डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अनुभवांती आता मला असेही कळू लागले आहे की, गाभा व आवाका पकडता येण्यासाठी लेखकाकडे स्वत:चा असा दृष्टिकोन असला पाहिजे. किंबहुना, एका मर्यादेनंतर अभ्यासापेक्षा दृष्टिकोनच अधिक महत्त्वाचा ठरतो असे माझे मत बनले आहे. भले तुमचा दृष्टिकोन कोणताही असो, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्या लेखनात पडले पाहिजे. मला व्यक्तिश: साहित्य समीक्षेबाबत वामन मल्हार यांचा दृष्टिकोन जवळचा वाटला आहे. त्यांच्या ‘विचारसौंदर्य’ या पुस्तकातील ‘मी व माझे टीकाकार’ या लेखातील एक परिच्छेद तर गप्पांच्या मैफिलींमध्ये मी पूर्वी अनेक वेळा वापरला आहे.

‘ललित’च्या या अंकाचे अतिथी संपादक विलास खोले यांनी मला या अंकासाठी लेख लिहिण्याबद्दल विचारले आणि एका बेसावध क्षणी मी ‘हो’ म्हणून गेलो. पण नंतर लगेचच आपण अडचणीत आल्याचे लक्षात आले, मात्र त्यातून सुटका करून घेता आलेली नाही. त्यांनी मला ‘सामान्य वाचकाच्या समीक्षेकडून अपेक्षा’ हा विषय लेखासाठी दिला आहे. त्यावर विचार करायला लागल्यावर मी या विषय-शीर्षकावरच बराच वेळ अडखळलो. कारण सामान्य वाचकाच्या अपेक्षा सांगायच्यात आणि मी तर स्वत:ला असामान्य वाचक समजत आलो आहे (आणि सभोवतालच्यांनी माझा तो समज अधिकाधिक बळकट करत नेला आहे). शिवाय, मी एका वैचारिक-परिवर्तनवादी साप्ताहिकाचे गेली सहा वर्षे पूर्णवेळ संपादन करतोय, त्यामुळे आपण असामान्य वाचक असल्याचा माझा समज किती पक्का असेल याची कल्पना करा!

लेखाच्या विषयाचा विचार करू लागलो आणि डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला... ‘जे समीक्षक नाहीत ते सर्व सामान्य वाचक’ असा तर विचार अतिथी संपादकांच्या मनात नाही? आणि काय सांगू तुम्हांला, हा विचार मनात चमकल्यावर माझे धाबेच दणाणले! इतकी वर्षे आपण गैरसमजातच आहोत हे लक्षात आले आणि लेख लिहिण्याचे माझे अवसानच गळून पडले. त्या क्षणी असेही वाटले की, अतिथी संपादकांना सांगून टाकावे; सामान्य वाचकाच्या (म्हणजे माझ्या) समीक्षेकडून काहीही अपेक्षा नाहीत! पण त्यांचे ज्येष्ठत्व, ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाच्या समीक्षेमुळे त्यांच्याविषयी वाटत असलेला आदर आणि ऐकून माहीत असलेला त्यांचा काटेकोरपणा यामुळे तसे म्हणण्याचे धाडस झाले नाही. शिवाय, ‘समीक्षेकडून का अपेक्षा नाहीत हेच सांगणारा लेख लिही’ असे जर ते म्हणाले तर आपण क्लीनबोल्ड होऊ आणि मग कदाचित आपली गणना अतिसामान्य वाचकांत होईल अशी भीतीही वाटली! असो.

तर सर्व समीक्षकांकडून पहिली अपेक्षा ही आहे की, त्यांनी सामान्य वाचक, असामान्य वाचक आणि अतिसामान्य वाचक यांच्या शक्य असेल तर व्याख्या कराव्यात, किमान त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगावीत. म्हणजे मग वर्गीकरण करणे सोपे जाईल. त्याही पुढे जाऊन चांगला वाचक, वाईट वाचक, उत्तम वाचक ओळखण्यासाठी काही निकष सांगावेत. कारण अनेक रथी-महारथी स्वत:ला सामान्य वाचक म्हणवतात आणि अनेकांचे ‘आपण असामान्य वाचक आहोत’ असे भ्रमाचे भोपळे बराच काळ फुटत नाहीत. शिवाय, नामवंत लेखक, नामवंत संपादक यांना जर कोणी ‘तुम्ही सामान्य वाचक आहात’ असा शेरा मारला आणि त्यांचा संताप अनावर झाला तर? अर्थात वाचकांच्या व्याख्या व वर्गीकरण हे काम कठीण असणार हे उघड आहे, पण तसा प्रयत्न अनेक समीक्षकांकडून झाला तर बऱ्यापैकी गदारोळ माजेल. त्यातून हाती काय लागेल हा भाग बाजूला ठेवला तरी समुद्रमंथन केल्यासारखे होईल इतके निश्चित!... चला, पहिली अपेक्षा सापडली एकदाची.

मी बऱ्यापैकी वाचन करायला लागल्यावर लेखन-प्रक्रियेविषयी प्रश्न मनात येऊ लागले आणि त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नवे-जुने लेखन धुंडाळू लागलो, तेव्हा ‘मी का लिहितो’ या नावाचे एक छोटे पुस्तक पूर्वी प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ दृष्टीस पडला. मग ते ‘आऊट ऑफ प्रिंट’ पुस्तक मिळविण्याच्या मागावर राहिलो. अखेर ‘मसाप’च्या ग्रंथालयात ते सापडले. वि.स.खांडेकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, अनंत काणेकर, काका कालेलकर, दुर्गा भागवत इत्यादी दहा-बारा मान्यवरांचे लेख त्यात होते. (मुळात ती आकाशवाणीवर झालेली भाषणे होती, नंतर त्यांचे संकलन पुस्तकरूपाने आले होते) ते पुस्तक मी अधाशासारखे वाचले. पण खरेच सांगतो, त्याही वेळी म्हणजे माझ्या वाचनाच्या सुरुवातीच्या अवस्थेतही, त्या पुस्तकाने माझा भ्रमनिरास केला. त्या पुस्तकात काही तुकडे चांगले होते, कुतूहल शमवणारी थोडी माहितीही होती, पण ‘मी का लिहितो’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्या रथीमहारथींपैकी एकाच्याही लेखात आले नाही असेच मला वाटले. त्यानंतर चार-पाच वर्षांनी इंग्रजीतील वाचन थोडेबहुत सुरू केले असताना, जॉर्ज ऑरवेलचा Why I Write? हा निबंध वाचण्यात आला. तो वाचून मला केवळ ऑरवेल का लिहितो एवढेच कळले नाही तर एकूणच ‘लेखक का लिहितात’ या प्रश्नाचा गाभाच हाती लागला. मराठीतील दहा-बारा ‘स्टॉलवर्ट’ लेखकांच्या सर्व लेखांत मिळून जे आले नाही त्यापेक्षा जास्त ऑरवेलच्या त्या छोट्या निबंधात आले आहे असे जाणवले. ऑरवेलने त्यात कोणत्याही लेखकाच्या लेखन करण्यामागील चार प्रमुख व प्रबळ प्रेरणा तर सांगितल्या आहेतच, पण त्याही पुढे जाऊन कलाकार, वैज्ञानिक, उद्योजक व राजकीय नेते यांच्यातही कमी-अधिक प्रमाणात त्या प्रेरणा असतात असे सांगून सामान्य वाचकांसमोर क्षितिज अधिक मोठे करून दाखवले आहे. (‘तो’ निबंध मुळातूनच वाचला जावा म्हणून त्या चार प्रेरणा मी इथे सांगत नाही.) म्हणून मी त्याचा अनुवाद केला आणि ऑरवेलच्या जयंतीचे निमित्त करून ‘साधना’त छापला. त्यासाठी माझा एक महिना गेला, हा भाग वेगळा. पण शाळा-कॉलेजमधील परीक्षेतील अनुवादाच्या अनुभवावर थेट जॉर्ज ऑरवेल, हा आनंदही वेगळा होता. असो.

ऑरवेलच्या त्या लेखाला मराठीतील व इंग्रजीतीलही समीक्षक ‘समीक्षा’ हे लेबल लावतील की नाही हे मला माहीत नाही. पण इथेच सामान्य वाचक या नात्याने माझी दुसरी अपेक्षा जन्म घेते, ती अशी की लेखकांनी स्वत:च्या लेखनाची कठोर समीक्षा करावी. स्वत:च स्वत:च्या लेखनाचे कठोर संपादन करावे आणि मगच ते इतरांना दाखवावे किंवा प्रसिद्धीला द्यावे हे जर सर्वमान्य गृहीतक असेल तर, आपले लेखन प्रसिद्ध झाल्यावर काही काळाने तरी लेखकाने स्वत:च्या लेखनाची समीक्षा करावी ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. अर्थातच, हेही काम अवघड आहे. पण समीक्षेच्या वर्गवारीत ‘स्वत:च्या लेखनाची समीक्षा’ असा काही उपप्रकार अस्तित्वात असेल तर तो भरभराटीस आणावा, नसेल तर रुजवावा...

या दुसऱ्या अपेक्षेच्या संदर्भात मी केलेला एक छोटासा प्रयोग थोडक्यात सांगतो, कारण त्यातच माझी (अर्थातच, सामान्य वाचकाची) तिसरी अपेक्षा दडलेली आहे. तो प्रयोग असा की, चार वर्षांपूर्वी राजन खान यांची ‘कथेमागची कथा’ ही लेखमाला साधनात चालवली. ‘एखादी कथा लिहिण्याचे बीज मनात पडणे इथपासून तिची लेखनप्रक्रिया चालू असतानाचे व ती प्रसिद्ध होऊन वाचकांच्या प्रतिक्रिया येण्यापर्यंतचे आठवतील तेवढे व उलगडतील तेवढे तपशील सांगणारे लेखन म्हणजे कथेमागची कथा,’ अशी माझी कल्पना होती. राजन खान यांनी आधी दोन-तीन वेळी ती कल्पनाच उडवून लावली, नंतर माझा नाद मिटवायचा म्हणून सुरुवात केली... आणि त्यानंतर लेखक म्हणून त्यांना आणि वाचक म्हणून मला जो काही सर्जनशील अनुभव मिळाला तो अफलातूनच! त्या वेळी लेख (कथेमागची कथा) आधी वाचून मग मूळ कथा वाचायची असे मी सात वेळा केले. आणि आधी कथा वाचून मग लेख (कथेमागची कथा) वाचायचा असे सात वेळा केले... मला पहिल्या प्रकारच्या वाचनाने खूपच जास्त आनंद दिला... अर्थात, हा प्रयोग राजन खान यांनी स्वत:च्या लेखनाची समीक्षा करण्याचा नव्हता, पण त्यातील काही ‘झलकबाज’ तुकडे असे होते की, ते उत्तम समीक्षकालाही दाखवता आलेच नसते. इथे मला त्या प्रयोगाचे नाही तर स्वत:च्या लेखनाची समीक्षा करण्याच्या प्रयत्नाचे महत्त्व सूचित करायचे आहे. म्हणजे वेगवेगळ्या समीक्षकांनी एखाद्या कथेची समीक्षा करून तिच्यातील कितीही ताणेबाणे उलगडून दाखवले तरी, लेखकाने स्वत:च्या कथेचे काहीएक विश्लेषण करून भाष्य केले तर त्यातून (कोणत्याही समीक्षकाकडून न मिळालेला असा) वेगळा आस्वाद वाचकांना मिळेल.

या प्रयोगातून पुढे आलेली माझी तिसरी अपेक्षा ही आहे की, कोणत्याही साहित्यकृतीची पुढची-मागची भूमी माहीत असेल तर सामान्य वाचकांना ती साहित्यकृती अधिक वेगळ्या प्रकारे समजून घेता येईल, तिचा वेगळा आस्वाद घेता येईल. अर्थात, ही पुढची- मागची भूमी लेखकाकडून येईल त्यापेक्षा वेगळी समीक्षकाकडून येईल. आपले बहुतांश समीक्षा लेखन हे वाचकाने ती साहित्यकृती वाचली आहे असे गृहीत धरून केलेले असते. म्हणून मला वाटते, समीक्षा लेख वाचून वाचकाला मूळ साहित्यकृती वाचण्याची इच्छा अनावर व्हायला हवी असेल तर पुढची-मागची भूमी समीक्षा लेखनात चांगली यायला हवी. आता संपादकाच्या अनुभवातून सांगतो, अशी समीक्षा मोठ्या प्रमाणात आली तर सामान्य वाचक समीक्षेकडे मोठ्या प्रमाणात वळतील. अर्थातच, अशा समीक्षेला पॉप्युलिस्ट म्हणून हिणवले जाण्याची शक्यता आहे. पण उपयुक्ततेचा निकष लावायचा झाला तर अशा समीक्षेला सध्याचे दिवस चांगले आहेत.

वरील प्रयोगाबद्दल सांगताना मी असे म्हणालो की, राजन खान यांनी कथेमागची कथा लिहिण्याची कल्पना उडवून लावली होती आणि नंतर ती कल्पना भारी ठरली होती(चक्क पुस्तकही आले). तसाच प्रकार मला अनेक वेळा अनुभवास आला आहे. पण तीनच उदाहरणे सांगतो, त्यातून या सामान्य वाचकाची समीक्षेकडून चौथी अपेक्षा व्यक्त होईल.

2005 च्या युवक दिनाच्या एका कार्यक्रमात विनय हर्डीकर  म्हणाले, ‘या देशात कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे काँग्रेसीकरण झाल्याशिवाय सत्ता मिळवता येत नाही.’ ते विधान माझ्या मनात खोलवर रुतले आणि दोन-चार वेळा पाठपुरावा करूनही ‘त्यात अधिक स्पष्ट करून सांगण्यासारखे काही नाही’ असे हर्डीकरांचे मत पडले. अखेरीस 2009 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी त्या विधानाचे स्पष्टीकरण देणारी अडीच हजार शब्दांची मुलाखत दिली. ‘एका विधानाचे स्पष्टीकरण देणारी मुलाखत’ याच शीर्षकाखाली मी ती छापली, तिच्यावर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाटच!...

अशाच एका विधानाचे स्पष्टीकरण देणारी मुलाखत मी रा.ग.जाधव यांना गेली पाच-सहा वर्षे मागतोय आणि ते ठामपणे ‘नाही’ म्हणताहेत. ते विधान बरेच स्फोटक आहे. ते संदर्भासह सांगतो म्हणजे त्या स्फोटाची तीव्रता जास्त कळेल. सहा वर्षांपूर्वी विजय तेंडुलकर यांची औरंगाबादला झालेली एका कार्यक्रमातील मुलाखत शब्दांकन करून संयोजकांनी साधनाकडे पाठवली होती. ती वाचून झाली तेव्हा रा.ग.जाधव आले होते म्हणून मी त्यांना सहज म्हणालो, ‘सर, ही मुलाखत छापली तर काही बिघडणार नाही, पण छापलीच पाहिजे अशी नाही. तर काय करावे?’ (विशेष म्हणजे, तेंडुलकर हे माझे आवडते लेखक!) जाधव सर क्षणाचाही विलंब न लावता म्हणाले, ‘तुला असं वाटत असेल तर नको छापूस.’ मी म्हणालो, ‘पण तुम्ही एक नजर टाकता का?’ त्यावर ते गंमतीच्या सुरात म्हणाले, ‘क्रिएटिव्ह लेखकांच्या मुलाखती गांभीर्याने घेऊ नयेत.’ अरे बाप रे बाप! त्या क्षणी मला एक सूत्रच हाती लागल्यासारखे झाले... बराच काळ मला काहीतरी वाटत होते आणि ते त्यांनी एकाच वाक्यात पकडले होते. (हे गुपित उघड केले म्हणून जाधव सर त्यांच्या स्वभावानुसार मला माफ करतीलच.) या विधानाची सत्यता नंतर अनेक वेळा मला अनुभवता आली. अगदी अलीकडे मी हिंदी पुस्तके वाचायला सुरुवात केली. त्यात श्रीलाल शुक्ल यांचे ‘मेरे साक्षात्कार’ हे त्यांच्या मुलाखतींचे पुस्तक आहे. त्याच्या प्रास्ताविकात जवळपास जाधव सरांचेच विधान वाचायला मिळाले. आयएएस अधिकारी राहिलेले, ‘रागदरबारी’ फेम श्रीलाल शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ मिळाले आहे आणि पद्मभूषणही! तरी ते म्हणतात, ‘माझ्यासारख्या सामान्य साहित्यिकाच्या मुलाखती गांभीर्याने घेऊ नयेत.’ बहुधा, त्यांनाही कोणातरी समीक्षकाने झटका दाखवला असावा आणि म्हणूनच त्यांना आपण सामान्य लेखक आहोत असा ‘साक्षात्कार’ झाला असावा. असो... तर जाधव सरांची अशी कितीतरी विधाने आहेत (सर्वच स्फोटक नाहीत), ती स्पष्टीकरणासह आली तर ते पुस्तक खूपच वाचकप्रिय होईल.

सहा महिन्यांपूर्वीचे असेच एक उदाहरण देतो. कृष्णात खोतच्या ‘झड- झिंबड’ कादंबरीच्या प्रकाशन समारंभात द.भि.कुलकर्णी यांचे भाषण ऐकले. त्या भाषणातील बाकी सर्व विवेचन जनरल वाटले, पण शेवटची दोन विधाने इतकी जबरदस्त होती की त्यांचे स्पष्टीकरण देणाऱ्या दोन दीर्घ मुलाखती होतील असे वाटले. त्यांतले पहिले विधान ‘मराठीतील ग्रामीण साहित्यात वैचारिकता नाही’ आणि दुसरे विधान ‘जी.ए.कुलकर्णी हा खऱ्या अर्थाने ग्रामीण साहित्यिक आहे.’ आहे की नाही धक्कादायक?

अशी अनेक समीक्षकांची अनेक विधाने संदर्भासह स्पष्टीकरण या प्रकारात येत गेली तर मराठी समीक्षेकडे सामान्य वाचक वळायला खूपच मदत होईल. कारण समीक्षक जी विधाने सहज म्हणून करतात किंवा समीक्षाशास्त्राचा भाग आहेत असे मानून सोडून देतात, ती सामान्य वाचकांना सिद्धांताप्रमाणे वाटू शकतात. म्हणून अशा विधानांची स्पष्टीकरणे संदर्भासह व उदाहरणांसह विस्तृतपणे यावीत, हीच ती चौथी अपेक्षा.

आता पाचवी अपेक्षा थेट सांगून टाकतो... गंभीर विनोदी पद्धतीने समीक्षा मोठ्या प्रमाणात यायला हवी! अशा समीक्षेचे एकच ठळक उदाहरण मला माहीत आहे, ते म्हणजे पु.ल.देशपांडे यांचे ‘मराठी वाङ्‌मयाचा (गाळीव) इतिहास’ हे पुस्तक. (मुळात तो दिवाळी अंकातील दीर्घ लेख आहे). मला वाटते ते पु.लं.चे सर्वांत चांगले, पण सर्वांत दुर्लक्षित पुस्तक आहे. त्या लेखनासाठी त्यांनी मराठी वाङ्‌मयाची प्राचीन-अर्वाचीन पुस्तके घेऊन (घरात स्वत:ला कोंडून घेऊन) काही महिने अभ्यास केला होता आणि मग तो ‘गाळीव इतिहास’ लिहिला होता. पु.लं.च्या त्या पुस्तकाची गंमत ही आहे की, वाचकाला मराठी वाङ्‌मयातील जेवढे जास्त संदर्भ माहीत तेवढी त्याची खुमारी अधिक! अर्थात, त्याही पुस्तकाला मराठी समीक्षक ‘समीक्षा’ म्हणायला तयार आहेत का, हे मला माहीत नाही. पण विनोदी पद्धतीने समीक्षा मोठ्या प्रमाणात येत राहिली तर सामान्य वाचक गंभीर पद्धतीने लिहिलेल्या समीक्षेकडे अधिक संख्येने वळतील, असे मला वाटते.

पु.लं.च्या याच पुस्तकाचा संदर्भ घेऊन सामान्य वाचकाची सहावी व सातवी अपेक्षा सांगता येईल. या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी पाहिलेल्या मराठी पुस्तकांतील सर्वोत्तम आहे. ‘प्रतिभा’ हा शब्द मला क्वचितच वापरावासा वाटतो, ते मुखपृष्ठ पाहिले तेव्हा मी तो उत्स्फूर्तपणे वापरला होता. वसंत सरवटे यांनी त्या चित्रात ‘ऊर्ध्वपातन’ ही रासायनिक अभिक्रिया दाखवली आहे. मराठी साहित्याच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ विज्ञानातील प्रयोगाने सजवलेले असे उदाहरण अपवादात्मकच असावे. म्हणजे सामान्य वाचकाची सहावी अपेक्षा अशी सांगता येईल... आशयसंपन्नता व आकर्षकता यांचे संयुग (मिश्रण नव्हे) असलेली मुखपृष्ठे मोठ्या प्रमाणात यायची असतील तर पुस्तकांच्या मुखपृष्ठांची समीक्षा व्हायला हवी. मराठी समीक्षेच्या पुस्तकांची मुखपृष्ठे तर दुर्बोधता, निरसता व अनाकलनीयता या तिन्ही बाबतींत आघाडीवर आहेत, त्यामुळे समीक्षा वाचनाची नावड निर्माण करण्यात त्या मुखपृष्ठांचा मोठा वाटा आहे. असो.

त्या पुस्तकाच्या प्रास्ताविकामध्ये पु.ल.नी सहज गंमतीने एक विधान केले आहे. ‘अर्ध्याहून अधिक वाचक एखादा लेख वाचायचा की नाही हे त्या लेखाचे शीर्षक वाचून ठरवतात, हे कळायला मला आयुष्याची पन्नाशी उलटावी लागली.’ ते पुस्तक वाचले तेव्हा मी ऐन पंचविशीत होतो, म्हणून ठरवले ‘या एका बाबतीत तरी आपण पु.लं.च्या पुढे पंचवीस वर्षे राहायचेच.’ त्यानंतर शीर्षकांना मी इतका सरावलो की, आता मला लेखांच्या शीर्षकांसाठी डोक्याला अजिबातच ताण द्यावा लागत नाही. कोणत्याही सुसंगत लिहिलेल्या मजकुरात चांगले शीर्षक असतेच, ते केवळ शोधायचे असते आणि तो तांत्रिक भाग आहे, असा सिद्धांत मांडणारा लेख मी लिहू शकतो. त्यामुळे मराठीतील समीक्षा लेखांच्या शीर्षकांबाबत माझ्यातल्या सामान्य वाचकाची खूपच जास्त नाराजी आहे. नोंदी, निरीक्षणे, टिपणे, आकलन, अभ्यास, परिप्रेक्ष्य असले गुळगुळीत शब्द समीक्षा लेखांच्या शीर्षकांत मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पु.ल.नी पन्नाशीत शिकलेला धडा लक्षात घेऊन आजच्या कोणत्याही वयोगटातील मराठी समीक्षकांनी त्याची तत्काळ अंलबजावणी सुरू करावी. त्यांनी बाकी इतर काहीही कमी करावे, पण शीर्षकांवर कष्ट घ्यावेत, ही एका सामान्य वाचकांची एक महत्त्वाची अपेक्षा आहे.

(कृपया, वरील विवेचन वाचून मी पु.लं.चा मोठा चाहता आहे किंवा त्यांचे खूपसे लेखन मी वाचले आहे असा गैरसमज करून घेऊ नये)

अतिथी संपादक म्हणाले होते, तुम्हाला लेख लिहिण्यासाठी शब्दांचे बंधन नाही. पण व्यक्तिगत अनुभवांवरून सामाजिक सिद्धांत मांडू नयेत याचे भान ठेवून आणि थोडक्यात गंमत असते, ही बुजुर्गांची शिकवण लक्षात घेऊन सामान्य वाचकाच्या अपेक्षा क्रमांक आठ, नऊ, दहा सांगतो आणि थांबतो. पण त्याआधी वर सांगितलेल्या सात अपेक्षा अधोरेखित करतो.

1. वाचकांचे वर्गीकरण

2. स्वत:च्या लेखनाची समीक्षा

3. पुढची-मागची भूमी

4. एकेका विधानाचे स्पष्टीकरण

5. विनोदी पद्धतीने समीक्षा

6. मुखपृष्ठांची समीक्षा

7. आकर्षक व अर्थपूर्ण शीर्षके

या सात अपेक्षांवर नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल, ‘सामान्य वाचकांकडून समीक्षा अधिक वाचली जावी’ त्यासाठीच्या या वानगीदाखल (उलगडत गेल्या तशा) अपेक्षा आहेत... शिवाय, समीक्षा लेखनाची वाचनीयता वाढावी यासाठी आणखी काही किरकोळ पण महत्त्वाच्या अपेक्षा सांगता येतील. उदा : परिभाषेचे अवडंबर कमी करावे, शब्दबंबाळपणा टाळावा, ठोकळेबाजपणाला थारा नसावा, पाल्हाळ व फाफटपसारा नाममात्र असावा इत्यादी... पण या अपेक्षा तर सर्वच प्रकारच्या लेखनाकडून असतात, म्हणून त्यावर येथे भाष्य करण्याची गरज नाही.

आता सांगणार आहे त्या तीन मोठ्या अपेक्षा वाचकांचे आकलन वाढवण्यासंदर्भातील आहेत.

1. गाभा व आवाका दाखवला जावा.

2. दृष्टिकोन प्रतिबिंबित व्हावा.

3. इतर विषयांची दालने खुली करावीत.  

या तिन्हींबद्दलही थोडक्यातच सांगतो.

कोणत्याही समीक्षा लेखातून त्या लेखनविषयाचा (लेखक/ साहित्यकृती) गाभा व आवाका वाचकाला कळायला हवा. अनेक वेळा समीक्षा लेखक तुकड्या-तुकड्यांत खूप काही सांगतात, पण त्यांना गाभा पकडता येत नाही व आवाका दाखवता येत नाही. एकच (सार्वत्रिक) उदाहरण द्यायचे असेल तर मृत्युलेख किंवा व्यक्तिवेध या प्रकाराचे देता येईल. या प्रकारचे खूप लेख प्रसिद्ध होतात, पण त्या व्यक्तीचा गाभा व आवाका दाखवता आलाय असे फारच कमी लेख असतात. एकदा तर साधनाच्या एका विशेषांकासाठी आलेले लेख पाहून मी (काहीसा वैतागून) डॉ.दाभोलकरांना म्हणालो होतो, ‘वर्षानुवर्षे सहवासात असलेल्या व्यक्तीच्या विचारांचा व कार्याचा गाभा आणि आवाका या लोकांना सांगता येत नाही, आश्चर्य आहे!’ तेव्हा ते म्हणाले होते, ‘तुला ते सोपे वाटते, पण तसे ते नाही.’ याच संदर्भात, नरहर कुरुंदकरांनी लिहिले आहे, ‘माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही किमान अपेक्षा आहे असे आपण म्हणतो, पण ती कमाल अपेक्षा आहे.’ त्यामुळे अनुभवान्ती मलाही असे वाटू लागले आहे की, गाभा व आवाका पकडता येणे ही अपेक्षा सोपी नाही, पण ती समीक्षेकडून आहे हे निश्चित!

अनुभवान्ती आता मला असेही कळू लागले आहे की, गाभा व आवाका पकडता येण्यासाठी लेखकाकडे स्वत:चा असा दृष्टिकोन असला पाहिजे. किंबहुना, एका मर्यादेनंतर अभ्यासापेक्षा दृष्टिकोनच अधिक महत्त्वाचा ठरतो असे माझे मत बनले आहे. भले तुमचा दृष्टिकोन कोणताही असो, त्याचे स्पष्ट प्रतिबिंब त्या लेखनात पडले पाहिजे. मला व्यक्तिश: साहित्य समीक्षेबाबत वामन मल्हार यांचा दृष्टिकोन जवळचा वाटला आहे. त्यांच्या ‘विचारसौंदर्य’ या पुस्तकातील ‘मी व माझे टीकाकार’ या लेखातील एक परिच्छेद तर गप्पांच्या मैफिलींमध्ये मी पूर्वी अनेक वेळा वापरला आहे, तो असा- ‘‘टीका माझ्या जीवनक्रमावर व लेखनसंसारावर अशा दोन विषयांसंबंधी झाली व होते. पैकी जीवनक्रमावरची टीका अत्यंत सहानुभूतीची व उदारबुद्धीची असते, इतकी की लोक मला जसा समजतात तसा मी असतो तर फार बरे झाले असते असे मला वाटते... तथापि, एका गोष्टीबद्दल मात्र तक्रार करावीशी वाटते ती अशी की, कोणत्याही विषयाचा सर्व बाजूंनी सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची व असा विचार इतरांसही करावयास लावण्याची माझी जी प्रवृत्ती आहे, तिचे महत्त्व अद्यापि पुष्कळ लोकांना कळलेले नाही आणि कित्येकांना तर तिचा अर्थही ध्यानात येत नाही. परिणामी, काही नसलेले गुण मला चिकटवले जातात तसेच काही नसलेले दोषही चिकटवले जातात. त्यामुळे फिट्‌टमफाट झाली असे मी मानतो आणि मनातल्या मनात हसतो.’’

वामन मल्हार यांच्यामध्ये जी ‘प्रवृत्ती’ आहे ती समीक्षेमध्ये ‘दृष्टिकोन’ म्हणून तरी आली पाहिजे असे मला वाटते. (येथे गांधीबाबा आठवतात. ते म्हणत, ‘अहिंसा हे माझ्यासाठी ध्येय आहे, ते तुम्ही धोरण म्हणून तरी स्वीकारा.’)

पण वामन मल्हारांची एक मर्यादा आता मला जाणवते आहे, ती अशी की कोणत्याही विषयाचा सर्व बाजूंनी सहानुभूतिपूर्वक विचार करणे व असा विचार इतरांसही करावयास लावणे हे ठीकच आहे. पण अशा प्रत्येक विषयाच्या सीमारेषा इतर अनेक विषयांना भिडतात, म्हणून इतर विषयांची दालने खुली करून देण्याचे काम समीक्षेने करावे ही एक फार मोठी व महत्त्वाची अपेक्षा आहे. ‘अलीकडे महाकाव्ये का निर्माण होत नाहीत?’ या 70 वर्षांपूर्वीच्या समीक्षा लेखात वामन मल्हार यांनी त्या प्रश्नाचे उत्तर ‘समाजजीवनातील व्यामिश्रता वाढली आहे’ असे दिले होते... ती व्यामिश्रता आता तर खूपच वाढली आहे. त्यामुळे अलीकडे चांगली समीक्षा व चांगले वैचारिक साहित्य का निर्माण होत नाही या प्रश्नाचे तेही एक उत्तर आहे... गेल्या वर्षी, एका प्रवासात मराठी कवितेविषयी चर्चा चालू होती तेव्हा संजय भास्कर जोशी यांना मी विचारले, ‘नव्वदोत्तर मराठी कविता तुम्ही बरीच वाचली आहे म्हणून विचारतोय, जागतिकीकरणाचे समर्थन किंवा त्याची अपरिहार्यता यावर मराठी कविता कोणी लिहिली आहे का?’ क्षणभर थांबून ते ठामपणे म्हणाले, ‘नाही’... तोच प्रश्न मराठी कथा, कादंबरी व समीक्षा यांच्याबाबत विचारला तर उल्लेखनीय अशी नावे समोर येत नाहीत. आता प्रश्न असा आहे की, भारतात उदारीकरण पर्व अवतरले त्याला ‘पावशतक’ होत आले आहे, पण अद्यापही मराठी साहित्य व समीक्षा त्या संदर्भातील ठोकळेबाज भूमिकेतून बाहेर आलेले नाहीत. मराठी साहित्य-समीक्षा प्रांतातील लोक ‘खाऊजा’च्या नावाने खूप ओरड करतात, पण ती प्रक्रिया समजून घेण्यासाठी इतर अनेक विषयांचा (विशेषत: अर्थकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण व विज्ञान-तंत्रज्ञान या किमान आवश्यक तीन विषयांचा) अभ्यास किती लोकांनी केला आहे? असो.

वरील तीन मोठ्या अपेक्षांना उतरेल असे समीक्षा लेखन मराठीत किती आहे? परिस्थिती निराशाजनक आहे! म्हणून तर माझ्यासारखा सामान्य वाचक अनौपचारिक चर्चेत म्हणतो, ‘समीक्षेकडून अपेक्षा नाहीत.’

अर्थात, जेमतेम पंधरा वर्षांची वाचन कारकीर्द असलेल्या या सामान्य वाचकाचे म्हणणे किती गांभीर्याने घ्यायचे हा भाग वेगळा. पण एक बरे झाले, आपण असामान्य वाचक आहोत या मनोभूमिकेतून हा लेख मी लिहिला असता तर अवास्तव अपेक्षा लिहून मोकळा झालो असतो, त्यातून ‘ललित’च्या अतिथी संपादकांनी माझी सुटका केली त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

2013 हे ‘ललित’ मासिकाचे सुवर्णहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने या वर्षातील त्यांचा प्रत्येक अंक विशेषांक म्हणून प्रसिद्ध होत आहे, त्यासाठी वेगवेगळे अतिथी संपादक आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांतील ‘ललित’चे अंक अनुक्रमे ‘वाचनसंस्कृती’, ‘कविता’, ‘ललितगद्य’ या विषयांना वाहिलेले होते. एप्रिलचा अंक समीक्षा विशेषांक होता, प्रा.विलास खोले हे त्याचे अतिथी संपादक होते. या समीक्षा विशेषांकात प्रसिद्ध झालेला हा लेख (किरकोळ बदल करून) दोन कारणांमुळे पुनर्मुद्रित करणे औचित्यपूर्ण वाटते... एक म्हणजे 23 एप्रिल हा जागतिक वाचकदिन आणि दुसरे- या लेखातील अनेक संदर्भांचा साधनाशी असलेला संबंध...

Tags: विनोद शिरसाठ विलास खोले सर्जनशील समीक्षक ज्ञानपीठ श्रीलाल शुक्ल विचारसौन्दर्य सामान्य वाचक विनोदी समीक्षा दृष्टीकोन मराठी कविता पु.ल. देशपांडे वामन मल्हार जोशी रा.ग.जाधव ललित समीक्षा विनोद शिरसाठ Vilas Khole Sarjanshil Samikshak Dnyapeeth Shrilal Shukl Vicharsoudray Samany Vachak Vinodi Samiksha Drushikon Marathi Kavita P.L.Deshpande R.G.Jadhav. Vaman Malhar Joshi Lalit Samiksha Vinod Shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


Comments

  1. Dinkar joshi- 15 Oct 2020

    लेख खूप चांगला आहे. पण संदर्भ मिळण्याच्या मर्यादा जाणवतात विशेषतः कवितेच्याबाबत.अर्थात एका माणसाला सगळे वाचन शक्य नाही.पण असा शोध घेतला जात नाही ही खंत कायम आहे.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके