डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ग. प्र. प्रधान यांचे 'साता उत्तराची कहाणी'

दरम्यान, लोकशाही समाजवाद ही काही आयडिऑलॉजी नाही, अशी टीका वाचत/ऐकत आलो होतोच; त्यामुळे उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवाद याला आयडिऑलॉजी निश्चितच म्हणता येणार नाही! पण तरीही (कदाचित म्हणूनच) इतक्या दीर्घ प्रक्रियेनंतर सापडलेल्या त्या स्थानावर मी निश्चिंत राहिलो आहे. इतका की, तसे अन्य कोणाला सांगण्याची गरजच कधी वाटली नाही. तर माझी राजकीय विचारप्रणाली कोणती, हे शोधण्याच्या प्रक्रियेत साता उत्तराची कहाणी हे पुस्तक माईलस्टोन ठरले.  

एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली होती, तेव्हा बारावीनंतर पुण्यात येऊन मला पाच-सहा वर्षे झाली होती, माझी आतून बाहेरून जोरदार वैचारिक घुसळण होण्याची प्रक्रिया ऐन भरात होती. ती प्रक्रिया त्रिस्तरीय होती.

1. मेडिकल, फार्मसी, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, ॲग्रीकल्चर, लॉ, सीए या व अन्य काही विद्याशाखांमधील समवयस्क मित्रांशी ‘अंडर द सन’ सर्व विषयांवर झालेल्या चर्चा व वाद-संवाद.

2. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान या व अन्य विषयांवरील अनेक लहान-मोठ्या कार्यक्रमांमध्ये निव्वळ श्रोता या नात्याने लावलेली उपस्थिती.

3. कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्रे, आत्मचरित्रे, ललित, वैचारिक, तात्त्विक या व अन्य प्रकारचे केलेले बरेच जास्त व गहन गंभीर वाचन.

या तिहेरी प्रक्रियेमुळे पंचविशीच्या उंबरठ्यावर असताना ‘माझा’ स्वत:चा असा दृष्टिकोन आकाराला येत होता. ‘आतापर्यंत मी काय गमावले हे एका पारड्यात आणि कमावलेला दृष्टिकोन दुसऱ्या पारड्यात, असे केले तर दुसरे पारडे कधीच वर उचलले जाणार नाही,’ असे म्हणण्याइतपत मजल मी मारली होती. मात्र ‘आपली राजकीय विचारप्रणाली कोणती?’ या प्रश्नाला ठोस असे उत्तर मिळालेले नव्हते आणि नेमके त्या टप्प्यावर ग.प्र. प्रधानलिखित ‘साता उत्तराची कहाणी’ हे पुस्तक हातात पडले.

1920 दरम्यान जन्मलेले, पुणे शहरात शिक्षण घेणारे सात मित्र वयाच्या ऐन विशीत म्हणजे 1940 च्या दरम्यान सात वेगवेगळ्या राजकीय विचारांनी प्रभावित होतात आणि पुढील चाळीस वर्षे, म्हणजे वयाच्या साठीपर्यंत, म्हणजे 1980 पर्यंत आपापल्या राजकीय प्रवाहासोबत पोहत जातात, अशी मध्यवर्ती कल्पना असलेले ते पुस्तक आहे. ते सात प्रवाह असे : साम्यवादी, समाजवादी, हिंदुत्ववादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, रॉयवादी आणि क्रांतिकारी (पत्री सरकार). या सात प्रवाहांतील सात मित्रांना जोडणारा, पण कोणत्याच राजकीय प्रवाहासोबत न जाणारा (पत्रकार म्हणून काम करणारा ) आठवा मित्र आहे. त्या सातही मित्रांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी अधूनमधून होत राहतात, अधूनमधून पत्रव्यवहारही होत राहतो. शिवाय, त्या आठव्याच्या माध्यमातून त्यांना परस्परांची ख्यालीखुशाली व देश-विदेशांतील घडामोडी कळत राहतात. या पुस्तकाचे कथानक म्हणावे तर बस्स एवढेच. सातही जणांचे व्यक्तिगत व कौटुंबिक तपशील येतात ते केवळ त्यांची ओळख ठळक व्हावी म्हणून!

बाकी सर्व पुस्तक म्हणजे वैचारिक घुसळण आहे; वाद-संवाद, प्रतिवाद, युक्तिवाद यांची मैफिल आहे. त्यासाठीचे विषय काय आहेत तर 1940 ते 80 या काळातील महाराष्ट्र, भारत आणि जग या तीनही स्तरांवरील राजकीय-सामाजिक घडामोडी. त्यातील प्रमुख अशा : चले जाव चळवळ, दुसरे महायुद्ध, देशाला स्वातंत्र्य, भारताची फाळणी, काश्मीरचे सामिलीकरण, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, तेलंगणाचा उठाव, भारताची राज्यघटना, पहिल्या सार्वत्रिक निवडणुका, भाषावार प्रांतरचना, गोवा मुक्तिसंग्राम, भारत-चीन युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, काँग्रेस पक्षातील उभी फूट, नक्षलवादाचा जन्म, बांगलादेश मुक्तिसंग्राम, जयप्रकाशप्रणित नवनिर्माण आंदोलन, राष्ट्रीय आणीबाणी, जनता पक्षाची राजवट, इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर इत्यादी. या राष्ट्रीय व अन्य अनेक लहान-मोठ्या प्रादेशिक व जागतिक घडामोडींच्या प्रसंगी त्या सात राजकीय प्रवाहांच्या भूमिका कशा राहिल्या या संदर्भातील तपशिलांची व मतमतांतराची या पुस्तकात रेलचेल आहे.

ग.प्र.प्रधान यांच्यावर वामन मल्हार जोशी यांच्या ‘रागिणी अर्थात काव्यशास्त्रविनोद' या तत्त्त्त्वचिंतनात्मक कादंबरीचा सखोल प्रभाव होता आणि साता उत्तराची कहाणी लिहिण्याच्या प्रेरणेचा उगम रागिणीमध्ये होता. त्यांनी हे पुस्तक लिहायला सुरुवात केली 1975 मध्ये आणि ते प्रसिद्ध झाले 1980 मध्ये. त्या पाच वर्षांत त्यांनी त्या सातही प्रवाहांतील प्रमुख नेत्यांना हस्तलिखित किंवा त्यातील काही भाग दाखवून ‘त्या वेळी वा त्या प्रसंगी तुमच्या भूमिका अशाच होत्या ना, तुमचे चित्रण करताना विपर्यास किंवा अन्याय तर झालेला नाही ना?’ असे विचारून घेतले होते आणि त्याप्रमाणे बदल करून त्या पुस्तकाची अंतिम संहिता तयार केली होती. (प्रधानसरांचा जन्म 1922 चा, म्हणजे त्यांनी स्वतः त्या चाळीस वर्षांतील सर्व राजकीय प्रवाहांची वाटचाल पाहिली होती, आणि त्यातील समाजवादी प्रवाहाचे ते प्रतिनिधी होते.)

‘साता उत्तराची कहाणी’चे त्या काळात भरपूर स्वागत झाले, मौज प्रकाशनकडून आल्याने साहित्यिक वर्तुळातही ते दखलपात्र ठरले. ‘मात्र साहित्यिक मूल्यांच्या निकषांवर या पुस्तकाला कादंबरी म्हणता येणार नाही आणि यातील सातही व्यक्तिरेखा इतक्या प्रामाणिक कशा असू शकतात,’ अशी टीका झाली. साहित्यकृती/कादंबरी म्हणून त्याकडे पाहिले तर ती टीका रास्त आहे. मात्र वैचारिक लेखन म्हणून पाहिले तर तोच या पुस्तकाचा सर्वांत मोठा गुण ठरतो. मात्र वैचारिक पुस्तक म्हणून त्याकडे पाहिले तर त्यात एक मोठेच न्यून राहून गेले आहे, ते प्रधानसरांनीच नोंदवून ठेवले आहे. ते असे की, त्या पुस्तकात काँग्रेसची व्यक्तिरेखा आलेली नाही. देशाची नव्याने उभारणी करण्यासाठी सात वेगवेगळे प्रवाह कसा विचार करीत होते व कसे निर्णय घेत होते, हे रेखाटणाऱ्या त्या पुस्तकात, नवा देश घडवण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती प्रवाह राहिलेल्या काँग्रेसची व्यक्तिरेखा नसणे हे मोठेच न्यून आहे, यात शंका नाही.

तर असे हे साता उत्तराची कहाणी हे पुस्तक मी 2001 मध्ये वाचले. त्यामुळे राजकीय आकलनाचे माझे क्षितिज बरेच रुंदावले, संदिग्धतेच्या अनेक जागा भरून निघाल्या. प्रत्येक राजकीय प्रवाहातील योग्य अयोग्य ठरवण्याच्या बाबतीत अधिक स्पष्टता आली. साहजिकच, त्या सात प्रवाहांपैकी कोणता राजकीय प्रवाह आपल्याला किती जवळचा वा दूरचा वाटतो. याचा विचार करू लागलो. तेव्हा आलेली स्पष्टता अशी...

1. माझे बालपण अशा गावात गेले जिथे धार्मिक उत्सव वा सण समारंभ साजरा झाला नाही, असा क्वचितच एखादा आठवडा जात असेल. तो सारा आनंदाचाच भाग असायचा, तरीही संस्कृतीच्या नावाखाली अनिष्ट रूढीपरंपरांचे आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली विविध प्रकारच्या विषमतांचे उघड वा छुपे समर्थन करणारा हिंदुत्ववाद मला कायमच त्याज्य वाटत राहिला; भले त्यांच्या शिस्तीचे, त्यागाचे व देशभक्तीचे कितीही कौतुक होत असले तरी!

2. माझे एक काका कट्टर कम्युनिस्ट आहेत, मला सार्वजनिक जीवनाची व वाचन लेखनाची आवड निर्माण होण्यात त्यांचा बराच मोठा वाटा आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचाही माझ्यावर प्रभाव राहिला. तरीही कम्युनिझमचे आकर्षण मला कधीच वाटले नाही; याची बरीच कारणे सांगता येतील, पण कम्युनिझमधील निर्दयीपणा, वर्गशत्रू ही कल्पना आणि व्यक्तीला असलेले दुय्यम महत्त्व, हे मला कायम त्रासदायक वाटत राहिले.

3. क्रांतिकारकांचे बलिदान व योगदान मान्य करूनही, टोकाच्या त्यागाची मागणी करणारा त्यांचा मार्ग दीर्घकालीन दृष्टीने व सर्वसाधारण परिस्थितीत अनुकरणीय असू शकत नाही, अशीच माझी धारणा राहिली; शिवाय तिथे काही निश्चित असा विचारप्रवाह आहे असेही कधी दिसले नाही.

4. रॉयवाद समजून घेण्यासाठी मी प्रयत्न केले होते आणि एम.एन.रॉय यांचा जीवनप्रवास अचंबित करणारा वाटला होता, पण ते कुठून निघाले आणि कुठे पोहोचले हे पाहता असेच वाटत राहिले की, इतका प्रतिभाशाली व अलौकिक कर्तृत्वाचा माणूस सतत इतका घाईत का राहिला? शिवाय, अखेरच्या काळात त्यांनी स्वतःच आपल्या विचारप्रवाहाचे विसर्जन केले होते, त्यामुळे रॉयवादाविषयी फार काही नकारात्मक वाटले नाही, पण कधी आपुलकीही वाटली नाही.

5. महात्मा गांधी यांनीच गांधीवाद नावाचे काही अस्तित्वातच नाही असे सांगितले होते, मात्र त्यांचे विचार व कार्य स्तिमित करणारे होते, त्यात नित्यनूतन असे सापडत राहिले; साध्यसाधनविवेक ही त्यांनी जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे असे वाटत राहिले. शिवाय कोणत्याही व्यक्तीला वा घटकाला त्याज्य न समजणारा व जीवनाचा सर्व अंगांनी विचार करणारा असा महामानव जगाच्या इतिहासात अन्य कोणी नसावा, ही जाणीव मनात अधिकाधिक रुजत गेली. पण संपूर्ण गांधी कोणत्याही काळातील कोणत्याही समाजाला झेपणारा नाही, ही जाणीवही कधीच कमी झाली नाही.

6. डॉ.आंबेडकरांची विद्वत्ता व त्यांनी हाताळलेले विषय कोणीही नतमस्तक व्हावे असे आहेत, केवळ भारतीय संविधानाला नाही तर भारतीय लोकशाहीला त्यांनी दिलेले योगदान शतकानुशतके वंदनीय मानले जाईल. पण त्यांच्याकडून गांधींच्याविषयी इतकी तीव्र नापसंती व्यक्त केली गेली की, त्या दोघांच्या मृत्यूनंतर अर्धशतक उलटले तरी प्रत्येक आंबेडकरवाद्यांच्या मनात गांधींविषयी टोकाची कटुता असतेच, त्यामुळे आंबेडकरवाद म्हटले की, ‘आहे मनोहर तरी’ असेच मला वाटत राहिले.

7. बुद्धिमत्ता, चारित्र्य व समर्पण वृत्ती आणि सामाजिक उत्तरदायीत्वाचे भान कधीही न हरपणे, या निकषांवर समाजवादी लोक कायम अव्वल स्थानी राहिले. व्यक्तीची प्रतिष्ठा व शासनसंस्थेची जबाबदारी या दोन्हींबाबत ते कमालीचे आग्रही राहिले, त्यामुळे या प्रवाहाने समाजजीवनाची किती दालने खुली केली, याची गणती नाही. पण त्यांच्यात इतक्या फाटाफुटी व इतके गटतट की, त्यातील कोणत्या गटाची भूमिका खऱ्या अर्थाने समाजवादी समजली जावी, याबाबत संभ्रमाचे व गोंधळाचे वातावरण कायम राहिले. शिवाय सार्वजनिक जीवनात तत्त्व आणि व्यवहार, अपेक्षा नि वास्तव यामधील अंतर कमी करत जाण्याचा प्रयत्न व्हायला हवा, पण समाजवाद्यांमध्ये हे अंतर वाढतच जाताना दिसले.

एकंदरीत विचार करता गांधीवादी, आंबेडकरवादी व मार्क्सवादी या तीन प्रवाहातील काही चांगले व काही  वांगले, असे अजब मिश्रण म्हणजे समाजवादी. ते तुलनेने सर्वात जवळचे वाटतात, पण आपल्याला लेबल लावायचेच ठरले तर काय, या प्रश्नावर मला साता उत्तराची कहाणी या पुस्तकाने आणून सोडले.

त्यानंतर काहीच महिन्यांनी ना.य. डोळे यांचे ‘राजकीय विचारांचा इतिहास’ हे जाडजूड पुस्तक हाती पडले. त्यात विविध राजकीय प्रवाह व उपप्रवाह यांची वैशिष्टे सांगितली आहेत. काही पाने उलटली आणि ‘लोकशाही समाजवाद’ या उपशीर्षकाखाली दिलेली वैशिष्टे वाचून थबकलो. यातील सर्व नाही पण बरीच वैशिष्ट्ये आपल्याला लागू होतात, असे वाटले. त्यानंतर काहीच दिवसांनी जॉर्ज ऑर्वेल यांचा Why I Write? हा निबंध वाचला, तो इतका आवडला की मी केलेला तो पहिला अनुवाद. त्यात, असे म्हटले होते की, ‘गांभीर्याने लेखन करणाऱ्या कोणत्याही लेखकामध्ये चार प्रमुख व प्रबळ प्रेरणा असतात. त्यांची तीव्रता व्यक्तीनुसार कमी-जास्त असू शकते आणि एकाच व्यक्तीमध्ये काळानुसार कमी-अधिक होऊ शकते.’ राजकीय हेतू ही त्यातील चौथी प्रेरणा आहे. ऑर्वेल यांनी त्या प्रेरणेच्या संदर्भात असेही म्हटले आहे की, ‘आणि मग माझे लेखन सर्वंकष एकाधिकारशाहीच्या विरोधात व मला कळलेल्या लोकशाही समाजवादाच्या बाजूने होत राहिले. माझे पूर्वीचे जे लेखन तसे नाही ते मला कुचकामी वाटत आले आहे.’ त्या विधानावर मी थबकलो, पण तरीही ते म्हणणे पूर्णतः आपले वाटले नाही.

आणखी काही दिवसांनी अरुण टिकेकर यांच्या ‘तारतम्य’चा चौथा खंड पूर्ण वाचला. त्यात जुनी पुस्तके आज उद्याच्या व भारतीय समाजाच्या संदर्भात, अशी थीम घेऊन केलेले लेख होते. त्यातील एका लेखाचे शीर्षक होते, ‘एकविसाव्या शतकासाठी योग्य विचारप्रणाली कोणती?’ तो लेख एरिक फ्रॉम यांच्या The Sane Society या 1956 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन लिहिलेला होता. त्या लेखाच्या शेवटी असा निष्कर्ष काढला होता की, ‘उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवाद, ही एकविसाव्या शतकासाठी योग्य विचारप्रणाली आहे.’ त्यानंतर लगेचच सेन सोसायटी हे पुस्तक मिळवले आणि आधी त्याचे conclusion/summary हे शेवटचे प्रकरण वाचले. ते वाचून असे वाटले की, ‘‘होय आपल्याला ‘उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवादी’ असे लेबल लावता येईल.’’ आणि मग असाही साक्षात्कार झाला की, भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट केलेल्या ‘समाजवादी’ या शब्दाचा अपेक्षित अर्थ असाच आणि एवढाच आहे. त्यामुळे ‘राजकीय दृष्टीने मी कोण?’ या प्रश्नांचे उत्तर मला मिळाले. दरम्यान, लोकशाही समाजवाद ही काही आयडिऑलॉजी नाही, अशी टीका वाचत/ऐकत आलो होतोच; त्यामुळे उदारमतवादाचा पुरस्कार करणारा लोकशाही समाजवाद याला आयडिऑलॉजी निश्चितच म्हणता येणार नाही! पण तरीही (कदाचित म्हणूनच) इतक्या दीर्घ प्रक्रियेनंतर सापडलेल्या त्या स्थानावर मी निश्चिंत राहिलो आहे. इतका की, तसे अन्य कोणाला सांगण्याची गरजच कधी वाटली नाही.

तर माझी राजकीय विचारप्रणाली कोणती, हे शोधण्याच्या प्रक्रियेत साता उत्तराची कहाणी हे पुस्तक माईलस्टोन ठरले.

ताजा कलम : ती प्रक्रिया संपल्यानंतर तीन वर्षांनी साधना साप्ताहिकाशी व प्रधानसरांशी माझी ओळख झाली. साधनासाठी मी लिहिलेल्या ‘लाटा लहरी’ या युवा सदरावर साता उत्तराची कहाणीची सावली होती. त्यानंतर तीन वर्षांनी प्रधानसरांनी ‘आठा उत्तराची कहाणी’ हे पुस्तक लिहिले, तेव्हा त्या हस्तलिखिताचा पहिला वाचक मी होतो. त्यांच्या अखेरच्या सहा वर्षांच्या काळात (2004 ते 2010) मला त्यांचा निकटचा सहवास लाभला. त्या काळात त्यांना माझ्याविषयी बरीच माहिती झाली, पण माझ्यावर साता उत्तराची कहाणीचा असा व इतका प्रभाव आहे, हे मी त्यांना सांगितले नव्हते. आता हे सांगतो आहे, कारण आणखी चार महिन्यांनी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे.

Tags: लोकशाही समाजवाद उदारमतवाद अरुण टिकेकर विनोद शिरसाठ वैचारिक साहित्य ग. प्र. प्रधान साता उत्तराची कहाणी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके