डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

आपल्या वैचारिक भूमिकेचा अहंकार मिरवणारे आणि आपली पोलिटिकल लाईन न मानणाऱ्यांना तुच्छ समजणारे बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते भोवताली दिसतात. मात्र एखादी वैचारिक भूमिका स्वीकारूनसुद्धा दुसऱ्यांच्या मनाची कदर करणारे सामाजिक कार्यकर्ते विरळाच. बहुतांश सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या वैचारिक भूमिकेशी तडजोड करणं कमीपणाचं समजतात. कादंबरीतला सावलीराम हा प्रवृत्तीने समन्वयवादी वाटतो. त्याला स्वतःच्या सृजनशील सामाजिक प्रेरणाही जोपासायच्या आहेत आणि कुटुंबातल्या माणसांनाही दुखवायचं नाही. म्हणून त्याची परवड होते, जी या कादंबरीच्या पानोपानी दिसते. ‘स्वप्नपंख’च्या भाबड्या, निरागस जगातून डॉक्टर राजेंद्र मलोसेंचा प्रवास ‘गाथा सप्तपदी’सारख्या व्यामिश्र भावभावनांच्या तांडवाकडे सहजपणे होतो. या विस्मयकारक दीर्घ प्रवासात वाचकांचं सामाजिक भान जागृत होतं

डॉक्टर राजेंद्र मलोसे या तरुणाने 1979 मध्ये नाशिकपासून साठ किलोमीटरवर असलेल्या चांदवड या गावी आपला दवाखाना सुरू केला. या हॉस्पिटलात आज 25 बेड्‌सची सोय आहे. अपेंडिक्स, हार्निया, सिझेरियन, हिस्ट्रेक्टॉमीज यांसारख्या आवश्यक शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. रविवार आणि सोमवार हे दोन दिवस शस्त्रक्रियांसाठी राखलेले आहेत. हॉस्पिटलची सगळी जबाबदारी डॉ.मेधा मलोसे बघतायत. चांदवडसारख्या लहान गावात पहिलं अद्ययावत ऑपरेशन थिएटर, पेशंटसाठी ऑक्सिजनची व्यवस्था, सोनोग्राफी मशीन या गोष्टी डॉ.मेधाच्या पुढाकारानेच सुरू झाल्यात. नवरा जर लष्करच्या भाकऱ्या भाजणारा असेल, तर बायकोला धान्य पिकवावंच लागतं. त्यामुळे डॉ.राजेंद्र मलोसेंच्या आयुष्यात डॉ.मेधाची भूमिका फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, पत्नी, सहकारी डॉक्टर आणि डॉक्टरांच्या लिखाणाची पहिली वाचक, समीक्षक अशी विविधांगी आहे.

1

मराठी साहित्याला दिडेकशे वर्षांपासून समाजप्रबोधनाची अखंड परंपरा आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रखर सामाजिक चिकित्सेमुळे मराठी साहित्याला स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तीन पुरोगामी मूल्यांचा भक्कम आधार प्राप्त झाला. याच मानवतावादी मूल्यांना स्मरून पुढे साने गुरुजींनी कथा, कादंबऱ्या आणि सामाजिक भाष्ये लिहिली. श्री.म. माट्यांनी सामाजिक कळवळ्याचा हाच वारसा जपला. तो पुढे लोकप्रिय मराठी साहित्याचे हीरो ठरलेल्या पु.ल. देशपांड्यांपर्यंत अखंडपणे सुरू होता. आजही हा वारसा जिवंत दिसतो. ‘स्वप्नपंख’ आणि ‘गाथा सप्तपदी’ या डॉक्टर राजेंद्र मलोसेंच्या दोन कादंबऱ्या वाचताना मराठी साहित्याची ही प्रबोधनकारी परंपरा आठवल्याशिवाय राहत नाही.

साहित्य दोन ढोबळ प्रकारांत विभागलं जातं. एक- फिक्शन आणि दुसरं- नॉनफिक्शन; म्हणजे काल्पनिक आणि वास्तविक. पैकी काल्पनिक साहित्याच्या सीमा अमर्याद असतात. तिथे लेखकाची प्रतिभा कार्यरत असते. ही त्याच्या अनुभवावर प्रक्रिया करते आणि करता-करता त्या अनुभवाचा पोत बदलून टाकते. मात्र अनुभवाला तंतोतंत तपशीलवार रीतीने सादर करणे हासुद्धा काही लेखकांचा ध्यास असतो. ह्यामध्ये डोळ्यांत भरणारं उदाहरण म्हणजे डॉक्टर अनिल अवचट ह्यांचं आहे. गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी सामाजिक चळवळींवर आणि कार्यकर्त्यांवर लिहिलेल्या तपशीलवार लेखांमध्ये अनुभवाचं थेट प्रक्षेपण बघायला मिळतं. असं थेट सामाजिक आशय असलेलं, ज्याला ‘नॉनफिक्शन’ म्हणता येईल असं लिखाण मराठी वाचकांना विशेष आवडतं.

एकाच वेळी समाजकार्य आणि लिखाण करणारे तळमळीचे अनेक कार्यकर्ते-लेखक मराठी साहित्याला परिचित आहेत. चटकन ज्यांची नावं आठवावीत असे गडचिरोलीच्या ग्रामीण भागात स्वास्थ्याचं काम करणारे डॉक्टर अभय बंग, रोजगार हमी योजना तसेच ग्रामीण स्वराज्य संस्थांबद्दल सातत्याने लिहिणारे श्री.मोहन हिराबाई हिरालाल, नर्मदा बचाव चळवळींबद्दल आस्थापूर्ण लिहिणारे कै.संजय संगवई आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतलेले हुतात्मा डॉ.नरेंद्र दाभोलकर. महाराष्ट्रात विविध राजकीय जाणिवा जोपासणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांची वानवा नाही. त्यापैकी अनेकांनी लेखन केलं आणि ते वाचकांच्या मनावर ठसलं.  

मराठी साहित्यात फिक्शन किंवा कल्पक लेखनातसुद्धा प्रबोधनाची परंपरा आहे. हाडाचे कार्यकर्ते असलेले हमीद दलवाई, बाबूराव बागुल, लक्ष्मण माने, दया पवार आणि उर्मिला पवार ह्यांच्या कथा-कादंबऱ्या मराठी वाचकांना परिचित आहेत. तरीही तुलनेत मराठीत कार्यकर्ते- कादंबरीकार नगण्य असून कार्यकर्ते-पत्रकार अधिक आहेत. राजेंद्र मलोसे हे पेशाने डॉक्टर, वृत्तीने सेवाभावी आणि प्रेरणेने कादंबरीकार आहेत. आतापर्यंत त्यांच्या दोन कादंबऱ्या, दोन दीर्घ कथा आणि तीन आधुनिक पुराणं- ज्यामध्ये ‘अंघोळ पुराण’, ‘नख पुराण’ व ‘मोबाईल पुराण’ या सामाजिक स्वास्थ्याच्या रोचक तीन पुस्तिकांचा समावेश आहे.

साहित्य आणि साहित्यिकांबद्दल ज्या लोकप्रिय धारणा मराठी पर्यावरणात रुजल्या आहेत, त्या मजेशीर आहेत. म्हणजे लेखन हा दैवी प्रतिभेचा आविष्कार आहे, त्यासाठी लेखकाला एकांत हवा असतो, खरे लेखक माणूसघाणे असतात, त्यांना माणसांच्या आरपार दिसतं, ते अहोरात्र आपल्या लेखनावर विचार करत असतात, त्यांच्या आवडी-निवडी जगावेगळ्या असतात, त्यांचा ‘लिबिडो’ म्हणजे कामुकता अमर्याद असते, त्यांच्यावर अनेक स्त्रिया फिदा असतात... वगैरे वगैरे. गंमत म्हणजे, काही लेखक या रोमँटिक धारणा खऱ्या मानून जगताना दिसतात. मात्र सामाजिक माध्यमांच्या विस्फोटानंतर या गमतीशीर धारणांच्या चिंधड्या उडाल्या, लेखनप्रेरणेचं व प्रक्रियेचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण सुरू झालं आणि आपल्या भोवतालचे अनेक जण लिहू लागले. त्यामुळे लेखक म्हणून जे विशेषाधिकार लेखकांच्या जमातीने क्लेम केले होते, ते इतिहासजमा झाले. हे कालानुरूप आणि स्वागतार्ह आहे.

माणसं जगताना अक्षरशः अमर्याद अनुभवांना सामोरी जात असतात. सगळ्या माणसांना त्यांचे भले-बुरे, कडू- गोड, स्वीकृत-विकृत असे अनुभव क्षणापुरते येतात. त्याबद्दल बहुतांश माणसं सहसा विचार करत नसतात. त्यामुळे मौलिक वाटणारे हे अनुभव वाळवंटात चूळभर पाणी जसं विरून जावं, तसे विरून जातात. फक्त लेखक (आणि लेखिका) या अनुभवाची गोष्ट रचतात. ज्या अनुभवाचं नॅरेशन होत नाही, तो विरून जातो. ज्याचं होतं, तो अनुभव ललित साहित्य होतं. राजेंद्र मलोसेंच्या कादंबऱ्यांचं नॅरेशन एका अर्थाने त्यांच्या अनुभवांचं नॅरेशन असलं, तरी ते पूर्णपणे आत्मचरित्रात्मक नाही आणि ते पूर्णपणे काल्पनिकसुद्धा नाही. आपली कलाकृती ही वास्तव आणि काल्पनिकतेच्या मधोमध असलेल्या धूसर प्रदेशात साकार व्हावी, असं बहुतेक लेखकांना वाटतं. त्यामुळे लेखकाचं सत्य हे केवळ वास्तववादी न राहता ते प्रतिभाशाली होतं.

त्यामुळे नाशिकजवळ चांदवड या गावात गेली सुमारे अडतीस वर्षे आपल्या पत्नीसोबत- डॉक्टर मेधासोबत ग्रामीण जनतेला आरोग्यसेवा देणाऱ्या मलोसे दांपत्याचा सेवाभावी संदर्भ दुर्लक्षून राजेंद्र मलोसेंच्या कादंबऱ्यांकडे वळता येणार नाही. त्यांच्या दोन कादंबऱ्यांची चर्चा करण्यापूर्वी म्हणूनच ‘ग्रामीण जनतेचा डॉक्टर’ या प्रत्यक्ष जगलेल्या त्यांच्या भूमिकेचा धावता आढावा आवश्यक वाटतो. लेखक हा निर्वात पोकळीत बसून लिहिणारा प्राणी नाही. तो समरसून जगणारा, जगताना भान हरपणारा आणि या हरपलेपणातून सावरलं की लिहिणारा- असा प्रतिबद्ध कलाकार असू शकतो, हे राजेंद्र मलोसे या डॉक्टर-कादंबरीकाराचा बौद्धिक व भावनिक प्रवास बघताना जाणवतं.

मराठी साहित्यात थोडे डॉक्टर आणि डॉक्टरणी लेखन करताना दिसतात. मात्र कादंबरी लिहिणारे विरळाच. म्हणून राजेंद्र मलोसे ह्यांचं कादंबरीकार असणं एक अनोखी घटना ठरते.

2

एकोणीसशे सत्तरीचं दशक हे महाराष्ट्रासाठी सामाजिक दृष्ट्या अत्यंत फलदायी ठरलं. याच काळात विविध सामाजिक चळवळींना जोर आला आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात दलित पँथर व समाजवादी चळवळीने बाळसं धरलं. राजा ढाले, नामदेव ढसाळ, बाबा आढाव आदी नावांची चर्चा याच काळात सुरू झाली. वरोऱ्यानजीकच्या आनंदवनात कुष्ठरोग्यांची सृजनशील सेवा करणारे श्री.बाबा आमट्यांचा मराठी तरुण पिढीवर प्रभाव वाढत जाणारा हाच कालखंड. आदर्शवाद जीवनशैलीचा सहज भाग होऊ शकतो, असं वाटणारा तो जादूई कालखंड होता. महाराष्ट्रातला सुशिक्षित आणि बोलका वर्ग सत्तरीच्या दशकात आजच्याहून अधिक संवेदनशील होता, असं म्हटलं जातं.

या काळात राजेंद्र मलोसे वयात येत होते. तसं येताना भोवतालच्या आदर्शवादाचा ओझोन वायू त्यांच्या श्वासात सहजच मिसळून गेला होता. काही तरी अर्थपूर्ण जगावं, दुसऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावं; पददलितांना, वंचितांना, ग्रामीण जनतेच्या समस्यांना आपलं मानून त्यावर काम करावं असं वाटणारे हजारो मराठी युवा-युवती सत्तरीच्या दशकाने बघितले आहेत. राजेंद्र मलोसे या आदर्शवादी युवाब्रिगेडचे एक सैनिक होते.

‘Make love, not war'’ हा प्रेमाचा संदेश या काळात फक्त महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा नारा होता. बॉब डिलनची अर्थपूर्ण गाणी, बिटल्सचं संगीत आणि प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध प्रेमाचा उठाव करणारी हिप्पी चळवळ याच काळात जगात जोमात होती. थोडक्यात, आदर्शवादाचं हे ‘इन्फेक्शन’ जगभरात पसरलं होतं. महाराष्ट्राच्या समृद्ध प्रबोधन परंपरेने प्रेमाचा हा संसर्ग दूरवर फैलू दिला होता. त्याचा परिणाम म्हणजे, नुकताच एमबीबीएस पास झालेल्या तरुण राजेंद्रने थेट आनंदवन गाठलं. या तरुणाचा उद्देश स्वतःला बाबा आमट्यांच्या सेवाप्रकल्पात झोकून देण्याचा होता. पण बाबाने त्याला थांबवलं आणि खेड्यात जाऊन ‘ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा दे’ असा प्रेमळ आदेश दिला. त्याचं तंतोतंत पालन करून डॉक्टर राजेंद्र मलोसे या तरुणाने 1979 मध्ये नाशिकपासून साठ किलोमीटरवर असलेल्या चांदवड या गावी आपला दवाखाना सुरू केला.

या हॉस्पिटलात आज 25 बेड्‌सची सोय आहे. अपेंडिक्स, हार्निया, सिझेरियन, हिस्ट्रेक्टॉमीज यांसारख्या आवश्यक शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. त्यासाठी विशेष सर्जन्स येतात. रविवार आणि सोमवार हे दोन दिवस शस्त्रक्रियांसाठी राखलेले आहेत. सुरुवातीपासूनच हॉस्पिटलची सगळी जबाबदारी डॉक्टर मेधा मलोसे बघतायत. चांदवडसारख्या लहान गावात पहिलं अद्ययावत ऑपरेशन थिएटर, पेशंटसाठी ऑक्सिजनची व्यवस्था, सोनोग्राफी मशीन या गोष्टी डॉ.मेधाच्या पुढाकारानेच सुरू झाल्यात. नवरा जर लष्करच्या भाकऱ्या भाजणारा असेल, तर बायकोला धान्य पिकवावंच लागतं. त्यामुळे डॉ.राजेंद्र मलोसेंच्या आयुष्यात डॉ.मेधाची भूमिका फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, पत्नी, सहकारी डॉक्टर आणि डॉक्टरांच्या लिखाणाची पहिली वाचक व समीक्षक अशी विविधांगी आहे.

तेव्हा, म्हणजे डॉक्टरांनी ग्रामीण वैद्यकीय सेवेचा संकल्प सोडला त्या 1979 वर्षी देशात ‘लायसन्स अँड परमिट’ राजचा अंमल होता. आवश्यक आणि चैनीच्या  हा शब्दही तेव्हा कोणाला माहीत नव्हता. त्या काळी खेड्यातच काय, शहरातसुद्धा सुख-सोर्इंची वानवा होती. गावांना जोडणारे धड रस्ते नव्हते आणि त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या मोटरी व स्कूटरी मोजक्याच होत्या. खेड्यात काम करायचं म्हणजे जवळ काही तरी वाहन हवं. तेव्हा भारतात मोटरसायकलचा एकच ब्रँड लोकप्रिय होता- ‘राजदूत’. तिच्यासाठी नंबर लावावा लागायचा. वर्षानुवर्षे वाट बघावी लागायची. (किती छान होते ते दिवस!) गावात नवीनच आलेल्या डॉक्टरांना पेशंटच्या व्हिजिटसाठी एखादं वाहन हवं आहे, ही बातमी गावात फुटली. आरएसएसबद्दल आस्था असणारे एक सद्‌गृहस्थ म्हणाले, ‘‘माझा नंबर येत आहे ‘राजदूत’चा, तो तुम्ही घ्या. तुम्हाला त्याची अधिक गरज. फक्त एक लक्षात ठेवा- तुमची ही मोटरसायकल वेगासाठी नाही, ती तुमच्या सोईसाठी आहे...’’ डॉ.राजेंद्रने हा उपदेश कायम लक्षात ठेवला आणि ग्रामीण डॉक्टर म्हणून जगताना स्वतःच्या वेगापेक्षा त्यांनी रुग्णांच्या सोईवर अधिक भर दिला.

अशा या डॉक्टर झालेल्या आणि कादंबरीकार होऊ बघणाऱ्या राजेंद्र मलोसेंचा आदर्शवाद अस्सल. सेवा म्हणजे सेवाच. त्याची पैशांत किंमत करू नये, या बाण्याने त्यांनी त्यांच्या पेशंट्‌सकडून फी म्हणून फक्त पन्नास पैसे आकारणं सुरू केलं. ‘अहो डॉक्टर, इतक्या कमी पैशांत तुमचं कसं भागायचं? तुमची फी किमान एक रुपया तरी करा-’ असा प्रेमळ आग्रह डॉक्टरांच्या हितचिंतकांनी केला होता. आज हे सगळं स्वप्नवत्‌ वाटू शकतं, कारण ते दिवसच तसे स्वप्नील होते. स्वप्नपंख असलेले, नितळ, निळ्या आभाळात निभ्रांतपणे विहरण्याचे. त्या उंचीवरून जमिनीवरचं दृश्य बघणारे. ते बघताना हरखून जाणारे. डॉ.राजेंद्र मलोसे आणि डॉ.मेधा मलोसेंना विचारा, दोघंही त्या जादूई दिवसांबद्दल भारावून बोलतात. लेखकासाठी अत्यंत आवश्यक असलेलं एक भांडवल म्हणजे परवेदनेप्रति अनुकंपा. तीच नसेल तर शुष्क- कोरडी लेखणी लिहून-लिहून किती लिहिणार? आणि छापलं तरी ते किती जणांना हलवून सोडणार?

लेखकाचं काम वाचकांना सर्वांगी हलवून सोडणं. तेच त्याने करावं. सेलिब्रेटी वगैरे होण्याच्या भानगडीत पडू नये. त्यातून बेरकेपणाचा संसर्ग होतो. लेखकाच्या प्रकृतीला हा संसर्ग वाईटच. रुग्णांवर इलाज करणाऱ्या डॉ.मलोसेंना हे कळलेलं दिसतं. तसंच करुणा हा साहित्याचा सहज भाव आहे आणि प्रेम हेच त्याचं ध्येय आहे- हे प्राथमिक ज्ञानसुद्धा कादंबरीकार डॉक्टर राजेंद्र मलोसेंना प्राप्त झालेलं दिसतं. या बाबतीत ते साने गुरुजींचे सच्चे विद्यार्थी शोभतात. त्यांच्या ‘स्वप्नपंख’ आणि ‘गाथा सप्तपदी’ या दोन कादंबऱ्या वाचल्यानंतर त्यांची नितळता आणि सच्चाई मनाला स्पर्श करते. ती ज्याला करत नसेल त्याला प्रेमाचं इन्फेक्शन झालं नाही, असं म्हणता येईल. हे असं इन्फेक्शन आहे, जे व्हावं. ते होत नसेल, तर माणसाच्या प्रकृतीला धोका असतो!

साने गुरुजींच्या आदर्शवादी संस्कारांत वाढलेल्या साहित्यिकांना आणि वाचकांना हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

3

राजेंद्र मलोसेंची ‘स्वप्नपंख’ ही कादंबरी मराठी साहित्यात ‘श्यामची आई’ने उद्‌घाटित केलेल्या आदर्शवादी, निरागसतेच्या परंपरेत समजून घेता येते. ही रमेश तात्यासाहेब कळंबकर नावाच्या एका किशोरवयीन मुलाची रोजनिशी आहे. शासनाने सुरू केलेल्या नव्या पब्लिक स्कूलमध्ये त्याची स्कॉलर म्हणून निवड होते. इथे  तो सातव्या वर्गात प्रवेश करतो. दहावीपर्यंत तो इथे शिकतो. होस्टेलमध्ये रमेश इतर ग्रामीण मुलांसोबत राहू लागतो. रमेशच्या चार वर्षांच्या वास्तव्याचा आणि त्याच्या सोबत्यांच्या होस्टेलमधल्या गमतीजमती हा या डायरीचा विषय आहे. लेखकाने किशोरवयीन मुलाच्या डायरीचा फॉर्म स्वीकारल्याने कादंबरीचं नॅरेशन सुबोध झालं आहे. या कादंबरीचं पर्यावरण ग्रामीण आहे. ग्रामीण भारताला प्राथमिक स्वास्थ्य आणि प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप मजल मारायची बाकी आहे.

‘स्वप्नपंख’ ही 1997 मध्ये प्रकाशित झाली आहे. आज तिची तिसरी आवृत्ती (2016) बाजारात आहे. गेल्या वीस वर्षांत भारतात जागतिकीकरणाने मूलभूत प्रकारचे सामाजिक- सांस्कृतिक बदल घडवून आणलेत. मूक लोक बोलू लागले, तंत्रज्ञान खेडोपाडी पोहोचलं आणि माहितीचं सार्वत्रिकीकरण झालं. पण उत्तम दर्जाच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मात्र बहुसंख्यांना मिळाला नाही. ‘स्वप्नपंख’ अशा शिक्षणाची फक्त थिअरीच नाही तर प्रॅक्टिस वर्णून सांगते, त्यामुळे तिचं औचित्य आजही कायम आहे. एका सातवीतल्या मुलाची डायरी असल्याने या कादंबरीची शैली बाळबोध आहे. डायरीत चितारलेला ग्रामीण विद्यार्थ्यांचा शालेय दिनक्रम, वयात येणाऱ्या मुलांचे आपसातले मनोव्यवहार, विविध प्रवृत्तींच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे परस्परसबंध, मुलांना नितळ संस्कार देण्याचा वसा घेतलेल्या प्राचार्यांचं लोभस व्यक्तिचित्र, वाचनसंस्कृती, नितळता व निर्भयता या मूल्यांचा पाठलाग, आणि एकूणच शिक्षणाने साध्य होणारं मानवीकरण व सांस्कृतिकीकरण इत्यादी विषय या कादंबरीत प्रभावीपणे येतात.

‘स्वप्नपंख’ हे ग्रामीण भारताची शैक्षणिक आकांक्षा मांडणारं पुस्तक आहे. ते शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणाचं नियोजन करणारे नोकरशहा आणि सत्ताधाऱ्यांना विशेष उद्‌बोधक आहे. बालशिक्षणाचं हे एक कलात्मक ‘पॉलिसी स्टेटमेंट’ आहे, असंसुद्धा म्हणता येतं. ही कादंबरी वाचून एकादोघांना खेड्यात शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं लेखक सांगतात. खेड्यातल्या आपल्या अम्माची आठवण येऊन रडणारा बारा वर्षांचा रमेश हळूहळू शाळेत रमतो. भोवतालाचं निरीक्षण करतो. नवं शिकतो आणि शिकलेलं आपल्या डायरीत मांडतो. ‘स्वप्नपंख’वर ‘श्यामची आई’च्या भाषेचा, शैलीचा आणि व्हिजनचा अमिट प्रभाव जाणवतो. इथे पानोपानी उत्तम संस्कारांची आंस आणि नैतिकतेचा आग्रह आहे. रमेशची निरीक्षणशक्ती आणि त्यांची संवेदनशीलता ही ‘स्वप्नपंख’ची विशेषता आहे. मात्र हे पुस्तक साने गुरुजींचा हळवा वारस पुढे नेताना अधिक व्यामिश्र भावनांना भिडतं. काळानुरूप निरागसतेच्या कल्पना बदलतात. त्यामुळे इथे भेटणारी मुलं जशी वात्रट, चावट, बेरकी आहेत; तशीच ती सच्ची, हळवी व बुद्धिवानसुद्धा आहेत.

मानवी स्वभावाचे सुष्ट, दुष्ट आणि क्लिष्ट असे तिन्ही पदर राजेंद्र मलोसे सहजपणे चितारतात. त्यामुळे ही कादंबरी शुद्ध संस्कार करणारी बाळबोध कलाकृती न वाटता ती पुरेशी वास्तववादी आणि रोचक होते. मुलं देवाघरची फुलं आहेत, असं साने गुरुजी म्हणत असत. इथे भेटणारी मुलं तशी काही वाटत नाहीत. वाढत्या वयात प्रवृत्तीची निरागसता आणि मनाची नितळता टिकवणं किती कठीण आहे, हे रमेशची सुमारे पावणेपाचशे पानांची डायरी सांगते.

या डायरीत ग्रामीण आणि शहरी या दोन संस्कृतींचा मनोवेधक आलेख सहजपणे येतो. गावात वाढलेल्या मुलांच्या गावरान भाषेला वळण देणारे शिक्षक इथे भेटतात. ‘शिस्त म्हणजे काय?’ असं विचारणारा गावातल्या लमाण तांड्यावरचा गावरान मुलगा रघ्घू इथे भेटतो. अंघोळ न करणारी, कॉफी कधीच न प्यायलेली, तिखट चटणी आणि भाकर खाणारी ही मुलं होस्टेलच्या मेसमध्ये शिस्तबद्ध रीतीने बसून मचामचा आवाज न करता जेवण करणं शिकतात. थोडक्यात, गावठी मुलं या पब्लिक स्कूलमध्ये ‘मॅनर्स’ शिकतात. खेड्यात न बघितलेले टेबल टेनिस, बेसबॉलसारखे खेळ शिकतात. वर्गप्रतिनिधीच्या निवडणुकीत आपल्या मित्रांचा हिरीरीने प्रचार करतात, नेतृत्वगुण दाखवतात. दांडगाई करतात. मास्तरांसारख्या शुद्ध भाषेत बोलून धमाल करतात. या शाळेत आल्यानंतर रमेशला वाचनाची गोडी लागते. सुरुवातीला आईची आठवण काढणारा हा मुलगा साने गुरुजींचं ‘मिरी’ वाचतो, तेव्हा त्याला रडू आवरत नाही. मग मास्तर त्याच्या हातातून ते पुस्तक काढून घेतात आणि त्याला ‘फास्टर फेणे’ वाचायला देतात. हे पुस्तक वाचताना रमेश हरखून जातो.

दिवाळीच्या सुटीला सगळी मुलं आपापल्या घरी जातात. त्यांना सोडायला त्यांचे  गुरुजी त्यांच्यासोबत प्रवासात असतात. या मुलांना बघून एसटीमधला एक प्रवासी विचारतो, ‘तुम्ही अनाथाश्रमातले का रे?’ त्यावर गुरुजी खवळतात. सुट्टीत अभ्यास म्हणून रमेशच्या शिक्षकांनी वृत्तपत्रातले अग्रलेख कापून आपल्या वहीत चिकटवायला सांगितलेलं असतं. रमेश आपल्या गावातल्या एका सुशिक्षिताच्या घरी ‘मराठा’ वृत्तपत्र मागायला जातो. त्याचा उद्देश ऐकून यजमान म्हणतात : ‘एवढ्या लहानपणी कशाला हे उद्योग? जा, चिंचा झोडा.’ हे ऐकून हसावं की रडावं, हे कळत नाही. मुलांनी फक्त उंडारावं, अभ्यासबिभ्यास करू नये, शिक्षकाने सांगितलेलं बौद्धिक काम तर अजिबात करू नये- असं ज्या समाजात मानलं जातं, त्या समाजात संवेदनशील शालेय शिक्षणाचं ध्येय किती अवघड आहे हे कळतं.

जात, धर्म, वर्ग, वर्ण, लिंग, प्रदेश या रोगट अस्मितादायक तुकड्यांमध्ये प्रत्येक भारतीय जन्माला येतो. म्हणजे एका अर्थाने तो अंधाऱ्या प्रदेशात जन्म घेतो. त्यात निरर्थक धार्मिक कर्मकांडांची भर. अशा भारतीय माणसाला जर अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल, तर त्याला या निकृष्ट अस्मितांच्या पल्याड उत्कृष्ट मानवी मूल्यांचा ध्यास घ्यावा लागतो. त्यासाठी विशाल दृष्टीचं विवेकशील शालेय शिक्षणच हवं. डॉ.राजेंद्र मलोसेंची ‘स्वप्नपंख’ वाचताना वाचक त्याच्या शालेय दिवसांत परतून जातो आणि त्या प्रदेशात एके काळी आपल्या वाट्याला आलेला अंधार बघून येणाऱ्या पिढीतल्या मुलांना तरी उत्तम माणूस करणारं शिक्षण मिळावं, असं मनाशी म्हणतो. या कादंबरीत शाळेचे प्राचार्य असलेल्या करंदीकरसरांची व्यक्तिरेखा ही महाराष्ट्र शासनाचे माजी शिक्षण संचालक श्री.वि.वि. चिपळूणकर यांच्यावर बेतलेली असून चिपळूणकरसर खऱ्या अर्थाने साने गुरुजींचे वारसदार आहेत, असं डॉक्टर मलोसे सांगतात. कादंबरीत त्यांची व्यक्तिरेखा स्मरणीय वठली आहे.

आधुनिक साहित्य व्यामिश्र भावनांना व्यक्त करतं म्हणून ‘स्वप्नपंख’सारख्या सुबोध कलाकृतीला आधुनिक म्हणता येईल का, असा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर कादंबरीच्या सुगम वाटणाऱ्या भाषाशैलीत नसून तिने उपस्थित केलेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये शोधावं लागतं. हा निकष लावला तर ‘स्वप्नपंख’ ही निर्विवाद आधुनिक कादंबरी ठरते, कारण ती दर्जेदार शालेय शिक्षणाचं मूल्य अधोरेखित करते. विवेकवादी वैज्ञानिक शिक्षण, त्यातून व्यक्तीचा बौद्धिक विकास आणि त्यातून उत्तम नागरिक- हा आधुनिकतेचा प्रवास आहे. रमेशची डायरी या प्रवासाचं साध्या शैलीत सूचन करते, म्हणून ‘स्वप्नपंख’ ही कादंबरी एका कार्यकर्त्या-कलाकाराच्या सामाजिक कळवळ्याची प्रतिक आहे.

4

‘गाथा सप्तपदी’ ही डॉक्टर राजेंद्र मलोसेंची दुसरी कादंबरी. ती 2002 मध्ये प्रकाशित झाली. सुमारे साडेचारशे पानांची ही कादंबरी आधुनिक मराठी साहित्यात परिचित नसलेल्या ‘सनाढ्य’ (ब्राह्मण) जातीच्या उपसंस्कृतीचे अंतर्गत ताणेबाणे सांगते. कधी काळी मध्य प्रदेशातून इथे आलेल्या आणि रुजलेल्या एका अमराठी भाषिक सबकल्चरचे अंतर्भेद, मनोव्यवहार, कौटुंबिक परंपरा आणि जात्याभिमान इथे भेटतो. कादंबरीचा विषय ‘आंतरजातीय विवाह’ आहे. सनाढ्यात शिक्षणाची परंपरा नाही, व्यापाराची आहे. जातीपातींच्या अहंकारामुळे भारतीय समूहमानस कसं रुग्णाईत झालं आहे, हे डॉक्टर राजेंद्र मलोसे सांगतात. हा रोगट अहंकार फक्त कौटुंबिकच नाही तर अनेकदा सामाजिक कलहांना आमंत्रण देतो. या कलहाची ही  ‘गाथा’ वाचकाला खिळवून टाकते. या कादंबरीतली पात्रं हिंदीमिश्रित मराठी बोलतात, त्यामुळे एरवी शहरी किंवा ग्रामीण मराठी भाषा वाचण्याची सवय असलेल्या वाचकांना ही संमिश्र मराठी अनोखी वाटते. ही संकरित भाषा या कादंबरीचं एक बलस्थान आहे.

सावलीरामच्या निवेदनातून कादंबरी पुढे सरकते. सनाढ्य जातीत जन्माला आलेला सावलीराम बुटोलिया हा पेशाने डॉक्टर आहे. हा सनाढ्यांमधला पहिला उच्चशिक्षित माणूस. त्याची पत्नी राधासुद्धा डॉक्टरच आहे. दोघांची वयात आलेली मुलगी रोशनी आपल्या मुसलमान मित्रासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहू इच्छिते. ते ऐकून रोशनीची आई त्रागा करते. बाप तिला समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. रोशनीचे आई-वडील दोघंही सेवाभावी प्रवृत्तीचे आणि पुरोगामी विचारांचे डॉक्टर आहेत. दोघांनी एके काळी समाजाला न जुमानता आंतरजातीय विवाह केलेला असतो. तरी मुलीची आपल्या शिक्षकासोबत- महंम्मद हुसेन सोबत- ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याची कल्पना त्यांना पसंत नसते. या कल्चरल शॉकपासून कादंबरी सुरू होते.

रोशनीने घरी आणलेल्या या भावनिक वावटळीला समजावून घेण्यासाठी आणि रोशनीला अशा संबंधातले खाच-खळगे समजावून देण्याच्या उद्देशाने सावलीराम तिला आपल्या घराण्याचा इतिहास ऐकवू लागतो आणि ‘गाथा सप्तपदी’ म्हणजे बुटोलिया घराण्यातल्या लग्नाच्या व परस्परनात्यांच्या एकेक चित्तरकथा आकारास येतात. इथे बालविवाह आहे आणि बालविधवा होणं आहे. जातीअंतर्गत आणि आंतरजातीय लग्नं आहेत. भाऊबंदकी आहे, त्यावरून झालेले कौटुंबिक गदारोळ आणि सामाजिक कलह आहेत. सावलीरामच्या आजी, आई, काका आणि आत्यांचा भावनिक उद्रेक आहे. ‘जातीसाठी खावी माती’ ही म्हण प्रत्यक्षात जगणारी सावलीरामच्या सनाढ्य जातीतली बाया आणि माणसं किती आढ्यताखोर, अहंकारी व गोंधळ घालणारी असतात, हे या कादंबरीत येतं. पण या कादंबरीचा मुख्य उद्देश जातीच्या अहंकारावर रचलेल्या समाजव्यवस्थेला आधुनिक विचारसरणीतून आव्हान देणे हाच आहे. म्हणून सावलीरामच्या या कुटुंबकथेचं (family saga) महत्त्व फक्त प्रादेशिक उरत नाही.

लेखकाने इथे जातिव्यवस्थेला छेद दिल्याने ‘गाथा सप्तपदी’ एक प्रबोधनवादी अस्सल भारतीय कादंबरी ठरते. माणसाला अमानुष करणाऱ्या पिढीजात परंपरा, जात्याभिमान आणि कौटुंबिक निष्ठेच्या जुनकट कल्पनांना नाकारणारा डॉक्टर सावलीराम हा कादंबरीचा प्रोटॅगॉनिस्ट आहे. तो हाडाचा समाजकार्यकर्ता आहे. एकीकडे समाजहित आणि दुसरीकडे बुटोलियांच्या संयुक्त कुटुंबाचं सुख यात दुभंगून गेलेला, मुळात ऋजू प्रवृतीच्या सावलीरामची भावनिक व बौद्धिक परवड वाचताना वाचक गुंग होतो. कादंबरीचं निवेदन अत्यंत प्रभावी आणि थेट आहे. आपल्या वैचारिक भूमिकेचा अहंकार मिरवणारे आणि आपली पोलिटिकल लाईन न मानणाऱ्यांना तुच्छ समजणारे बहुसंख्य सामाजिक कार्यकर्ते भोवताली दिसतात. मात्र एखादी वैचारिक भूमिका स्वीकारूनसुद्धा दुसऱ्यांच्या मनाची कदर करणारे सामाजिक कार्यकर्ते विरळाच. बहुतांश सामाजिक कार्यकर्ते स्वतःच्या वैचारिक भूमिकेशी तडजोड करणं कमीपणाचं समजतात.

कादंबरीतला सावलीराम हा प्रवृत्तीने समन्वयवादी वाटतो. त्याला स्वतःच्या सृजनशील सामाजिक प्रेरणाही जोपासायच्या आहेत आणि कुटुंबातल्या माणसांनाही दुखवायचं नाही. म्हणून त्याची परवड होते, जी या कादंबरीच्या पानोपानी दिसते. ‘स्वप्नपंख’च्या भाबड्या, निरागस जगातून डॉक्टर राजेंद्र मलोसेंचा प्रवास ‘गाथा सप्तपदी’सारख्या व्यामिश्र भावभावनांच्या तांडवाकडे सहजपणे होतो. या विस्मयकारक दीर्घ प्रवासात वाचकांचं सामाजिक भान जागृत होतं. ‘गाथा सप्तपदी’त वारंवार भेटणारा एक शब्द म्हणजे ‘रक्तनदी’. आपल्या वागणुकीचा उगम, तिच्या प्रेरणा आणि तिचं ध्येय हे कौटुंबिक स्वार्थासाठीच असतं, हे लेखक सुचवतो. या करकरीत कौटुंबिक प्रेरणेमुळे माणसं स्वार्थी होतात, एकमेकांना सांभाळून घेतात आणि प्रसंगी एकमेकांच्या उरावरसुद्धा बसतात. हीच रक्तनदीची विशेषता. माणसं त्यांच्या रक्ताच्या नात्याने एकमेकांना जशी बांधील असतात, तसेच इथे भाऊबंदकीसुद्धा असते. कौटुंबिक कलह आणि कौटुंबिक प्रेम हे दोन्ही रक्तनदीचे भागच. माणसाचा माणूस म्हणून चौफेर विकास या डार्विनवादी रक्तनदीच्या प्रवाहातून बाहेर पडूनच शक्य आहे.

जात, कुटुंब, घराणं, वर्ण, धर्म, वर्ग, प्रदेश आणि लिंग या पिंजऱ्यातून स्वतःची सुटका करून घेऊन नव्या मोकळ्या जगात विहरणं आणि माणसाला निखळ माणूस म्हणून  समजून घेणं म्हणजे आधुनिक होणं. आधुनिकता बोलायला सोपी पण जगायला कठीण अशी मूल्यव्यवस्था आहे. कौटुंबिक आसक्ती व घराण्याच्या अभिमानामुळे बहुतेकांना इतक्या विशाल संवेदनशीलतेने जगणं शक्य होत नाही. क्वचित एखादी व्यक्ती सावलीराम होऊन या रक्तनदीचा प्रवाह अडवते, क्वचित रोशनीसारखी मुलगी या प्रवाहाविरुद्ध पोहण्याची इच्छा व्यक्त करून खळबळ माजवते. पण रक्तनदीचं अव्याहत वाहणं, वाहताना अन्याय्य परंपरेला शिरोधार्य मानणं, त्यासाठी कुटुंबातल्या माणसांवर अत्याचार करणं सुरूच असतं. बहुतेक सगळी माणसं आपल्या कुटुंबाच्या धाकातच जगतात आणि रक्तनदीच्या करकरीत प्रेरणांमध्ये वाहून जातात, अशी माणसं श्रेयसाला टाळून प्रेयसाला जवळ करतात असं तात्त्विक विधान या कादंबरीत अध्याहृत आहे. ते विचार करण्यासारखं आहे.

रक्तनदीचा आद्य नियम मानणाऱ्या या सनाढ्यांच्या संयुक्त कुटुंबातल्या स्त्रियांना कायम दुय्यम स्थान आहे. पुरुषी वर्चस्व आणि अहंकारामुळे एरवी प्रेमळ वाटणारी माणसं इथे अन्यायकारक वागतात. ‘घरण्याची इज्जत’ हे मूल्यच असं असतं की, त्यासमोर माणुसकीचे सर्वसामान्य नियम फिके पडतात. हे सगळं रोचक घटनांद्वारे राजेंद्र मलोसे वाचकांना सांगतात.

श्रीवर्धन गावात शेतीवाडी असलेल्या बुटोलियांचं पन्नास-साठ जणांचं खाटलं चालवणं सोपं नाही. ते सावलीरामचा दोन नंबरचा भाऊ अण्णा चालवतो. कुटुंबाचं हित बघण्यासाठी त्याच्या लटपटी आणि खटपटी कधी संतापजनक तर कधी करुण भासतात. आपल्या बहिणींना चांगले नवरे मिळावेत आणि परंपरेने आखून दिलेल्या मर्यादेत कुटुंब राहावं म्हणून त्याची धावपळ व धडाडी विलक्षणच आहे. सावलीरामच्या या संयुक्त कुटुंबातल्या बायकांचं जग तसं प्रत्येक भारतीयाला परिचित आहे. दिवसभर स्वयंपाकघरातल्या अंधारातला त्यांचा वावर, जेवताना रोज शेवटचा नंबर, त्यातही नवऱ्याचं उरलेलं उष्टं अन्न खाण्याची सक्ती- या अन्यायाला घरातले पुरुष आव्हान देत नाहीत. मात्र सावलीरामचा मोठा भाऊ आपल्या ताटात मुद्दामूनच चांगलं-चुंगलं सोडून उठतो. उद्देश हाच की, आपल्या बायकोला आपण जे खातोय ते मिळावं.

भारतात ‘बेटी बचाव’ ही चळवळ घराघरांतून खूप पूर्वीच सुरू व्हायला हवी होती. ‘बेटा तुपाशी आणि बेटी उपाशी’ ही बहुतांश भारतीयांची मानसिकता ‘गाथा सप्तपदी’मध्ये पुनर्प्रत्ययासारखी वाचकाला भेटते. बुटोलियांच्या घराण्यात तरुण मुलींवर होणारे अन्याय, त्यांची मानसिक कोंडी, लग्नानंतरही त्यांची फरफट इत्यादी गोष्टी लेखक समरसून मांडतो. सावलीरामच्या धाकट्या बहिणीला- गार्गीला आंतरजातीय विवाह करायचा असतो. घरच्यांचा प्रखर विरोध सुरू होतो. प्रगतिशील सावलीरामला आपल्या बहिणीची भूमिका पटते, पण ती तो आपल्या कुटुंबाला पटवून देऊ शकत नाही. शेवटी कपट करून तो आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करतो. लोपामुद्रा, तिलोत्तमा अशी सुंदर नावं असलेल्या मुली सावलीरामच्या मोठ्या बहिणी आहेत. त्यांच्या लग्नांची चित्तरकथा वाचताना वाचक दंग होतो. लोपाचं वय जेमतेम बावीस. पण तिच्या लग्नाला उशीर होतोय, ही कुटुंबाची खंत. लोपा घराच्या अंगणात लग्नाची वाट बघत दिवसभर बसून असते. शेवटी तिला भेटायला झाडावरचं एक काळतोंडं माकड नियमित येऊ लागतं. ते बघून घरातल्या बायका हबकतात. आता मात्र या मुलीचं लग्न लवकर केलंच पाहिजे, असा तगादा घरातल्या पुरुषांना लावतात. त्यावर अण्णा- थोरला भाऊ चिडचीड करतो. त्याचे प्रयत्न सुरूच असतात. त्यात या माकडाची भर. हा सगळा प्रसंग भन्नाट आहे.

हे जर वाचकांनी इंग्रजी कादंबरीत वाचलं असतं, तर त्याला त्याने लगेच ‘मॅजिक रिॲलिझम’ असं भलं मोठं नाव दिलं असतं. अशी अनेक भन्नाट वर्णनं ‘गाथा सप्तपदी’मध्ये सहज येतात. या लोपाचा नवरा भुजंगप्रसाद पुढे रागाच्या भरात तिचं नाकच कोयत्याने कापून टाकतो. बिननाकाची लोपा ही कादंबरीतली व्यथित करणारी प्रतिमा आहे. शेवटी तिचा मुलगा मोठा होतो, कर्तृत्ववान होतो आणि आपल्या आईवर प्लॅस्टिक सर्जरी करून तिला नवं नाक देतो! हिंदीमिश्रित मराठी बोलणाऱ्या या पुरुषांचा राग, त्यांच्या अश्लील शिव्या, त्यांचा वेडसर अहंकार आणि त्यांनी केलेले ते अन्याय बघून जातीसाठी माती खाणाऱ्या या सनाढ्य जातीच्या प्राण्यांची कीव येते. अशा जात्यंध प्राण्यांच्या गर्दीत सामील न होणारा सावलीराम डॉक्टर होतो. संवेदनशील असल्याने तो समाजवादी चळवळीत सहभागी होतो. बाबा आमटे यांच्यामुळे प्रभावित होतो आणि खेड्यात डॉक्टर म्हणून  ग्रामीण जनतेची सेवा करू लागतो.

पुढे त्याला राधा भेटते. ही पण डॉक्टर. तिचं आणि सावलीरामचं लग्न हा संघर्षाचा बिंदू कादंबरीत प्रभावीपणे आला आहे. राधा आपल्या जातीची नाही म्हणून ती सनाढ्यांची सून होण्याच्या लायकीची नाही, असं सावलीरामच्या कुटुंबाला वाटतं. राधाला सावलीरामच्या आई-आजीने एकच नाव दिलं असतं, ‘काळतोंडी गोरी कातडी’. याच नावाने सावलीरामच्या बायकोचा पाणउतारा सतत केला जातो. शांत प्रवृत्तीचा सावलीराम हे सहन करतो आणि अधिक संघर्ष होऊ नये म्हणून मध्यममार्ग निवडतो. म्हणजे आंतरजातीय विवाहही करतो आणि कुटुंबाचं मन राखण्यासाठी लग्नाचे विधीही करतो. हे लग्नविधी, वरात, बँडबाजा त्याच्या चळवळीतल्या मित्रांना आवडत नाही. म्हणून पाचपन्नास चळवळे कार्यकर्ते सावलीरामचा घोषणांद्वारे निषेध करायला लग्न मांडवासमोर जमतात. सावलीरामची हुर्यो करतात. ते बघून कर्त्याधर्त्या अण्णाचा पारा चढतो. तो हातात बांबू घेऊन कार्यकर्त्यांना हाणू लागतो. अण्णाचा अवतार बघून ‘संपूर्ण क्रांती’चा नारा देणारे सगळे कार्यकर्ते सैरावैरा पळून जातात! असे एकाहून एक नाट्यमय प्रसंग या कादंबरीत येतात.

या पात्रांचे आर्ष मनोव्यवहार, त्यांचे वेडसर आग्रह, फक्त स्वतःच्याच जातीपुरतंच बघण्याची खोड... बदलत्या जगाबद्दल संपूर्ण बेपर्वा असलेले सावलीरामचे अशिक्षित आई, वडील, आजी, भाऊ, वहिन्या, आत्या, मावश्या, शेजारी आणि जातबंधू एका बाजूला व नवा समतावादी विचार करणारा सुशिक्षित सावलीराम दुसऱ्या बाजूला. ‘गाथा सप्तपदी’ हे भारतात कायम सुरू असलेल्या एका वैचारिक संघर्षावरचं कलात्मक विधान आहे. ‘परंपरा विरुद्ध आधुनिकता’ हा संघर्ष मुळात ‘अमानुषता विरुद्ध संवेदनशीलता’ असाच असतो. सावलीरामचे समतावादी सामाजिक संस्कार त्याला बुटोलिया कुटुंबातून मिळालेले नसतात, ते कुटुंबाबाहेरून त्याच्यात येतात. मात्र रक्तनदीत वाहून जाणाऱ्या बुटोलियांच्या सगळ्या बाया आणि सगळी माणसं रक्तनदीच्या उन्मादी प्रवाहात वाहताना आत्मभानालाच वंचित होतात.

चळवळ्या सावलीराम मात्र याला अपवाद आहे. तो आत्मभानात जगणारा माणूस आहे. सावलीरामचं लग्न अखेरीस होतं. घरच्यांचा तुंबळ विरोध मावळतो. पण आपली सून सनाढ्य नाही याची खंत स्वतःला खानदानी समजणाऱ्या बुटोलियांना शेवटपर्यंत आहे. या लग्नातले अनेक पेचप्रसंग कादंबरीला वाचनीय करतात. सगळ्यांचं सुख व हित बघणारा, पण ते पूर्ण करू न शकणारा हळव्या मनाचा, आदर्शवादी सावलीराम आणि त्याची आदर्शवादी तरीही व्यवहारी बायको राधा दोघंही कादंबरीतला मोठा अवकाश व्यापतात. सनाढ्यांचं हे जुनकट जग, तिथली हिंदीमिश्रित मराठी भाषा, तिथे राहणारे अहंकारी स्त्री-पुरुष, त्यांचा पोकळ अभिमान, आजी व आईचे अस्सल बोचरे शब्द, अण्णाचा तामसिक स्वभाव, दोन वहिन्यांचं अन्‌ सावलीरामचं नितळ नातं, तसेच सगळ्यात मोठ्या भावाचा समजूतदार स्वभाव मनाला भिडतो. ‘मोठं कुटुंब चालवणं म्हणजे मन मारून जगणं. मी माझं मन मारलं, म्हणून तू शिकू शकलास’, असं सावलीरामचा थोरला भाऊ त्याला सांगतो. त्याची व्यक्तिरेखा अण्णाच्या व्यक्तिरेखेपेक्षा निराळी, सात्त्विक अशी उतरली आहे.

कादंबरीतली आजी आणि आई म्हणजे मां- धोंडी या सावलीरामवर कधी जीव टाकणाऱ्या, तर कधी त्याला टोचून बोलणाऱ्या बाया खुमारी आणतात. वेळप्रसंगी हुकमी अश्रू ढाळणाऱ्या या सनाढ्यी बाया अत्यंत व्यवहारी आणि भावनातिरेकी अशा दोन्ही भूमिका लीलया पार पाडतात. त्यामुळे अनाहूतपणे विनोद निर्माण होतो. सावलीराम जेव्हा घरी येतो तेव्हा तो आपल्या आईला हांक घालतो : ‘मां री, मां रीऽ’. त्याला त्याची मां प्रतिसाद देते : ‘ओ री, ओ री’. हे फारच छान आहे.

कादंबरीतलं एकूणच जग मराठी वाचकाला अनोखं आहे. अनेक प्रसंगांची वर्णनं काव्यात्मक आहेत. विशेषतः सावलीराम जेव्हा राधाला मोटरसायकलवरून फिरवतो, तेव्हा तो मोटरसायकलशी जे हितगुज करतो ते लिरिकल आहे.

‘गाथा सप्तपदी’ वाचताना विक्रम सेठची ‘अ सूटेबल बॉय’ ही इंग्रजी कादंबरी आठवली. ती इंग्रजीतली ‘गाथा सप्तपदी’ आहे. भारतीय जणू काही लग्न करण्यासाठीच जन्माला येतात, त्याच्यासाठीच जगतात आणि त्यावरून एकमेकांना अतोनात त्रास व सुख देतात. मात्र विक्रम सेठची पात्रं मेट्रोमध्ये वाढलेली आधुनिक माणसं आहेत. त्यांचं सांस्कृतिक जग डॉ.राजेंद्र मलोसेंच्या सनाढ्य जगाच्या तुलनेत बऱ्यापैकी सपाट आहे. सनाढ्यांचं सांस्कृतिक विश्व हे अतर्क्य आहे. तिथे भेटणारी आरभाट  माणसं दांडगाई करणारी आहेत. बुटोलियांच्या घरात बायकांना घटकेत जिव्हाळ्याचे उमाळे येतात आणि क्षणात हिस्टेरियाचे ॲटॅक्स. त्यामुळे इथे भेटणारं हसू आणि हुकमी रडणं- दोन्ही खास सनाढ्यांची खासियत आहे. मात्र ‘परंपरा विरुद्ध आधुनिकता’ हा त्यात येणारा संघर्ष जोमदारपणे व्यक्त होतो.

भारतात या सांस्कृतिक संघर्षात कुठलाही एक पक्ष कधीही निर्विवाद जिंकत नसतो. ही मॅच कायम ड्रॉ होत असते. म्हणजे कधी परंपरा वरचढ ठरते, तर कधी आधुनिकता. त्यामुळे आधुनिकतावाद्यांना खूप दूरचा पल्ला गाठायचं आहे, हे जाणवतं. कादंबरी संपते तरी संवेदनशील सावलीरामचा संभ्रम संपत नाही. काय खरं आणि काय खोटं? मानवाला आणि मानवी समूहाला कायम छळणारा हा प्रश्न ‘गाथा सप्तपदी’त ध्रुपदासारखा भेटतो. ज्या चळवळीवर प्रेम करून डॉ.राजेंद्र आणि मेधा मलोसे यांनी ग्रामीण सेवेचा संकल्प सोडला, त्यात ते सुमारे चार दशकांनंतर बऱ्यापैकी समाधानी वाटतात. ‘‘इतर सेवाभावी संस्थांसारखं आम्ही आमची रजिस्टर्ड संस्था स्थापली नाही; मात्र आम्हाला जे-जे शक्य होतं- ते-ते आम्ही मन:पूर्वक करत आलो,’’ असं डॉ.राजेंद्र सांगतात. ‘‘स्वतःचं हॉस्पिटल असल्यामुळे आम्ही आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झालो आणि आमच्यातल्या सामाजिक प्रेरणांना स्मरून आम्ही जगू शकलो.’’ ‘‘मी दिवसभर पेशंट्‌सच्या गराड्यात असतो. त्यामुळे शांतपणे बसून लिहिण्याची चैन मला करता येत नाही. पेशंट्‌सना तपासताना, मधूनच थोडा वेळ मिळाला की मी लिहीत असतो. पेननेच कागदावर लिहितो. काँप्युटरवर कसं लिहायचं, हे मला माहीत नाही. तुकड्या-तुकड्याने मी कादंबऱ्या, कथा लिहितो. सार्वजनिक आरोग्याच्या पुस्तिका लिहितो आणि समाजसेवेतला माझा खारीचा वाटा उचलतो.’’ डॉक्टर राजेंद्र सांगतात.

खिडकीतून आकाशाकडे बघत प्रतिभेची वाट बघणारा लेखक कुठे आणि पेशंट्‌सच्या गर्दीत चार क्षण चोरून लिहिणारा हा कार्यकर्ता-कादंबरीकार कुठे! सेवेमुळे येणारी मनाची ऋजुताही मलोसे दांपत्यांची खरी ओळख आहे. ‘‘माझ्यासारख्या चळवळ्या, ओबडधोबड शैलीत लिहिणाऱ्या माणसाला लेखक करण्याचं सगळं श्रेय मी ‘देशमुख आणि कंपनी’ या प्रकाशकांना- विशेषतः डॉ.सुलोचना देशमुख आणि रवींद्र गोडबोले या दोघांना- देतो. या दोघांमुळेच मला लिहिण्याचा आत्मविश्वास मिळाला,’’ असं लेखक सांगतो. प्रकाशन हा व्यवसाय न मानता तिला चळवळ मानणाऱ्या ‘देशमुख आणि कंपनी’नेच मलोसेंच्या दोन कादंबऱ्या आणि ‘मोबाईल पुराण’, ‘अंघोळ पुराण’ आणि ‘नख पुराण’ या सामाजिक स्वास्थ्याच्या पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत.

काळानुरूप परिवर्तनवादी चळवळीतसुद्धा स्थित्यंतरं येऊ लागली आहेत. सामाजिक माध्यमांमुळे कुठल्याही एका माध्यमाची मक्तेदारी नष्ट झाली आहे. माणसं विविध भाषेत आणि विविध स्वरांत बोलू लागली आहेत. ती सहिष्णू, असहिष्णू, नैतिक, ननैतिक, अनैतिक आणि आत्मप्रेमी झाली आहेत, असं चौफेर नजर टाकल्यानंतर जाणवतं. सतत सेल्फी काढणारी ही टेक्नोसॅव्ही जनता आजच्या लेखकासमोर मोठं आव्हान आहे. एकविसाव्या शतकाअखेरचा माणूस कसा असेल? त्याची नवनैतिकता काय असेल? कुठल्या प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाची तो तरफदारी करेल? कुठली चळवळ आजपासून ऐंशी वर्षांनी फोफावेल? माणसं आज आहेत त्याहून अधिक आत्मप्रेमी होतील की समूहप्रेमी? या सर्व प्रश्नांची उत्तरं येता काळच देणार आहे.

मात्र डॉक्टर राजेंद्र मलोसेंने जो समाज बघितला, ज्याच्या सुख-दुःखात ते जसे मनःपूर्वक सामील झाले आणि तसं होताना त्यांनी स्वतःची सृजनाची प्रेरणा जशी तेवत ठेवली, ती अभिनंदनीय आहे. अशा या कार्यकर्त्या- कादंबरीकाराच्या कलाकृतींचं नव्याने पुनर्वाचन होणं गरजेचं आहे. संवेदनशील मराठी वाचक हे काम अगत्याने करतील, अशी आशा आहे.

Tags: विश्राम गुप्ते डॉ. राजेंद्र मलोसे स्वप्नपंख गाथा सप्तपदी राजेंद्र मलोसे विश्राम गुप्ते swapnapankh gatha saptapadi rajendra malose vishram gupte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात