डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हमीद दलवाई यांचे ‘विचार आणि साहित्य’ या विषयावर साहित्य अकादमीने 25 मे 2021 रोजी ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. न्या.हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात ओमप्रकाश नागर यांनी चर्चासत्रामागील भूमिका मांडली, एकनाथ पगार यांनी प्रास्ताविक केले. दलवाईंचे विचार व सामाजिक कार्य या विषयावर अन्वर राजन आणि अझरुद्दीन पटेल यांची भाषणे झाली. दलवाईंच्या ‘इंधन’ या कादंबरीवर नितीन रिंढे यांनी तर दलवाईंच्या कथा या विषयावर विनोद शिरसाठ यांनी भाषण केले. या चर्चासत्राचा सविस्तर वृत्तांत kartavyasadhana.in वर प्रसिद्ध केला आहे. मात्र दलवाईंच्या कथा हे लिखित भाषण येथे प्रसिद्ध करीत आहोत.  

नमस्कार, 

या चर्चासत्राचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा.हेमंत गोखले, चर्चासत्रात सहभागी अन्य वक्ते, साहित्य अकादमीचे मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.रंगनाथ पठारे, त्या समितीचे सदस्य एकनाथ पगार, साहित्य अकादमीचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर आणि मित्रहो! 

1932 ते 77 असे 44 वर्षांचे आयुष्य हमीद दलवाई यांना लाभले आणि त्यांच्या मृत्यूला आता 44 वर्षे होत आहेत. ते आज हयात असते तर 88 वर्षांचे राहिले असते. 

हमीद दलवाईंचे सार्वजनिक आयुष्य 1950 ते 77 असे जेमतेम पाव शतकाचे म्हणता येईल. त्याचे दोन भाग मानता येतील- लेखक आणि समाजसुधारक! त्यांच्यातील लेखकाचेही दोन भाग करता येतील. ललित लेखक आणि वैचारिक लेखक. सार्वजनिक जीवनाच्या पूर्वार्धात त्यांनी प्रामुख्याने ललित लेखन केले आणि उत्तरार्धात वैचारिक लेखन केले. त्यांनी केलेल्या ललित लेखनाचे दोन प्रकार - कथा आणि कादंबरी. 

1952 ते 66 या चौदा वर्षांच्या काळात दलवाईंनी एक कादंबरी ‘इंधन’ आणि 40 कथा लिहिल्या. आज या कार्यक्रमात मी ‘दलवाईंच्या कथा’ या विषयावर बोलावे, असे निमंत्रण साहित्य अकादमीने दिले आहे. 

माझ्यासाठी 17 मिनिटे इतका वेळ दिलेला असल्याने खूप तपशिलात जाता येणार नाही. मात्र दलवाईंच्या कथांचा गाभा व आवाका सांगून, त्यांचे वेगळेपण दाखवून, त्यांची कालसुसंगतता अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण सुरुवातीलाच या विषयावरील वक्ता म्हणून बोलताना माझी मुख्य मर्यादा आणि मुख्य बलस्थान सांगणार आहे; म्हणजे माझ्या या विवेचनाकडे कोणत्या चौकटीत श्रोत्यांनी पाहावे हे स्पष्ट होणार आहे. 

तर... मोठी मर्यादा अशी की, मराठी कथा व कादंबऱ्या मी बऱ्यापैकी वाचल्या असल्या तरी मराठी साहित्याचा अभ्यासक, समीक्षक वा प्राध्यापक मी नाही. त्यामुळे दलवाईंच्या कथांची साहित्याच्या अंगाने समीक्षा मला करता येणार नाही. 

... आणि मोठे बलस्थान असे की, हमीद दलवाई यांच्या एकूण कारकिर्दीत ‘साधना’ साप्ताहिक व साधना परिवार यांचा मोठा सहभाग राहिला आहे; त्या साप्ताहिकाचा संपादक या नात्याने मागील सात-आठ वर्षे मी कार्यरत आहे. या काळात हमीद दलवाईंची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी साधनाने बरेच काही केले आहे. म्हणजे दलवाईंचे व त्यांच्यावरचे प्रकाशित व अप्रकाशित लेखन नव्याने लोकांसमोर आणणे, त्यांच्याच पुस्तकांच्या अनुवादाला प्रोत्साहन देणे आणि त्यावर चर्चा-परिसंवाद घडवून आणणे असे बरेच काही. त्या सर्व प्रक्रियेच्या केंद्रस्थानी राहिल्याने दलवाईंचे सर्व प्रकाशित व अप्रकाशित लेखन माझ्याकडून वाचून झाले आहे. 

दलवाईंच्या सर्व 40 कथा वाचलेल्या आहेत असे आजच्या घडीला खूपच कमी लोक असतील. याचे कारण असे की, अवघ्या पाच वर्षांपूर्वीपर्यंत हमीद दलवाईंच्या कथा म्हटले की 13 कथांचा ‘लाट’ हा एकमेव कथासंग्रह वाचकांसमोर होता. 2015 मध्ये दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी जे जुने बाड साधनाकडे सोपवले त्यातून पूर्वप्रसिद्ध- पण असंग्रहित अशा 11 कथांचा संग्रह ‘जमीला जावद’ या नावाने आम्ही प्रकाशित केला. त्यानंतर हाती आलेल्या 16 पूर्वप्रसिद्ध कथांचा संग्रह लवकरच ‘वंगण’ या नावाने साधना प्रकाशनाकडून येणार आहे. म्हणजे 1961 मध्ये ‘लाट’ आणि त्यानंतर 55 वर्षांनी- 2016 मध्ये ‘जमीला जावद’ आणि त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 2021 मध्ये- ‘वंगण’. या तीन कथासंग्रहांत मिळून दलवाईंच्या 40 कथा आहेत. (पूर्वप्रसिद्ध मात्र अद्याप हाती लागलेल्या नाहीत, अशा कथांची संख्या पाच ते दहा यांपेक्षा जास्त असण्याची शक्यता नाही.) 

तर या 40 कथा मी आधी वाचल्या, त्या त्यांचा आस्वाद घेण्यासाठी; नंतर वाचल्या त्या त्यांचे संग्रह प्रकाशित करण्यासाठी व अन्य कार्यक्रम-उपक्रमांसाठी आणि अर्थातच दलवाईंचे मानस समजून घेण्यासाठी. त्यातून ठळकपणे पुढे आलेले काही मुद्दे इथे नोंदवतो. 

1. दलवाईंच्या या कथा 1952 ते 66 या चौदा वर्षांच्या काळात लिहिल्या गेल्या, म्हणजे दलवाईंनी वय वर्षे 20 ते 34 या काळात त्या कथा लिहिल्या. त्यालाच जोडून हेही लक्षात घेतले पाहिजे की, 1965 मध्ये त्यांनी ‘इंधन’ ही कादंबरी लिहिली. ती बरीच गाजली. त्यानंतर त्यांनी कथालेखन जवळपास थांबवलेच आणि कादंबरी म्हणून ‘इंधन’ ही एकमेवच. 

2. दलवाईंच्या सर्व 40 कथा विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यातील 15 कथा श्री.पु.भागवत संपादक होते त्या ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. उर्वरित कथा धनुर्धारी, नवयुग, मराठवाडा, साधना, वसुधा इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे संपादक अनुक्रमे प्रभाकर पाध्ये, आचार्य अत्रे, अनंतराव भालेराव, यदुनाथ थत्ते, विजय तेंडुलकर हे रथी-महारथी होते. वर उल्लेख केला आहे ती नियतकालिके, त्यांचे संपादक आणि तो काळ म्हणजे मराठी नवकथा उदयाला आल्यानंतरची दोन दशके समोर ठेवली, तर दलवाईंच्या कथांचा दर्जा निर्विवादपणे ‘उत्तम’ होता, हे त्या कथा वाचलेल्या नाहीत असा साहित्याचा वाचकही म्हणू शकेल. 

3. दलवाईंच्या अर्ध्या कथांना कोकणची म्हणजे ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे आणि साधारणत: अर्ध्या कथांना मुंबई शहराची. अर्थातच काही कथांना ग्रामीण व शहरी अशा दोन्ही प्रकारची पार्श्वभूमी कमी-अधिक प्रमाणात आहे किंवा कमी-अधिक संदर्भ तरी आहेत. आणि ते संदर्भ इतके अस्सल व चपखल आहेत की, वाचक त्या त्या वातावरणाशी पूर्णत: समरस होतो; मात्र लेखक किंवा निवेदक त्या दोन्ही ठिकाणी उपरा आहे, अलिप्ततेच्या भावनेने वावरतो आहे हे भान त्या कथा वाचताना कधीही सुटत नाही. 

4. दलवाईंच्या लेखनातील भाषेची विशेष नोंद घेतलीच पाहिजे. त्यांच्या काही कथांमधील संवादात कोकणातील मराठी आणि त्या वेळच्या मुस्लिम कुटुंबात बोलली जात असेल ती मराठी यांची झलक पाहायला मिळते. मात्र उर्वरित निवेदन वा वर्णन प्रमाण मराठीत आहे आणि ही प्रमाण मराठी इतकी प्रवाही आहे, त्यातील शब्दरचना व वाक्यरचना इतकी नेमकी आहे की, केवळ उत्तम भाषा हा निकष लावला तरी दलवाईंचा समावेश मराठीतील आघाडीच्या लेखकांमध्ये करावा लागेल. आणि त्यातही अधिक विशेष हे आहे की, त्यांच्या बहुतांश कथांमध्ये ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ पसरलेला आहे. शिवाय त्यांच्या भाषेत व लेखनात पाल्हाळ व पसरटपणा यांना किंचितही स्थान  नाही. एखादा चित्रकार जसे रेषांचे माफक फटकारे मारून अर्थपूर्ण व आकर्षक रेखाचित्र काढतो आणि समोरच्याला चकित करतो, तसे दलवाईंच्या लेखनात कित्येक ठिकाणी जाणवते आणि याचे एक कारण त्यांची भाषा. 

5. दलवाईंच्या वैचारिक लेखनात समाज व देश घडवणारे असामान्य नेते व बुद्धिवंत असतात. मात्र त्यांच्या कथालेखनात सर्वसामान्य माणसेच आहेत, त्यांचे आर्थिक व शैक्षणिक स्तर विविध असले तरी! (रझिया पटेल यांना ही गोष्ट विशेष भावलेली आहे.) कोकणातील माणसे वा व्यक्तिरेखा मिरजोळी व चिपळूण या गाव-परिसरातील आहेत; तर मुंबई शहरातील व्यक्तिरेखा प्रामुख्याने झोपडपट्टीतील किंवा आजच्या परिभाषेत कनिष्ठ- कनिष्ठ मध्यमवर्गातील म्हणता येतील अशा आहेत. हे वातावरण व या व्यक्तिरेखा मुस्लिम समाजाशीच संबंधित जास्त आहेत. मात्र त्यांची सार्वत्रिकता निर्विवाद आहे! 

6. ‘लाट’ हा कथासंग्रह 1961 मध्ये साधना प्रकाशनाकडून आला, नंतर मंजुळ प्रकाशनाकडून. त्यातील सर्व 13 कथा ‘सत्यकथा’ मासिकातील आहेत. (अर्थात, तीन कथांचे नेमके संदर्भ अद्याप सापडले नाहीत.) दलवाई 29 वर्षांचे होते तेव्हा तो संग्रह आला. त्याची नवी आवृत्ती मौज प्रकाशनाकडून दलवाईंच्या मृत्यूनंतर आली, तेव्हा त्याला साधनाचे तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते यांनी छोटीच, पण दलवाईंच्या कथालेखनाचा गाभा पकडणारी प्रस्तावना लिहिली आहे. तिच्यातील एक परिच्छेद इथे उद्‌धृत करतो, म्हणजे माझे उर्वरित काम सोपे होईल. 

यदुनाथ थत्ते- ‘‘हमीदने वैचारिक लिखाण केले, तसे ललित लेखनही केले. ते दोन्ही प्रवाह सरमिसळ झालेले आढळतील. हमीदच्या वैचारिक साहित्याचे वेगळेपण त्याच्या वास्तवाच्या सम्यक आकलनात आणि निर्भय मांडणीत दिसून येते. तीच गोष्ट त्याचे ललित साहित्य  वाचतानाही जाणवते. त्याचे मानवी भावजीवनाचे आकलन सम्यक वास्तवावर आधारलेले आहे. तो मुस्लीम समाजात वावरला, वाढला. त्या समाजातील विविध रसधारा त्याने पाहिल्या, चाखल्या. इतर मुस्लीम लेखकांप्रमाणे आपला समाज वगळून त्याने फारसे लिहिले नाही. त्याच्या काव्यात्म सत्याच्या मुळाशी वास्तव सत्य ठाम उभे असते. त्याने माणसे बेचैन, प्रक्षुब्ध झाली तरी ते वास्तव सत्य नाकारणे कोणालाच शक्य नसते.’’ 

यदुनाथांनी त्याच प्रस्तावनेत केलेले भाष्य असे आहे, ‘‘हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्याच्या वैचारिक साहित्यात घुसले आहे.’’ 

मित्रहो, दलवाईंचे ललित व वैचारिक लेखन आणि त्यांचे समाजसुधारणेचे कार्य यांच्या खंबीर पाठीराख्यांमध्ये यदुनाथांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी दलवाईंना अखेरची 20 वर्षे सर्व प्रकारची साथसंगत केली आहे, म्हणून यदुनाथांचा अभिप्राय अधिक महत्त्वाचा. शिवाय तीन वर्षांपूर्वी ‘दलवाईंच्या 24 कथा’ या विषयावर साधनाने विनय हर्डीकर यांचे भाषण आयोजित केले होते, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘खरे म्हणजे यदुनाथांची दोन पानांची ती प्रस्तावना वाचली तर दलवाईंच्या कथांविषयी वेगळे भाषण करण्याची गरज राहत नाही.’’ 

7. तर अशा या यदुनाथांनी ‘दलवाईंच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यात शिरले आहे’, या विधानाचे स्पष्टीकरण दिलेले नाही. पण दलवाईंचे वैचारिक साहित्य वाचले असेल तर ठळकपणे पुढे येणारा मुद्दा असा की, केवळ मुस्लिम समाजच नाही तर एकूण भारतीय समाज विज्ञाननिष्ठ, धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आणि आधुनिक व्हावा, अशी दलवाईंची इच्छा होती. त्यासाठी जुन्या जाचक रूढी-परंपरांमधून समाजाला बाहेर काढावे, व्यक्तिस्वातंत्र्य व समता ही मूल्ये समाजात रुजावीत असा ध्यास त्यांना लागला होता. धर्म ही व्यक्तिगत बाब म्हणून समाजात राहावी आणि धर्मातील इष्ट-अनिष्ट आधुनिक मूल्यांच्या निकषांवर तपासून ती स्वीकारावी वा नाकारावी अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी भारतीय संविधान प्रमाण मानले जावे, याबाबत ते आग्रही होते. 

8. दलवाईंच्या वैचारिकतेचा हा गाभा लक्षात घेतला आणि त्यांच्या कथा वाचल्या तर असे लक्षात येते की, यदुनाथ म्हणताहेत ते खरे आहे. वैचारिक लेखन आधी वाचून नंतर या कथा वाचल्या तर असे लक्षात येईल की, त्या विचारांचेच केवळ नव्हे, तर त्यांनी हाती घेतलेल्या मुस्लिम समाजसुधारणांचे प्रतिध्वनी या कथांमध्ये ऐकायला येतील. मात्र वैचारिकता माहीत नसणाऱ्याने त्या कथा वाचल्या तर तशा काही विचारांच्या प्रतिपादनासाठी या कथा लिहिल्या गेल्या आहेत असा संशयदेखील कोणाला येणार नाही. 

मित्रहो, दलवाईंच्या कथांविषयी इतके कुतूहल निर्माण केल्यानंतर त्यांच्या काही कथांचा माफक संदर्भांसह नामोल्लेख करून मी हे भाषण संपवतो. 

दहा रुपयांची नोट- ही कथा दलवाईंनी लिहिली 1952 मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी. त्यात श्रीराम आणि करीम या दोन मित्रांची वाटचाल दिसते. श्रीराम हा गावात राहूनही ‘स्व’च्या पलीकडे जाऊन समाजासाठी काही करून इच्छितो आहे, तर करीम मात्र मुंबईत जाऊनही स्वत:च्या उपजीविकेचा प्रश्नच नीट सोडवू शकलेला नाही. ही कथा गावाच्या दारिद्य्राची आहे; त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणाऱ्यांची आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची उभारणी करताना हिंदू व मुस्लिम यांच्या स्थितीगतीकडे लक्ष वेधणारी आहे. 

बाबूखानचा ग्रामोफोन- ही दलवाईंनी लिहिलेल्या बहुदा शेवटच्या तीन-चार कथांपैकी असावी. 1966 मध्ये प्रसिद्ध झालेली. यातही गावाचे संथ जीणे व गरिबी हटत नाही, त्यामुळे बाबूखान हा तरुण गावातील कंटाळवाणे जीणे सोडून शहराची वाट धरतो. या कथेत ‘ग्रामोफोन’ हा प्रतिक बनला आहे, त्याला नवे व प्रगतीशील जीवनाची दिशा दाखवणारा. 

छप्पर- या कथेतील करीम आपले आई, वडील, बहिणी परंपरेच्या ओझ्याखाली दबल्या गेलेल्या पाहतो, त्यांना बाहेर काढताच येणार नाही अशी हतबलता अनुभवतो. जुने छप्पर उद्‌ध्वस्त केल्याशिवाय यांचे जीवन सुसह्य होणार नाही असे मानतो आणि तरीही त्या प्रयत्नात स्वत:च संपून जातो. जुन्या रूढी-परंपरा व समाजमनातील अज्ञान सहजासहजी जाणार नाही, अशी जाणीव ही कथा देते. इथे छप्पर हे रूपक आहे, जुन्या समाजव्यवस्थेचे. 

पराभूत- एक सुशिक्षित शालीन स्त्री मसूदखान या एका आडदांड व फसवणाऱ्या माणसाच्या घरात चौथी-पाचवी बायको म्हणून येते आणि मुस्तफा व तिच्या शेजाऱ्यांकडून तिला त्याच्याविषयी खरे खरे सर्व सांगितले जाते तरी ती तिथेच नांदते हे पाहून आणि तिचेही भविष्य अनिश्चित आहे हे जाणून मुस्तफा पराभूत भावनेने पछाडला जातो. 

कफनचोर- ही कथा स्मशानात जाऊन प्रेताला गुंडाळलेले नवे कापड चोरून आणून व धुवून गावातील दुकानदाराला चोरून विकणाऱ्या रसूलची आहे. दारिद्य्राचे असे व इतके भयानक दर्शन कोणाही वाचकाला हलवून सोडते. (ही कथा वाचल्यावर काहींना अण्णा भाऊ साठे यांची ‘स्मशानातील सोने’ ही कथा आठवेल.) 

कोल्हा आणि कोकरू- ही कथा हैदर नावाच्या माणसाची आहे. गरिबी, फसवणूक, अज्ञानातून येणारी हतबलता आणि हावरटपणामधून येणारी अमानुषता याचे चित्रण करणारी आहे. ही कथा वाचून झाल्यावर वाचक स्तब्ध होऊन जातो. धर्म- (ही कथा न्या.गोखले यांना विशेष महत्त्वाची वाटत आली आहे.) देशाची फाळणी झाल्यावर भारतातच राहिलेल्या, पण आता आपण राज्यकर्ते राहिलेलो नाही, या भावनेने तळमळणाऱ्या खानसाहेबांची कहाणी सांगते. खुदा हाफिज- ही कथा तशाच भावनेने वावरणाऱ्या एका तरुणाची आहे. तेलंगणामध्ये कम्युनिस्टांनी केलेल्या उठावात सामील होऊ पाहणाऱ्या सद्रुद्दीन या तरुणाची वाताहत; त्याचबरोबर त्याचा बाप उबेदुल्लाची हतबलता, इथे पाहायला मिळते. 

आहमद- ही 1958 च्या साधना बालकुमार अंकात आलेली एका आठ-नऊ वर्षांच्या शालाबाह्य मुलाची कथा आहे. ‘फॅन्ड्री’ सिनेमातील जब्याने भिरकावलेला दगड प्रेक्षकांना आपल्यावरच फेकला आहे असे वाटते. अगदी तसेच, आहमदने शाळेतील मुलांच्या दिशेने भिरकावलेले दगड आपल्याच दिशेने आलेत, असे कोणत्याही संवेदनशील वाचकाला वाटू शकते. 

अशी बरीच यादी देता येईल. ‘तळपट’ आणि ‘शेरणं’ या कथा ग्रामदेवतांवरील श्रद्धांच्या संदर्भात मार्मिक भाष्य करतात. ‘ब्राह्मणांचा देव’ ही कथा ‘हिंदू-मुस्लिम’ समुदायातील सौहार्द व तणाव यांची आठवण एकाच वेळी करून देते. ‘माणूस आणि गाढव’ ही कथा मात्र अगदीच वेगळी आहे, शेतकरी संघटनेने नंतर उपस्थित केलेला शेतमालाच्या दराचा मुद्दा दलवाईंनी इथे कलात्मक व विनोदी ढंगाने मांडला आहे. 

शेवटी तीन मुद्दे अधोरेखित करतो आणि थांबतो. ‘लाट’ या पुस्तकात त्याच शीर्षकाची कथा आहे, त्या कथेची नायिका सुमित्रा गोखले आहे. ‘जमिला जावद’ या संग्रहात त्याच शीर्षकाची कथा आहे, तिची नायिका जमिला आहे. आणि ‘वंगण’ या कथेतही तशी एक नायिका आहे. ‘लाट’ हे पुस्तकाचे नाव दलवाईंनी निवडले असणार किंवा अन्य कोणी सुचवले म्हणून मान्य केले असणार. ‘जमिला जावद’ व ‘वंगण’ या पुस्तकांची नावे प्रस्तुत संपादकाने निश्चित केली, पण दलवाईंचे मानस लक्षात घेऊन किंबहुना दलवाई आज हयात असते तर त्यांनी काय मान्य केले असते, याचा अंदाज घेऊन! तर या तीनही कथांच्या नायिका सुशिक्षित आहेत, नवा व वेगळा विचार करणाऱ्या आहेत, बंदिस्त वातावरणामुळे त्यांना भरारी घेण्यात अडथळे आहेत, मात्र तशी आकांक्षा त्या बाळगून आहेत. दलवाईंच्या अनेक कथांच्या मध्यवर्ती स्त्रिया आहेत. त्या बदलांच्या मोठ्या वाहक होऊ शकतात, मात्र त्यांच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण केले जातात असा अर्थ त्या कथांच्या केंद्रस्थानी आहे, असे म्हणता येते. 

दुसरा मुद्दा असा की, दलवाईंच्या अनेक कथांमध्ये जुन्या रूढी व परंपरा यांचा काच व त्यामुळे समाजजीवनाला आलेला बंदिस्तपणा दाखवतात. त्याचे प्रमुख कारण धर्माचे जोखड. मग तो धर्म कोणताही असो, हिंदू वा मुस्लिम. धर्मा-धर्मांमध्ये आंतरिक सलोखा असतो, परंतु त्यांच्यात ताणतणाव होण्याच्या शक्यताही अधूनमधून निर्माण होत असतात; शिवाय धार्मिक वातावरणामुळे सामाजिक सलोखा निर्माण होण्यास हातभार लागत असला तरी, धर्मामुळेच समाजजीवनाला साचलेपणही आलेले असते, असा आशय पुन:पुन्हा सूचित होतो. 

तिसरा मुद्दा असा की, दलवाईंच्या लेखनातील सर्व व्यक्तिरेखा मग त्या अन्यायग्रस्त वा अन्याय करणाऱ्या असोत किंवा सहनशील वा बंडखोरी करणाऱ्या असोत, प्रतिगामीत्वाचा अहंकार मिरवणाऱ्या असोत वा आधुनिकतेच्या दिशेने जाण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या असोत... त्या सर्व व्यक्तिरेखा एवढेच नव्हे तर त्या प्रकारचे पर्यावरण वा सभोवताल भारताच्या व जगातील अनेक अविकसित देशांच्या कानाकोपऱ्यांत आजही आहे, मात्र शोधक नजरेने ते पाहता यायला हवे. त्या अर्थाने दलवाईंच्या कथांची सार्वत्रिकता खूप जास्त आहे. या कथा अन्य देशी-विदेशी भाषांमध्ये गेल्या तर त्याचा प्रत्यय येईल, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही. 

हमीद दलवाई यांचे कथात्म आणि वैचारिक साहित्य 'अ‍ॅमेझॉन'वर व 'किंडल'वर उपलब्ध आहे.

Tags: कर्तव्य साधना चर्चासत्र सामाजिक सलोखा मराठी साहित्य भाषण साहित्य अकादमी कादंबरी मुस्लीम हमीद दलवाई कथा मराठी वाङ्मय इंधन यदुनाथ थत्ते विनोद शिरसाठ विनय हर्डीकर मराठी कथा साहित्य हेमंत गोखले sahitya academy seminar on hamid dalwai sahitya akdemi vinay hardikar yadunath thatte hemant gokhale speech vinod shirsath short stories marathi katha marathi literature hamid dalwai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके