डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

दोन कादंबऱ्या, दोन व्हिजन्स (व्हाया सावरगाव खुर्द: देशीवादाचं शीर्षासन)

दिनकर दाभाडे ह्यांची तिसरी कादंबरी म्हणजे ‘व्हाया सावरगाव खुर्द’. ही २०१६ मध्ये ‘पेपरवॉल मिडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. या मुंबईच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे. ती तब्बल साडेसहाशे पानांची आहे. एका लढाऊ कार्यकर्त्याची इतकी मोठी कादंबरी प्रकाशित होणं ही मराठी साहित्यातली खळबळजनक घटना आहे. या कादंबरीचा सगळं सांगणारा धीट पवित्रा, तिची बहुआवाजी (Pragmatic) निवेदनशैली आणि लोकायत किंवा चार्वाकाला जवळ वाटणारी या कादंबरीची भौतिकवादी (materialistic) फिलॉसॉफिकल व्हिजन या तिन्ही गोष्टी आधुनिक मराठी कादंबरीत नव्या आहेत. म्हणून त्यांची विस्तृत चर्चा करणं आवश्यक आहे. ती केल्यानंतरच दिनकर दाभाडेंच्या सावरगावातल्या सापेक्षतावादी म्हणजेच नवोत्तर नीतिमत्तेचा अंदाज येऊ शकतो.

‘‘एखादा माणूस नदीत बुडत असेल तर त्याला काठावरून ‘तू असे हात मार, तसे हात मार’ हे सांगण्याऐवजी थेट नदीत उडी मारून त्या बुडत्याला काठावर आणणं, हेच मला पटतं. बुडत्याला वाचवण्यासाठी नुसतं प्रवचन काय कामाचं? त्यासाठी प्रत्यक्ष कृतीच हवी.’’ ‘बिलामत’ (१९९४), ‘गयपातं’ (२००५) आणि ‘व्हाया सावरगाव खुर्द’ (२०१६) या तीन कादंबऱ्यांचे लेखक श्री.दिनकर दाभाडे वाहत्या प्रवाहात उडी मारून बुडत्याला वाचवण्याची नीतिमत्ता सांगत होते. हीच कार्यकर्त्या-कादंबरीकाराची अस्सल ओळख आहे.

 लेखन ही लेखकाची कृतीच असली, तरी ती झोपलेल्या समाजाला जागं करण्यासाठी पुरेशी नाही. त्यासाठी प्रत्यक्ष लोकसंपर्क करावा लागतो, लोकांची चळवळ बांधावी लागते, त्यांचे मोर्चे काढावे लागतात आणि प्रसंगी राजकीय सत्तेशी दोन हात करावे लागतात. ते न करता फक्त टुकूटुकू लिहून समाजाचा केस वाकडा होत नसतो, अशी कृतिशील भूमिका प्रत्यक्ष जगणारे दिनकर दाभाडे हे शेतकरी संघटनेचे गेल्या आठ वर्षांपासून विदर्भ-प्रमुख आहेत. ते जळगाव-जामोदमध्ये राहतात. त्यांचं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे.

बारावी पास झाल्यानंतर त्यांनी कॉलेज सोडायचा निर्णय घेतला, तो त्यांच्या वडिलांना रुचला नाही. ते म्हणाले, ‘‘तुला जर कॉलेजात जायचं नसेल, तर तुला घरी राहाता येणार नाही.’’ तरुण दिनकरने पडत्या फळाची आज्ञा मानली आणि रात्री अकरा वाजता घराला रामराम ठोकला. पुढे वर्षभर भटकंती केली. आपल्या परीने भोवतालचं जग बघितलं, समजावून घेतलं. या भटकंतीचा त्याला फायदाच झाला.

अस्वस्थता ही प्रतिभेची पहिली अट. दिनकर दाभाडे या अठरा वर्षांच्या तरुणाने नकळत ती पूर्ण केली होती. अस्वस्थ होण्याची ॲक्टिंग करता येत नाही; अस्वस्थता आत असेल तर ती बाहेर येतेच आणि एकदा ती बाहेर आली की स्वातंत्र्याची ओढ लागते, घट्ट नाती सैल होतात आणि परंपरा नष्ट होतात. ‘‘आपण सगळे कायम इतरांच्या प्रेमाचं, अपेक्षांचं जू मानेवर घेऊन वाटचाल करतो. त्यामुळे आपल्याला आपण कधी गवसत नाही. मी हे जू नाकारून जगणं शिकलो, म्हणून मी इथवर आलो’’, दिनकर दाभाडे सांगतात.

तारुण्यातच स्वतःच्या मनाचा कौल ऐकून निर्णय   घेण्याची धडाडी दाखवणारा हा अस्वस्थ तरुण भोवतालच्या सामाजिक समस्यांवर विचार करतो. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या बघून व्यथित होतो. शेतकऱ्याचं दुःखं फक्त भावनिक पातळीवरच नाही, तर बौद्धिक पातळीवरसुद्धा समजावून घेण्याचे कष्ट घेतो. हे दुःख सौंदर्यवादाच्या भावुक चष्म्यातून न बघता ते अर्थवादाच्या व्यवहार्य भिंगातून बघणं शिकतो. कारण तो शेतकरी संघटनचे आयडियालॉग असलेल्या श्री.शरद जोशींच्या संपर्कात आलेला असतो. शेतकऱ्याचं खरं दुःख ‘शेतमालाला योग्य भाव न मिळणं हेच’, या निष्कर्षाप्रत दिनकर दाभाडेंचा बौद्धिक प्रवास होतो.

मग दिनकर दाभाडे हा तरुण बीएसएनएलमधली सिनिअर टेलिफोन ऑपरेटरची कायमची नोकरी सोडतो आणि आपलं जीवन शेतकरी संघटनेच्या कामाला समर्पित करतो. ‘कुठल्याही पक्षाचं शासन आलं, तरी ते शेतकऱ्यांना कर्जमाफीसारख्या योजना राबवून अंतिमतः लाचारच करतं. शेतकऱ्याचं पारंपरिक शहाणपण पुरेसं आहे. त्याला केव्हा काय पिकवायचं, हे माहीत असतं. शासनाने त्याला ते सांगण्याची गरज नाही. शासनाने त्याच्या शेतमालाला फक्त योग्य तो मोबदला द्यावा, त्यामुळे शेतकऱ्याचं जगणं सुसह्य होईल. त्याचं शोषण थांबेल. सगळे शासक भांडवलदारांचे हस्तक असतात. त्यामुळे त्यांच्या आर्थिक नीती उद्योगधंद्यांना अनुकूल, तर शेतीला प्रतिकूल असतात. हे थांबवण्यासाठी शेतीला लाभदायक उद्योग कसं करता येईल यावर मंथन व्हायला हवं,’ अशी दिनकर दाभाडेंची भूमिका आहे.

‘‘उगाच भावुक होऊन शेतजमिनीला ‘आई’ म्हणू नका. शेत आमच्यासाठी कारखाना आहे. त्यात योग्य ती ‘लागत’ लावून उत्पन्न घ्यायचं असतं. त्यासाठी नवा अर्थवादी दृष्टिकोन आत्मसात करायला हवा, तेव्हा कुठे शेतमालाला योग्य भाव मिळेल. तो मिळाला की शेतकरी समाधानी होईल आणि आत्महत्या करणार नाही’’, असा रोखठोक आणि व्यवहार्य (Pragmatic) विचार हा कादंबरीकार करतो. सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे ‘गोवंश हत्याबंदी’. या ज्वलंत विषयावर कार्यकर्ता दिनकर दाभाडेंनी वीसएक हजार शेतकऱ्यांचा मोर्चा काढून या कायद्याला विरोध दर्शवला होता. या नव्या कायद्यामुळे शेतकऱ्यांवर भाकड गुरांना जिवंत ठेवण्याचा जादा खर्च सोसावा लागतोय. आधीच खस्ता हालत झालेल्या शेतकऱ्यावर हा अन्याय आहे, ही व्यवहार्य भूमिका कोणालाही मान्य होण्यासारखीच आहे.

एक वळू- जो सामान्य शेतकऱ्याला काहीच फायदा देत नसतो- त्याच्या भरणपोषणासाठी त्या शेतकऱ्याला किती खर्च येतो ह्याचं अर्थशास्त्रीय विवेचन दिनकर दाभाडे पोटतिडिकीने करतात. ते पटतं. पण गाईच्या पोटात तेहेतीस कोटी देव वसतात, या श्रद्धेमुळे गाईलाच नाही तर तिच्या पोटी येणाऱ्या वळूलासुद्धा परवडत नसून पोसावं लागतं. त्याऐवजी त्याला खाटिकखान्यात पाठवलं, तर शेतकऱ्याचा आर्थिक फायदाच आहे. शेतकी व्यवसाय हा सांस्कृतिक गरजेपोटी नव्हे तर आर्थिक समृद्धीसाठी करायचा असतो, ही शेतकरी संघटनेची भूमिका हा कार्यकर्ता, लेखक उचलून धरतो.

 आजचं राजकारण हे ‘वाईट विरुद्ध वाईट’ प्रवृतींचा संघर्ष आहे. तो जर ‘वाईट विरुद्ध चांगला’ व्हावा असं वाटत असेल, तर प्रामाणिक आणि संवेदनशील माणसांनी राजकारणात यावं, असं दिनकर दाभाडे सांगतात. सर्जनशील आणि सुशिक्षित माणसांना राजकारणाचं वावडं असतं, त्यामुळे राजकारणातल्या अपप्रवृत्तींचं फावतं. जेव्हा चांगली माणसं राजकारणात येतील, तेव्हा सत्तेच्या राजकारणाचा पोत बदलेल, ही दाभाडेंची भूमिका आहे. त्यांनी यापूर्वी भारिप व बहुजन महासंघामार्फत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आहे. विधान परिषदेची निवडणूकसुद्धा त्यांनी लढवून बघितली आहे.

संवेदनशील असून दिनकर दाभाडे भावुक नाहीत. त्यांच्या तीन कादंबऱ्यांमध्ये त्यांनी तीन वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे. पहिली ‘बिलामत’ ही विदर्भातला लोकप्रिय आदिवासी नेता- ज्याला लोक डाकू समजत- त्या श्यामा कोलाम या मराठी ‘रॉबिनहूड’च्या जीवनावर आधारित आहे. श्यामा कोलाम हा मार्क्सवादावरचं एकही पुस्तक न वाचता खरा मार्क्सवादी कार्यकर्ता होता, असं दिनकर दाभाडे सांगतात. गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या श्यामा कोलामच्या सहवासात दिनकर दाभाडे आले. या संपर्कात त्यांनी या आदिवासी नेत्याचं काम जवळून बघितलं. ‘‘गोरगरिबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या श्यामा कोलामचं कर्तृत्व हे रॉबिनहूडच्या परोपकारी कामापेक्षा कितीतरी अधिक पटीने मोठं आहे, म्हणून इंग्लंडच्या त्या रॉबिनहूडलाच श्यामा कोलाम म्हणायला हवं,’’ असं दाभाडे बोलून दाखवतात.

त्यांची दुसरी कादंबरी ‘गयपातं’ ही त्यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या भटकंतीवर आणि त्यातून मिळवलेल्या अनुभवांवर आधारित आहे. मानवी स्वातंत्र्य हे कसं कौटुंबिक घटकांमुळे निर्धारित होतं आणि या स्वातंत्र्याचे आयाम किती विशाल असतात असा विषय ‘गयपातं’मध्ये येतो. गयपातं म्हणजे एक लाकडी चौकटीसारखं कुलूप. हे शेतात राबणाऱ्या बैलाच्या गळ्याभोवती अडकवलं जातं. त्यामुळे कष्टकरी बैलाला चौफेर बघता येत नाही. माणसांचंही असंच असतं. त्यांच्या मानेभोवतीसुद्धा कोणी ना कोणी असं गयपातं अडकवून टाकतं. मग त्या माणसाला सरळ बघत मान मोडून कष्ट करत जगावं लागतं. मानेवरचं गयपातं नाकारणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं. हे स्वातंत्र्य दिनकर दाभाडेंनी स्वकष्टातून कमावलं.

दिनकर दाभाडे ह्यांची तिसरी कादंबरी म्हणजे ‘व्हाया सावरगाव खुर्द’. ही २०१६ मध्ये ‘पेपरवॉल मिडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. या मुंबईच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली आहे. ती तब्बल साडेसहाशे पानांची आहे. एका लढाऊ कार्यकर्त्याची इतकी मोठी कादंबरी प्रकाशित होणं ही मराठी साहित्यातली खळबळजनक घटना आहे. या कादंबरीचा सगळं सांगणारा धीट पवित्रा, तिची बहुआवाजी (Pragmatic) निवेदनशैली आणि लोकायत किंवा चार्वाकाला जवळ वाटणारी या कादंबरीची भौतिकवादी (materialistic) फिलॉसॉफिकल व्हिजन या तिन्ही गोष्टी आधुनिक मराठी कादंबरीत नव्या आहेत. म्हणून त्यांची विस्तृत चर्चा करणं आवश्यक आहे. ती केल्यानंतरच दिनकर दाभाडेंच्या सावरगावातल्या सापेक्षतावादी म्हणजेच नवोत्तर नीतिमत्तेचा अंदाज येऊ शकतो.

2

 ‘विेशात नैतिक-अनैतिक असं काहीच नसतं, असं मानणाऱ्या सर्वार्ंना’ ही दिनकर दाभाडे यांच्या ‘व्हाया सावरगाव खुर्द’ या कादंबरीची अर्पणपत्रिका आहे. ती वाचून सामान्य वाचकाला नैतिक हुडहुडी भरू शकते. ही अर्थातच या कादंबरीने स्वीकारलेल्या मूल्यव्यवस्थेची एक चुणूक आहे. पण त्यावरून या कादंबरीची तात्त्विक दृष्टी (Philosophical View) कशी ननैतिकवादी असेल, याचा वाचकाला अंदाज येतो. कादंबरीच्या नावावरून ही ग्रामीण म्हणजेच प्रादेशिक कादंबरी असेल, असं वाटतं.

जागतिकीकरणानंतर गाव आणि शहरांतल्या भेदरेषा धूसर होऊ लागल्या आहेत, त्यामुळे साठ आणि सत्तरच्या दशकात लिहिल्या गेलेल्या ग्रामीण कादंबऱ्यांच्या तुलनेत नव्या प्रादेशिक कादंबऱ्यांच्या भौगोलिक व सांस्कृतिक सीमारेषा दिवसेंदिवस अस्पष्ट होत जाणार आहेत. त्यामुळे खेड्यांमध्ये फॅशनेबल चंगळवादी जीवनशैली घुसणं आणि शहरांमध्ये खाण्या-पिण्या- लेण्याचा आणि भाषेचा गावरानपणा घुसणं अपरिहार्य आहे. शहरी म्हणजे ‘अर्बन’ आणि गावरान म्हणजे ‘एथनिक’ संस्कृतीची ही घुसळण नव्या युगाची नांदी आहे. तिला सांस्कृतिक संकर म्हटलं तरी चालतं. म्हणूनच आज एखाद्या प्रादेशिक कादंबरीत वेगळ्या पडलेल्या (isolated) फक्त एकाच खेड्याच्या सांस्कृतिक जीवनाची कप्पेबंद कथा येणं असंभव आहे. कारण गेल्या पंचवीस वर्षांत खेडी आणि शहरांना जोडणारा एक महाकाय पूल बांधला गेला असून, त्याचं नाव ‘जागतिकीकरण’ असं आहे आणि तो पूल ‘टूवे ट्रॅफिक’ आहे. त्यामुळे दोन्ही प्रदेश एकमेकांना सांस्कृतिक दृष्ट्या शोषून घेत एकमेकांना समृद्ध व भणंग करताना दिसतात.

‘व्हाया सावरगाव खुर्द’ ही या टू-वे ट्रॅफिकची अजीब दास्तान आहे. त्यामुळे ती निखळ प्रादेशिक कादंबरी तर नाहीच नाही, पण ती स्थानीय सांस्कृतिक मूल्यांचा उत्सव साजरा करणारी देशीवादी कादंबरीसुद्धा म्हणता येत नाही. ती ग्रामीण म्हणजे वैदर्भीय (वऱ्हाडी) बोलीत लिहिलेली  मराठीतली पहिली ननैतिक (ethically neutral) अशी भेदक सामाजिक आणि सांस्कृतिक ग्राम-समीक्षा आहे. तिचा मूल्यनिरपेक्ष (Value Neutral) आवेश आणि आवेग यापूर्वी कुठल्याही शहरी किंवा ग्रामीण मराठी कादंबरीत वाचलेला आठवत नाही. हा पवित्रा घेऊन दिनकर दाभाडेंनी मोठी कलात्मक रिस्क घेतली आहे.

मराठीला सर्वस्वी अनपेक्षित असलेल्या या मूल्यनिरपेक्ष पवित्र्यामुळे ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ही वऱ्हाडी बोलीतली पहिली पोस्टमॉडर्न नॉव्हेल ठरते. कुठलीही मूल्यव्यवस्था अंतिम सत्य नसते; तर ती स्थल-काल आणि संस्कृतिसापेक्ष असते, हे उत्तराधुनिक दर्शनाचं प्रमुख गृहीत आहे. ‘व्हाया सावरगाव खुर्द’मध्ये स्थानिक राजकीय सत्ता, स्त्री-पुरुष लैंगिकता आणि कौटुंबिक मूल्यव्यवस्थेवर जी आत्मकथात्मक प्रक्षोभक भाष्ये ऐकायला मिळतात, ती वाचताना मराठी कादंबरी मूल्याग्रहापासून मूल्यसापेक्षतेकडे प्रवास करू लागली आहे, हे जाणवतं.

भावरम्य ग्रामीण संस्कार, साधी-भोळी स्थानिक नैतिकता आणि स्वायत्ततेच्या मूल्याला सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या नेमाड्यांची ‘हिंदू’ ही कादंबरी अँटिथेसिस आहे, असंसुद्धा म्हणायला हरकत नाही. ‘हिंदू’च्या रोमँटिक ग्रामीण व्हिजनची ज्यांच्या मनावर भुरळ पडली होती, त्यांना ‘व्हाया सावरगाव खुर्द’ वाचताना जबर सांस्कृतिक धक्का (Cultural Shock) बसू शकतो. त्यामुळे दाभाडेंची ही कादंबरी वाचताना वाचकांनी आपली स्थैर्यशील संवेदनशीलता नव्या अस्थिर युगाला शोभेल अशी सापेक्षतावादी (relativistic) करून घेणं आवश्यक ठरतं.

संवेदनशीलतेचं हे अपडेटिंग जर होत नसेल, तर ही कादंबरी खेड्याची असूनही तिच्यात ग्रामीण परंपरांचा जल्लोष नाही म्हणून पहिला भ्रमनिरास, ती प्रादेशिकतेलाच सर्वश्रेष्ठ वाङ्‌मयीन मूल्य मानणाऱ्या देशीवादी व्हिजनला छेद देते म्हणून दुसरा भ्रमनिरास आणि ती गावातल्या स्त्रीपुरुषांच्या लैंगिक कुलंगड्या थेट भाषेत बाहेर काढून स्त्री सशक्तीकरणाच्या युगातल्या आकांक्षावादी ग्रामीण स्त्रीला अपशकुन करते म्हणून तिसरा भ्रमनिरास- असा तिहेरी भ्रमनिरास वाचकाच्या वाट्याला येऊ शकतो.

या सावरगावात स्त्री-पुरुष पात्रांच्या अनिर्बंध सत्ताकांक्षेचा आणि त्यांच्या लसलशीत लैंगिक प्रेरणांचा जो खुल्लम्‌खुल्ला आविष्कार आहे, तो यापूर्वी कुठल्याही मराठी कादंबरीत इतक्या थेटपणे आलेला नाही. फक्त तो नीट कळून घेण्यासाठी वाचकाला वऱ्हाडी बोलीचा कोडब्रेक करणं आवश्यक आहे. वऱ्हाडी बोलीमुळे सावरगावातल्या त्या तीसेक बोलघेवड्या पात्रांच्या बोलण्याला सच्चेपणाचे (authenticity) परिमाण लाभत असले, तरी या प्रक्षोभक कादंबरीची वाचनीयता प्रमाण- भाषेव्यतिरिक्त इतर बोलीभाषेत गती नसणाऱ्यांना हुलकावणी देण्याची एक शक्यता आहेच.

देशीवादी कादंबऱ्यांमध्ये बोलीभाषेचा वापर आग्रहाने होतो. दिनकर दाभाडेंच्या कादंबरीत देशीवादी कादंबरीला प्रिय असणारं बोलीभाषेचा वापर हे एकमेव वैशिष्ट आढळून येतं. इथे वावरणारे सगळे स्त्री-पुरुष- अगदी स्थानिक भवानीमाता ही देवीसुद्धा- वऱ्हाडी बोलीतच आत्मनिवेदन करते. लीना ही एकमेव स्त्री या कादंबरीत प्रमाणभाषेत आपली आत्मकथा सांगते. मात्र सावरगावातली ही पात्रं ज्या बेधडकपणे आपल्या गुप्त प्रेरणांबद्दल आणि सुप्त इच्छा-आकांक्षांबद्दल बोलतात, ते ऐकताना आपण एका सामूहिक मनोविश्लेषणाला सामोरे जात आहोत, असं वाटतं. दाबून ठेवलेल्या मनातल्या सुप्त इच्छा जेव्हा खुल्लखुल्ला अभिव्यक्त होतात; तेव्हा त्या व्यक्तीच्या रोगट भावनांचा निचरा होऊन ती बंधनमुक्त होते, असं आधुनिक साहित्याला चालना देणाऱ्या फ्रॉयडियन मानसोपचारशास्त्राचं गृहीत होतं.

सावरगावातली ही अचाट व बोलभांड बाया-माणसं इतकं सगळं बोलून खरंच आतून मोकळी होतात का? होत नसावीत, असं वाटतं. कारण पात्रांची अंतर्यामी मुक्ती हा लेखकाचा उद्देश वाटत नाही; तर जे सामाजिक वास्तव आहे ते जसं आहे तसं, कुठल्याही महान सत्याचा मुलामा न देता थेटपणे सांगून खेड्यातल्या नैतिक अधःपतनाचा नकाशा वाचकासमोर उलगडवून दाखवणे, हा या कार्यकर्त्या कादंबरीकाराचा उद्देश वाटतो. ‘खरेदी करणाऱ्यांनो, सावधान!’ या धर्तीवर ‘वाचणाऱ्यांनो, सावधान!’ अशी सूचना दिनकर दाभाडे या कादंबरीच्या पानोपानी देतात. ती लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एखाद्या गावातलं सत्तेचं जातिनिष्ठ भ्रष्ट राजकारण आणि त्याचा कादंबरीच्या प्रोटॅगोनिस्टमार्फत एकाकी व एकहाती विरोध हा मराठीतल्या बहुतांश ग्रामीण कादंबऱ्यांचा आस्थेचा विषय आहे. मनाने संवेदनशील असलेला तरल बुद्धीचा सुशिक्षित नायक भोवतालच्या भ्रष्ट सत्तेच्या राजकारणाला शह देतो किंवा एखाद्या सामाजिक समस्येवर काम करून नवं समाजप्रबोधन करतो  आणि गावातल्या त्या अंधाऱ्या प्रदेशाला (area of darkness) छेद देऊन आपल्या वाचकासोबत प्रकाशाकडे प्रवास करतो, हा साचा देशीवादी ग्रामीण कादंबऱ्यांनी आजपर्यंत हुकमी मानला होता.

‘व्हाया सावरगाव खुर्द’ हा पारंपरिक साचाच मोडून टाकते. लैंगिक वासनापूर्तीसाठी केलेल्या सत्तेच्या राजकारणाने अंतर्बाह्य किडून गेलेल्या विविध स्त्रीपुरुषांच आत्मकथात्मक निवेदनं या कादंबरीत एकापाठोपाठ येतात. त्या विविध कथनांचा भर गावातल्या सत्तेच्या राजकारणाचा आणि व्यक्ती-व्यक्तीमधल्या वासना व द्वेषपूर्ण संबंधांचा उभा-आडवा छेद घेणे यावर आहे. या विविध व्यक्तिनिष्ठ कैफियतींद्वारे वाचकांना सावरगाव खुर्दबद्दल, तिथल्या स्त्री-पुरुषांबद्दल, तिथल्या शेतकऱ्यांच्या दारुण अवस्थेबद्दल, गावात वाढणाऱ्या दारूबाजीबद्दल जे कळतं ते अत्यंत धक्कादायक आहे. एके काळी निरागस वाटणाऱ्या स्वायत्त ग्रामीण संस्कृतीचं सत्तेच्या हव्यासापोटी झालेलं संपूर्ण नैतिक अधःपतन हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. हे अधःपतन इतकं निर्णायक आहे की, ग्रामीण नैतिकतेची घसरलेली गाडी परत रुळावर येईल, असं वाटायला थोडाही वाव ‘व्हाया सावरगाव खुर्द’ देत नाही.

माणसं चुकतात, नैतिक दृष्ट्या पाप करतात; पण त्यावर पश्चात्तापाचा आध्यात्मिक उतारा असतो, हे ख्रिश्चनधर्मीय संवेदनशीलतेचं- म्हणजेच बायबलच्या नव्या कराराचं- मूलतत्त्व आहे. हे तत्त्व महात्मा गांधींना पूर्णतः मान्य होतं. ही पश्चात्तापदग्घ संवेदनशीलता मराठी वाङ्‌मयात प्रथम साने गुरुजींच्या कथा-कादंबऱ्यांनी उजागर केली होती. हाच मार्ग जगभरातल्या अनेक ग्रेट कादंबरीकारांनी- उदा. डिकन्स, डोस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, व्हिक्टर ह्युगोसारख्या अभिजात कादंबरीकारांनी स्वीकारला होता.

आधुनिक मराठी कादंबरीलासुद्धा हा आध्यात्मिक मार्ग बऱ्यापैकी परिचित आहे. पापाचा पश्चात्ताप करून त्याचा मनातून निचरा करणे, ही मानवी नैतिकतेची विशेषता. तीच माणसाला पशूपासून वेगळं करते. पण सावरगावातले निगरगट्ट मानसिकता लाभलेले पथभ्रष्ट आणि स्खलनशील स्त्री-पुरुष विमोचनाच्या (redumtion) या उदात्त प्रेरणेला धुडकावून देत केवळ सत्ता आणि लैंगिक सुखाचा पिच्छा करताना दिसतात. वासनापूर्तीसाठी ते कुठल्याही स्तरावर जायला तयार आहेत. कादंबरीकाराने चितारलेलं हे डार्विनियन समाजवास्तव गारठवून टाकणारं आहे. इतका निर्मम वास्तववाद मराठी कादंबरीला ह्यापूर्वी तरी माहीत नव्हता.

नवऱ्याच्या नाकावर टिच्चून घरी यारांशी लागू होणाऱ्या धीट बायका सावरगावात आहेत. पोटच्या मुलाला ‘मला गिऱ्हाईक आण’ हे सांगणारी आई आहे, पोट जाळण्यासाठी स्वतःच्या शरीराचा उपयोग करणाऱ्या असह्य व महत्त्वाकांक्षी बायका इथे आहेत, स्थानिक सत्तेच्या राजकारणात वर जाण्यासाठी कुठल्याही पुरुषासोबत झोपायला तयार असणाऱ्या स्त्रिया इथे भेटतात... आणि स्त्रीला नेमकं काय हवं आहे, ह्याची जाण असलेले बेरके सत्ताधारी या कादंबरीत आहेत. त्यांचा बिनधास्त वावर बघून ‘ग्रामपंचायतींच्या निवडणुका ग्रासरूटमधली लोकशाही पक्की करण्यासाठी, की स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य लैंगिक वासना पूर्ण करण्यासाठी?’ हा प्रश्न पडतो. ‘

व्हाया सावरगाव खुर्द’ ही आकांक्षावादी ग्रामीण स्त्रीपुरुषांच्या गिचमिड मनांचा तळ शोधणारा आणि त्यांची सर्वांगीण अनैतिकता चव्हाट्यावर आणणारा भलताच धीट असा वाङ्‌मयीन प्रयोग आहे. शहरी माणसं बदमाश आणि खेड्यातली भोळी, शहरी माणूस स्वार्थी तर गावरान माणूस निःस्वार्थी- हा ग्रामीण कादंबऱ्यांचा लाडका विचारव्यूह दिनकर दाभाडे ‘व्हाया सावरगाव’मध्ये उद्‌ध्वस्तच करून टाकतात. प्र

त्येक कादंबरीलेखकाची अशी एक विशिष्ट नैतिक भूमिका असतेच- किंबहुना, ती असावीच हे देशीवादी म्हणजेच नेमाडेवादी साहित्यिक स्कूलचं रास्त गृहित आहे. पण हेच धुडकावून देत कादंबरीतल्या स्त्री-पुरुष पात्रांच्या रासवट प्रेरणांचा शोध दाभाडे घेतात. तसं करताना ते तटस्थपणे वर्णनं करतात. ती टोकाची वास्तववादी वाटतात. हे सगळं विविध पात्रांच्या तोंडून सांगताना ते अभिजात वाङ्‌मयात उदात्त समजल्या जाणाऱ्या नैतिकतेऐवजी पोस्टमॉडर्न साहित्यात मान्य झालेल्या ननैतिकतेचा पवित्रा घेतात. सामुदायिक नीतिनियमांच्या संदर्भातला लेखकाचा हा ‘नॉनजजमेंटल’ पवित्रा ग्रामीण मराठी साहित्याच्या संदर्भात तरी नवाच आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुका, तिथलं जातीपातीचं राजकारण, विविध लोककल्याणकारी योजनांचा रतीब, त्यांचे लाभार्थी होण्यासाठी लोकांच्या लटापटी, तालुका  आणि जिल्हा पातळीवरचं राजकारण कसं चालतं- हे बहुतेक भारतीयांना थोडंबहुत माहीत असलं, तरी त्याचे अंतरंग बारीक-सारीक तपशिलांमधून सांगण्याची दिनकर दाभाडेंची भेदक वास्तववादी शैली अस्वस्थ करते. त्यांची भाषेवरची हुकूमत कादंबरीच्या पानोपानी जाणवते. वऱ्हाडी बोलीतलं सौंदर्य आणि तिचं रासवटपण, तिची बिनधास्त शब्दसंपदा आणि तिच्यातल्या चपखल म्हणींचा वापर लेखक सहज करतो. मात्र त्याचा उद्देश प्रादेशिक भाषेचा जल्लोष करणे हा नसून, वेगाने फोफावत जाणाऱ्या नव्या सांस्कृतिक बिमारीचं वास्तववादी वर्णन करणे हाच दिसतो.

जोसेफ कॉनरॅडने ‘हार्ट ऑफ डार्कनेस’ ही कादंबरी लिहिली. ती युरोपियन साम्राज्यवादी राजवटीने आफ्रिकेचे जे शोषण केलं त्याबद्दल आहे. ती वाचताना किंवा विल्यम गोल्डिंगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ या लहान मुलांचा दुष्टपणा सांगणाऱ्या कादंबरीत वाचकाला ज्या निराशावादी (dark) व्हिजनचं दर्शन होतं, तीच घोर निराशावादी व्हिजन ‘व्हाया सावरगाव खुर्द’मध्ये पाहायला मिळते. स्थानिक राजकीय सत्तेचे अंतर्भेद स्पष्ट करणारी ‘व्हाया सावरगाव खुर्द’ ही एक राजकीय कादंबरी आहे. पण ती राजकीय सत्तेचा अनुनय करत नाही. तसेच ती एका आदर्शवादी- उदा.साम्यवादी, समाजवादी किंवा गांधीवादी- राजकीय सत्तेची प्रतिष्ठापना करण्याचा हेतूसुद्धा बाळगत नाही. या कादंबरीला पारंपरिक प्लॉट नाही. सुरुवात, मध्य आणि अंत नाही. ती घटनाप्रधानसुद्धा नाही. तर, ती विविध स्त्री-पुरुषांच्या मनस्वी बोलण्यातून साकारते. तसं करताना ती गब्बर झालेल्या राजकीय सत्तेची अंडीपिल्ली काढून तिची संरचनाच मोडून टाकते. म्हणून ती अलीकडल्या काळातली एक विरचनावादी (Deconstructionist) आणि विरेचनवादी (cathartic) अशी प्रक्षोभक उत्तराधुनिक कलाकृती ठरते.

आजचं सत्तेचं राजकारण हे ‘वाईट विरुद्ध वाईट’ या दोन समान प्रवृत्तींचा लटका संघर्ष आहे, असं म्हणणाऱ्या दिनकर दाभाडेंनी या संघर्षात त्यांना अपेक्षित असलेल्या चांगूलपणाचा पाठपुरावा कादंबरीत तरी केलेला नाही. याला कारण कादंबरीकाराचा नैतिक दृष्ट्या तटस्थ पवित्रा हे असू शकतं. ‘सावरगावचं हे स्खलनशील जग जसं आहे तसं मी ते तुम्हाला सांगितलं. त्यात परिवर्तन-बिरिवर्तन करण्याचा माझ्या कलाकृतीचा उद्देश नाही,’ असंच जणू काही दिनकर दाभाडे सांगू इच्छितात. हे म्हणजे रोम जळत असताना रोमचा बादशहा नीरोने तल्लीन होऊन फिडल वाजवण्यासारखं झालं!

सत्तेचा मार्ग जातीपातीच्या राजकारणातून, लैंगिक वासनेतून आणि सामुदायिक लाचारीकरणातून कसा जातो, हे सावरगाव खुर्दमध्ये कळतं. शेतकरी म्हटला की त्याची भक्तिमार्गावरची अढळ श्रद्धा आपण गृहीतच धरतो. पण अशा आध्यात्मिक विकासातून शेतकरी समृद्ध होणार नाही; त्यासाठी शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने विवेकवादी म्हणजेच भौतिकवादी (materialistic) होणं आवश्यक आहे, हे दिनकर दाभाडे सांगू इच्छितात. पण हे ते थेटपणे सांगत नाहीत. त्यामुळे या विविध आत्मनिवेदनांतून व्यक्त होणारी रानवट लैंगिकताच तेवढी वाचकाच्या लक्षात राहते. यातून वाचक त्याला पेलेल तोच बोध घेतो. त्यामुळे या कादंबरीचे एकाहून अधिक पाठभेद संभवतात.

 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकशाही रुजावी, हा एक थोर विचार आहे. पण दाभाडेंची कादंबरी या विचाराचं कासव उलथवून टाकते आणि ही लोकशाही जातीपातीच्या आग्रहापोटी व लैंगिक वासनेच्या प्रेरणेपोटी कशी दुबळी होते, हे सांगते. लोकशाही हा जबाबदार आणि संवेदनशील समाजाचा आविष्कार म्हणून योग्यच आहे, पण तो पशुतुल्य प्रेरणा जोपासणाऱ्या सावरगावातल्या रानवट आणि अर्धविकसित माणसांसाठी मात्र स्वार्थाचा धुडगूसच वाटतो. या सावरगावात जसे गांधींच्या ग्रामस्वराज्याचे बारा वाजले आहेत, तसेच आंबेडकरांच्या समतेचेसुद्धा धिंडवडे निघालेले दिसतात. त्यामुळे बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकर आणि नेहरूंच्या नावाने उद्‌घाटित झालेला भारतीय ग्रामस्वराज्याचा राष्ट्रीय प्रकल्प अंतर्बाह्य किडून गेल्याचं वाचकाला कळतं. हे फारच अस्वस्थ करणारं आहे.

सावरगाव हे सत्तेच्या गावरान राजकारणाचं रूपक म्हणूनसुद्धा बघता येतं. जातिनिष्ठ राजकारण आणि स्त्रीला भोग्य वस्तू म्हणून समजण्याचं पुरुषप्रधान संस्कृतीचं वैशिष्ट्य याबद्दल मराठी कथा-कादंबऱ्यांतून आणि कवितेतून यापूर्वी लिहिलं गेलं आहे. मात्र स्त्रीसुद्धा पुरुषाइतकीच सत्ताकांक्षी, पुरुषांना भुरळ घालणारी, निर्मम आणि बेरकी असू शकते; असं सावरगावात भेटणाऱ्या काही बायका- उदा.मनकर्णा मानवतकर, सुनीता कुटासकर किंवा सुनीता कांबळे- यांच्या  आत्मनिवेदनातून कळतं.

स्त्रीच्या स्वातंत्र्यामध्ये कुठल्याही पुरुषासोबत झोपण्याच्या स्वातंत्र्याचा अंतर्भाव होतो, असं या कादंबरीतलं मुख्य स्त्री पात्र मनकर्णा मानवतकर सुचवते. आपल्या आत्मनिवेदनातून ती वारंवार ‘मी लय जिंदाबाद बाई आहे’ असं सांगत राहते. तिचा हा ‘जिंदाबाद’ स्त्रीवाद शेतात राबणाऱ्या ग्रामीण बाईलाच काय, पण नोकरी करणाऱ्या शहरी स्त्रीलासुद्धा पेलेल, असं वाटत नाही. सदाशिव मानवतकरसारख्या भोळ्या सांबाशी लग्न केलेल्या मनकर्णाचा हा रॅडिकल फेमिनिझम वरवर जरी उत्तराधुनिक काळातल्या स्त्रीचा जाहीरनामा वाटत असला, तरी तो अखेरीस खेड्यातल्या एका अर्धशिक्षित स्त्रीचा फेमिनिझम आहे. त्यामुळे गावातल्या श्रीमंत माणसासाठी- रावसाहेब जुमडेसाठी ती झुरते. नात्यासाठी हपापलेली ही तेजतर्रार बाई चमकदार बोलते; पण तिला पारंपरिक अशा पुरुषप्रधान नात्याचाच शोध आहे, दागिन्यांचा सोस आहे आणि आई व्हायची आस आहे.

सुनीता कांबळे या मध्यमवयीन स्त्रीचं निवेदनसुद्धा असंच बिनधास्त आणि प्रक्षोभक आहे. एका विधवेला आपला संसार चालवण्यासाठी किती पुरुषांच्या अंगाखाली झोपावं लागतं, हे ती सांगते. सुनीता कांबळे ही ग्रामपंचायतीची निर्वाचित सदस्य आहे, तरीही तिला पोटासाठी बऱ्याच (लैंगिक) कसरती कराव्या लागतात! त्या तिच्या मुलाला- सुगतला मान्य नाही. दारूडा सुगत आईवर खार खाऊन असला, तरी स्वतःच्या बायकोला वेश्या म्हणून इतर पुरुषांकडे पाठवायला तयार आहे. त्याची आत्मकथा आईच्या आत्मकथेला छेद देणारी आहे. सुनीताची सून कल्पना म्हणजे कपीचं आत्मनिवेदनसुद्धा असंच प्रक्षोभक आहे. तिची बाजूसुद्धा पटते. त्यामुळे कोण खरं, कोण खोटं याचा निर्णय होत नाही.

कुठलेही सत्य एकमेव (absolute) स्वरूपात नसतं; तर त्याचे अनेक पैलू असतात, हे पोस्टमॉडर्न दर्शनाचं गृहीत आहे. ‘व्हाया सावरगाव खुर्द’मध्ये ऐकू येणारी आत्मनिष्ठ निवेदनं विविध भावनात्मक पैलूंनी जटिल झालेली आहेत. ती काही वेळा एकमेकांना समांतर, तर अनेकदा एकमेकांना छेद देतात. त्यामुळे कादंबरीची थेट वर्णनात्मक शैली पुरेशी व्यामिश्र (complex) होते.

सुनीताच्या मुलीची- उमा कांबळेची कैफियतसुद्धा अशीच मन पिळवटून टाकणारी. स्त्रीची अवस्था सांगायला गेलं तर ‘पृथ्वीचा कागद, झाडाचा पेन आणि समुद्राची शाई केली तरी ती न संपणारी गोष्ट आहे’ असं उमा सांगते. सुनीता कुटासकर ही सावरगावातली तीन मुलांची आई. शेतमजुरी करून पैसे कमावते. माझा नवरा साधा म्हणजे ‘झेंडू’ आहे, असं ती सांगते. मानलेल्या श्रीमंत भावाशी लपून-छपून रत होते आणि एक्स्ट्रा पैसे कमावते. ‘आता गावरान काहीच भेटत नाही खायले. वांगे, तुरी, टमाटे- सगळं हायब्रीड’ अशी तिची व्यथा आहे. पण हायब्रीड बियाणं नाही वापरलं तर पूर्वीसारखं शेतकऱ्यांना उपाशी मरावं लागेल, असंही ती सांगते.

लिना ही प्रमाणभाषेत बोलणारी, स्कॉच व्हिस्की पिणारी, मित्रांसोबत जेट विमानात बसून हिंडणारी मनकर्णा मानवतकरची धाकटी बहीण. ती आपल्या मोठ्या बहिणीसारखीच बिनधास्त आहे. नवनवे हातरुमाल वापरावेत तशी ती नवनव्या पुरुषांना स्वतःच्या करिअरसाठी आणि इच्छातृप्तीसाठी वापरून घेते. फक्त तिची भाषा खास शहरी आहे. तिचा लिबरल आवेश हॉलिवुड आणि बॉलिवुडच्या अभिनेत्र्यांना लाजवणारा आहे. 

कादंबरीत तानाजी रणीत या लेबर कॉन्ट्रॅक्टरचं म्हणजे जमातदाराचं आत्मनिवेदन शेतीची अर्थव्यवस्था कशी आतबट्‌ट्याची आहे, हे सांगतं. कष्टकरी शेतकरी दिवसेंदिवस कंगाल, तर ऐदी व बेरका शेतमजूर दिवसेंदिवस कसा मालामाल होतोय, याची कारणमीमांसा वाचताना मनाचा क्षोभ होतो. तानाजीच्या मते- आत्महत्या फक्त शेतकरी करतात, शेतमजूर करत नाहीत. शेतकी व्यवसायात शेतकरी विरुद्ध शेतमजूर हा संघर्ष दुर्दैवी आहे. तो होण्याची कारणं अर्थशास्त्रीय आहेत. त्यावर सखोल मंथन होणं अपेक्षित आहे.

आमदार रामचंद्र दगडू पाटील हे भ्रष्ट, ननैतिक आणि अनैतिक राज्यकर्त्याचं नेमकं अर्कचित्र आहे. ते सगळ्यांना चांगलंच परिचित आहे. पण या कादंबरीत सर्वाधिक मनात ठसणारी व्यक्ती म्हणजे सरपंच डॉ.गजानन मुखरे. गावाचा विकास तळमळीने करणारा एक डायनॅमिक माणूस म्हणून तो लक्षात राहतो. माणूस म्हणूनसुद्धा त्याचा नीट विकास झालेला वाटतो. सावरगावातला हा एकमेव नीतिवान माणूस आहे. त्याची निरीक्षणं भेदक आहेत. त्याचा कामाचा उरक प्रेरणादायी आहे. ‘खेड्यापाड्यातली गोदरी मोडणं शक्य नाही’, हे त्याचं निरीक्षण अस्वस्थ करणारंच आहे. पण ही गजानन मुखरेच्या अभिक्रमाची कादंबरी नाही. तो स्थानिक  सत्तेच्या सारीपटावरची केवळ एक सोंगटी आहे. देशीवादी कादंबरीने मात्र त्याला हीरो केलं असतं.

या कादंबरीतल्या सगळ्याच बायका लैंगिक दृष्ट्या इतक्या वखवखलेल्या (nymphomaniac) कशा? मग ती वैशाली जाधव असो, की तिची वयस्क सासू. सगळ्यांचं लक्ष कुठल्या ना कुठल्या पुरुषावर आणि सगळ्या पुरुषांची नजर कुठल्या ना कुठल्या बाईवर. लेखकाचा हा सेक्सनिष्ठ दृष्टिकोन विवादास्पद आहे. या बाबतीत सुप्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ज्ञ श्री.एम.एन. श्रीनिवास यांनी १९४८ मध्ये म्हैसूरजवळच्या रामपुरा खेड्याचं केलेलं समग्र अध्ययन उद्‌बोधक आहे. ‘The Remembered Village’ असं शीर्षक असलेला हा जगप्रसिद्ध ग्रंथ एका प्रातिनिधिक भारतीय खेड्याचं समाजशास्त्रीय कसोट्यांवर केलेला अत्यंत वाचनीय असा आत्मकथनात्मक अभ्यास आहे.

विविध जातींचे आपसातले संबंध आणि भारतीय खेड्याच्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक व सांस्कृतिक परिस्थितीचा अंदाज यावा म्हणून एम.एन. श्रीनिवास वर्षभर रामपुरा या खेड्यात जाऊन राहिले आणि सुमारे दीड हजार लोकसंख्या असलेल्या या खेड्याचा सर्वांगीण अभ्यास त्यांनी केला. गावातल्या अनेक अनैतिक संबंधांची त्यांना कुणकुण लागली होती, पण त्याबद्दल ठोस पुरावे त्यांना मिळवता आले नाहीत. त्यामुळे रामपुरा खेड्यातली माणसं लैंगिक नैतिकतेच्या बाबतीत नेमकी कशी आहेत, हे सांगण्याचं त्यांनी टाळलं होतं. हे समाजशास्त्रीय अध्ययन १९४८ म्हणजे नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं आहे. आज, म्हणजे सत्तर वर्षांनंतर गावातल्या विविध अनैतिक संबंधांची कुणकुण बिनधास्त भाषेत दिनकर दाभाडेंनी सांगून टाकलेली दिसते. तरीही त्यांचा हा सगळं सांगून टाकण्याचा (Tell All) पवित्रा त्यांनी स्वीकारलेल्या ननैतिक पवित्र्यामुळे विवाद्यच ठरतो.

नैतिक व अनैतिक सेक्सच्या पलीकडे एक आधिभौतिक (Spiritual) मूल्यव्यवस्था आहे. तिला अनुसरल्यानेच माकडाचा माणूस होतो आणि मानवी संस्कृती आकारास येते, हे लिबरल आर्टचं- ज्यामध्ये कादंबरीचासुद्धा समावेश होतो- मुख्य गृहीत बहुश्रुत आणि व्यासंगी दिनकर दाभाडे जाणून असतीलच. चांगला कादंबरीकार मानवी अवस्थेवर चिंतन करतो. या अवस्थेचं मोठं दुखणं सेक्समध्ये लपलं असेलही, पण ते फक्त सेक्स-केंद्रित नाही. ते सर्वांगीण आणि सर्वव्यापी आहे, असाही एक दृष्टिकोन आहे. पण सावरगावच्या लेखकाला तो मंजूर दिसत नाही, असं वाटतं. त्यामुळे गावांची सगळी बरबादी तिथल्या वासनांध स्त्री-पुरुषांनी केली, असा अपसमज रूढ होऊ शकतो, तो खुद्द लेखकाच्याच राजकीय विचारधारेविरुद्ध जाणारा आहे. ज्या शेतकरी संघटनेचे काम दिनकर दाभाडे करतात, त्या संघटनेला हा विचार मान्य आहे का; हा प्रश्न विचारावासा वाटतो.

 म्हणजे जर उद्या शेतमालाला योग्य भाव मिळालेच, तर ही बुभुक्षित बाया-माणसं शांत होतील का? सावरगावातला लैंगिकतेचा उच्छाद थांबेल का? याचं उत्तर शेतीच्या अर्थव्यवस्थेशी फारसं निगडित नसून ते माणसांच्या जनुकीय स्वभावावर, त्यांच्या आर्थिक- सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणावर व अंतिमतः त्यांच्या व्यक्तिगत व सार्वत्रिक नैतिकतेवर अवलंबून आहे. तिथेच खोट असेल तर मग खेडं काय अन्‌ शहर काय- वखवखलेला माणूस तोच.

राजकीय किंवा आर्थिक बदल कितीही म्हटलं तरी वरवरचेच असतात. कुठल्याही माणसात अंतर्बाह्य बदल होण्यासाठी पराकोटीची व्यक्तिगत सचोटी आवश्यक असते. तिचे संकेत देणं कादंबरीकाराचं काम असू शकतं. पण ही नैतिकतावादी स्पिरिच्युअल भूमिका भौतिकवादाच्या निकषांवर टिकणारी नाही. ‘जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सुखाने राहावे, कर्ज काढूनही तूप वगैरेचे सेवन करावे’ असं म्हणणाऱ्या आणि ‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ मानणाऱ्या भौतिकवादी चार्वाकाची आठवण ही कादंबरी वाचताना येते. दिनकर दाभाडे हीच भौतिकवादी भूमिका घेऊन सावरगावातलं डार्विनियन जग जसं आहे तसं दाखवतात, ते विलक्षण अस्वस्थ करणारं आहे. अस्वस्थ करणं हेच खऱ्या साहित्याचं काम हे मान्य केलं, तर दिनकर दाभाडेंची ही भली मोठ्ठी कादंबरी एक यशस्वी कलाकृती ठरते. मात्र तिने अनुत्तरित ठेवलेले लैंगिक नीतिमत्तेबाबतचे प्रश्न गंभीर आहेत.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

Tags: Vhaya Sawargao Khurda Via Savargaon Khurd Bilamat Gayapatan Farmers Philosophical Vision Paperwall Media and Publishing Vishram Gupte Dinkar Dabhade sensitiveness authenticity Cultural Shock ethically neutral Value Neutral relativistic redumtion cathartic deconstructionist materialistic complex nymphomaniac The Remembered Village व्यामिश्र विरेचनवादी विरचनावादी स्त्री-पुरुष विमोचन संवेदनशील सापेक्षतावादी मूल्यनिरपेक्ष ननैतिक वऱ्हाडी वैदर्भीय शेतकरी गोवंश हत्याबंदी गयपातं बिलामत फिलॉसॉफिकल व्हिजन भौतिकवादी निवेदनशैली बहुआवाजी मुंबई पेपरवॉल मिडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि व्हाया सावरगाव खुर्द दिनकर दाभाडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात