Diwali_4 भाई उद्धवराव पाटील
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

मराठवाडा 1956  मध्ये मुंबई प्रांतात सामील केल्याने भाई मुंबई विधानसभेचे आमदार झाले. प्रजासमाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, रिपब्लिकन पार्टी, लाल निशाण गट, डॉ.नरवणे, आचार्य अत्रे यांची सर्वांची मिळून संयुक्त महाराष्ट्र समिती बनवली गेली. भाई उद्धवराव यांची 1958  मध्ये विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. ‘शेकापच्या नेत्यांना घालायला व्यवस्थित कपडे तरी आहेत का?’ अशी कुजकी चर्चा केली जायची,  त्या वेळी भाई विरोधी पक्षनेते बनले. दैनिक केसरीनेही या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र भाईंचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर केसरीने रकानेच्या रकाने छापून त्यांच्या कारकिर्दीचे योग्य मूल्यमापन केले. यानंतर एक टर्म भाई विधानसभेवर होते. मग अनुक्रमे राज्यसभा व लोकसभेवर ते निवडून गेले.

भाई उद्धवराव पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय-क्रांतिकारी-सामाजिक अशा कुठल्याही इतिहासात दुर्लक्षून चालणार नाही. हैदराबाद मुक्तिसंग्रामातील भार्इंचे क्रांतिकारी योगदान, शेतकरी कामगार पक्ष, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात उमटवलेला आदर्शवत्‌ ठसा, फक्त आणि फक्त कर्तृत्वावर लढवलेल्या निवडणुका, अखंड कर्मयोग- असं ओझरतं वर्णन भाईंच्या आयुष्याचं करता येईल. सन 2019-2020 हे भाईंचं जन्मशताब्दी वर्ष होते.

भाईंचा जन्म बार्शी तालुक्यातील इर्ले या लहानशा गावी दि. 30 जानेवारी 1920 रोजी झाला. शेतकरी कुटुंब. आई-वडील, चुलते, आजोबा सारे शेतात राबणारे. ना शिक्षणाची पार्श्वभूमी, ना राजकारणाची. नाही म्हणायला चुलते ज्ञानेश्वर पाटील हे सातवीपर्यंत शिकले होते आणि वडील साहेबराव पाटील हे इयत्ता तिसरीपर्यंत.

भाई इर्ल्यातच इयत्ता तिसरीपर्यंत शिकले. चौथी त्यांनी काटी गावातून केली, इयत्ता सातवीपर्यंत ते तुळजापुरात शिकले. मेहुणे नरसिंहराव देशमुख यांच्याकडे उस्मानाबाद येथे राहून ते ‘गव्हर्न्मेंट मल्टिपर्पज हायस्कूल’मध्ये शिकू लागले. या काळात भाईंची राजकीय समज आकार घेऊ लागली. आर्य समाज चळवळीचे पंडित नरेंद्रजी यांना निजाम सरकारने अटक केली होती. या वेळी भाई मॅट्रिकच्या वर्गात शिकत होते. या अटकेच्या निषेधार्थ भाईंनी बी.एस.कुलकर्णी, बलभीम तांबे, भाऊसाहेब देशमुख, शंकर नायगावकर आणि वसंत सोनटक्के यांना बरोबर घेऊन उस्मानाबादचे मल्टिपर्पज हायस्कूल एक दिवसासाठी बंद पाडले! राज्य निजामाचे, शाळा निजामाची आणि भाईंनी निजामाविरोधातच ही शाळा बंद पाडली ! शाळेचे मुख्याध्यापक बेगसाहेब हे खुल्या विचारांचे असल्याने त्यांनी भाई व त्यांच्या साथीदारांवर कारवाई केली नाही.

निजामाविरुद्ध शाळकरी वयात भाईंनी केलेली ही पहिली कारवाई. यानंतर उस्मानिया विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची ‘वंदे मातरम्‌’ चळवळही मोठी गाजली. निजामाने असफजाही घराण्याचं हित चिंतणारी प्रार्थना स्टेटमधल्या शाळा-कॉलेजात म्हटली जाईल, असा कायदा केला. याविरुद्ध सर्व विद्यार्थिवर्गाने ‘वंदे मातरम्‌’ ही चळवळ सुरू केली. हा लढा चांगलाच पेटला. अखेर विद्यार्थ्यांसमोर उस्मानिया विद्यापीठ झुकलं आणि विद्यार्थ्यांना वंदे मातरम्‌ म्हणण्याची परवानगी दिली. भाई उद्धवरावदादांना मात्र विद्यापीठातून काढून टाकलं, कारण ते ह्या चळवळीच्या प्रमुखांपैकी एक होते. यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केला, पण आधी उस्मानियामध्ये शिकल्याने बनारस विद्यापीठाने प्रवेश नाकारला. अखेर त्यांनी इंटर सायन्सचं शिक्षण अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पूर्ण केलं.

‘भक्षक हे रक्षक होऊ शकत नाहीत’

स्टेट काँग्रेसवर निजामाने बंदी घातली होती. त्यामुळे महाराष्ट्र परिषद, कर्नाटक परिषद, आंध्र परिषद अशा परिषदा निर्माण होऊन निजामाविरोधात लढा दिला जात होता. महाराष्ट्र परिषदेचं पहिलं अधिवेशन लातूर येथे भरणार होते आणि परिषदेचे स्वागताध्यक्षपद उस्मानाबाद-कळंब-तुळजापूर अशा तालुक्यांच्या ठिकाणी गडगंज सावकारी करणारे फुलचंद गांधी यांना देण्यात आले होते. भार्इंचा व त्यांच्या साथीदारांचा सावकारशाहीला विरोध असल्याने या निवडीलाही विरोध होता. त्यासाठी दिवस-रात्र एक केली, गावोगावी जाऊन ‘भक्षक हे रक्षक होऊ शकत नाहीत’ या मथळ्याची पत्रके वाटली, लोकांना सावकारशाहीविरोधात एकत्र केले आणि ऐन अधिवेशनात या सर्वांनी ‘सावकारशाही.. ठेवायची न्हाई..!’ अशा घोषणा सुरू केल्या. लोकांचा प्रचंड विरोध फुलचंद गांधींना झाला. अखेर गांधी यांना ‘यापुढे कधीही सावकारी करणार नाही’, असा शब्द अधिवेशनात द्यावा लागला. यानंतर भाईंनी हात वर केला आणि सर्व जमाव शांत झाला. अधिवेशन शांततेत पार पडले.

निजामाविरुद्ध लढा

दि.15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. निजाम मात्र आपले सार्वभौमत्व उन्मत्तपणे राखून होता. त्याने रझाकारांसारखं धर्मांध सैन्यदल बनवून आपल्या प्रदेशात अत्याचार सुरू केले. या काळात भाईंचे लग्न झाले होते. उस्मानाबादमध्ये भाड्याने घर घेऊन ते राहत होते. निजामाच्या या कारवाया ऐकून त्यांनी पत्नी शारदाबार्इंना गावी इर्ल्याला नेऊन सोडले आणि निजामाविरुद्धच्या संघर्षात पूर्ण वेळ उतरले.

बार्शी, पानगाव, काजळा या ठिकाणी निजामाविरुद्ध लढण्यासाठी सैनिकी कँपची उभारणी भाई उद्धवरावदादा, नरसिंहराव देशमुख, अण्णासाहेब गव्हाणे यांनी केली. या कँपमध्ये नवयुवकांना निजामाच्या फौजेविरोधात लढण्याचे सैनिकी प्रशिक्षण दिले जायचे. पुणे, सोलापूर, गोवा या ठिकाणांहून या कँपसाठी हत्यारे मागवली होती. प्रतिसरकार चळवळीतले फिल्ड मार्शल जी.डी.बापू लाड यांनीही या कामी भार्इंना भरपूर सहकार्य केले. ते स्वतः या कँपमध्ये युवकांना प्रशिक्षण द्यायचे. अनेक कारवायांमध्ये जी.डी.बापू हे भाईंसोबत स्वतः सहभाग घ्यायचे.

एकदा शेंदरी रेल्वेस्थानकाजवळ भाई उद्धवराव आणि त्यांचे दहा-बारा साथीदार थांबले असता, त्यांना 500 रझाकारांची एक मोठी तुकडी तिथे आढळली. भाई उद्धवरावदादा आणि साथीदारांकडे अवघ्या दोन स्टेनगन आणि काही हातबॉम्ब होते. संख्येनेही हे लोक उणेपुरे दहा ते बाराच होते, पण अख्ख्या 500 च्या निजामी रझाकार टोळीवर यांच्या दोन स्टेनगन भारी पडल्या. निजाम रझाकार जवळच पिंपरी गावातल्या पाटलाच्या मोठ्या वाड्यात शिरले. वाडा मोठा होता, धान्य-पाणी अमाप. तेव्हा उद्धवराव आणि साथीदारांच्या सततच्या हल्ल्यांमुळे निजाम तुकडी वाड्यात राहू लागली. भाईंनी वाड्याच्या मालकाशी बोलणी करून अख्खा वाडाच जाळायचा चंग बांधला. पण रझाकारांसाठी अख्खा वाडा जाळणं सयुक्तिक नाही, असा विचार करून तो रद्द केला गेला. मात्र आतमधली निजाम रझाकार पार्टी सुखानं श्वास घेणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. रोज रात्री दोन ते अडीचच्या सुमारास भाई आणि साथीदार या वाड्यावर गोळीबार करायचे आणि हँडग्रेनेड्‌स वाड्यात टाकायचे.

स्वतः निजाम या घटनेने हादरून गेला होता. अखेर हैदराबादहून दिल्लीला विनंतीपत्र गेले आणि सोलापूरच्या कलेक्टरांकरवी ही निजाम पोलीस पार्टी भारत सरकारने वाड्याबाहेर सुरक्षित काढली, अन्यथा भाईंनी या निजाम पार्टीला जिवंत राहू दिले नसते.

शेतकरी कामगार पक्ष

तुळजापूर तालुक्यातील काटी या गावी नरसिंहराव देशमुख, अण्णासाहेब गव्हाणे, भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेचा निर्णय 1949 मध्ये घेतला. हा निर्णय क्रांतिसिंह नाना पाटील यांनी बार्शी येथील सभेत बोलून दाखवला. शेकापच्या तिकिटावर भाईंनी हैदराबाद स्टेट असेंब्लीची निवडणूक उस्मानाबाद-तुळजापूर मतदारसंघातून 1952 मध्ये लढवली आणि निवडून आले.

मराठवाडा 1956 मध्ये मुंबई प्रांतात सामील केल्याने भाई मुंबई विधानसभेचे आमदार झाले. प्रजासमाजवादी, कम्युनिस्ट, शेकाप, रिपब्लिकन पार्टी, लाल निशाण गट, डॉ.नरवणे, आचार्य अत्रे यांची सर्वांची मिळून संयुक्त महाराष्ट्र समिती बनवली गेली. भाई उद्धवराव यांची 1958 मध्ये विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

‘शेकापच्या नेत्यांना घालायला व्यवस्थित कपडे तरी आहेत का?’ अशी कुजकी चर्चा केली जायची, त्या वेळी भाई विरोधी पक्षनेते बनले. दैनिक केसरीनेही या निवडीबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र भाईंचा विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर केसरीने रकानेच्या रकाने छापून त्यांच्या कारकिर्दीचे योग्य मूल्यमापन केले. यानंतर एक टर्म भाई विधानसभेवर होते. मग अनुक्रमे राज्यसभा व लोकसभेवर ते निवडून गेले. त्या वेळी राजकीय परिस्थिती आजच्याइतकी अनैतिक नव्हती, राजकारण म्हणजे फक्त पैशांचा खेळ हे समीकरण नव्हते. भार्इंचे जिल्हाभरातले चाहते प्रचारासाठी घरच्या भाकरी बांधून घेऊन यायचे. इतकेच काय तर, डिपॉझिटचे पैसेही भाईंना घरटी लोकांनी जमा करून दिलेले आहेत.

भाई म्हणजे उस्मानाबादमधले सर्वमान्य आणि लाडके नेतृत्व होते. त्यांच्याबद्दलचा आदर आजही लोक बाळगून आहेत.

अभ्यासपूर्ण मतमांडणी

भाईंनी संसदीय सभागृहं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि मतप्रदर्शनांनी अक्षरशः गाजवलेली आहेत. सलग तीन वेळा विभानसभेवर, तर लोकसभा आणि राज्यसभेवर प्रत्येकी एकदा निवडून गेले होते. या सभागृहांमधे बोलताना कुठल्याही मुद्याची, संकल्पनेची, मागणीची मांडणी ते समाजातल्या दुर्बल घटकांना मध्यवर्ती ठेवून करायचे.

शेतकऱ्यांना द्यावा लागणारा चुकीचा कर, जमीन सुधारणा, कसेल त्याची जमीन या नियमानुसार जमिनीचे पुनर्वाटप, कूळकायदा, कमाल जमीन धारणा, उत्पादन खर्चावर आधारित भाव, स्वतंत्र शेतमाल बाजारपेठ, सहकारी तत्त्वावर शेतकरी एकजुटीतून शेती, साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ताब्यात देणे, कमी व्याजदराने दीर्घ मुदतीची कर्जे, प्राथमिक शिक्षणाबद्दलचे मूलभूत व तातडीचे बदल, दलितांसाठी शिष्यवृत्तीयुक्त शिक्षण, दुष्काळात कर्जमाफी, आधुनिक राहणीमानानुसार शेतमजुरांना कर्जमाफी, विकासाचा समतोल... अशा समाजोपयोगी अनेक मुद्यांवर त्यांची भाषणे या सभागृहांनी ऐकलेली आहेत.

विनोबांच्या भूदानाला विरोध

महात्मा गांधीजींचे पट्टशिष्य विनोबा भावे यांनी ‘भूदान चळवळ’ सुरू केली होती. तब्बल पाच कोटी एकर जमीन 1957 मध्ये मिळवून भारतातील शेती कसणाऱ्यांचा, शेतमजुरांचा प्रश्न मिटवल्याशिवाय पवनारच्या आश्रमात पाऊल ठेवणार नाही, अशी प्रतिज्ञाच घेतली होती. चळवळ चालू झाल्यापासून अडीच वर्षांत 24 लाख एकर जमीन मिळवली. भाईंनी या भूदान चळवळीला वैचारिक विरोध केला. मोठमोठे जमीनदार आपली उपजाऊ जमीन शाबूत ठेवून माळरान किंवा ज्या जमिनीचा काही उपयोग होणार नाही, अशा जमिनी विनोबांना दान करतात- ही भूदान चळवळीची मोठी विदारक बाब भाईंनी मांडली. मुळात गांधीजींच्या पट्टशिष्याला विरोध करणे- तेही जेव्हा बहुतांश सर्व राजकीय व्यक्तिमत्त्वे विनोबांच्या या भूदान चळवळीचे कौतुक करत होते, तेव्हा- ही मोठी गोष्ट आहे.

‘कसेल त्याची जमीन’ ही मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भाईंनी लावून धरलेली होती. या भूदानात मिळालेल्या न पिकवता येण्यासारख्या जमिनीचा शेतमजुराला उपयोगच नाही, हे त्यांचे मत होते आणि त्यांनी ते जाहीरपणे मांडलेही. पुढे जेव्हा ही भूदान यात्रा कर्नाटकातून महाराष्ट्रात येत होती, तेव्हा यात्रेच्या स्वागत समितीत सहभागी होण्यासाठी भाईंनी नकार दिला. या भूदान यज्ञामुळे शेतकरी-शेतमजुरांच्या मनात संभ्रम निर्माण होईल. त्यांच्या स्वागत समितीत सहभागी होऊन मी त्यांच्या संभ्रमात भर टाकू इच्छित नाही, असे मत त्यांनी जाहीरपणे मांडले.

आयुष्यातला साधेपणा

ते तीन वेळा आमदार, एकदा विरोधी पक्षनेते आणि दोन वेळा खासदार बनले होते. असे असतानाही त्यांनी कधीच डामडौल बाळगला नाही. स्वच्छ धोतर, पांढरा सदरा, डोक्यावर पांढरा फेटा- असा सर्वसामान्य वेष ते करायचे. कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी, मजूर, कामगार अथवा अडलेला-नडलेला कुणीही त्यांना सहजपणे भेटू शकत होता. अमक्या-तमक्याकडून शिफारस वगैरे घ्यावी लागते, तीन-चार स्वीय सहायकांच्या हाता-पाया पडावे लागते- तसे काहीही करण्याची गरज नव्हती. आपल्या घरासमोर ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत आल्या-गेलेल्यांसोबत गप्पा मारताना कित्येकांनी पाहिलेले आहेत.

भाईंच्या अचाट कारकिर्दीने प्रभावित असलेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी दि.9 ऑक्टोबर 1983 रोजी औरंगाबाद येथे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते त्यांचा मोठा नागरी सत्कार केला. शेतकरी, सर्वसामान्य जनता, कामगार यांच्यासाठी ते पूर्ण हयातभर लढले. आयुष्यभराच्या या दगदगीत त्यांचे स्वतःच्या तब्येतीकडे बरेच दुर्लक्ष झाले. आयुष्याच्या शेवटी त्यांना दुर्धर आजार जडला. त्यानंतर वर्षाच्या आतच दि.12 जुलै 1984 रोजी त्यांचे उस्मानाबाद येथे निधन झाले. शेतकरी-कामगारांसाठी आयुष्यभर झटणाऱ्या या झुंजार सेनानीला वंदन!

Tags: संयुक्त महाराष्ट्र समिती शेतकरी कामगार पक्ष योगदान क्रांतिकारी भार्इं मुक्तिसंग्राम हैदराबाद यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते विधानसभा उस्मानाबाद भाई उध्दवराव पाटील sanyukt Maharashtra samiti kamgar paksha shetakari yugdan krantikari muktisangram haidrabad yashwantraw chvhan viridhi pakshanete osmanabad Bhai uddhawaraw patil weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात