डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मोनोलॉग नव्हे, डायलॉग... 'जीवनाशी संवाद'

मधु दंडवते यांच्या 'जीवनाशी संवाद' ('डायलॉग विथ लाइफ'चा मराठी अनुवाद) या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 21 जानेवारी 2006 रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात पार पडला. त्या कार्यक्रमाचा हा संक्षिप्त वृत्तांत…

ध्येयधुंद संसदपटू मधु दंडवते यांना आपल्या मृत्युची चाहूल लागली होती... त्यांनी आपल्या 'डायलॉग विथ लाइफ' या शेवटच्या (दहाव्या) पुस्तकाचं प्रकाशन 9 ऑक्टोबर 2005 रोजी दिल्लीत माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या हस्ते केलं... त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कुमुद करकरे यांनी करावा आणि ते पुस्तक 21 जानेवारी 2006 रोजी म्हणजे त्यांच्या जन्मदिनी प्रसिद्ध करावं अशी इच्छाही त्यांनी जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त केली होती... 12 नोव्हेंबर 2005 रोजी त्यांचं निधन झाल्यावर 'साधना’ प्रकाशनाने ते पुस्तक अनुवादित स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी 21 जानेवारी 2006 ही तारीख जांहीर करूनही टाकली. त्यामुळे 200 पानी इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद अवघ्या दीड महिन्यांत पूर्ण करण्याचं अवघड आव्हान कुमुदताई करकरे यांच्यापुढे आणि पंधरा दिवसांत 'साधना’ साप्ताहिकाचं काम सांभाळून पुस्तक निर्मिती करण्याचे आव्हान सत्यजित वैद्य व सुरेश माने या 'साधना 'च्या दोन सहकाऱ्यांपुढं उभं राहिलं... पण जराही गडबड-गोंधळ न करता, त्यांनी हे काम शिस्तबद्ध रीतीने 18 जानेवारीला संपवलं आणि 20 जानेवारीला सदर पुस्तक प्रकाशनासाठी व विक्रीसाठी तयार ठेवलं...

21 जानेवारी 06 रोजी संध्याकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन समारंभ सुरू झाला... ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली, 'साधना’चे कार्यकारी विश्वस्त सदानंद वर्दे व एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे कोषाध्यक्ष किशोर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे व विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या हस्ते 'जीवनाशी संवाद' (डायलॉग विथ लाईफ) पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचवेळी वासू देशपांडे यांनी नाथ पै यांच्या निवडक पत्रांचे संपादन केलेल्या 'सांगाती या पुस्तकाचे प्रकाशनहीं प्रा. जाधव यांनी केले... 'साधना'चे संपादक नरेंद्र दाभोलकर यांनी प्रास्ताविक केले.

“जीवनाशी संवाद' व 'सांगाती' या पुस्तकांची निर्मिती करताना आम्हांला काळाशी स्पर्धा करावी लागली" या एकाच वाक्यात त्यांनी पुस्तक-निर्मितीच्या धावपळीचं वर्णन केलं...

मधु दंडवते गेल्यानंतर एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या अध्यक्षपदावर आलेल्या किशोर पवारांनी सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं...

प्रास्ताविक करताना प्रा. वर्दे म्हणाले, "नाथ पै व मधु दंडवतेच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. लेनिनचा मृत्युदिवस 21 जानेवारी 1924 आणि मधुचा जन्मदिवसही 21 जानेवारी 1924 असल्याने मधु, कधी-कधी गमतीने म्हणत असे, "एक पर्व संपलं आणि दुसरं पर्व सुरू झालं...' या क्षणी माझ्या मनात मधुच्या अनंत आठवणींचा कल्लोळ आहे... 1971 मध्ये बॅ. नाथ पै यांचं अकस्मात निधन झाल्यावर, त्यांच्या राजापूर या मतदारसंघातून मधु दंडवते सलग पाच वेळा निवडून आले. पार्लमेंटमधील भाषणांमुळे 'ध्येयधुंद संसदपटू' म्हणून मधु दंडवतेंची ओळख निर्माण झाली.

‘Echoes in Parliament' या नावाने प्रसिद्ध झालेला, त्यांच्या भाषणांचा संग्रह याची साक्ष देईल. अव्वल दर्जाचा वक्ता, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, नियोजन मंडळाचा उपाध्यक्ष अशा मोठ्या पदांवर जाऊनही दंडवतेना सत्तेची मिजास नव्हती; ते शेवटपर्यंत कार्यकर्तेच राहिले. शेवटची निरवानिरव त्यांच्यातल्या उदात्तपणाची उदाहरणं आहेत. देहदानाचा निर्णय आणि दिल्लीतलं सरकारी घर एक महिन्याच्या आत खाली करून देण्याची सूचना त्यांनी आपल्या चिरंजीवाला (उदयला) केली होती. सर्व पत्रव्यवहार 'नेहरू मेमोरिअल' लायब्ररीला आणि ग्रंथसंपदा 'नाथ पै सेवागण'ला द्यावीत असंही त्यांनी सांगितलं होतं. वृंदावन दंडवते व इतरांनी तशी व्यवस्था केली आहे... मधुने आपल्या आप्तेष्टांसाठी काहीही ठेवलेलं नाही!... याच सभागृहात आपण त्यांची भाषणं ऐकली असतील... 'आणीबाणी’च्या प्रश्नावरून मधुने इंदिरा गांधींवर घणाघाती टीका केली. पण इंदिराजींच्या मृत्युनंतर मधुने संसदेत केलेलं भाषण फारच भावनात्मक व परिणामकारक झालं होतं. अशा त्या मधुच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे...”

सदानंद वर्दे यांच्या प्रास्ताविकानंतर नाथ पै यांची पत्रं असलेल्या 'सांगाती' या पुस्तकाचे संपादक वासू देशपांडे म्हणाले, "नाथ पै यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना पाठवलेली पत्र, या संग्रहात आहेत. यात बेळगाव प्रश्नावर नेहरूंना पत्र आहे. नेहरू गेल्यावर इंदिराबाईंना पत्र आहे. यशवंतरावांनी बेळगाव कारवारसह विशाल गोमांतकाच्या कल्पनेला विरोध केल्याने ते प्रकरण बारगळलं. नाथ पै यांचा अकस्मात मृत्यू झाल्यावर ना. ग. गोरे नाथच्या पत्नीला (क्रिस्टलला) म्हणाले, 'तू राजापूरमधून निवडणुकीला उभी रहा.' त्या म्हणाल्या, 'माझी पात्रता नाही.' गोरेंना त्या पुढे हेही म्हणाल्या, 'लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीला निवडणुकीसाठी उभे राहण्याचा आग्रह झाला होता; पण त्यांनी, 'हे माझे काम नाही व माझी प्रवृत्तीही नाही', असं सांगितलं होतं. मधु दंडवते उमेदवार ठरले तेव्हा ते क्रिस्टलला भेटायला गेले. तेव्हा नाथने निवडणुकीसाठी जमवलेले दहा हजार रुपये क्रिस्टलने दंडवतेंना दिले (1971 साली)... नाथचा पत्रव्यवहार त्यांनी मला दिला, तोच आज पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे."

वासू देशपांडेंच्या मनोगतानंतर किशोर पवार यांची अकरावीत शिकत असलेली नात कृष्णा एम.डी. ही नाना आजोबा (मधु दंडवते) व काका आजोबा (किशोर पवार) यांच्या मैत्रीमुळे तिला दंडवतेंचा जो सहवास मिळाला त्याबद्दल सांगण्यासाठी व्यासपीठावर आली. "नाना आजोबा व काका आजोबा यांची 60 वर्षांची मैत्री होती. त्यांच्या आवडीत मात्र फारसं साम्य नव्हतं. नाना आजोबा क्रिकेटचे शौकीन होते, काका आजोबा नव्हते. दिल्लीहून फोन करून नाना आजोबा, माझ्या आजीला 'स्कोअर’ सांगत असत... मला ते सुपर-हिरो वाटत. गोवामुक्ती संग्रामात झालेल्या लाठीहल्ल्याची आठवण त्यांनी मला सांगितली होती. त्यांना पोर्तुगीज पोलिसांनी बंदुकीच्या दस्त्याने मारहाण केली होती. त्यावेळी त्यांना पायात लोखंडी सळ्या टाकाव्या लागल्या. त्यामुळे ते म्हणत ‘I am a steel man!' दिल्लीला मी त्यांच्याबरोबर जात असे तेव्हा रेल्वे स्टेशनवरील कर्मचारी धावत येत असत आणि नाना आजोबांना तब्येतीविषयी विचारीत... उदय मामाने मला दिलेला त्यांचा चष्मा व काठी मी जपून ठेवणार आहे!"

छोट्या कृष्णा एम. डी. चं हृदयस्पर्शी मनोगत झाल्यावर दाभोलकरांनी कोपरखळी मारली - 'साठ वर्षे या दोन आजोबांची मैत्री टिकली, हे समाजवादी परिवारात विशेष आहे...' ग. प्र. प्रधान सरांच्या 'Persuites of Ideals' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रा. रा. ग. जाधव सरांनी फारच प्रभावी भाषण केलं होतं, याची आठवण करून देऊन दाभोलकरांनी प्रा. जाधव सरांना भाषणासाठी आमंत्रित केलं... संथ लयीत पण स्पष्ट आवाजात जाधव सरांनी सुरुवात केली आणि पुढचा अर्धा तास सभागृह अक्षरशः ताब्यात घेतलं.

"बॅ. नाथ पै व मधु दंडवते या समाजवादाच्या भारतीय कुल-शीलाच्या दोन आदर्शांना मनःपूर्वक अभिवादन करतो. मधु दंडवते हा ग्रंथांवर प्रेम करणारा माणूस होता. ते आज आपल्यात असते तर 'जीवनाशी संवाद’ मधील आत्मसंवादाचं दर्शन त्यांनी आपल्याला घडवलं असतं. पण आपण तेवढे भाग्यवान ठरलो नाही. हे पुस्तक प्रकाशित करण्याचा मान मला दिला म्हणून मी संयोजकांचे आभार मानतो. 'डायलॉग विथ लाइफ’च्या सरस अनुवादाबद्दल मी कुमुद करकरे यांचे अभिनंदन करतो. इंग्रजीतील राजकीय परिभाषा पेलण्याची क्षमता मराठी भाषेत आहे, हे या अनुवादाने सिद्ध केलं आहे. दुसरं म्हणजे दंडवते शैलीदार लेखक होते, त्यांना वाङ्मयाची जाण होती, पण हे पुस्तक अतिशय मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलं आहे. यात भावनाप्रधानता नाही, कारण ते वैज्ञानिक मनोवृत्तीचे होते.. मूळ पुस्तक 'डायलॉग विथ लाइफ' मधील 'डायलॉग' ही पोलिटिकल टर्म आहे. 'डायलॉग’ हे लोकशाही जीवनाचं महत्त्वाचं संसाधन आहे. ताणतणावांचे नियंत्रण करणारी, वाटाघाटीच्या माध्यमातून प्रश्न सोडविणारी पद्धती म्हणजे लोकशाही... ही लोकशाही दंडवतेच्या रक्तामध्ये भिनली होती. हे पुस्तक त्यांचं आत्मचरित्र नाही, त्यांच्या आठवणीही नाहीत.

गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवर केलेलं त्यांचं हे भाष्य आहे, चिंतन आहे. आत्मकथनात जीवनातील रस संपल्याचा भाव असतो. या पुस्तकाचा लेखक मात्र कारकीर्द संपल्यामुळे अस्वस्थ आहे. सांजवात लावून लिहिलं जातं तसं हे पुस्तक नाही... यात धग आहे - वर्तमान, भूत व भविष्यकाळाची... खाजगी जीवनाचे उल्लेख यात नाहीत. मांडणीसाठी आवश्यक तितकेच तपशील दिले आहेत. प्रमिलाताई गेल्यावर 'मोठी पोकळी निर्माण झाली' इतकंच भाष्य आहे. प्रेम भसीन यांना हे पुस्तक अर्पण केलंय, पण प्रेम भसीन यांच्याविषयी पुस्तकात काहीच माहिती नाही.

संवादाची सुरुवात, '21 जानेवारी 1924 रोजी अहमदनगर येथे माझा जन्म झाला', अशी केली आहे आणि शेवट, 'हा खेळ चालूच राहिला पाहिजे; पण ते कालपुरुषाच्या हाती आहे', असा केला आहे... आत्मचरित्र लिहिणारा माणूस स्वतःवर खूप प्रेम करणारा असावा लागतो. चांगल्या व वाईट अर्थानेही. गेल्या पन्नास वर्षांत दंडवतेंचा अनेक व्यक्तींशी संपर्क आला. सदानंद वर्दे, किशोर पवार, मृणालताई अशा अनेक माणसांशी झालेला त्यांचा संवाद, हे एक-एक अलिखित पुस्तकच आहे. अशा अनेक संवादांच्या पुस्तकांतून दंडवतेंचं समग्र चरित्र उभं राहिलं. ते फार आवश्यक आहे. तो समाजाचा विचार असतो...

'मोनोलॉग' आणि 'डायलॉग' म्हणजे 'स्वगत' आणि संवाद' असे दोन प्रकार असतात. आत्मचरित्र लिहितो तेव्हा 'मोनोलॉँग, हे पुस्तक 'डायलॉग' आहे, त्यामुळे ते आत्मचरित्र नाही... मुलाखतकाराने चिकित्सक प्रश्न विचारून दंडवतेंना बोलतं केलं, त्यातून त्यांनी जीवनाशी संवाद साधला... यात एके ठिकाणी ते म्हणतात, 'आम्ही हृदयाशी जपलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ही विनम्र ओंजळ आहे...' यातले 'आम्ही' कोण? गांधी, मार्क्स, जे. पी., साने गुरुजींपासून नरेंद्र देवांपर्यंत सर्वजण 'आम्ही’ मध्ये येतात. शेवटी लिहिलंय, 'आजची राजकीय परिस्थिती ही आपल्या राष्ट्राच्या जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका आहे.' पन्नास वर्षे मूल्यनिष्ठ, तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन जगणारा माणूस हे सांगतोय, म्हणून हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. या शोकांतिकेची जबाबदारी कोणाची?... संवेदनशील आणि समाजमनस्क वाचकांसाठी हे पुस्तक आहे! हा माणूस माझ्यासारखा केवळ पुस्तकांत रमणारा नाही.... माझ्यापुढे मोठाच पेच आहे.

एखाद्या पुस्तकावर व्यवस्थित बोललं तर लोक म्हणतात, 'समजलं की सर्व, आता कशाला पुस्तक वाचायचं?' अव्यवस्थित बोललं तर लोक म्हणतात, 'या पुस्तकात दम नाही, मग कशाला वाचायचं?'... पण या पुस्तकाबाबत तसं होऊ नये. हे पुस्तक समाजवादी शीलातील सर्वांनी तर वाचलं पाहिजेच, पण तरुणांनी पाठ्यपुस्तकासारखें वापरलं पाहिजे.... हे पुस्तक वाचणारा माणूस अस्वस्थ होईल. अस्वस्थ होण्याची सवय नसते त्या समाजाला भवितव्य नसतं... मोठी माणसं पुढच्या पिढीला त्रासदायक असतात. त्यांचा वारसा म्हणजे एक प्रकारचं ओझं असतं... पण याची समज असते त्या समाजाला भवितव्य असतं.... संसदीय मूल्यं ढासळत चालली आहेत. ती कशी सावरायची हे कळण्यासाठी ‘100 Best Lectures in Parliament' या पुस्तकाचं मराठी भाषांतर व्हायला पाहिजे... त्या पुस्तकात मघाशी वर्दे सरांनी उल्लेख केलेलं दंडवतेंचं भाषण आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल, देशाला नवीन पंतप्रधानही मिळेल, पण राजीवला आई मिळणार नाही. दंडवतेंनी साने गुरुजींचे 'श्यामची आई' वाचले असणार. अशा प्रकारचं मराठी माणूसच बोलू शकतो, लिहू शकतो...

या पुस्तकात बोफोर्स प्रकरण, आणीबाणी व नैतिक राजकीय घसरगुंडी या तीन विषयांवर महत्त्वपूर्ण लेख आहेत. त्यांचा व्यवस्थित अभ्यास व्हायला पाहिजे. अभ्यासाला पर्याय नाही! 'नैतिक राजकीय घसरगुंडी' या प्रकरणात पुस्तकाचं सार आहे. त्यात फारच उत्कटतेने लिहिलं आहे. उत्कटता, तीव्रता दंडवतेंच्या लेखनात आढळत नाही, पण या प्रकरणात आहे.

आज मध्यमवर्ग समाजविन्मुख होताना दिसत आहे. पूर्वी चळवळी करणारे लोक मध्यमवर्गातूनच पुढे आले होते. आजचा मध्यमवर्ग लढ्यापासून, चळवळीपासून दूर का जात आहे, याचा विचार व्हायला हवा. 'संसद व कायदेमंडळात आय.ए.एस. अधिकारी नसावेत. त्यांच्याकडून फार दडपण येतं. त्यांच्याऐवजी वेगळे अधिकारी असावेत', हे मधु दंडवतेंचं - एका उत्तम संसदपटूचं - म्हणणं गांभीर्याने घेतलं पाहिजे. नरसिंह रावांनी सुरू केलेल्या नव्या आर्थिक धोरणावरही दंडवतेंनी सविस्तर लिहिले आहे. त्यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांचं केलेलं विवेचन याचलं पाहिजे. खरं तर जागतिक, खाजगी, उदार ही विशेषणं मराठीतील फार चांगले शब्द आहेत. पण आपल्या समाजाने हे शब्द भ्रष्ट केले आहेत, समाजच भाषा सुंदर करतो आणि भ्रष्टही करती. हाच समाज ते शब्द सुंदर करू शकतो... मला तर ना हल्ली, हे तीन शब्द वापरायची भीतीच वाटते...

'समाजवादी कुलशील' हा कळीचा प्रश्न आहे. समाजवादी विचारप्रणाली, चळवळ व कार्य यावर 21व्या शतकात पुनर्विचार करावा लागणार आहे. या विचारप्रणालीत काही दोष होते, का सामाजिक वास्तवाचा तिच्याशी मेळ बसला नाही, याची चिकित्सा व्हायला पाहिजे. या विचारप्रणालीत कालानुरूप बदलण्याची ताकद आहे की नाही, याचा शोध घेतला पाहिजे.... The end of Ideology असं म्हटलं जातं, पण मला तसं वाटत नाही. आचार्य कृपलानी म्हणायचे, कार्यक्रम असला पाहिजे, आयडिऑलॉजीचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही, पण तसं नाही... Programme is not a substitute for party and ideology. हा इतिहास 'ओव्हर सिम्लिफाय' करू नका. आव्हाने स्वीकारली पाहिजेत. अभ्यासच केला पाहिजे.

जनता पार्टीचं सरकार कोसळल्यानंतर जयप्रकाश नारायण म्हणाले, 'बाग उजड गया.’ जेपींचे हे तीन शब्द म्हणजे महाभारत आहे, महाकाव्य आहे. आज आपला जो अधःपात झाला आहे, त्याचे काय करायचं? समाजवादी शीलात घोटाळा झाला, आपण मूर्त गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि वादविवादात गुंतून पडलो. माणसांवर प्रेम केलं नाही.'I hate humankind but love people' असं एक वचन मला आठवतंय... जनता पक्ष फुटल्यामुळे उजव्या पक्षांची जनमानसातली विश्वसनीयता वाढली, उलट डाव्या पक्षांची पिछेहाट झाली. या सर्वांचं सिंहावलोकन करण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. सोपं आणि सुलभ वाचायचं आपण बंद केलं पाहिजे."

प्रा. जाधव सरांच्या अविस्मरणीय भाषणाच्या वेळी सभागृह ‘पिनड्रॉप सायलेन्स’चा अनुभव घेत होतं. संयत शैलीत अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन भिडणारं आणि काही नवे प्रश्न उपस्थित करणारं भाषण ऐकल्यामुळे श्रोते भारावून गेले होते. श्रोत्यांमध्ये पहिल्या रांगेत बसलेले ग. प्र. प्रधान सर उत्स्फूर्तपणे म्हणाले “He gave justice to his work!"

शेवटी अध्यक्षीय समारोप करताना मृणालताई म्हणाल्या, "मूळ इंग्रजी पुस्तक दिल्लीत प्रसिद्ध झालं. प्रकृतीच्या कारणामुळे त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकले नाही. नंतर नाना भेटल्यावर म्हणाले, याचा मराठी अनुवाद 21 जानेवारीला प्रसिद्ध होणार. आज तो झाला आहे. जाधव सरांनी या पुस्तकावर सुंदर भाषण केलं आहे. जे कोणी स्वतःला समाजवादी म्हणवतात त्यांनी तर हे पुस्तक वाचावंच पण इतर तरुणांनीही वाचलं पाहिजे. 1942ची चलेजाव चळवळ, संयुक्त महाराष्ट्र आणि आणीबाणी या तीन चळवळीचा इतिहास यात आला आहे. अनुवाद सुरेख झाला आहे.

भाषा ओघवती आहे. नानांनी या पुस्तकात जीव ओतला. सर्व लढयांशी ते कसे एकरूप झाले होते, ते यात आलंय. व्यक्तिगत जीवनासंबंधी काही नाही. राजकीय जीवनाचा उहापोह असणारा हा 'संवाद' आहे. कार्यकर्त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे. हे असं का घडलं? इतिहास घडत असताना अनेक प्रश्न आम्हांला पडत होते. हे पुस्तक वाचताना अस्वस्थता वाढत होती. तत्त्वज्ञानात काही मूलभूत उणीवा होत्या की कार्यकर्त्यामध्ये उणीवा आहेत, याचा शोध घेतला पाहिजे!

Tags: प्रकाशन जीवनाशी संवाद आत्मचरित्र मधु दंडवते dialogue with life autobiography janata party madhu dandvate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके