

(ग.प्र.प्रधान यांचे जन्मशताब्दी वर्ष 26 ऑगस्ट 2022 रोजी समाप्त होत आहे. त्यानिमित्ताने  ललित दिवाळी 2021 च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख येथे पुनर्मुद्रित केला आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे ( 124 लेख )
vinod.shirsath@gmail.com

मागील दोन दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके