डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माकडीचा माळ कादंबरी वाङ्‌मयातील वेरुळचे लेणे

‘माकडीचा माळ’ची सुरुवात लाघवी रसाळ शब्दरचनेमध्ये काटेरी वास्तव आणि भटक्यांच्या चाकोरीबाहेरच्या जीवनाचा कालस्वर पकडणारी आहे. नमनालाच ती मदहोश करते. मंत्रमुग्ध बनवते. भटक्यांच्या जगाचे, त्यांच्या फाटक्या गोधड्यांच्या उभ्याआडव्या चिंध्यांचे, आपसांतील संघर्षाचे, त्यांच्या माणसा-जनावरांवरील तसेच निसर्गराजीवरच्या वेड्या प्रीतीचे प्रत्ययकारी दर्शन घडवते. कादंबरीकार म्हणून इथे अण्णा भाऊंचे योगदान अपूर्व आहे. ते इतके हादरवून टाकणारेही आहे की, याआधी आणि त्यानंतरही भटक्यांच्या जीवनाचा असा सखोल धांडोळा घेणारी कादंबरी मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्येही निर्माण झाल्याचे दिसत नाही.

काळगावच्या अफाट फोंड्या माळावर सुगीला येऊन उतरलेली फिरस्त्या भिकाऱ्यांची अनेक पालं. एखाद्या महावृक्षावर पाखरांचा थवा उतरावा, तशी उतरलेली ती बारा वाटांची कुटुंबे.

या माळावर डवरी, डोंबारी, माकडवाले, दरवेशी, सापगारुडी, तुरेवाले, गोसावी, भानामतीवाले, नंदीबैलवाले, शिकलगार अशा भटक्यांच्या अनेक जाती येऊन उतरलेल्या. सुगीच्या आशेनं वर्षाची धान्यकमाई करायला आलेली ती वस्ती. साधारण 1969-70पर्यंत महाराष्ट्रातील कोणत्याही बऱ्या सुखवस्तू गावाच्या माळावर अशी अजब दुनिया उतरलेली दिसायची. ‘माकडीचा माळ’ या अभिजात कादंबरीतील शब्दकळा वाचताना तेव्हाची ती रंगवस्त्रांची, गोऱ्याचिट्ट्या बंजार-लमाणांची आणि काही ढेकळासारख्या काळ्या लोकांचीही गर्दी, त्यांची घोडी, गाढवे, कोंबड्या आणि डुकरांचा तो कलकलाट आणि वर्दळ मला अजून आठवते.

1980च्या दशकात दया पवार यांचे ‘बलुतं’, प्र. ई. सोनकांबळे यांचे ‘आठवणींचे पक्षी’ अशी अनेक सुंदर दलित आत्मचरित्रे मराठीत प्रकाशित झाली. पाठोपाठ लक्ष्मण माने यांचे ‘उपरा’ हे भेदक आणि अभिजात आत्मचरित्र आले. त्याच्या मागोमाग लक्ष्मण गायकवाडांचे ‘उचल्या’, पार्थ पोळके यांचे ‘आभरान’, शरणकुमार लिंबाळेंचे ‘अक्करमाशी’, किशोर शांताबाई काळेंचे ‘कोल्हाट्याचं पोर’ आदी आत्मचरित्रे आली अन्‌ मध्यम वर्गीयांच्या साचेबंद वाटेने जाणाऱ्या मराठी साहित्यविश्वात खळबळ उडाली.

मात्र याआधीच सतरा वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 1963मध्ये प्रकाशित झालेल्या अण्णा भाऊंच्या ‘माकडीचा माळ’ ह्या कादंबरीने भारतीय साहित्यात खऱ्या अर्थी उपऱ्या आणि फिरस्त्यांच्या जीवनाच्या गाभ्यालाच हात घातला होता. ही जबरदस्त कादंबरी केशवराव कोठावळ्यांनी आपल्या ‘मॅजेस्टिक प्रकाशन’तर्फे प्रकाशित केली होती. दीनानाथ दलालांच्या कुंचल्यातून एक सुंदर मुखपृष्ठही साकारले होते. पण दुर्दैवाने मराठी साहित्यशारदेचे ह्या अप्रतिम वाङ्‌मयीन कृतीकडे अद्यापिही लक्ष गेलेले नाही.

इरस्काईन काल्डवेल यांची ‘टोबॅको रोड’, एरिख मारिया रेमार्क यांची ‘ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ ही जर्मन कादंबरी, स्टाईनबेक यांची ‘द ग्रेप्स ऑफ राथ’, गुन्थुर ग्रास यांची ‘द टिन ड्रम’ अशा जागतिक पातळीवरील विविध भाषांमधील आणि विभिन्न काळांमध्ये प्रकाशित झालेल्या गेल्या शतकातील काही अव्वल कादंबऱ्या, ज्या आगळ्या विषयाने आणि कादंबरीकारांच्या अपूर्व प्रतिभेमुळे अक्षर वाङ्‌मयाची शिखरे ठरल्या. त्या परंपरेतच अण्णा भाऊंची ‘माकडीचा माळ’ ही कादंबरी म्हणजे वाङ्‌मयातील ‘वेरुळचे लेणे’ आहे, हे मी पुरेशा जबाबदारीने सांगतो.

‘माकडीचा माळ’ची सुरुवात लाघवी रसाळ शब्दरचनेमध्ये काटेरी वास्तव आणि भटक्यांच्या चाकोरीबाहेरच्या जीवनाचा कालस्वर पकडणारी आहे. नमनालाच ती मदहोश करते. मंत्रमुग्ध बनवते. भटक्यांच्या जगाचे, त्यांच्या फाटक्या गोधड्यांच्या उभ्याआडव्या चिंध्यांचे, आपसांतील संघर्षाचे, त्यांच्या माणसा-जनावरांवरील तसेच निसर्गराजीवरच्या वेड्या प्रीतीचे प्रत्ययकारी दर्शन घडवते. कादंबरीकार म्हणून इथे अण्णा भाऊंचे योगदान अपूर्व आहे. ते इतके हादरवून टाकणारेही आहे की, याआधी आणि त्यानंतरही भटक्यांच्या जीवनाचा असा सखोल धांडोळा घेणारी कादंबरी मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्येही निर्माण झाल्याचे दिसत नाही.

उडिया भाषेतील गोपीनाथ महंती आणि कान्हुचरण महंती या बंधूंनी भटक्या आणि आदिवासी जीवनाचे पीळ आपल्या कथाकादंबऱ्यांतून मांडले आहेत. विशेषत: गोपीनाथ बाबूंची ‘परजा’, ‘माटीमटाल’ आणि कान्हुबाबूंची ‘शिक्षा’ ह्या कादंबऱ्या मी इंग्रजी आणि हिंदी भाषांतरातून वाचल्या आहेत. ‘परजा’च्या बिक्रम दास यांनी इंग्रजीत केलेल्या सुंदर भाषांतरावर भारावून ग्रंथालीच्या ‘रुची’ मासिकात पंचवीस वर्षांमागे मी एक लेखही लिहिला हेाता. अलीकडच्या ‘माकडीच्या माळ’च्या पुनर्वाचनानंतर मी गोपीनाथ बाबूंची ‘परजा’ पुन्हा एकदा डोळ्यांखाली घातली.

ओरिसाच्या कातापुरा जंगलपट्ट्यातील ‘परजा’ या आदिवासी जमातीच्या जीवनाचा लेखाजोखा मांडणारी ‘परजा’ ही कादंबरी. ती ‘माकडीच्या माळ’आधी 1948मध्ये प्रकाशित झाली. वर्षानुवर्षे आदिवासींना आपल्या दुष्ट जाळ्यात अडकविणारी व आपोआप कास्तकारांना सावकारांचे वेठबिगार बनवणारी तिथली नादान अर्थव्यवस्था हा ‘परजा’ या कादंबरीचा विषय आहे. तिचा नायक सुक्रू व त्याची माडीया व टिकरी ही मुले स्वत:च्याच जमिनीच्या तुकड्यावर सावकाराचे गुलाम म्हणून राबतात. त्याची गोड पोर जिल्ली हिच्यावर दुर्दैवाने अशी आफत येते की, तिला त्याच सावकाराची रखेल बनून त्याची सेज सजविण्याचे लाचार जिणे जगावे लागते. याच दरम्यान मल्याळम भाषेत ताकझी शिवशंकर पिल्ले यांची ‘चेमिन’ तथा ‘मछुवारे’ नावाची कादंबरीही 1958मध्ये प्रकाशित झाली. समुद्र आणि त्यावर जगणारे कोळी या विषयावरची ही कादंबरी. तिचाही वेगळ्या संदर्भाने इथे विचार करावा लागेल.

त्या दीड-दोन दशकांत राष्ट्रीय स्तरावरच्या कथावाङ्‌मयाचा विचार करता ‘माकडीचा माळ’सारखा भटक्यांचा असा भन्नाट पेरा भारतीय वाङ्‌मयात अन्यत्र आढळत नाही. जंगलझाडीच्या अंगाखांद्यावर वाढणाऱ्या लेकरांच्या कहाण्या अन्य भाषांत त्यादरम्यान लिहिल्या गेल्या नाहीत, असेही नाही. मात्र संबंधित लेखकवर्गाला आपला प्रचारकी थाट फारसा लपवता आला नाही. त्या पार्श्वभूमीवर मला अण्णांचे निखळ वाङ्‌मयीन यश खूप मोठे वाटते.

...तर काळगावच्या त्या फोंड्या माळावर उतरलेल्या त्या भटक्या जमाती. एकदुसऱ्याशी फटकून वागणाऱ्या. त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा वेगळ्या, देवदैवते वेगळी आणि पालांच्या समोर उभारलेल्या धार्मिक पताकाही वेगळ्या रंगांच्या होत्या. पण सुगीची गरज, म्हणजेच पोटाची ओढ हाच त्यांना त्या माळावर एकोप्याने बांधणारा खरा देव होता.

हे भटके जीव आपापल्या जित्राबांसह एकमेकांना या सुगीपासून ते त्या सुगीपर्यंत वर्षभराच्या अंतराने भेटतात. अगत्याने एकदुसऱ्याला कडकडून मिठ्या मारतात. त्यामध्ये यंकू माकडवाला, सैदू दरवेशी (म्हणजे अस्वलवाला), सक्या माकडवाला, परबती डवरी, बाळ्या डोंबारी अशी अनेक अनुभवी खोडं आहेत. अलीकडेच यंकूच्या फाटक्या संसाराला गाठी मारणारी त्याची बायको मेलेली होती. त्याच्यासोबत बिनाआईची देखणी, कांडेदार दिसणारी दुर्गा नावाची अकरा वर्षांची पोर आहे. तिची सर्वांना कीव येते.

यंक्याकडे गंग्या नावाचे माकड आहे. त्याच्या जिवावरच यंक्याचे पोटपाणी पिकते. छोट्या मापट्याएवढे दिसणारे ते माकड चांगले माणसाळलेले आहे. इकडून तिकडे उड्या मारते. दुर्गाच्या झिपरीतल्या उवा वेचून खाते. एकूणच अनेक फिरस्त्यांच्या आगमनाने त्या माळाचे पांग फिटल्यासारखे झाले आहेत. त्या जिद्दी रानपाखरांचे, त्यांच्या वाट्याला आलेल्या दु:खभोगाचे, सुखाचे आणि विवंचनांचे, मातीशी आणि जंगलझाडांशी असणाऱ्या त्यांच्या गोड नात्याचे असे टवटवीत, ताजे, चित्रमय आणि मदहोश करून सोडणारे चित्रण अण्णा भाऊ असे करतात की, ते फक्त त्यांच्याच शब्दांत वाचत राहायचा मोह होतो.

‘श्रावणात चमत्कार घडला. मळीला नवा रंग आला. हिरवा मुलामा चढला. ती सुखाचे नि:श्वास टाकू लागली. शिवार बहरला. पिकं डोलू लागली. गिरक्या घेऊ लागली. जागोजाग भाजी पिकली. मुबलक भाजी, भरपूर पाणी, सर्पण यामुळे माळावरचे भिकारी सुखी झाले. उभी पिकं पाहून देवाला हात जोडू लागले. लोकांची पिकं, लोकांचा शिवारपण त्यांना आनंद होता. जग सुखी, तर आपण सुखी असा त्यांचा व्यापक जिव्हाळा होता. भाद्रपदात पावसानं हात आखडला. मातीत मोती पिकवून तो निघून गेला. भिकाऱ्यांना आनंद झाला, ते सर्व नव्या जोमानं उद्योगाला लागले. डवरी, डोंबारी, दरवेशी, सापगारुडी, तुरेवाले, भानामतीवाले, गोसावी, फासेपारधी, नंदीवाले, माकडवाले एकूणएक तयार झाले. डवरी येऊन डवर घालू लागले. यंकू आपल्या गंग्या माकडाला घेऊन दारोदार हिंडू लागला. सैदू दरवेशी आपलं अस्वल खेळवू लागला नि ‘अस्वलापेक्षा दरवेशाचा दंगा मोठा’ ही म्हण सार्थ करू लागला. बाळ्या डोंबारी आपल्या तरुण पोरींचा तांडा घेऊन तमाशाचा फड पाडीत होता. सापवाले साप खेळवीत होते. भानामतीवाले भानामतीचा चमत्कार दाखवून लोकांना दिपवीत होते. माकडवाल्यांनी आपली पोटं माकडावर लादली होती. रावणाची लंका जाळणारा तो प्राणी त्यांच्या हुकुमात होता. नाच म्हणेल तसा नाचत होता, नि शेतकऱ्यांपुढं डोकं टेकून भीक मागत होता.

‘यंकू अंगानं, बळानं मोठा होता. रुंद चेहरा, रुंद गर्दन, भरपूर पिळदार मिश्या, अंगात गोल पैरण, डोकीला भलंमोठं पागोटं, हातात लांबलचक काठी नि खांद्यावर गंग्या माकड असा त्याचा थाट होता.

‘सैदू दरवेशी भयंकर गांजा ओढणारा म्हणून प्रख्यात होता. बंदुकीत गोळी भरून हिंडावं, तसा तो चिलमीत गांजा भरून हिंडत असे. त्यानं गुलछबू मिश्या राखल्या होत्या. सिंहाच्या आयाळीसारखी दाढी वाढवली होती. भुवया रेखीव नि दाट होत्या. रोज दारादारांपुढं अस्वलाशी कुस्ती खेळून त्याचा देह पीळदार झाला होता. त्याच्या आवाजात पोलादाचा नाद निघत होता. तो तापट होता. सर्व भिकारी त्याला वचकत होते.

‘बाळ्या डोंबारी हा रंगेल माणूस होता. त्याचं पोट किंचित पुढं आलं होतं. देह दबदबीत झाला होता. रंग काळा होता. पण चेहरा पाणीदार होता. त्यानं कपाळावर भरपूर टाळू राखली होती. कमरेला करगोटा, त्याला लंगोटी, डोकीला लहरी पटका असा त्याचा वेश होता.

‘पर्बती डवरी हा नावाप्रमाणे पर्वतासारखा होता. पण लोक त्याला पाऱ्या म्हणत. त्या कंगाल वस्तीत तो कुबेर समजला जात होता. तो भलताच रागीट होता. त्यात तो रोज दारू पीत असे. त्यामुळे त्याचं नाव काढणं पाप झालं होतं. त्यानं पाच शिकारी कुत्री पाळली होती. नाबदा नि आबदा या त्याच्या दोन बायका खडं-मोती, कुंकू, मेण, काळी पोत यांचा व्यापार करीत. पाऱ्या घरात दारूची भट्टी लावी. पहिल्या धारेची दारू पोटभर पिऊन तो दिवसभर आडवा पडलेला असे. त्याच्या चार देखण्या तरुण लेकी दारूचे डबे गावोगाव पोहोचवून पैसा गोळा करीत. दूरदूरचे दारू पिणारे लोक पाऱ्याच्या घरी येत नि दारू पिऊन जात.

‘अशी ती माणसं त्या माळावर जगत होती. जगण्याविषयी त्यांना अपार प्रेम होतं. जगात त्यांच्या मालकीचं काहीही नव्हतं. पण सृष्टीवर त्यांचंच प्रेम होतं. सर्व दिशांनी लोक येत. तिथे येऊन ती माणसं त्या वैराण माळावर नांदत होती.

‘त्या गर्द झाडीत चोर, खुनी, दरोडेखोर यांचा बारा महिने तळ पडलेला असे. ते चोर रात्री खेडी लुटीत, खून पाडीत, बायका पळवीत नि त्या माळावरच्या जंगलात उडी मारीत. आज काय, तर त्या माळावर खून पडला! कुणाची लेक पळवली! कुणाचा तरी हाडांचा सापळा पडला आहे! अशा रोज भुमका उठत. काळगावची बायकापोरं भयभीत होत. चारआठ दिवसांनी त्या माळावर काहीतरी भयंकर नि विपरीत प्रकार नक्कीच होत असे. म्हणूनच लोक त्या माळाला ‘भुताचा माळ’ म्हणत.

‘असं ते अवघं चराचर एकदुसऱ्याशी एकरूप झालंय. माणसांशी एकजीव होणारी माकडं आणि माकडांच्या प्रीतीमध्ये अडकलेली माणसं. जशी शेतकऱ्यासाठी दुभती गाय महत्त्वाची, तसा गारुड्याला आपला साप प्राणप्रिय. कारण त्याच्याच बळावर तो आपल्या संसाराचं गाडं पुढे हाकारीत असतो.’

ती प्रत्ययकारी वर्णने वाचताना अण्णा भाऊ साठेंच्या भाषेचा, त्या रंगारूपाचा सुगंधित दवणाच जसा काही घमघमाट करत सुटलाय. केवड्याची कणसे फुटून त्याच्या दरवळाची पखरणच होते आहे.

‘दिवस मावळत होता. त्याची सोनेरी किरणं धरणीला कुरवाळीत होती. थंड वारा धावत होता. माळावरची पालं डगमगत होती. निरनिराळ्या देवस्थानांपुढील फरारे फडफडत होते.

‘माणसं परतत होती. सर्व दिशांनी लोक येत होते. कित्येक भीक मागून येत होते, तर कित्येक शिकार करून येत होते. ससा, मुंगूस, कोल्हे, मांजर, वानर; जे मिळेल, ते मारून त्यांनी आज पोटभर जेवणाचा विचार केला होता. आपापल्या माणसांना ओळखून कुत्री नाचत होती. काही भुंकत होती. पोरं चेकाळली होती. मध्येच एखादं गाढव भुंकून माळ डोकीवर घेत होतं. सर्वत्र आनंदी वातावरण खेळत होतं.

‘बाळ्या डोंबारी डोकीचा पटका मागं सरकावून नि आपल्या प्रचंड तंगडीखाली ढोलकं धरून डोळे झाकून बडवीत होता.

‘पाऱ्या दारू पिऊन बडबडत होता. पोरींना शिव्या देत होता. त्याच्या पोरी दारू विकून गोळा केलेला पैसा मोजत होत्या.

‘सैदूनं आज लांडोर मारून आणला होता. त्याचं कडान लवकर कर, म्हणून त्यानं आपली बायको सकिना हिच्या मागे तगादा लावला होता. तो गांज्याचा झुरका मारीत एकसारखा चुलीकडे पाहत होता.

‘यंकूच्या पालापुढं दुर्गा उभी होती. ती बापाची वाट पाहत होती. रसरशीत नाकातोंडाची दुर्गा आज भलतीच उदास झाली होती.

‘थोड्या वेळानं यंकू आला. त्याच्या खांद्यावर गंग्या ऐटीत बसला होता. बापाला पाहताच दुर्गाला आनंद झाला. ती धावली नि यंकूला बिलगली. यंकूनं गंग्याला खाली ठेवून दुर्गाला खांद्यावर घेतली. पण ते गंग्याला खपलं नाही. तो चटकन उडी मारून दुर्गाच्या खांद्यावर बसला. खांद्यावर दुर्गा नि तिच्या खांद्यावर गंग्या अशी उतरंड घेऊन यंकू पालाकडे चालू लागला. ते पाहून बाळ्या ढोलकं बाजूला सारून घोडं खिंकाळावं, तसा भयंकर हसला.

‘यंकूनं झोळी पसरली. पाण्याचा तांब्या भरून घेतला. दुर्गाला पुढ्यात घेऊन भाकरी खाऊ लागला. अनेक घरची भाकरी, अनेक घरची चटणी, लोणची, निरनिराळं कोरड्यास, खरडा, घोलाणा - असे एक एक पदार्थ दुर्गा मिटक्या मारीत खाऊ लागली. यंकूनं दिलेली भाकरी गंग्यानं एकदम तोबऱ्यात भरून तो ती हळूहळू काढून चावून खाऊ लागला.

‘इतक्यात हिकम्या गारुड्याचा नवा नाग पेटाऱ्यातून पळाला. हिकम्याची पोरगी ओरडली, ‘बापा, साप गेला’ - हिकम्या उठला नि सापामागं धावू लागला. पण ते जनावर सापडलं नाही.

‘तो नाग सरळ यंकूच्या पालात शिरला. तशी दुर्गा किंचाळली, ‘साप, बापा-’

‘गंग्यानं बिचकून उडी मारली आणि यंकूनं काठीच्या एकाच दणक्यात तो साप मारला. इतक्यात सापाचा पाठलाग करीत हिकम्या गारुडी तेथे येऊन पोहोचला. आपला साप मारलेला पाहून तो खवळला. त्यानं जोरदार बोंब ठोकली, ‘पळा, पळा, साप मारला!’ कोणीतरी दुधाची गाय मारावी, तसा त्यानं टाहो फोडला, ‘गारुड्यांनो हो पळा, माझा देवासारखा नाग ह्या माकडवाल्यानं ठार मारला. आता मी काय करू?’

‘तसे गारुडी चिडून उठले. काठ्या घेऊन यंकूच्या पालाकडे धावत निघाले.’

त्या समूहाचं अवघं जगणं, मरणं यांच्याशी अण्णांसारखा जातीचा कलावंत खूप एकजीव झालेला आहे. त्या भटक्यांच्या जीवनाचा लसावीच जसा काही त्यांनी काढून दिला आहे. ते लिहितात की, सूर्योदय झाला की, माळावरच्या त्या वस्तीला भूक आणि शिकार एवढ्याच गोष्टी माहीत आहेत. शिकार करून सांजेला ‘खारटवणी’ (एखाद्या मांसमटणाचा पातळ नमकीला, भुळका रस्सा)आणायचं. तिथल्या प्रत्येकाची आपल्या पाळीव पशुपक्ष्यांवर अपार माया आहे. त्यामुळे दारू पिऊन झिंगलेला पाऱ्या डवरी आपल्या कुत्र्याचं गुणगान गातो, ‘‘हा कुत्रं नव्हं, माझा वाघ हाय.’’ त्यांच्या आपसांतल्या लढाया आणि चढाया बेभान आणि बेलगाम आहेत. त्यामुळेच दारुड्या पाऱ्याला यंकू माकडवाला ‘हुरडा चोपावा तसा चोपत होता. खाली पडलेला पाऱ्या माशासारखा तडफडत होता.’

माळावरच्या भटक्यांचं आणि भिकाऱ्यांच्यां भांडणाचं खाटलं गावच्या चावडीवर जातं. त्यांची आपसांतली ‘झगाझगी’ बघून गावचा नाथा पाटील वैतागतो. त्याच्याकडे हिकम्या गारुडी तक्रार करतो, ‘‘ह्या यंक्यानं माझा साप मारला. आता मी उपाशी मरतोय, काय खाऊ?’’ तर पाऱ्या डवरी गळा काढत गाऱ्हाणं घालतो, ‘‘माझा कुत्रा देवावानी हुता.’’ त्यांच्या आपसांत पेटणाऱ्या वैराची आगही तशीच कमालीची दाहक असते. पाऱ्या डवरी यंकू माकडवाल्याला सरळ धमकीच देऊन टाकतो, ‘‘बेटा, हुशार अस. एक दिवस मी तुझी खांडोळी करंन. मी तुझी पोरगी पळवीन, तिला मुंबईला नेऊन विकीन, कसबीण करीन.’’

पाच कुत्र्यांचा मालक पाऱ्या डवरी तसा होताच पाताळयंत्री स्वभावाचा. पूर्ण उफराटा मनुष्य. त्याच्याकडं अक्कल, काळीज आणि माणुसकी ह्या तिन्ही गोष्टींपैकी काहीच नव्हतं.

भिकारी येता येता वाटेश्वराच्या बागेत शिरून एक मोठा वानर मारतात. तो शिजवून हडप करतात. त्यांच्याकडून महापाप घडलं म्हणून पाटलाकडे तक्रार जाते. त्यांना अट्टल गुन्हेगारासारखं पाटलासमोर एका ओळीत उभं केलं जातं. पाटील विचारतो, ‘‘मारुती रामाचा कोण?’’

‘‘वानर मारुतीचा अवतार, सरकार.’’ म्हातारा गोसावी पडक्या आवाजात उत्तर देतो.

‘‘मग त्या मारुतीला कापून खाणारी तुम्ही माणसं की रावणाची औलाद?’’

‘‘वानेर खायचा आम्हांस्नी रामानंच वर दिलंय, सरकार.’’

‘‘मारुती कापून खा सांगणारा तो राम कुठंय?’’ पाटील विचारतो.

त्यावर तो थरथरत्या हाडांचा म्हातारा गोसावी पोटावर हात मारून म्हणतो, ‘‘वानेर खा म्हणून वर देणारा आमचा राम म्हन्जी आमचं हे पोट. ते भरत नाय म्हणून तर गुन्हा घडतो, सरकार.’’

पोटाच्या परमेश्वरासाठी पापाची पूजा बांधणाऱ्या माणसांचे हे जळजळीत जग. त्याचे वास्तव अण्णा भाऊ केवळ माणुसकीच्या गहिवराने सांगतात.

‘‘रानामाळात वानर, मुंगूस, किडूकमिडूक, शेकोटीवर भाजलेले चवदार रानउंदीर खाऊन पोटाची खळगी भरणारी ही भटकी लेकरं. रानवाऱ्यात पालाच्या आडोशाला त्यांना सुखाची झोप लागते असे नाही. त्या गार वाऱ्यात आणि अंधारलेल्या दऱ्यात झोपल्याझोपल्या ते सारे पालात चाळवतात. कण्हतात. बरळतात. उद्या कसली भीक मागायची, या चिंतेनं झोपेतच कळवळतात.

‘त्यांच्या त्या उपाशी पोटांची तडफड बघून निसर्गाच्याही काळजात कळ उठते. त्या बिचाऱ्यांचे दु:खाचे कढ बघून आभाळ काळवंडून जातं. चांदण्या मलिन होतात. वेताळाच्या देवस्थानाजवळच्या वटवृक्षावर घुबडं घुमत राहतात.’

या इथल्या रानाबद्दल, झाडांच्या पानाबद्दल, पशुपक्ष्यांसह सामान्य भटक्या जिवांच्या दैनेबद्दल अण्णा भाऊ नावाच्या महान शब्दकर्त्याचे हृदय कणवेने आणि कारुण्याने भरून गेले आहे. झाडाच्या फांदीवरून नुकतेच काढलेले मधाचे पोळे मधुरसाने ठिपकत राहते, तसे ह्या अभिजात आणि अभूतपूर्व कादंबरीचे लेखन करताना अण्णा भाऊंसारखा लेखक अखंड गहिवरून गेलेला जाणवतो.

‘त्याच वस्तीच्या पल्याड झुडपाजवळ बाळ्या डोंबाऱ्याचं मेलेलं गाढव पडलं होतं. त्याचं दडदडीत चामडं कावळ्यांच्या चोचींना तुटत नव्हतं.’ इथे अण्णा भाऊ भटक्यांच्या भेदक वास्तवदर्शनाच्या बळावर आणि आपल्या असामान्य लेखनसामर्थ्यावर असा एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा करतात, तशा अव्वल बाजाचे धन जागतिक वाङ्‌मयात शोधणे कठीण जावे. ‘त्या मेलेल्या गाढवाचे लचके तोडायच्या ओढीनं दहाबारा गिधाडं गोळा झालीत. परंतु ती त्या मुडद्यापासून फटकूनच बाजूला उभी आहेत. वरचेवर ती आभाळाकडे बघत होती. मध्येच पंख झटकून साफसूप करत चीत्कारत होती.’ अण्णा मांडतात ती माणसांची नव्हे, तर दुष्ट गिधाडांची दुनियासुद्धा आपले रूढी-संकेत पाळणारी होती.

‘ती गिधाडं कोणाचीतरी आतुरतेनं वाट बघत होती. त्याच वेळी त्या मृत गाढवाच्या शेपटीखाली भिकाऱ्यांच्या पोरांनी फास टाकला आहे. तो पेरून ती सारी गुमान बाजूने दबून बसली आहेत. जशी मधपोळ्यामध्ये मानापानाची राणीमाशी असते, तसा गिधाडांच्याही दुनियेत त्यांचा ‘राजगीध’ नावाचा राजा असतो. मेल्या जनावराच्या मांसावर पहिली चोच मारायचा सन्मान त्यालाच असतो.’ निसर्गाच्याही नसेवर बोट ठेवणारी अण्णा भाऊंची लेखणी त्या गिधाडांच्या राजाच्या आगमनाची आणि त्याची शिकार करण्यासाठी भिकाऱ्याच्या पोरांनी लावलेल्या फासक्याचे कसे सुंदर आणि अतुलनीय वर्णन करते, हे त्यांच्याच शब्दांतून वाचायला हवे.

‘एक काळा ठिपका अतिवेगानं जमिनीकडे येत होता. त्याची गती सारखी वाढत होती नि त्याचबरोबर त्याचा आकारही वाढत होता. तो डाग तीरासारखा खाली येत होता. त्याला पाहून ती पोरं सारखी मुरत होती, दडत होती. हरखली होती, हसत होती. त्यांना आनंद झाला होता. ती एकमेकांना डिवचत होती.

‘तो डाग क्षणाक्षणानं खाली येत होता, तसतसा त्याचा आकारही वाढत होता. आकाशातून दगड फेकावा, तसा तो धरणीकडे येत होता. हा काय प्रकार आहे, या विचारानं नाथा पाटील आतुर झाला. त्यानं पागोटं काढून काखेत घेतलं नि आ वासून तो आकाशात पाहत राहिला.

‘थोड्या वेळानं करकराट ऐकू येऊ लागला. आणि मग एक प्रचंड गिधाड त्या गाढवाजवळ येऊन उतरलं. आपले पंख अंगाशी आवळून ते खाली येताच कावळे पंख पसरून दूर पळाले. गिधाडांनी त्याला नमस्कार केला. मग तो गीध डुलत डुलत पुढं गेला. त्यानं गाढवाला पाहून घेतलं. तो रक्तासारखा लाल दिसत होता. त्याच्या खांद्यापासून त्याला पंख नव्हते. तो एखाद्या जाकीट चढविलेल्या श्रीमंतासारखा दिसत होता. तो नाचत नाचत पुढं गेला. त्यानं ते गाढव निरखून पाहिलं आणि एक ललकार ठोकली. त्याबरोबर इतर गिधाडांना आनंद झाला. त्यांनी पंखांची फडफड करून आपला आनंद व्यक्त केला.

‘मग तो नवा ‘राजगीध’ पुढं सरकला. त्यानं चौफेर नजर फिरवली. गाढवाच्या मागे जाऊन त्यानं पुन्हा सर्वत्र पाहिलं आणि गपकन गाढवाच्या शेपटाखाली आपली पल्लेदार चोच खुपसली. तो खांद्यापर्यंत गाढवात शिरला. पुन्हा परत मागे सरकला. तसे इतर गीध पुढं झाले. पण त्याच वेळी तो लाल रंगाचा राजगीध संकटात सापडला. त्याची मान बाहेर येताना पोरांनी लावलेल्या फासात पूर्ण अडकली होती. त्या गिधाडानं जोराचा हिसका दिला. परंतु त्याची मान फासात अधिकच गुंतली. तसा तो प्रचंड राजगीध धडपडू लागला. केविलवाणा चीत्कारू लागला.

‘त्यासरशी ती पोरं धावली. त्यांनी काठीनं त्या राजगीधाचा चुराडा केला. बघता बघता त्याला झोडपून ठार केला, नि ती त्याचा मृतदेह घेऊन हसत-खिदळत ओढ्यात उतरून माळाकडे पळाली.’

माणसांच्या दुनियेतल्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या राजापेक्षा गिधाडांच्या दिमाखदार राजेश्वराचे थाटदार वर्णन अण्णा भाऊ किती बहारीने करतात. त्याहीपेक्षा गाढवाच्या शेपटाकडून त्याच्या पोटात शिरायचे, अशा तऱ्हेनं त्याच्या काळजाच्या गोड तुकड्यापर्यंत पोहोचणाऱ्या अण्णांच्या ह्या अलौकिक लेखनसामर्थ्याला काय म्हणावे?

त्या वस्तीतला पाऱ्या डवरी हा कडू कारल्यासारखा एक खलपुरुष. स्वत:ला चांगले काही जमत नाही आणि दुसऱ्याचे पाहवत नाही, अशा जाती-प्रवृत्तीचा एक शूद्र जीव. परंतु त्याचं वाईटपण व्यंकू माकडवाला बरोबर ओळखून आहे. आपली कोवळी पोर सोबत घेऊन फिरताना तो जसा काही काळजात टोकदार सुई घेऊनच जगतोय.

‘डोक्याची घोटून हजामत केलेल्या गुलब्याच्या जावयाच्या डोक्यावर चंद्राचा प्रकाश चमकतो, तेव्हा त्या मस्तकाचे रूप उन्हात चमचमणाऱ्या तांब्याच्या लोट्यासारखे दिसते. जेव्हा पूर्वेकडून चंद्र वर सरकतो, तेव्हा अंधार वितळतो. माळ उजळतो. पालांना आकार मिळतो.’ ह्या कादंबरीत आपल्या काव्यात्म भाषेच्या हळुवार कुंचल्याने अण्णा भाऊ इथला निसर्ग मूर्तिमंत रूपात जागा करतात. मात्र ते काव्य वास्तवाचे अंगार विझू देत नाही. उलट रानातल्या वृक्षांची गाठीची जुनी खोडे दीर्घ काळ जळत राहावीत, तसेच ह्या माणसांचे भगभगीत जगणे आणि भोगणेही लेखक मांडत राहतो.

‘‘आपली दुर्गा नावाची जवान पोर म्हणजे, ‘ही तलवार मानेवर घेऊन ह्या माळावर मी किती दिवस ऱ्हावू?’’ ही यंकू माकडवाल्याची जटिल समस्या आहे. पाऱ्या डवऱ्यासारख्या हलकटांशी दुश्मनी घेऊन पाल आणि पोर सांभाळणे त्याच्यासाठी मुश्कील आहे. आधी बायको मेली. त्यानंतर दारिद्र्यामुळे त्याने त्याची कामधेनू असणारी दोन्ही गाढवे विकून खाल्ली. त्या अडचणीत बाळ्या डोंबारी त्याला आपले एक गाढव उधारीवर देतो, तेव्हा कुठे जगायच्या अभिलाषेने त्याचा श्वास मोकळा होतो.

तो उलट्या खोपडीचा पाऱ्यासुद्धा दैवगतीच्या तडाख्यातून सुटलेला नाही. यंकूची पोर पळवून त्याचा जन्माचा काटा काढावा, ही त्याची दुष्ट बुद्धी. त्यासाठी तो गल्या-बल्यासारख्या दरोडेखोरांना आमंत्रण देतो. अंधाराचा फायदा घेऊन मोठ्या मुश्किलीने यंकू तेथून सटकतो. गल्या-बल्या पाऱ्याच्या पालावरच्या चार कोंबड्या आणि दारू चापून झाल्यावर त्याच्या तरुण पोरींना उचलतात. आडव्या येणाऱ्या पाऱ्याला चिडून शस्त्राने लंगडे करतात.

उधारीने मिळविलेल्या त्या गाढवाच्या पाठीवर आपल्या दुर्गा नावाच्या पोरीला आणि गंग्या नावाच्या माकडाला लादून यंकूचा या माळावरून त्या माळावर प्रवास सुरू आहे. ‘पाठीमागे सकाळ, डोकीवर दुपार आणि पुढे संध्याकाळ घेऊन’ यंकूची दौड सुरूच राहते.

मध्ये सात वर्षं लोटतात. यंकूची अकरा वर्षांची दुर्गा सतरा वर्षांची होते. तिच्या तारुण्याचं बहारदार वर्णन करताना अण्णा भाऊंची लेखणी कळसच गाठते. वर्णनाची सुरुवात रुटीन, मळल्या बाजारू वाटेने सुरू होते. ‘परंतु एखादा वाटसरू अचानक पायवाट सोडून बांधापलीकडे आत सुगंधी फुलांच्या मळ्यात उडी घेतो. त्या घमघमलेल्या बनात स्वत: पाखरासारखा हरवून जातो.’ अशा शब्दकळेची अण्णा भाऊ लूट करतात.

‘दुर्गा अठराव्या वर्षात दाखल झाली. तिचा चेहरा रसरसू लागला. छाती रुंदावली. उरोजाची उंची वाढली. टपोऱ्या डोळ्यांत नवं तेज तरळू लागलं. नजरेत तरलता आली. रंगानं गव्हाळी, रूपानं आगळी दुर्गा जुन्या नि फाटक्या वस्त्रातही अप्रतिम दिसू लागली. अंगावरच्या थिट्या कापडात तिची काया मावेनाशी झाली. तिच्या प्रत्येक हालचालीतून मोहकता ओसंडू लागली. ती धनुष्याच्या कमानीसारखी लवू लागली. ती हसली की रुपयांची ओंजळ खडकावर ओतल्याचा भास होऊ लागला. ती बोलली की सारंगीच्या तारा छेडल्याचा साक्षात्कार होऊ लागला. फुटक्या, पारा उडालेल्या आरशात आपला सुंदर चेहरा पाहून ती स्वत:वर संतुष्ट होत होती. तिला स्वत:च्या देखणेपणाबद्दल अभिमान वाटू लागला.’ अशा वर्णनांच्या तारा लेखक छेडतात.

‘यंकूसोबत गाढवावर बसून फिरणारी ती उफाड्याची दुर्गा नावाची पोर. ती आणि तिचा दिमाख वाटसरूंच्याही नजरेत भरतो. यंकूच्या त्या लेकीला त्याची बायकोच समजून वाटेत भेटलेली एक म्हातारी त्याची काटेरी शब्दांत पूजा मांडते. ‘‘माणसानं साजेल ते ल्यावं नि पचेल ते खावं. पण तुला तेच उमजलं न्हाय. त्वां ही एवढी देखणी, इतकी तरणी बायकु करून चूक केलीस. आरं बाबा, हत्ती काबुत ऱ्हातो, पण तरणी बायकु हातीपरास वंगाळ. ही बायकु तुला झेपणार नाय.’’ तेव्हा दुर्गाच त्या आजीबाईला तो आपला नवरा नसून बाप असल्याचं हसत सांगते.

गाढवावर दुर्गा, तिला मागे चिकटून धरणारं गंग्या माकड आणि गंग्याच्या पाठीला घट्ट बिलगून बसणारी त्याची रंगी माकडीन असा यंकूच्या लटांबराचा प्रवास सुरूच आहे. सात वर्षांच्या दीर्घ काळानंतर त्याच भागात यंकू परततो. तो जंगलरानातली नदी ओलांडत असतो, तेव्हा त्याला पाऱ्या डवऱ्याचं बिऱ्हाड पुन्हा भेटतं. गल्या-बल्यानं पाय तोडल्यानं पाऱ्या कुबड्यांच्या आधारानं चालतोय. मात्र त्याचा वैराचा पीळ त्यानं जराही कमी होऊ दिलेला नाही. त्यामुळेच ‘मुंगीलाही मुताचा पूर चढतो,’ अशी विखारी भाषा त्याच्या जिभेवर खेळते.

‘ती भरली नदी नावेतून पार करताना काठावरची तारुण्याने भरलेली दुर्गा त्याला दिसते, तेव्हा त्याच्या बेताल जिभेला काटे फुटतात. तो सटकतो, ‘‘चांगलं सणंग निपजलं. नुसता एैना. ह्या नगाला अजून काटा टोचला नसावा.’’ पाऱ्याच्या त्या पुनर्भेटीनं मात्र यंकू हादरून जातो. पाऱ्या आपल्या भोवतीनं आता वणवा पेटवणार, याची त्याला खात्रीच होते.

‘त्या राधानगरीच्या जंगल परिसरातल्या विलासराव नावाच्या इनामदाराला दुष्ट पाऱ्या उठवून बसवतो. दुर्गासारखं रानपाखरू तुम्ही गट्टम करायला हवं, असं तो त्याच्या डोक्यात भरवतो. इनामदाराचा तो घडीव चिऱ्यांचा जुनाट वाडा. त्या वाड्यात झुरळासारखे राहणारे विलासराव आणि ती ऐंशी वर्षांची अंध म्हातारी.’ विश्ववाङ्‌मयाचा धांडोळा घेताना प्रतिभावान शब्दवीरांच्या खाणाखुणा व त्यातले कमालीच्या साधर्म्याचे कवडसेही वाचकाला अचंबित करून सोडतात.

स्त्रियांच्या मानसिक व शारीरिक शोषणाचे चित्र मांडणारी ‘टेस ऑफ द डर्बरव्हील’ ही कादंबरी थॉमस हार्डी यांनी 1891 मध्ये लिहिली. व्हिक्टोरियन कालखंडातील या कादंबरीत इंग्लंडच्या ग्रामीण भूभागाबरोबर कष्टकरी शेतकरी आणि मेंढपाळांची दुनियाही हार्डीने मोठ्या ताकदीने रेखाटली आहे. तिथल्या इतिहासपूर्व दफन टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर टेस नावाच्या त्या ग्रामकन्येची दर्दभरी कहाणी झळाळून निघते. जेव्हा ती टेस नावाची गरिबाघरची पोर टँटरिज गावात पोहोचते, तेव्हा तिला भेटलेला ॲलेक डर्बरव्हील नावाचा सरंजामी तरुण मुलगा या विलासरावांसारखाच विषारी नजरेचा असतो. आपल्या वासनेच्या जाळ्यात टेसला खेचायचा तो प्रयत्न करतो. तेव्हा त्यांचे ते शेतातले घर आणि ती अंध सरंजामी म्हातारी, टँटरिज गावच्या त्या वाड्याचे वातावरण आणि ह्या इनामदारांचा वाडा, ती मुजोरी, ते शोषण आणि तो अंधपणा असे कमालीचे साम्य मला या दोन्ही कलाकृतींमध्ये जाणवले. अर्थात ही उंच प्रतिभेच्या शब्दकारांच्या हुंकारातील सहज जाणवलेली साम्यस्थळे. बाकी काही नाही.

‘कुजलेल्या काट्यासारखा दुष्ट प्रवृत्तीचा पाऱ्या इनामदाराच्या मस्तकात विखाराची पेरणी करतो. त्या वाड्यात विलासरावच्या अंध म्हाताऱ्या आईची काळजी घ्यायला दुर्गा जात असते. एका दुपारी विलासराव दुर्गावर बळजबरीचा प्रयत्न करतो. धनिकाच्या त्या अचानक वरचढपणामुळे गरीब दुर्गाची अवस्था पांगुळल्यासारखी होते. नकार, प्रतिकार किंवा पळ यांपैकी त्या नेमक्या वेळी तिला काहीच सुचत नाही. त्या क्षणी ऐन वेळी गंग्या माकड दुर्गाच्या मदतीला धावते.

‘इनामदाराने पोरीला डागाळले तर नाही ना, या भीतीने यंकू माकडवाला खूप परेशान आहे. कारण आपल्या जातीच्या रूढ परंपरेनुसार उष्टावलेल्या पत्रावळीला घरात घ्यायची रीत नाही.’ स्त्री ही ‘चेमिन’ कादंबरीतील कुरुतम्मासारखी कोळ्याची पोर असो किंवा ‘परजा’मधील जिल्ली असो; रानात, वनात तसेच रामायणात आणि आजच्या दामायणातसुद्धा चारित्र्यसंवर्धनाचा मक्ता जसा काही फक्त स्त्रियांनीच उचलला आहे. ‘चेमिन’मध्ये तर मछवाऱ्यांच्या स्त्रियांनी कठोर चारित्र्याचे पालन करायला हवे, अन्यथा समुद्रदेवता भयंकर कोपते. मग ती त्या कोळ्याच्या बोटीला आणि कोळ्यालासुद्धा गिळून टाकते. तसाच प्रघात माकडवाल्यांच्या दुनियेत आहे. बाईच्या चुकीने नव्हे, तर दुसऱ्याने कोणी अन्यायाने तिला डागाळले तरी तिच्या डोक्यात सरळ धोंडा घालून तिला ठार मारायचा जातिप्रथेचाच कठोर दंडक होता. त्यामुळे इनामदाराने असा गुन्हा केला असेल तर आपले पोटचे एकमेव लेकरू ठार मारावे लागणार, या कल्पनेने यंकू पुरता हादरून गेला होता. मात्र ती पाक असल्याचे कळल्यावर, तिचा बाप आपल्या लेकीला पोटाशी पकडून हंबरडा फोडतो. गावाबाहेरच्या कोरड्या ओढ्यात ते दोघे खूप रडून घेतात.

पुढे दुर्गाच्या पावित्र्याचा पंचनामा करण्यासाठी यंकूची ‘जातकाशी’ म्हणजेच जात पंचायत भरते. माकडवाल्यांच्या त्या देवकाशीसाठी माळावर गावोगावचे हेकट, तापट, बुढ्ढेबुजुर्ग पंच गोळा होतात. पोरीचा बाप आणि सासरा अशा दोन्ही बाजूंनी शब्दांचा तोफखाना पेटतो. गलका वाढतो. आपल्या सुनेचे पावित्र्य ठरविण्यासाठी तिचा सासरा एक भयंकर कसोटी सुचवतो, ‘‘तिनं कढत्या तेलातला पैसा काढून दिला पायजी. हात भाजला तर ती पापी आन नाय भाजला तर तुळस.’’ अशी अट तो घालतो.

अशा नेमक्या क्षणी अण्णा भाऊंची लेखणी आजवर चूप बसलेल्या तिच्या भर्ताराला वाचा फोडते. ‘तो सोन्याच्या तुकड्यासारख्या आपल्या गुणवान अस्तुरीचे रक्षण करायला जात पंचायतला आडवा जातो, ‘‘दुर्गाचं पाप सिद्ध करण्यासाठी माझ्या बापानंच कडत्या तेलातला पैसा काढावा. जर बापाचा हात भाजला, तर दुर्गानं पाप केलं नाय. जर हात जळला नाय तर दुर्गा पापी, बाटलेली.’’ आपलं पोरगं आपल्याच गळ्यात तंगड्या घालतंय, ते बघून बाप कातवला.

सुगी उलगते. संपते. उंदरांनी आपल्या बिळामध्ये पळवलेलं धान्य साठवलेलं असतं. त्यांचे उकीर खणून भिकारीच उंदरांना भिकारी करून सोडतात. त्याच वेळी पालावरच्या भिकाऱ्याची सुंदर पोर हुरड्यासारखी चोळायला मिळाली नाही, या दु:खानं त्या भागातले सरंजामी टगे आणि धनदांडगे पोळून निघतात.

वास्तवात शिराळा ते पूर्वीच्या पेटलोंड गावापर्यंत (हे सुंदर गाव चांदोली धरणाच्या जलाशयात कायमचे बुडाले आहे.) फिरणारा असा यंक्यासारखा एक माकडवाला होता. त्याच्या फाटक्या पदरात चंद्राच्या कोरीसारखी वास्तवातली दुर्गा होती, असे आमच्या त्या भागातले जुने लोक सांगतात. माळावरच्या त्या सुंदरीसाठी धनदांडग्यांनी असाच हरणीसारखा तिचा सतत पाठलाग केला होता. मात्र शेवटपर्यंत तो यंक्या आपली पोर आणि अब्रू जपण्यासाठी यशस्वीपणे लढला होता. अण्णा भाऊंनी वास्तवातली ती फक्त चंद्राची कोर उचललेली नाही, तर तिच्याबरोबरच भटक्याविमुक्तांच्या आभाळाचा दस्तऐवजच आपल्या कवेत घेतला आहे, ही त्यांची खरी अतुलनीय कामगिरी.

सरंजामी धनिकांच्या मेंदूत दुर्गाच्या हव्यासाच्या बेडक्या कर्कश आवाज काढत राहतात. काही रानवट दांडगे नदीच्या पाणवठ्यावर गोधडी पांघरून झडप घालतात. दुर्गाला इनामदाराच्या वाड्यात पळवून आणून कोंडतात.

पुढे कादंबरीच्या अखेरच्या टप्प्यात धनदांडग्यांकडून सुरू होतो तो येमू आणि त्याची अस्तुरी दुर्गा यांचा अखंड पाठलाग. तोही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतला, नद्यांच्या काठचा. रात्रीबेरात्रीच्या अवचित वेळेचा. अण्णांची लेखणी इथे फक्त पळापळीत किंवा मारझोडीच्या हिंसाचाराच्या वर्णनात वाहून जात नाही; उलट ती पळापळ, ते लपणेछपणे आणि निसर्गराजीच्या मांडीवरचे ते हुंदडणे सारेच काही अभिजाततेचा अंगरखा लेऊन प्रवास करते.

हा कादंबरीकार दिवस उगवल्याची वर्णने रेखाटू लागतो.

‘दिवसाची पिवळी किरणं डोंगरावर उतरली. दवानं भिजलेली फुलं स्नान घातलेल्या मुलांप्रमाणं दिसू लागली. सह्याद्री जागा झाला. पाखरं फांदीफांदीवर गाऊ लागली.

‘दुर्गानं डोळे उघडले. येमू जवळच बसला होता. अंघोळीहून येता येता त्यानं दोन पाणकोंबड्या मारून आणल्या होत्या, आणि जाळ करून तो त्या भाजत बसला होता. कोंबड्या जाळावर तरतरत होत्या. त्या खरपूस भाजल्या जात असलेल्या कोंबड्यांकडे पाहून दुर्गा गालात हसली...’

अमूल्य रत्ने किंवा मोती असोत. अगर अफलातून स्त्रीसौंदर्य असो; त्यांच्यावर सरंजामी धनदांडग्यांचा, शेटसावकारांचा कायम डोळा असतो. जे मौल्यवान असेल, ते लुटण्यासाठी हे लक्ष्मीपुत्र उघड किंवा चोरटे दरोडे नेहमी घालतच असतात. त्यासाठी कँप बनतात. कंपन्या उभारल्या जातात. ह्या प्रवृत्तीची लक्तरे उघडणारी ‘द पर्ल’ नावाची एक सुंदर कादंबरी जॉन स्टाईनबेक नावाच्या जगप्रसिद्ध अमेरिकन कादंबरीकाराने लिहिली आहे. ‘द ग्रेप्स ऑफ राथ’ आणि ‘ईस्ट ऑफ ईडन’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या त्याच्या नावावर आहेत.

स्टाईनबेकच्या ‘द पर्ल’मध्ये समुद्राकाठी मासेमारी करणारा किनो नावाचा एक सामान्य कोळी असतो. एके सकाळी मासेमारी करताना कोट्यवधीच्या मोलाने विकले जाईल, असे एक अमूल्य रत्न त्याच्या हाती गवसते. ते रत्न हासिल करण्यासाठी गुंड-मवाली आणि श्रीमंत धनिकांच्या टोळ्या त्याचा पाठलाग करतात. तेव्हा जंगलातून होणारी त्याची ससेहोलपट, त्याचे उपास, त्याची परवड. तसाच अमानुष पाठलाग ‘माकडीचा माळ’च्या अखेरच्या भागात अण्णा भाऊंनी चितारला आहे. उंच प्रतिभेचा कर्ता त्या विपन्नावस्थेतील माणसांचे जीवन जागे करताना आजूबाजूच्या निसर्गाला कसे कवेत घेतो, बोलते करतो, माणसातल्या हिंस्त्रपणाच्या साक्षी त्या रानातल्या झाडापानांतून, पत्थर आणि काट्याकुट्यांकडूनही कशा नोंदवतो, यांचे दर्शन ‘माकडीचा माळ’ देते. ह्या लेखनाची पत आणि पोत स्टाईनबेकच्या अभिजात लेखनशैलीच्या तुलनेत कणभरही कमी नाही. ह्या दोन्ही कादंबऱ्यांच्या वाचनानंतर मला जगाच्या भूखंडाची अंतरे कमी झाल्यासारखी दिसतात. वेगवेगळ्या भूखंडांतल्या साहित्याच्या ह्या गुलदऱ्या मला वेडावून सोडतात.

तशीच ती जंगलराने, तो भयानक पाठलाग. तशीच ती जगण्यामरण्याच्या ईर्षेची कहाणी. तसेच ते मधाळलेले आणि दुधाळलेले रान.

‘दुर्गाची नजर हिरव्यागार गर्द झाडीवरून समोरच्या माळावर भिरभिरत होती. आकाशात लाल रंगाचा एक ढग रेंगाळत होता. त्या ढगाखाली पाखरं सुरकंडीचा खेळ खेळत होती. दुर्गा एकाग्र चित्तानं तो पाखरांचा खेळ पाहत होती. बाजूला सागवान, धावडी, माकडी, जांभूळ, पांगिरा आणि देवकळकीची बेटं डोलत होती.

‘दुर्गा भान हरपून तो देखावा पाहत होती. जवळच येमू बसला होता. पण त्याचाही तिला विसर पडला होता. माणसाची करणी खोटी असते. आपण पाण्याला गेलो. रंगरावानं आपणाला पळवलं, डांबलं, आपली अब्रू जबरीनं लुटण्याचा प्रयत्न केला. मी गरिबाची लेक. मला ओरबडावी म्हणूनच सर्व काही घडलं, या विचारानं तिचं काळीज कठोर झालं होतं.

‘इतक्यात दोन ससेमोरांग्या आकाशातून खाली उतरल्या. त्यांनी गांजणीच्या गवतात खोप करून बसलेल्या एका सशावरच झडप घातली. तसा तो ससा जीव घेऊन वाऱ्यासारखा पळू लागला.

‘ससा पळत होता. अगदी रबरी चेंडूप्रमाणे तो उड्या घेत होता आणि भात्यातील बाण सरासर सोडावेत, तशा त्या सशावर ससेमोरांग्या सूर मारीत होत्या.

‘अखेर एका ससेमोरांगीनं आपल्या बळकट नखांत तो ससा धरून गगनात झेप घेतली. त्यांची लढाई संपली. पण ससा धडपडत हेाता. तो मध्येच त्या नखांतून सुटला नि पुन्हा जमिनीकडे येऊ लागला. त्याच वेळी येमूनं भर्रकन एक बाण सोडला नि एकाच बाणात तो ससा आणि ससेेमोरांगी खाली पडली.’

अण्णा भाऊंची ही अवीट कादंबरी समजून घेण्यासाठी वाचकांकडे जर रानभान असेल, तर दुधात साखरच. ज्यांनी गांजणीच्या गवताचा वास घेतला आहे किंवा देवकळकीच्या बेटांतून रात्री वाहणाऱ्या भिरभिरत्या वाऱ्याची मजा लुटली आहे, त्यालाच ह्या रानाबनाची खरी गंमत माहीत. ससेमोरांगीचा मोठा विखारी दुर्गुण म्हणजे ती झडप घालून सशासारख्या जिवांचे डोळे फोडते. त्यांना आंधळे बनवून त्यांच्यावर झपाटा मारून त्याला उचलून नेते. जगातल्या सरंजामी आणि धनदांडग्या व्यवस्थेचे प्रतीक म्हणूनच सहज अलगुज छेडावा तसे अण्णा भाऊ त्या ससेमोरांगीला घेऊन येतात.

सिनेमातील दृश्यांची गती वाढविण्यासाठी आणि त्यांना उठाव देण्यासाठी बॅकग्राउंड म्युझिकमध्ये सारंगीचा दर्द, तर कधी प्रसंगानुरूप व्हायोलिनसारख्या शेकडो वाद्यांचा वर्षावही सुरू हेातो. तशा प्रसंगानुरूप अण्णांचे शब्द, प्रतीके आणि प्रतिमाही झरझर बदलत राहतात. झाडं करकरतात. वातावरणात भयाण काळोख भरतो. चंद्रोदय होतो. तेव्हा वाळूत पाणी दडावं तसा अंधार लपतो. जागोजाग झाडांच्या बुंध्यांना मिठी मारतो.

मध्येच त्या पळापळीच्या पार्श्वभूमीवर त्या गवताळ रानात त्या रानपाखरांच्या वाटेला थोडे सुखाचेही क्षण येतात. रानमातीत झोपलेल्या येमूकडे त्याची दुर्गा ‘गवताकडे वणवा सरकावा’ अशी सरकते. अन्‌ मध्येच अंधारातून काळोख्या आकृत्याही सरकतात. दुष्ट पात्रे जनावरासारखी ताबा घ्यायला पुढे होतात, तेव्हा येमूच्या धनुष्यातून भर्रकन बाण सुटतो. किंकाळ्या फुटतात. रात्र गदगदते. धडपडते, थरारते. राव्या नावाचा दुष्ट कड्यावरून रेडा खाली पडावा, तसा कोसळतो. त्याचं भेसूर नरडं घरघरत राहतं.

चांदण्या दमल्यासारख्या होतात. चंद्र मावळतीची उतरण उतरतो. त्याचा कलता प्रकाश वारणा नदीच्या अफाट पाण्यात झगमगतो. अन्‌ त्या चंद्राचं प्रतिबिंब नदीच्या पाण्यात गटांगळ्या खातं.

कोणत्याही लेखनतंत्राच्या हिशोबाने अण्णा भाऊंनी हे लेखन केलेले नाही. कुंडीत वाढवलेले झाड आणि रानात एखाद्या बंजर भूमीत मूळ धरून आपसूक वाढलेला महावृक्ष या दोन्हींमध्ये फरक असतो. ‘माकडीचा माळ’चा वाङ्‌मयीन पसारा त्या महावृक्षासारखाच आहे. ती अभिजात कलाकृती बनली आहे. तिला रूढार्थाने नायक नाही. यंकू हे एक मुख्य पुरुष पात्र म्हणता येईल. कादंबरीला दुर्गासारखी उत्तम नायिका लाभली आहे. मात्र नायकाची भूमिका तिचा बाप यंकूही पेलू शकत नाही. अवघी माळराने नव्हे, तर निसर्गच इथे सर्वांचा बाप ठरतो. या कलाकृतीमध्ये लेखकाने भटक्या आणि फिरस्त्यांच्या भणंग जीवनाचा चित्रमय व सखोल लेखाजोखा मांडला आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा आत्रे यांच्या ‘गावगाडा’सारखे तिला एक वेगळे महत्त्व आहे.

उडिया कादंबरीकार गोपीनाथ महंती यांनी ‘दादी बुद्धा’ (1945), ‘परजा’ (1948) आणि ‘अमृत संतान’ (1947) अशी कादंबरी-त्रिवेणी ओरिसातील आदिवासींच्या जीवनावर लिहिली. मात्र त्यांच्या जंगली टापूतील आदिवासींचा लढा हा मुख्यत: त्यांच्या छोट्या जमिनींचे तुकडे वाचवण्यासाठी आहे. तसेच ‘चेमिन’मध्ये कोळ्यांच्यासुद्धा मालकीचा वहिवाटीचा समुद्रकाठ होता. त्या त्यांच्या जमिनीच्या किंवा पाण्याच्या हक्कासाठी ते लढले. मात्र ‘माकडीचा माळ’वरच्या भटक्यांच्या बुडाखालची पालाची जागा ही त्यांची कधीच नव्हती. वीतभर धरतीही त्यांच्या मालकीची नाही. मात्र माथ्यावरचे आभाळ आपल्याच बापाचे आहे आणि वाहत्या वाऱ्यावर आपलीच हुकमत आहे, अशा कैफात ही निसर्गाची लेकरे जगत होती. ह्या कादंबरीत आरंभापासून अखेरपर्यंत काटेरी वास्तव आणि कलात्मकतेचा ओसंडता खळाळ वाहत राहतो.

दूर अमेरिकेच्या एका प्रांतात अशीच रानात नदीकाठी घडलेली ‘द पर्ल’ आणि ‘माकडीचा माळ’ या दोन्हींतील साम्यस्थळे शोधताना मी अचंबित झालो. विझू लागलेल्या चांदण्यांपासून भिजू लागलेल्या गवतापर्यंतचे रानातले विश्व ह्या दोन्ही कादंबऱ्या आपल्या कवेत घेतात. त्यातले गरिबांचे जिणे, धनिकांकडून होणारा पाठलाग, त्या रानकोल्ह्यांचे करवती दात आणि तरसासारखे बळकट जबडे, जीवनातले सौंदर्य आणि पिळवणूक, लबाडी, अन्याय, हिंसाचार, माणसा-जनावरांचे अंतरंग व बाह्य रंग नेटकेपणाने ह्या दोन्ही कलाकृती मांडतात.

येवल्याच्या पैठणीसारख्या ह्या दोन्ही कलाकृतींच्या बांधणीत अभिजाततेची सळसळ आहे. माणुसकीची ऊब आहे. पण ‘माकडीचा माळ’ ह्या कादंबरीच्या पहिल्या तीसचाळीस पानांत भटक्या जमातींच्या जगण्यामरण्याचे, हर्षखेदाचे, त्यांच्या निसर्गाशी असणाऱ्या ताण्याबाण्यांचे जे विराट चित्र अण्णा भाऊंनी रेखाटलेले आहे, ते महाकाव्याच्या जरतारी पदरासारखे आहे. कादंबरीचा पुढचा प्रवासही तितकाच प्रत्ययकारी आहे. हा समाजशास्त्राच्या दृष्टीने दस्तऐवज आहे.

दुर्गा ही ‘माकडीचा माळ’ची सशक्त नायिका. तिला जपण्यासाठी तिचा बाप यंकू माकडवाला अखेरपर्यंत लढतो. त्या झटापटीतच वैऱ्यांकडून त्याचा अंत होतो. त्याचा मुडदा पुरण्यासाठी गार खोदली जाते, तेव्हा त्याचे लाडके माकड झाडावरून खाली उडी ठोकते. आपल्या धन्यासाठी जीव देते. गरीब, सद्‌गुणी लेकीच्या भवितव्यासाठी बाप मरणाला मिठी मारतो.

कुरुतम्मा ही ‘चेमिन’ची नायिका. तिच्या नवऱ्याला समुद्रात एक बडा देवमासा सापडतो. तो इतका प्रचंड असतो की, त्याला तो पाण्यातून ओढताही येत नाही आणि सोडताही येत नाही. शेवटी खवळलेला समुद्र कुरुतम्मा, तिचा प्रियकर, पती आणि देवमासा अशा चारही जिवांना गिळून फस्त करतो. त्यांचे मुडदे सागरकिनारी ओल्या वाळूत पडलेले आढळतात. वेठबिगारीच्या दास्यातून मुक्तता करून घेण्यासाठी ‘परजा’तील जिल्लीही शोषणकर्त्या सावकारशाहीविरुद्ध झगडत आयुष्य घालवते.

‘माकडीच्या माळा’वरची दुर्गा, तिचा बाप यंकू, त्यांची ती गाढवे, कुत्री, लंगडी घोडी... त्या फिरस्त्यांची सारी दुनियाच आता कुर्र काळाने गिळून टाकली आहे. मात्र अण्णा भाऊ आपल्या जबरदस्त लेखनसामर्थ्याने गांजणीच्या गवतासारखा हा सुगंधी माळ मागे ठेवून गेले आहेत.

जानेवारी 1963मध्ये ‘मॅजेस्टिक प्रकाशना’च्या केशवराव कोठावळेंसारख्या तेव्हाच्या ज्येष्ठ प्रकाशकाने ही अमोल कलाकृती उजेडात आणली. परंतु मराठी समीक्षेने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. ‘माकडीचा माळ’ आणि ‘फकीरा’ यांसारख्या अव्वल कलाकृती लिहिणाऱ्या ह्या लेखकाने श्रेष्ठ लेखक जॉन स्टाईनबेक ज्या प्रदेशात जन्माला आला, त्या मातीत जन्म घेतला असता तर?

(अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपले. त्यांचे वाङ्‌मयीन चरित्र राजहंस प्रकाशन, पुणे यांच्याकडून लवकरच येत आहे, त्यातील हे एक प्रकरण आहे.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके