डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ज्या ३६ मान्यवरांची उत्तरे आली आहेत, त्यातील ३१ मान्यवर असे आहेत ज्यांची नावे आजच्या मराठीतील जाणकार वाचकांनाही परिचयाची नाहीत, परंतु त्या काळात (विशेषत: त्या त्या देशांत) ते सर्वजण ख्यातकीर्त होते. अन्य पाच नावे मात्र सर्वसामान्य वाचकांनाही चांगलीच परिचयाची आहेत. त्यामध्ये दोन ब्रिटिश (बर्ट्रांड रसेल, जॉर्ज बर्नार्ड शॉ) आणि तीन भारतीय (गांधी, नेहरू, सी.व्ही.रामन) आहेत. यापैकी दोन्ही ब्रिटिश मान्यवरांनी दोन-चार ओळींत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. रसेल म्हणतात, ‘जीवनाला काहीही अर्थ नाही, आणि सत्याचा शोध घेण्यातून काहीही हाती लागणार नाही.’ शॉ म्हणाले, ‘ड्युरांट, तुमचा प्रश्नच निरर्थक आहे.’

वस्तुत: तत्त्वज्ञान (फिलॉसाफी) ही सर्व विद्याशाखांना जोडणारी विद्याशाखा आहे, पण तिच्याभोवती गूढत्वाचे वलय कायम राहिलेले आहे. जड, क्लिष्ट, डोके भणाणून सोडणारा विषय म्हणजे तत्त्वज्ञान असाच सर्वसाधारण समज सर्वत्र राहिलेला आहे. अशा या शाखेभोवतीचे गूढत्वाचे वलय फिकट करून, सर्वसामान्य वाचकांच्या मनातील तिच्याविषयीची भीती व दुरावा कमी करून, तिच्यात रस उत्पन्न करणारे काही अभ्यासक-संशोधक जागतिक स्तरावर होऊन गेले. त्यांच्यात विल ड्युरांट हे नाव अग्रभागी घ्यावे लागते. त्यांनी तत्त्वज्ञानाला उंच मनोऱ्यावरून जमिनीवर आणले, असे मानले जाते.

१८८५ मध्ये जन्म आणि १९८१ मध्ये मृत्यू असा कालखंड वाट्याला आलेल्या ड्युरांट यांना ९६ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी लिहिलेला ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ हा सहाशे पानांचा ग्रंथ १९२६ मध्ये प्रसिद्ध झाला आणि तो जगभर गाजला. त्यात सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, बेकन, स्पिनोझा, व्हॉल्टेअर, कान्ट, शोपेन हॉवर, स्पेन्सर, नीत्शे, बर्गसाँ, रसेल, क्रोचे इत्यादी तत्त्ववेत्त्यांवरील लेख आहेत. त्या ग्रंथाच्या लक्षावधी प्रतींची जगभर विक्री झाली. वयाच्या केवळ ४० व्या वर्षी त्यांना, या एका ग्रंथाने जगभरातील लेखक-अभ्यासक-विचारवंत यांच्या पहिल्या रांगेत स्थान मिळाले. या पुस्तकातून त्यांना इतकी रॉयल्टी (रक्कम) मिळाली की, पुढील आयुष्यात त्यांनी काहीच आर्थिक प्राप्ती केली नसती तरी त्यांना उत्तम प्रकारे आणि सन्मानाने जगता आले असते. (या ग्रंथाचा मराठी अनुवाद साने गुरुजींनी ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची कहाणी’ या नावाने १९४२ मध्ये तुरुंगात असताना केला आहे, यावरून या ग्रंथाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता लक्षात येईल.)

परंतु ड्युरांट यांनी त्या ग्रंथलेखनानंतर एक बृहद्‌प्रकल्प हाती घेतला आणि पुढील पन्नास वर्षे त्यावर काम केले. तो प्रकल्प म्हणजे ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन.’ सभ्यता व संस्कृती यांचा जागतिक इतिहास कथन करणाऱ्या त्या प्रकल्पात ११ खंड प्रकाशित झाले, प्रत्येक खंडाच्या पानांची संख्या हजारांपेक्षा जास्त आहे (या  लेखनप्रकल्पात शेवटच्या काळात त्यांची पत्नी एरियल यांची मदत झाली.) या ११ खंडांची अशी ख्याती आहे की, जगातील कोणत्याही मोठ्या व चांगल्या ग्रंथालयात हे खंड नाहीत, असे होऊच शकत नाही.

याव्यतिरिक्त ड्युरांट यांनी ‘द प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी’, ‘लेसन्स ऑफ हिस्ट्री’ आणि अन्य लहान-मोठे असे डझनभर ग्रंथ लिहिले. या सर्व लेखनप्रक्रियेत ड्युरांट यांनी इतिहास आणि तत्त्वज्ञान यांची अशी काही सांगड घातली की, त्यामुळे तत्त्वज्ञानाभोवतीचे गूढतेचे वलय कमी झाले आणि इतिहासाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यासाठी जाणकार वाचकांना मदत होऊ लागली. अभ्यासाच्या, संशोधनाच्या व प्रबोधनाच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान अनन्यसाधारण आहे. अशा या ड्युरांट यांनी १९३१ मध्ये एक प्रयोग केला होता, त्याला त्यांनी ‘तत्त्वज्ञानाचा खेळ’ असे संबोधले होते.

त्याचे असे झाले... १९३० च्या हिवाळ्यात अमेरिकेतील आपल्या घराच्या प्रांगणात एका सकाळी ते थंडीने कुडकुडत, आवारातील झाडांची पाने छाटण्याचे काम करीत होते, झाडांना पाणी घालत होते. तेव्हा उत्तम पोषाख केलेला, सभ्य-सुसंस्कृत वाटावा असा एक मध्यमवयीन गृहस्थ त्यांच्याकडे चालत आला आणि शांतपणे म्हणाला, ‘मिस्टर ड्युरांट, आज मी आत्महत्या करणार आहे, पण मी तसे करू नये, यासाठी तुम्ही मला कारण सांगू शकाल का?’ या अनपेक्षित व्यक्तीच्या अनपेक्षित हल्ल्याने, थंडीत कुडकुडत असलेले ड्युरांट एकदम गांगरून गेले आणि त्यांना त्यावेळी जे काही सुचले ते त्यांनी घाईगडबडीत पटापट सांगितले. ते ऐकून घेतल्यावर तो माणूस आला तसाच शांतपणे चालत गेला. त्यानंतर तो माणूस ड्युरांट यांना परत भेटला नाही, त्याचे काय झाले हेही त्यांना कळले नाही.

आपल्या उत्तराने त्याचे समाधान झाले की नाही, आणि तो जिवंत आहे की त्याने आत्महत्या केली हेही त्यांना कळले नाही. कारण त्याचे नाव, गाव किंवा अन्य माहिती त्या गडबडीच्या क्षणी विचारायचे ते विसरूनच गेले होते. तो हिवाळा संपला, उन्हाळा सुरू झाला. ड्युरांट यांच्या मनात तो विचार अधूनमधून येतच होता आणि आपण त्याक्षणी दिले ते उत्तर कितपत उपयुक्त होते/आहे, याविषयी त्यांच्या मनात कल्लोळ निर्माण होऊ लागला. मग आत्महत्त्यांच्या बातम्यांकडे त्यांचे अधिक लक्ष जाऊ लागले.

१९३० हे वर्ष आर्थिक महामंदीचे मानले जाते आणि त्याचा सर्वांत मोठा फटका अमेरिकेला बसला होता. त्याच दरम्यान अमेरिकेत आत्महत्त्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचेही दिसत होते. (१९०५ ते १९३० या पंचवीस वर्षांत अमेरिकेत अधिकृतपणे नोंद झालेला आत्महत्त्यांचा आकडा २ लाख ८४ हजार इतका होता.) आणि या काळात ड्युरांट यांना अनेक लोकांची पत्रे येत असत, त्यात आत्महत्त्येचे विचार त्यांच्या मनात कसे तरळतात हे लिहिलेले असे. ड्युरांट यांनी याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्या पत्रांमधून केलेली असे. याचे कारण ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’ या ग्रंथात ड्युरांट यांनी जीवनाचा मूलगामी विचार करणाऱ्या पाश्चात्त्य राष्ट्रांतील १६ तत्त्वज्ञांच्या विचारांचा/कार्याचा गाभा व आवाका पकडणारे लेख अतिशय सुलभ व वाचनीय पद्धतीने लिहिले होते. म्हणून त्या ग्रंथाच्या लेखकालाच ‘आपल्या मनातील आत्महत्त्येच्या विचारांबद्दल विचारावे’ असे त्या लोकांना वाटत असे.

अशा या पार्श्वभूमीवर, ड्युरांट यांच्याही मनात निराशा डोकावत असे आणि अशा पत्रलेखकांना समाधानकारक व उपयुक्त वाटेल असे काय उत्तर द्यावे, याबाबत संभ्रम निर्माण होत असे. म्हणून त्यांनी ठरवले की, ‘आपण एक प्रयोग करायचा, जगभरातील निवडक शंभर लोकांना पत्र पाठवून विचारायचे, जीवनाचा अर्थ काय? माणूस जगतो कशासाठी?’ मग त्यांनी विविध क्षेत्रांतील व विविध देशांतील व्यक्तींची यादी केली. त्यांना ज्यांच्या बुद्धिमत्तेविषयी विश्वास वाटतो अशा शंभर मान्यवरांची ती यादी होती. त्यात तत्त्ववेत्ते, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय नेते, वैज्ञानिक, नाटककार, चित्रकार, संगीतकार, लेखक, विनोदकार, शिक्षणतज्ज्ञ, संपादक, कवी, संत, खेळाडू, कादंबरीकार इत्यादी जानेमाने लोक होते. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदीही त्यात होता. ते सर्वजण त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी, त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या शहाणपणासाठीही प्रसिद्ध होते. आपापल्या देशांत आणि अन्य काही देशांतही!

मग या  सर्वांना (साधारणत: हजार शब्दांचे) सहा परिच्छेदांचे एक पत्र ड्युरांट यांनी लिहिले. त्यातील पहिलेच वाक्य असे होते, ‘तुम्ही तुमच्या हातातील काम काही वेळासाठी थांबवून माझ्यासोबत ‘तत्त्वज्ञानाचा खेळ खेळता का?’ त्या पत्रातील पहिल्या परिच्छेदात त्यांनी, ‘सध्याच्या म्हणजे १९३० च्या आसपासच्या काळात जगण्याच्या व जीवनाच्या संदर्भातील प्रश्न पूर्वी कधी नव्हे इतके सतावत असून, याआधी अनेक प्रबोधनकारांनी, सुधारकांनी, तत्त्ववेत्त्यांनी व वैज्ञानिकांनी जीवनाविषयी खूप काही लिहिले असले तरी आज सभोवताली निराशाच दिसते आहे’ असे लिहिले.

त्या पत्रातील दुसऱ्या परिच्छेदात खगोलशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, इतिहासकार, मानसशास्त्रज्ञ इत्यादी लोक आपापल्या अभ्यासातून जे काही सांगतात ते कसे केवळ तुकडे आहेत, हे लिहिले. तिसऱ्या परिच्छेदात ‘औद्योगिक क्रांतीनंतर पाश्चात्त्य जगतात कुटुंबव्यवस्था खिळखिळी झाली असून, जुनी नीतीमूल्ये ऱ्हास पावत असून, विवाहसंस्थेचे महत्त्व शरीरभोगापुरते मर्यादित होताना दिसत असून, लोकशाही व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरली जात असून, समाजवादाचे स्वप्न विरत चालल्याचे जाणवत आहे’ असे म्हटले आहे.

याच परिच्छेदात ते म्हणतात, ‘प्रत्येक नवा शोध बलवानांना अधिक बलवान तर दुर्बलांना अधिक दुर्बल करीत आहे आणि प्रत्येक नवे मशीन/तंत्रज्ञान माणसांचे विस्थापन करीत असून, युद्धाच्या शक्यता अनेक पटींनी वाढण्याला हातभार लावत आहे.’ चौथ्या परिच्छेदात ते म्हणतात, ‘एके काळी ईश्वर हे सर्व समाजाचे अधिष्ठान होते, पण ती श्रद्धा आता डळमळीत झाली असून, कोणत्याही सूक्ष्मदर्शक यंत्रातून (मायक्रोस्कोप) व दुर्बिणीतून (टेलिस्कोप) त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे माणूस हा किड्यामुंग्यांप्रमाणेच (पृथ्वीवरील) एक प्राणी असून, त्याच्या जगण्यात पराभव व मृत्यू यांच्याशिवाय सर्व काही अनिश्चितता आहे.’

पाचव्या परिच्छेदात म्हटले आहे, ‘‘आपण आता अशा निष्कर्षावर येत आहोत की, ‘सत्याचा शोध’ ही मानवी इतिहासातील सर्वांत मोठी चूक असून, ‘त्या-त्या क्षणाचा आनंद व उद्याची आशा’ एवढे सोडले तर सत्याचा शोध हा माणसाला त्रासदायकच ठरतो आहे.’’ शेवटच्या (सहाव्या) परिच्छेदात ड्युरांट लिहितात, ‘विज्ञान व तत्त्वज्ञान यांनी आपल्याला जवळ आणले आहे. मी वर्षानुवर्षे तत्त्वज्ञानावर प्रेम केले आहे आणि आता पुन्हा जीवनाकडे वळून तुम्हाला विचारत आहे, जीवनाचा अर्थ काय? तुम्ही सर्वजण अर्थपूर्ण विचार करत व अर्थपूर्ण जगत आला आहात, म्हणून मला मदत करा. तुम्हाला कार्यरत राहण्यासाठीची, प्रेरणा, ऊर्जा, उद्दिष्टे, हेतू कुठून व कशा मिळतात आणि त्यातून आनंद, समाधान यांची प्राप्ती कशी होते?’

त्या पत्राचा शेवट करताना ड्युरांट लिहितात, ‘हे सर्व थोडक्यात किंवा विस्ताराने कळवा, तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मौल्यवान असेल.’ हे पत्र जगभरातील शंभर मान्यवरांना पाठवण्यात आले, त्यातील ३६ जणांनी उत्तरे पाठवली. त्यामधील काही उत्तरे दहा-वीस ओळींची आहेत, काही पत्रे एक-दोन पानांची तर काही पत्रे पाच-दहा पानांची आहेत. त्यापलीकडेही काही पत्रे आली, पण या विषयावर लिहिता येणे अवघड असल्याचे कळवणारी ती होती. तर काहींनी कळवले होते की, या प्रश्नांचा वेध आम्ही आमच्या लेखनात/ साहित्यात घेतलेला असून, वेगळे काही सांगता येणार नाही.

एवढे मात्र खरे की, ‘द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी’च्या लेखकाचे पत्र आहे म्हणून, काही अपवाद वगळता सर्वांनी ते पत्र गांभीर्याने घेतले आणि शंभर जणांच्या यादीत समावेश केला याबद्दल बहुतेकांनी आनंद व्यक्त केला. अशा या सर्व पत्रांचा संग्रह (लहान पत्रे आहेत तशी व दीर्घ पत्रे संक्षिप्त करून) विल ड्युरांट यांनी १९३२ मध्ये ‘ऑन द मिनिंग ऑफ लाईफ’ हे शंभरेक पानांचे पुस्तक प्रसिद्ध केले. (त्याची नवी आवृत्ती २००५ मध्ये प्रॉमेथियन प्रेसकडून आली.) त्या पुस्तकाच्या प्रारंभी ड्युरांट यांनी स्वत:चे ते संपूर्ण पत्र दिले आहे आणि जीवनाविषयी स्वत:चे चिंतन सांगणारे (साधारणत: तीन हजार शब्दांचे) टिपण पुस्तकाच्या शेवटी छापले आहे.

या पुस्तकात ज्या ३६ मान्यवरांची उत्तरे आली आहेत, त्यातील ३१ मान्यवर असे आहेत ज्यांची नावे आजच्या मराठीतील जाणकार वाचकांनाही परिचयाची नाहीत, परंतु त्या काळात (विशेषत: त्या त्या देशांत) ते सर्वजण ख्यातकीर्त होते. अन्य पाच नावे मात्र सर्वसामान्य वाचकांनाही चांगलीच परिचयाची आहेत. त्यामध्ये दोन ब्रिटिश (बर्ट्रांड रसेल, जॉर्ज बर्नार्ड शॉ) आणि तीन भारतीय (गांधी, नेहरू, सी.व्ही.रामन) आहेत. यापैकी दोन्ही ब्रिटिश मान्यवरांनी दोन-चार ओळींत उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. रसेल म्हणतात, ‘जीवनाला काहीही अर्थ नाही, आणि सत्याचा शोध घेण्यातून काहीही हाती लागणार नाही.’ शॉ म्हणाले, ‘ड्युरांट, तुमचा प्रश्नच निरर्थक आहे.’ (ही उत्तरे ब्रिटिश-अमेरिकन विद्वानांमधील शीतयुद्धाचे परिणाम म्हणून पाहता येतील?)  स्वत: विल ड्युरांट यांनी, त्या ३६ पैकी त्यांना विशेष आवडलेली उत्तरे म्हणून चार जणांचा उल्लेख केला आहे. चार्ल्स बिअर्ड, जॉन क्यूपर पॉऊस, आन्द्रे मोर्वा आणि ओवेन सी मिडलटन.

अमेरिकन इतिहासकार चार्ल्स बिअर्ड यांनी आपल्या उत्तराच्या प्रारंभी कवी जॉन मिल्टनचे वाक्य उदधृत केले आहे, ‘आपली गृहितके आणि विश्वास यांना धक्का देत सत्य आपल्यापर्यंत येते, पण काळाच्या प्रवासात आपण ते अशा पद्धतीने स्वीकारतो की, त्याच्याशिवाय जीवनप्रवाह पुढे सरकतच नाही.’ पुढे बिअर्ड म्हणतात, ‘त्यामुळे आपले आदर्श उद्‌ध्वस्त झाले तरी आपण कार्यरत राहतो. याचे कारण कदाचित आपल्या आतमध्ये अशी जैविक ऊर्जा असते जी मार्गातील अडथळे दूर करत आपल्याला पुढे पुढे जाण्यास भाग पाडते. पण एवढेच नाही, पूर्ण सुरक्षित व यशस्वी आयुष्य जगणारे लोकही गरज नसताना धोका पत्करत पुढे पुढे जात राहतात, यामागे तीच ऊर्जा कार्यरत असावी... आपण स्वत:चे विश्लेषण केले तर लक्षात येईल- अनेक परस्परविरोधी हेतू आपल्या आत एकाच वेळी प्रबळ असतात. उदा. काहीतरी मिळवण्यासाठी स्वार्थाची प्रेरणा आणि इतरांना काहीतरी मिळावे यासाठी लढण्याची व प्रसंगी स्वत:चे काही गमावण्याची (त्यागाची) प्रेरणा एकाच वेळी कार्यरत असतात. हा प्रकार प्रत्येक लहान-मोठ्या स्त्री-पुरुषांच्या बाबतीत खरा असतो, अर्थात या प्रेरणांची तीव्रता व्यक्तीनुसार व काळानुसार कमी-अधिक असते.’... बिअर्ड हे इतिहासचक्राकडे एक महानाट्य म्हणून पाहतात, त्यात त्यांना केवळ वाताहत दिसत नाही तर यादवी व शोकांतिका यांच्याबरोबरच काही एक प्रकारचे नियमन आणि नियोजनपूर्वक प्रगतीही दिसते.

त्यामुळे त्यांना याची खात्री पटली आहे की, ‘जगात केवळ जन्म-मूत्यूचे चक्र चालू नसून, क्रौर्य व शोकांतिका यांच्या आडही खूप काही भव्य व उदात्त घडत असते. त्याचा शोध घेणे हे मानवी बुद्धिसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे... विश्वाच्या निर्मितीच्या वेळी सुसंगत व भव्य म्हणावे असे डिझाइन नव्हते, पण जे तुकडे होते ते हेच सांगत आहेत की, ते डिझाइन पूर्ण करण्याची ताकद मानवजातीमध्ये आहे. तत्त्वज्ञानाने आपल्यासमोर चांगल्या जीवनाचे चित्र उभे केलेले आहे. आणि ते जीवनचित्र अधिक चांगले करण्यासाठी तंत्रज्ञान मदत करीत आहे... इतिहासाच्या महानाट्याकडे अशा दृष्टीने मी पाहतो, त्यामुळे अत्यंत निराशेच्या क्षणीसुद्धा कार्यरत राहू शकतो. इतरांकडून प्रेम मिळवता येणे, आनंद मिळवता येणे आणि आपल्या कार्यातून इतरांचे आयुष्य चांगले होण्यासाठी मदत होत राहणे, आनंदाचे वाटप करता येणे ‘याला जीवन ऐसे नाव’ असे मला वाटते आणि हे विचारचक्रच माझी छोटीसी गिरणी चालू ठेवते आहे.’  

२. ब्रिटिश लेखक-समीक्षक, कवी जॉन क्यूपर पॉऊस म्हणतात, ‘निसर्गाची म्हणून काही रचना आहे आणि राष्ट्राचा गाडा चालवणारी म्हणून काही राज्ययंत्रणा आहे. पण दोन्हींतही अधूनमधून बिघाड होत असतो, तो का व कसा याचा प्रत्येक माणसाला शोध घेता येतो आणि त्यातच विश्वास, आशा व आनंद यांची गुपीते दडलेली असतात. या गुपितांचे सर्वाधिक चमत्कारिक प्रभाव, त्यांचे मूल्य आणि त्यांच्या जाणीवा यांचा शोध निसर्गातून लागणे अद्याप बाकी आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये अलौकिक म्हणावेत असे ताज्या पाण्याचे झरे अशा गूढरम्य पद्धतीने वाहत असतात की, ते कोणत्याही विचारधारेला नष्ट करता येत नाहीत आणि कोणत्याही राजकीय, आर्थिक व्यवस्थेमध्ये किंवा अव्यवस्थेमध्येही ते झरे प्रवाही राहण्याचे थांबत नाही... निसर्ग मित्रत्वानेच वागत असतो, सबलांशी आणि दुर्बलांशीही! आणि नियम व पद्धती यांच्याद्वारे विवेकाचे जनरलायझेन करून सत्य सापडत नसते. पण व्यक्तीच्या अंत:प्रेरणा, सर्जनशीलता व सदसद्‌विवेक यांच्या निसर्गाशी होणाऱ्या तादात्म्यातून मात्र सत्याच्या जवळ जाता येऊ शकते.’  

३. फ्रेंच लेखक आन्द्रे मोर्वा यांना ड्युरांटचे पत्र व त्यातील प्रश्न इतका महत्त्वाचा वाटला की, त्यांनी फ्रेंच भाषेत एक दीर्घ निबंधच लिहून पाठवला. त्यातील तीन उतारे ड्युरांट यांनी त्या पुस्तकात घेतले आहेत, पण त्यातली गंमत अशी आहे की, तो निबंध म्हणजे गोष्टीवजा भाष्य असा आहे. त्यातील मध्यवर्ती गोष्ट अशी आहे : काही इंग्लिश स्त्रीपुरुष एका रॉकेटद्वारे चंद्रावर उतरतात, पण त्या रॉकेटमध्ये बिघाड झाल्याने त्यांचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटतो आणि मग त्या स्त्री-पुरुषांना चंद्रावरच वस्ती करणे भाग पडते. दहा वर्षे निघून जातात आणि मग हे स्त्री-पुरुष अशा पद्धतीने वागू लागतात की, ते ब्रिटनमध्येच आहेत (म्हणजे पंतप्रधान, राजा, राणी, राजपुत्र असलेल्या ब्रिटनचा भाग आहेत.) पुढील दोनशे वर्षे चंद्रावरची ब्रिटिश वसाहत फोफावत जाते, पण पृथ्वीशी संपर्क काही होत नाही. त्यामुळे तिथल्या सातव्या पिढीच्या मनात आपल्या पूर्वजांविषयी जे सांगितले/शिकवले जाते त्याविषयी शंका निर्माण होऊ लागते. त्यातील बंडखोर विद्यार्थ्यांचा एक गट, ‘दूर पृथ्वी नावाच्या ग्रहावर ब्रिटन नावाचे राष्ट्र आहे,  आपले सर्व कायदे ज्याच्या नावाने केले जातात तो सर्वेसर्वा राजा तिथे आहे, तो आपल्या चंद्राचा रक्षणकर्ता आहे’ या सांगण्यावर अविश्वास व्यक्त करू लागतात. तेव्हा तिथला मवाळांचा गट म्हणतो, ‘काळजी घ्या. तुम्ही जर पृथ्वीवरील आपल्या राजाचे अस्तित्व अमान्य केलेत आणि आपल्या परंपरा नाकारल्यात तर तुमचे चंद्रावरचे जगणे अवघड होऊन जाईल. मग तुमच्या जीवनाला अर्थ तो काय उरणार? तुम्हाला अन्य ऊर्जास्रोत कुठून मिळणार? कोणत्या गुपिताच्या आधारावर तुम्ही जगणार?’ ही गोष्ट लिहिली गेली त्या काळात ‘ब्रिटनच्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नाही’ असे बोलले जात होते (म्हणजे जगातील सहाही खंडांमध्ये ब्रिटनच्या वसाहती होत्या, त्यामुळे कुठे ना कुठे सूर्यप्रकाश असायचाच.) गंमत म्हणजे अमेरिकेने १९६९ मध्ये चंद्रावर माणूस पहिल्यांदा उतरवला, त्याच्या ३८ वर्षे आधी ही गोष्ट लिहिली आहे. आन्द्रे मोर्वा यांच्या या निबंधाला ड्युरांट यांनी व्हॉल्टेअर आणि आनातोली फ्रान्स या (ऑल टाइम ग्रेट) तत्त्ववेत्त्यांच्या तोडीचा असे संबोधले आहे.

४. ड्युरांट यांना विशेष आवडलेल्या प्रतिक्रिया वरील तिघांच्या आहेत, पण त्यांना हेलावून टाकणारे पत्र तेव्हा जन्मठेपेची शिक्षा न्यूयॉर्कमधील तुरुंगात भोगत असलेला कैदी नंबर ७९२०६ ओवेन सी मिडलटन याचे आहे. जीवनाचा अर्थ आपण त्याला देऊ तसा आहे, असे मध्यवर्ती प्रतिपादन असलेल्या त्या पत्रात ओवेन म्हणतो, ‘ज्या प्रमाणात मानसिक संतुलन त्या प्रमाणात जीवनाला अर्थ प्राप्त होतो, ते संतुलन असेल तर बाहेरचे जगणे जेवढे आनंदी व समाधानी असते तेवढेच तुरुंगातील असू शकते. बाहेरचे लोक सदासर्वदा आनंदी नसतात, तसेच तुरुंगातील लोक सदासर्वदा दु:खी नसतात... मी एक निग्रो पाहिला होता, ज्याला किंचितही अक्षरओळख नव्हती, पण तो ज्या प्रोफेसरकडे काम करत होता, त्याच्यापेक्षा जास्त आनंदी होता. आनंदी जगण्याचा संबंध धर्म, शिक्षण, सत्ता, संपत्ती, यांच्याशी किंवा भौगोलिकतेशी वा सामाजिक स्थानाशी जोडता येणार नाही. कारण आनंदाचा संबंध मानसिकतेशी आहे... अतिशय विचारपूर्वक एखादा माणूस ‘जीवनाला काहीही अर्थ नाही’ अशा निष्कर्षाप्रत आला असेल, तर तो निश्चितच बुद्धिमान असला पाहिजे. पण बुद्धिमान माणसे निरर्थक गोष्टी करणार नाहीत, हे लक्षात घेतले तर त्यांचा सिद्धांत चुकीचा ठरतो.

त्यामुळे मी या निष्कर्षावर आलो आहे की, बुद्धिमान माणसांना स्वत:च्या या सिद्धांतांविषयी पुरेशी सुहानुभूती नसते. त्यामुळे वृत्तपत्रात जेव्हा जेव्हा आत्महत्त्येची बातमी वाचतो, त्या प्रत्येक वेळी मला वाटते, हा असा माणूस होता ज्याला खरोखरच वाटत होते की, जीवनाला काहीच अर्थ नाही... नियती या जगाला कुठे घेऊन जाईल हे मला माहीत नाही, पण त्या शेवटाच्या खूप आधी माझ्या वाट्याला आलेली भूमिका मी पार पाडली पाहिजे. ज्ञात इतिहास असेच सांगतो की, महान, चित्ताकर्षक, सुंदर आणि उर्ध्वगामी दिशेने जगाची जी वाटचाल होत आहे, तिलाच ‘जीवन’ असे म्हणतात. त्यामुळे शारीरिक यातना, कुप्रसिद्धी, निराशा यापैकी कशानेच माझ्या वाट्याला आलेली भूमिका, माझी स्फूर्ती, माझी मानसिकता हिरावून घेतली जात नाही.’ ओवेन मिडलटनच्या या हृदयस्पर्शी पत्रावर भाष्य करताना ड्युरांट म्हणतात, ‘अशा बुद्धिमत्तेला अखेरपर्यंत तुरुंगात ठेवण्यापेक्षा तिचा अधिक चांगला उपयोग करून घेण्याचे मार्ग शोधले पाहिजेत.’  विल ड्युरांट यांनी या प्रयोगात ज्या शंभर व्यक्ती निवडल्या त्यातील तीन व्यक्ती भारतीय आहेत.

१. गांधीजींनी राऊंड टेबल कॉन्फरसला निघण्यापूर्वी ड्युरांटच्या पत्राला उत्तर देणारे जे पत्र लिहिले, त्यात सरळ क्रमांक टाकून सात मुद्दे लिहिले. त्याचा सारांश असा- जीवन हे मला दैवी शक्तीची ठिणगी वाटते. धर्म हा पारंपरिक नाही तर व्यापक अर्थाने, मला दैवी शक्तीचा अंश प्राप्त करण्यास मदत करतो. पण नैतिकतेचा पूर्ण अंगिकार केल्याशिवाय हा अंश प्राप्त करता येत नाही. त्यामुळे, माझ्या दृष्टीने धर्म आणि नीती हे समानार्थी शब्द आहेत. संपूर्ण सत्याचा शोध घेण्याचा ध्यास मला सतत कार्यरत ठेवतो. हा ध्यासच मला ऊर्जा आणि स्फूर्ती पुरवतो. जिवंत असे जे काही आहे त्याच्या सेवेतच मला आनंद मिळतो. कारण अशा सर्वांचे जीवन मिळूनच दैवी शक्ती बनते. सर्व प्रकारचा अंध:कार आणि सर्व प्रकारचा दुष्टपणा यांच्या विरोधात लढत राहणे हेच माझे ध्येय!  गांधीजींच्या संदर्भात ड्युरांट भाष्य करतात की, ‘धर्म संकल्पनेचा वापर करून व्यक्तीच्या आणि समूहांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गांधींइतकी प्रभावी व्यक्ती पृथ्वीतलावर नाही. त्यांनी दिलेले उत्तर पुरेसे समाधानकारक नाही, पण ज्याच्या डोक्यावर एका उपखंडाचे ओझे आहे आणि जो ३२ कोटी जनतेच्या मुक्तीसाठी श्रम करीत आहे, त्याने एवढे उत्तर पाठवले यासाठीही आपण कृतज्ञ असले पाहिजे.’

२. जवाहरलाल नेहरू जेमतेम ४२ वर्षांचे होते, तेव्हा ड्युरांटने त्यांना हे पत्र पाठवले होते आणि त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील गांधींनंतरचा महत्त्वाचा नेता असे संबोधले आहे. नेहरूंनी सहा-सात परिच्छेदांचे (साधारणत: हजार शब्दांचे) पत्र ड्युरांट यांना उत्तरादाखल पाठवले, ते संपूर्ण पत्र त्यांची जीवनदृष्टी दाखवणारे आहे. त्यांची आत्मकथा त्यानंतर पाच वर्षांनी प्रसिद्ध झाली, पण तिचे प्रतिबिंब म्हणून हे पत्र दाखवता येईल. त्यातील मध्यवर्ती आशय असा आहे- ‘तत्त्वज्ञानातील मूलतत्त्वांची (मेटाफिजिक्स) चर्चा करण्यात भारतीयांना आनंद मिळतो; पण मी स्वत:ला त्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे. कारण फार पूर्वीच माझ्या हे लक्षात आले की, त्या चर्चा/अभ्यास मला गोंधळात टाकतात आणि भविष्यातील कृतीसाठी मार्गदर्शक ठरत नाहीत. धर्म त्याच्या संकुचित अर्थाने मला भावत नाही. विविध ज्ञान- विज्ञानांच्या शाखांमध्ये मी मुशाफिरी केली आहे, त्यातून मला काही प्रमाणात आनंद मिळाला आहे आणि माझ्या कक्षा रुंदावल्या आहेत. पण तरीही मी काहीसा संभ्रमात, संशयात आणि काहीसा तुच्छतावादी होतो. पण ढोबळ म्हणावे असे काही आदर्श माझ्यात वस्ती करून असल्याने, मी समाजवादी व राष्ट्रवादी झालो. हळूहळू त्या दोहोंचे मिश्रण होत गेले आणि मग देशाचे स्वातंत्र्य हीच माझी उत्कट इच्छा व आकांक्षा बनली.

त्यानंतर, भारताचे स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्र स्वतंत्र होणे नाही, तर देशातील कोट्यवधी स्त्री-पुरुषांची दु:ख, दैन्य व शोषण यांपासून मुक्ती हा माझ्या मनातील स्वातंत्र्याचा आशय बनला. आणि मग भारत हे जगभरातील सर्व दु:खितांचे व शोषितांचे प्रतिक म्हणून माझ्या मनात आकार घेऊ लागले, त्यानंतर मी आंतरराष्ट्रीयवादी बनत गेलो. पण मनात या सर्व भावनांचा कल्लोळ वाढत गेला आणि असहायतेची जाणीव तीव्र होऊ लागली. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता आणि नेमके त्यावेळी माझ्या जीवनात गांधी आले. त्यांनी असा मार्ग दाखवला की, ज्यात परिणामांची खात्री होती किंवा कोणतीही किंमत चुकवून त्या दिशेने जावे असा तो मार्ग वाटला. मी उडी घेतली आणि लक्षात आले, दीर्घकाळापासून ज्याची प्रतिक्षा करीत आहे तो हाच प्रवाह आहे. हा प्रवाह/मार्ग प्रत्यक्ष कृतीचा होता आणि ती कृती मी उराशी बाळगलेल्या ध्येयपूर्तीसाठी होती. तेव्हापासून आतापर्यंत त्या ध्येयासाठी मी माझी सर्व शक्ती पणाला लावत आलो आहे, त्यातूनच मला अधिक बळ मिळत गेले आहे. परिणामी, मी नवा अर्थ व नवा हेतू असलेले पूर्ण जीवन जगू लागलो आहे... इतिहासातील आकडेवारी व तपशील असे सांगतात की, कित्येक महान व्यक्तींनी महान कृत्ये केली तरीही शोकांतिका झाल्याच, आदर्श तुडवले गेलेच, दुष्ट शक्तींनी सुष्ट शक्तींवर विजय मिळवलेच, त्यामुळे भविष्यकाळात नवे धोकेही निर्माण झाले. ही सर्व जाणीव मला कधीकधी निराशा देते. पण हे सर्व असूनही, मला असे तीव्रतेने वाटते की, माझ्या देशाचे आणि मानवजातीचे भविष्य उज्ज्वल आहे.

आम्ही जो स्वातंत्र्यलढा करीत आहोत, त्यामुळे ते भविष्य अलीकडे येत चालले आहे. माझ्या या भावनेला वस्तुस्थितीचा आधार वा पुरावे कृपया मागू नका, ते मी देऊ शकणार नाही. पण मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की, माझे मानसिक संतुलन, माझी शक्ती व प्रेरणा/स्फूर्ती मला हे विचारपूर्वक सांगते की, मी ज्या भव्य व उदात्त ध्येयासाठी कार्यरत आहे ते श्रम वाया जाणार नाहीत. अर्थातच, मी यश मिळवण्यासाठीच काम करीत आहे आणि मला उद्दिष्टांच्या दिशेने जलद गतीनेच जायचे आहे. पण तरीही आपल्या कृतीच्या परिणामांची चिंता मला फारशी वाटत नाही. जोपर्यंत आपण करतोय ती कृती योग्य आहे, अशी माझी खात्री आहे तोपर्यंत मला समाधान मिळतच राहणार आहे.’ नेहरूंच्या या पत्रावर ड्युरांट यांनी केलेले भाष्य असे होते, ‘एक नितळ मन इथे बोलले आहे. आज नैतिक आदर्शाची ज्योत पृथ्वीवर सर्वाधिक तेजाने जर कुठे तेवत असेल तर ती भारतात!’   

३. १९३० मध्ये सी.व्ही.रामन यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते, तो शोध ‘रामन इफेक्ट’ या नावाने प्रसिद्ध आहे. आकाशाचा रंग निळा का असतो, या प्रश्नाचे उत्तर त्यातून दिले गेले. म्हणून तो शोध लागला तो दिवस (२८ फेब्रुवारी) भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्या रामन यांनी दोनच परिच्छेदांचे उत्तर विल ड्युरांट यांच्या पत्राला पाठवले. हे उत्तर नेहरूंच्या आशयाला पूरक व पुढे घेऊन जाणारेच आहे. रामन म्हणतात, ‘या क्षणाचा आनंद आणि उद्याची आशा, इतक्या मर्यादित अर्थाने मी जीवनाकडे कधीच पाहिले नाही. या विश्वाचे महाप्रचंड गूढ उकलण्यासाठी मानवी मन हे फारच दुर्बल साधन आहे, पण मी सतत हाच विचार केला आहे की, आज आपल्याला जे ज्ञात आहे, त्यापेक्षा अधिक शोधण्यातून व समजून घेण्यातून हे जग निश्चितच अधिक चांगले होणार आहे. बौद्धिक व वैज्ञानिक संवेदना माझ्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहेत, धार्मिक कर्मकांड आणि श्रद्धा यांचे माझ्या आयुष्यात काहीही महत्त्व नाही, पण बुद्ध आणि ख्रिस्त यांची शिकवण (शब्दश: घेतली नाही तर) खूपच मोलाची आहे आणि माझा असा विश्वास आहे की, काळाच्या प्रवाहात ती कधीच नष्ट होणार नाही. काम करत राहण्याची इच्छा, त्यातून काही साध्य करण्याची आकांक्षा आणि त्याचा उपयोग अन्य लोकांना व्हावा ही मनोकामना मला सतत पुढे जाण्यासाठी ऊर्जा पुरवत असतात.

स्वैर उपभोग नव्हे तर स्वनियंत्रण हा माझ्या आनंदाचा खरा स्रोत आहे. आणि जग जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळवता येणे ही अधिक महान उपलब्धी आहे असे मला वाटते.’ ड्युरांटला आलेल्या अन्य पत्रांतूनही काही ना काही चमकदार व नवे आयाम पुढे येतातच! (पण त्या सर्वांची दखल घेणे येथे जागेअभावी व वेळेअभावी शक्य झालेले नाही.) समारोपादाखल ड्युरांट यांनी स्वत:ची जीवनदृष्टी सांगणारे विस्तृत टिपण लिहिले आहे. त्यात त्यांनी ज्ञान- विज्ञानाच्या अनेकविध शाखांच्या दृष्टिकोनातून जीवनाचा अर्थ काय याचा उहापोह केला आहे. आणि ‘या विश्वातील प्रत्येक घटकाचे काही ना काही महत्त्व आहे, जरी आपल्या छोट्या मनाला ते सापडत नसले तरी! त्यामुळे कशाचाही अर्थ शोधायचा तर तो एकूणाशी म्हणजे पूर्णत्वाशी शोधावा लागेल.’ असे मध्यवर्ती प्रतिपादन केले आहे.

पुढे जाऊन ते सांगतात, आपले अस्तित्व अधिक अर्थपूर्ण तेव्हा बनते जेव्हा आपल्याला आनंदी मार्गक्रमण करता येत असते. अर्थात, कितीही छोट्या गोष्टींत मोठा आनंद मिळू शकतो. स्वत:च्या आतल्या जगाशी व बाहेरच्या जगाशी संपर्कात राहून तो आनंद वाढत असतो. आपल्या आवडीचे काम करायला मिळते, अद्‌भुत काही पहायला मिळते, नवे काही समजायला लागते तेव्हाही आपण आनंदी होतो. आणि आपल्यासाठी कोणी काही करते किंवा आपण इतरांसाठी काही करतो तेव्हाही आनंदप्राप्ती होतच असते. म्हणजे आनंदप्राप्ती हा जीवनाचा मुख्य आशय आहे. विल ड्युरांटच्या या पुस्तकातील सर्वांच्या दृष्टिकोनातून हाती लागते ते सार म्हणजे जीवनाला काहीतरी प्रयोजन असण्यातून ही आनंदप्राप्ती होत असते. मग ते प्रयोजन आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करता येणे वा आपले मूल वाढवता येणे इतके साधेही असू शकते आणि जागतिक शांततेसाठी कार्यरत राहण्याचेही असू शकते. एखादी सर्जनशील कलाकृती निर्माण करणे किंवा गूढ उलगडण्यासाठी विज्ञानात संशोधन करणे असे भव्यदिव्य वाटणारे असू शकते आणि आपण रोज जे काम करतो तेच अधिक चांगले वा वेगळ्या पद्धतीने करत राहणे इतके साधेही असू शकते. स्वत:च्या बरोबर अन्य लोकांना जोडून घेत राहण्यातून ते प्रयोजन अधिक उदात्त होऊ शकते. (आणि जगाच्या कोलाहलापासून दूर राहून शांतपणे गूढत्वात रममाण होण्यातही ते प्रयोजन असू शकते.) म्हणजे आपल्या जगण्यात, वागण्यात, कामात अधिक परिपूर्णता आणण्यात, नीतीमूल्ये विकसित करण्यात, योग्य सुखोपभोग घेण्यात आणि समाजसन्मुख जगण्यात जीवनाचा खरा अर्थ आहे, या निष्कर्षाप्रत यावे लागते. म्हटले तर हे साधे सत्य आहे, पण एका मोठ्या प्रयोगातून पुढे आलेले आहे, म्हणून ते अधिक गांभीर्याने घ्यावे असे आहे.

Tags: विनोद शिरसाठ युवा साधना दिवाळी अंक २०१८ विल ड्युरांट ‘द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन द स्टोरी ऑफ फिलॉसॉफी ‘लेसन्स ऑफ हिस्ट्री’ विल ड्यूरांटचा प्रयोग ‘द प्लेजर्स ऑफ फिलॉसॉफी’ Jorge burard shaw c.v. raman Jawaharlal Nehru Mahatma Gandhi the story of civilization the story of philosophy suicide suicidial experiment philosophy wil durant wil dyurantcha prayog vinod shirsath yuwa sadhana Diwali ank 2018 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विनोद शिरसाठ,  पुणे
vinod.shirsath@gmail.com

मागील दीड दशकापासून साधना साप्ताहिकात कार्यरत असलेले विनोद शिरसाठ हे साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन व कर्तव्य साधना (डिजिटल पोर्टल) यांचे संपादक आहेत.


Comments

 1. Yogesh wasad- 10 Sep 2020

  खूप सुंदर विश्लेषण आहे.यावर अनुवादित पुस्तकं येवू द्या वे

  save

 1. Satish Shirsath- 12 Sep 2020

  अतिशय नेमकेपणाने केलेले विस्लेशन आहे.वाचून खूप आनंद झाला आणि मनातील कल्लोळ कमी झाला. अश्याच प्रभावशाली आणि विचारला आकार देणाऱ्या व्यक्तींचे अनुवादित लिखाण वाचकांना द्यावे.

  save

 1. Vijay Padalkar- 26 Sep 2020

  खूप छान व सविस्तर लिहिले आहे. सुमारे २ वर्षापूर्वी मी म. टा. मध्ये या पुस्तकावर लिहिले होते. पण शब्दसंख्येच्या बंधनामुळे दीर्घ लिहिता आले नाही.

  save

 1. Netaji Khandagale- 30 Sep 2020

  आजच्या काळाला साम्य असणार्या काळातील विश्लेषण आहे. आजही लागु आहे. गरजेचं आहे.

  saveसाधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके