डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

शिरीषाला जोडूनच पर्जन्य नावाच्या गचाळ वृक्षाची थोडी माहिती घेतली पाहिजे. हा हुबेहूब शिरीषासारखा दिसणारा विदेशी वृक्ष शे-दीडशे वर्षांपूर्वी भारतात आला. अलीकडच्या अनेक लेखकांनी पर्जन्याला शिरीष समजण्याची चूक केली आहे. तयांसी तारे म्हणून ज्योतिषी भले-भले चकले. या भल्या-भल्या ज्योतिषांमध्ये जयंतराव टिळक आणि शरदिनी डहाणूकरही आहेत. त्यांना चुकू द्या, तुम्ही चूक करू नका. थोडक्यात फरक सांगतो. शिरीषाची फुले शेवाळी, हिरवट, पिवळट, पांढरट आणि सुवासिक असतात; तर पर्जन्याची फुलं लाल-गुलाबी असून निर्गंध असतात. शिरीषाची पाने फिकट हिरवी असतात, तर पर्जन्याची पाने गडद हिरवी असतात. शिरीषाच्या शेंगा आपल्या पोपटांना आवडतात, पण पर्जन्याकडे आपले कोणतेही पक्षी फिरकत नाहीत. पर्जन्य वृक्षाचं वनस्पतीशास्त्रीय नाव सामनिया सामन असं आहे.

 

एप्रिल महिन्यात वसंत ऋतू पूर्णत्वाला जातोही आणि हळूहळू सृष्टीतून काढता पायही घ्यायला लागतो. क्रमाने रंगत गेलेली कव्वाली शेवटी-शेवटी टिपेला पोहोचावी, तसे एप्रिलमधल्या वसंत ऋतूचे आहे. सुगंधाच्या दुनियेचा मानबिंदू म्हणजे एप्रिल. सुगंधाच्या निकषावर माझे सर्वांत आवडते फूल म्हणजे मोगरा. सुगंधाच्या कोरसमधला मुख्य आवाज. यातले सहगायक आहेत- मदनबाण, सोनचाफा, भुईचाफा, सुरंगी, जाई, जुई आणि सायली. आपण शेतकरीमंडळी शेतात काही काम नसल्याने घरी दोऱ्या वळत, पळसफांद्या-पऱ्हाट्यातुराट्याने झोपडीचे छप्पर दुरुस्त करत आणि गुरांच्या गोठ्याची डागडुजी करत बसलो आहोत, याची जाणीव या कोरसगायकांना असते. ‘आज बरा घरी सापडला!’ म्हणत ते आपले गंधरंजन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि त्यांना भरीव यश मिळते.


मदनबाण हे सरळ, उंच वाढणारे झुडूप असून त्याचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम ओडोरॅटिसिमम आहे. सुवासिक व शोभिवंत फुलासाठी म्हणून ते एखाद्या कुंडीतही लावता येते. त्याचे मुख्य खोड फार तर करंगळीएवढे होते. एप्रिलमध्ये त्याला येणारी फुले पांढरट पिवळी आणि सुगंधी असून झाडांच्या शेंड्याकडे येतात. सुकल्यावरही त्याच्या फुलांचा सुगंध राहतो. तैवान या देशात त्याची लागवड चहाला सुवासिक बनवण्यासाठी करतात. सोनचाफा दहा-पंधरा मीटरपर्यंत उंच वाढू शकतो. याची पाने वीस ते पंचवीस सें.मी. लांब आणि पोपटी रंगाची असतात. हा नित्यपर्णी आहे.


मोगरा हे कवींचे लाडके फूल आहे. फादर स्टिफन्सना ते सर्व फुलांमध्ये ‘साजिरे’ वाटते, तर ज्ञानेश्वर आपल्या ओव्यांना ‘वसंतागमीची वाटोळी मोगरी’ म्हणतात. वाटोळी हा शब्द तसा नीरस वाटतो; पण फुलण्याच्या बेतात आलेल्या मोगरीच्या कळीशी तो जोडला जाताच, त्याला विलक्षण सौंदर्य येते. जुन्या लावण्यांत ‘लावण्याचा गड्डा’ म्हणून मोगऱ्याचा उल्लेख आहे. कुणी तरी मोगऱ्याचा गौरव करताना असं म्हटलंय की, इतर फुलं फार तर सुंदरीच्या एकेका अवयवाशी सौंदर्याच्या बाबतीत स्पर्धा करू शकतील; पण मोगरा अमक्या अवयवासारखा अथवा तमका अवयव मोगऱ्यासारखा असावा, असं आपण म्हणत नाही. मोगऱ्याची अवस्था एखाद्या गुणी कवीसारखी आहे. त्याची जाहिरात होत नसली, तरी लोकांना त्याचे गुण पटलेले असतात.


मोगरा ही आधी वेल होती, असावी. ज्ञानेश्वरही त्याचा ‘वेलू’च म्हणतात. उत्क्रांती किंवा शास्त्रज्ञाच्या करामतीमुळे त्याचे झुडूप झाले असावे. त्याचे खोड फार अंगठ्याएवढे जाड होते. कोवळ्या खोडावर लव असते. पाने एकेका पेरावर दोन-दोन समोरासमोर येतात, ती अंडाकृती असतात. फुलं पांढरी असतात व ती सायंकाळी उमलतात. कुंदापेक्षा मोगऱ्याच्या पाकळ्या आखूड आणि विपुल असतात. कुंदाच्या कळीचा नळीवरचा भार सुळक्यासारखा, तर मोगऱ्याच्या कळीचा गोटासारखा असतो. सुंदर दातांना कुंदकळीप्रमाणेच मोगऱ्याचीही उपमा देतात. गुलजार म्हणतात, ‘लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं’!


मोगऱ्याचा सुगंध फार उग्रही नसतो आणि फार मचूळही नसतो. काय वैशिष्ट्य आहे, नेमके सांगता येणार नाही; पण हा गंध हृदयाला आणि मेंदूला विलक्षण भावणारा आहे, एवढे मात्र खरे. ग्रेस लिहितात –


    अलभ्य फुलला सखे

    घनवसंत हा मोगरा

    विनम्र लपवू कुठे

    हृदयस्पंदनाचा झरा


हृदय आणि मेंदूचं ठीक आहे, पण रसनेद्वारे पोटात पोचणारादेखील तो आहे. त्याच्यात शीतलतेची संवेदनाही आहे. म्हणून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या माठात किंवा सुरईतही तो टाकतात. होय ना?


मराठवाड्यात पाचुंदा या छोटेखानी झाडाचं दर्शन मोठ्या प्रमाणात शेताच्या, रस्त्याच्या बाजूला घडतं. सेलू-सातोना रस्त्यावर मी पाचुंद्याची सदाहरित झाडं पुष्कळ पाहिली आहेत. ती एप्रिलपासून फुलायला लागतात ते पावसाळ्याच्या तोंडापर्यंत. पानं आणि फुलं मोठी देखणी असतात. फुलं पांढरी, छोट्या-छोट्या गुच्छांमध्ये येणारी असतात. सकाळच्या प्रहरी त्याला छानसा मंद सुवासही येतो. या झुडपाचे शास्त्रीय नाव कपॅटिस ग्रँडिस असे आहे.


पुण्यात आढळणाऱ्या वावळ या वृक्षाचं एक नाव ‘मंकी बिस्कीट ट्री’ असं आहे. कारण एप्रिलमध्ये त्याला येणारी फळं बिस्किटासारखी चपटी व गोल असून वानरांचं ते आवडतं खाद्य आहे. हा वृक्ष पंधरा ते अठरा मी. उंच वाढतो. त्याच्या पर्णपत्राची लांबी सात ते दहा सेंमी असते. त्याचा बुंधा पुष्कळ मोठा होतो आणि बुंध्याचा घेर चार-पाच हात सहज होतो. वावळाचे लाकूड भक्कम असते. फर्निचरसाठी त्याचा वापर होऊ शकतो.


एप्रिलमध्ये फुलणारा एक वृक्ष आहे अर्जुन. एप्रिल आणि मे असे दोन महिने अर्जुनाच्या झाडावर सूक्ष्म, सुवासिक, पांढऱ्या-पिवळसर रंगांचे तुरे येतात. हिवाळ्यात पानगळ होतेे आणि वसंत ऋतूत नवी पालवी येते. पालवीबरोबरच अर्जुन मोहरायलाही लागतो. अर्जुन वृक्षाचा गौरवर्ण आणि नितळ कांती पाहून श्रीरामास सीतेची व्याकूळ करणारी आठवण होते, असा वाल्मीकी रामायणात अर्जुन वृक्षाचा उल्लेख आहे. या भरदार आणि डौलदार वृक्षाला पाहिल्यामुळेच महाभारतातील कुंतीने आपल्या मुलाचे नाव अर्जुन ठेवले, यात शंका नाही. औरंगाबादमध्ये औरंगपुरा सिटीबसच्या स्टॉपवरून व्हाया निराला बाजार तापडिया टेरेसकडे जाताना एस.टी. वर्कशॉपला लागून अर्जुन वृक्ष आहे. बामु विद्यापीठात बोटॅनिकल गार्डनच्या अलीकडे अर्जुन वृक्ष आहे. तिथेच कुलगुरू निवासस्थानाच्या मागेही अर्जुन वृक्ष आहे. दिल्लीचा जनपथ तर खऱ्या अर्थाने ‘अर्जुन पथ’च आहे.


अर्जुन वृक्ष भारतभर आढळतो. याचे वनस्पतीशास्त्रीय नाव टर्मिनालिया अर्जुना असे आहे. याच्या खोडाची साल जाड, साफ आणि हिरवट पांढरी असते. पाने वरून सौम्य हिरवी आणि खालून सौम्य पिंगट असतात. ती एकमेकांसमोर किंवा थोडी खाली-वर असतात. फुलोरे शाखाग्री किंवा पानांच्या बगलेत येतात. अर्जुनाच्या फुलांना सुगंध असतो. फळाला पाच कंगोरे असतात. बीज एकच असते. आपल्या मुला-मुलींना वृक्ष-वेलींची नावं देणारी आपली संस्कृती खरोखरीच निसर्गप्रेमी-निसर्गभक्त आहे, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.


असेच आणखी एक नितांत सुंदर झाड आहे शिरीषाचे. मी एवढा शिरीषभक्त आहे की, अत्रेनगरमध्ये स्वत:चे चांगले प्रशस्त घर असताना केवळ प्लॉटसमोर शिरीषाचे प्रचंड मोठे झाड आहे, या एका कारणासाठी तो विद्यानगरमधला प्लॉट विकत घेऊन मी नवे घर बांधले आणि पोस्टाचा पत्तासुद्धा ‘शिरीष वृक्षाच्या मागे’ असा द्यायचो. कसला सुंदरतम सुगंध आहे शिरीषाचा! एकदा फुप्फुसभर घेऊन पाहा किंवा फुललेल्या शिरीषाजवळ दीर्घ श्वसन, प्राणायाम करून पाहा. अननुभूत असे सुख लाभेल!


प्रा. वा. ल. कुलकर्णी यांनी कुठेसे लिहिले होते की, प्रत्यक्ष शारीरिक किंवा अन्नाच्या भुकेचा अनुभव शब्दबद्ध करणे कठीण असते. मला हे वृक्ष-वेलींच्या सुगंधाबद्दल जास्त खरे वाटते. कडुनिबांचा गंध, शिरीषाचा गंध, मोगऱ्याचा गंध, अनंताचा गंध, जाई-जुई-सायली यांचा गंध... प्रत्येक सुगंधाला एक स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या अनुभूतीचा वेगळेपणा व्यक्त करायला शब्दच कुठे आहेत! कोणत्या शब्दांत हापूस आंबा आणि शेप्या आंबा यांच्या गंधांतला फरक समजून सांगायचा? कोणत्या शब्दांत मूळ (हायब्रीड नव्हे) गुलाबाचे जाणवलेले गंधवैशिष्ट्य अभिव्यक्त करायचे? माझ्या बोलण्या-लिहिण्यात एक शब्द येतो- ‘सुंदर!’ फार फार तर परमसुंदर, नितांत सुंदर. अरे, ही फार स्थूल विशेषणं झाली. त्या-त्या सुगंधाची पृथगात्मता सांगायला नेमके शब्द कुठे आहेत तुझ्याजवळ? शिरीषाचं अप्रतिम सुगंधलावण्य चितारताना महाकवी कालिदाससुद्धा हतबुद्ध झाला-


    कृतं न कर्णार्पितबंधनं सखे

    शिरीषमागण्डविलंबि केसरम्‌ ।


कालिदासाची ही अवस्था, तर मग माझी कशी गती? मी आपला बाह्य वर्णन करणारा की- बाबांनो, शिरीषाचे झाड मोठे, उंच, दहा ते वीस मीटरपर्यंत वाढणारे, डेरेदार आकाराचे असते. खोडाची साल तपकिरी खरखरीत असते. हे झाड फार मोठे झाले, तर साल भेगाळतेही. याची पाने मोठी, द्विसंयुक्त (बाय-पिनेटली कंपाऊंड) असतात. फुलांचा रंग शेवाळी, हिरवट, पिवळसर, पांढुरका असतो. त्याला पेल्यासारखा आकार आलेला असतो. प्रत्येक पेल्यात पिवळसर, हिरवट, रेशमी पुंकेसर असतात. महाजन सर लिहितात की- रूढार्थाने ज्याला शिरीषाचे फूल म्हणतात- तो गेंद म्हणजे मुख्यत: अशा असंख्य, लांब (सुमारे तीन सेंमी.) नाजुक पुंकेसराचा झुबका असतो. फूल हीच शिरीषाची खरी ओळख. वारकाच्या दुकानासमोर जसे केसांचे झुबके असतात, तसे वाळलेल्या फुलांचे झुबके शिरीषतळी दिसतात.


शिरीषाला जोडूनच पर्जन्य नावाच्या गचाळ वृक्षाची थोडी माहिती घेतली पाहिजे. हा हुबेहूब शिरीषासारखा दिसणारा विदेशी वृक्ष शे-दीडशे वर्षांपूर्वी भारतात आला. अलीकडच्या अनेक लेखकांनी पर्जन्याला शिरीष समजण्याची चूक केली आहे. तयांसी तारे म्हणून ज्योतिषी भले-भले चकले. या भल्या-भल्या ज्योतिषांमध्ये जयंतराव टिळक आणि शरदिनी डहाणूकरही आहेत. त्यांना चुकू द्या, तुम्ही चूक करू नका. थोडक्यात फरक सांगतो. शिरीषाची फुले शेवाळी, हिरवट, पिवळट, पांढरट आणि सुवासिक असतात; तर पर्जन्याची फुलं लाल-गुलाबी असून निर्गंध असतात. शिरीषाची पाने फिकट हिरवी असतात, तर पर्जन्याची पाने गडद हिरवी असतात. शिरीषाच्या शेंगा आपल्या पोपटांना आवडतात, पण पर्जन्याकडे आपले कोणतेही पक्षी फिरकत नाहीत. पर्जन्य वृक्षाचं वनस्पतीशास्त्रीय नाव सामनिया सामन असं आहे.


बिचारा पर्जन्य! तो कधी म्हणाला का, मला ‘शिरीष’ म्हणा म्हणून? माझ्याजवळ त्यानं तसं बोलूनही दाखवलं आहे.


    पर्जन्य/ रेन ट्री

    जरी मी शिरीषसा दिसतो

    तसा सुगंध मज नाही

    कोवळे फुलांचे अंग

    परि उपमा माझी नाही


    भुरभुरता वाटतो ‘पर्जन्य’

    तरी मुळी मी पाऊस नाही

    खरे सांगू, तुमचे ईऽऽ शीऽऽ

    मला मुळी परवडणे नाही


    ‘पर्जन्य’ सुंदर असतो

    माझ्यावरून म्हणता येणार नाही

    आम्लवर्षा होणार म्हणता

    तिथं कुणी थांबणार नाही


    तुम्हां तो शिरीष सुखकर हो

    नका मज भारती लावू

    दोघांचे फूल वेगवेगळे

    नका साधर्म्यावर जाऊ

त्रिफळा चूर्णातले तिघं- हिरडा, बेहडा आणि आवळकंठी- यातला हिरडा एप्रिलमध्ये फुलतो आणि इतका सुंदर फुलतो की, याला आपण अजून का बरं पाहिलं नव्हतं, असं वाटायला लावतो. खरोखर अजूनही पाहिलं नसेल, तर या महिन्यात एखाद्या चांगल्या आयुर्वेद महाविद्यालयाला भेट द्यायला हवी. असंख्य सूक्ष्म, पांढरट पिवळसर फुलं शाखावंत मंजिऱ्यांमध्ये फांद्यांच्या टोकाला येतात. नखशिखान्त फुललेले झाड एखाद्या सोनाराने घडवलेला मोठा दागिना पाहावा असे दिसते. हिरड्याचा म्हणून एक उग्रसा सुगंध या महिन्यात त्या झाडाभोवती दरवळलेला दिसेल. ज्याला आपण बेहडा म्हणतो, ते औषधी फळ गोलसर असते. हिवाळ्यात झाडावर फळे धरतात. औषधी गुणांमुळेच हिरड्याला सुंदर-सुंदर नावं संस्कृतात- आयुर्वेदात मिळाली आहेत. उदाहरणार्थ- अमृता, जया, अव्यथा, प्राणदा, नंदिनी आदी.


महाबळेश्वरला घडलेलं या झाडाच्या फुलोऱ्याचं दर्शन डॉ. सुनीला रेड्डी कसं घडवितात ते पाहा : फेड्रिक हॉटेलच्या आवारात असलेलं लहानसं, ठेंगणं-ठुसकं हिरडीचं झाड बहारदार फुललंय. तारुण्याची उधळण करणाऱ्या कोवळ्या हिरव्या पानांची आणि सोनसळी रंगाच्या लांब, देखण्या मंजिरींची जुगलबंदी जमलीय- ‘वसंत बहार’ रागातली. हिरडीची मंजिरी चाफेकळीच्या रंगाची, अतिशय नीटस, बांधेसूद. मंजिरीतली फुलंसुद्धा प्रमाणबद्ध. पाच छोट्या-छोट्या पाकळ्या अन्‌ दहा केसर होते त्या फुलात. त्यामुळे त्यातले केसरच नजरेत भरणारे. ह्या मंजिऱ्या उभ्या असतात ताठ मानेनं. येतात पण अमाप. काही ठिकाणी चार-पाच मंजिऱ्या एकत्र आलेल्या दिसल्या मोहक गुच्छात.


संस्कृतात हिरड्याला इतकी सुंदर नावं असताना मराठीने नाव दिले ‘हिरडा’. त्रिफळातल्या हिरड्याच्या नंतरच्याला नाव दिले ‘ब्याहडा’! आई गं! ब्याहडा म्हणताना तर तोंडदेखील वेडेवाकडे होते. नावं देण्याच्या बाबतीत मराठी माणसं काहीशी अरसिक आणि विचित्र तर नाहीत ना? बघा, बेहड्याला संस्कृतात नावं आहेत- तेलफळ, इंद्रद्रुम. द्रुम म्हणजे वृक्ष. इंद्राचा वृक्ष. भेंडीला इंग्रजीत नाव आहे लेडीज फिंगर. बॉटल ब्रश हेदेखील कल्पक नाव आहे. माझं एक आवडतं झुडूप आहे; त्याच्या फुलाइतके तरल, सुंदर रंग कुठल्याच फुलात नाहीत. त्या झुडुपाचं मराठी नाव आहे ‘घाणेरी’. आता यात ‘घाण’ काय आहे? याच घाणेरीच्या नाजुक, सुबक, इवल्या-इवल्या फुलांच्या झुडपाला गुजरातीत नाव आहे ‘चुनडी’. स्त्रियांच्या तलम-पातळ ओढणीवरच्या रंगसौंदर्यात त्यांनी घाणेरी दिसते किंवा घाणेरीच्या सुबक फुलांत चुनडी दिसते! आपण मात्र नावं देतो- घाणेरी, हिरडा, ब्याहडा! काय आहे हे?


बेहड्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याचं एक नावं आहे अव्यथा. किती समर्पक! हिरड्यापेक्षा बेहड्याची पाने दाट हिरवी किंवा काळसर हिरवी असतात. याला मंजिऱ्या येतात. फुले लहान, फिकट हिरवी आणि साध्या कणसांमध्ये येतात. याच्या फळाला बेहडाच म्हणतात. ते दोन ते तीन सेंमी. लांब, अंडाकृती, दाट केसांनी आच्छादलेले असते. याची साल निळसर किंवा राखी रंगाची असून तिच्यावर खूपशा उभ्या बारीक भेगा असतात आणि आतून ती पिवळी असते. फेब्रुवारी, मार्चमध्ये पानगळ होते आणि लगेच नवपल्लवी येते.

एप्रिलमध्ये सुंदर फुलं येणारं एक झाड आहे; पण त्याला नाव मात्र वाकड्यातिकड्या, मेंढीच्या शिंगासारख्या शेंगा येतात त्यावरून ठेवण्यात आलं आहे- मेडशिंगी. तिची फुलं पांढरी, नाजुक, वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आणि सुगंधी असतात. वनस्पतीशास्त्रीय नाव डॉप्लिकँड्रोन फॅलकॅटा.


कुडा या झाडाचा नुसता पुसटसा उल्लेख आपण मार्चमध्ये केला. एप्रिल हा कुटजमाहात्म्याचा महिना आहे. हलायुधाने त्याला नाव दिलं- गिरिमल्लिका. यक्षाने आषाढात मेघाची पूजा कुटजपुष्पांनी केली, असा उल्लेख मेघदूतात (1.4) आढळतो. कालिदासाने ‘मेघदूत’ आपल्या नागपूरजवळच्या रामटेक इथेच लिहिले. याचा कुडा किंवा कुटज हा भक्कम पुरावा आहे. कारण उन्हाळा संपता-संपता रामटेकच्या डोंगरावर पूजा करण्यासाठी पांढऱ्या कुड्याची फुलंच यक्षाला उपलब्ध झाली. आजही रामटेकच्या भागात मोठ्या संख्येने ‘कुटजा’ची झाडे आहेत, कारण मुळात ते एक डोंगरी झुडूप आहे. ग्रीष्मातसुद्धा ते फुलतं. म्हणून डोंगराळ भागात त्याचे मोठ्या प्रमाणात वनीकरण केले, तर उन्हाळाही ‘हिरवा हिरवा ऋतू’ होऊ शकतो. पांढरा कुडा अतिशय औषधी वनस्पती आहे. त्याचे पंचांग औषधी आहे. त्याच्या बियांचे नावही सुंदर आहे. त्या जवाएवढ्या असतात, पण त्यांना म्हणायचे मात्र ‘इंद्रजव’. कुडा या झाडाला इंग्रजीत ‘ईस्टर ट्री’ म्हणतात.


ईस्टर हा ख्रिश्चनांचा सण याच महिन्यात येतो. पॅलेस्टाईनमध्ये रोमन व ज्यू लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आलेल्या रविवारी येशू परत जिवंत झाला, अशी श्रद्धा आहे. जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक हा सण उत्साहाने साजरा करतात. या दिवशी चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते आणि कुड्याच्या शुभ्र, मंद आणि सात्त्विक फुलांनी फार पूर्वीपासून चर्चला सजवले जाते; म्हणून कुड्याचे इंग्रजी नाव ईस्टर ट्री! रविवारी येणाऱ्या ईस्टरबरोबर गुड फ्रायडेसुद्धा एप्रिलमध्येच येतो आणि दर वर्षी मला चिं. वि. जोशींचा तो निरागस विनोद आठवून हसू येतं- ‘याही वर्षी गुड फ्रायडे शुक्रवारीच आला!’


आयुष्यात मी पाहिलेला सर्वांत मोठा वृक्ष म्हणजे गोरखचिंच. बंगळूरच्या सर्वांत मोठ्या गार्डनमध्ये मी तो पाहिला. सुमारे पाच मीटर व्यासाचा बुंधा असलेला हा वृक्ष भारतातलादेखील सर्वांत मोठा वृक्ष मानला जातो. तो आहे आंध्र प्रदेशात असणाऱ्या गोलकोंडा किल्ल्याच्या परिसरात. मूळचा मध्य आफ्रिकेतला हा वृक्ष हजार वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतल्या हबशी मजुरांनी आणलेल्या बियांतून लावला गेला. आता तो भारतभर झाला आहे. मी खूप गोरखचिंच पाहिलेत, पण उस्मानाबादला आकाशवाणी कर्मचाऱ्यांच्या क्वार्टर्समध्ये तीन दिवस राहिल्याने तिथल्या वृक्षाचे भरपूर निरीक्षण करू शकलो. नाथपंथीय गोरक्षनाथांनी या विशाल वृक्षाखाली आपल्या शिष्यांना विद्या दिली, म्हणून याच्या नावात ‘गोरख’ आले. चिंचेशी याचा काही संबंध नाही. नाव देणाऱ्याच्या पाहण्यात तोपर्यंत चिंचेपेक्षा मोठा वृक्ष नसेल, म्हणून त्याला वाटले- ही गोरखचिंच!


प्रचंड मोठा बुंधा असला, तरी सामान्यपणे गोरखचिंच दहा ते पंधरा मीटर उंच असतो. याचा शिशिर एवढा प्रचंड की, संपूर्ण पाने-पाने गळून गेलेले झाड उन्मळून पडल्यासारखे दिसते. गोरखचिंचेची पाने एकांतरित, हस्ताकृती, संयुक्तपर्ण (पामेटली काम्पाउंड) असून गुळगुळीत आणि गडद हिरव्या रंगाची असतात. पर्णिका पाच किंवा कमी-अधिक असू शकतात. एप्रिलनंतर फुले यायला आरंभ होतो.


आपल्या सर्वांच्या पाहण्यातली गुळवेल कुणी मुद्दाम न लावता आपोआप आलेली सर्वत्र दिसेल. तिची फुलं मात्र या महिन्यापासून संपूर्ण उन्हाळाभर पाहायला मिळतील. गुळवेलीची फुलं छोटी-छोटी, हिरवट-पिवळसर रंगाची असतात. फुलांची जागा वाटाण्याच्या आकाराची फळं घेतात. गुळवेलीची पिकलेली फळं पक्ष्यांना फार आवडतात. त्यांच्यामार्फत गुळवेलीचे परागसिंचन होते. आयुर्वेद गुळवेलीला अमृतासारखी संजीवक मानते, म्हणून तिचे एक नाव अमृता असेही आहे. गुळवेलसत्त्व या औषधाच्या संदर्भात हे नामकरण आहे. वेलीच्या बोटाएवढ्या जाड फांद्यांचे बारीक तुकडे करून, त्यात पाणी घालून भरपूर उकळायचे अन्‌ गाळून घ्यायचे. या गाळलेल्या अर्कावर प्रक्रिया करून आयुर्वेदिक गुळवेलसत्त्व तयार करतात.


वाघाटी हा लहानपणापासून माझ्या ओळखीचा वेल आहे. एप्रिलमध्ये त्याला फुलं लागतात. फुले पानाच्या बगलेत एकेकटी किंवा दोन-तीन अशी एकत्र येतात. उन्हाळ्यात या वेलाला फळे लागतात. त्या (वाघाट्याच्या) फळांना का कुणास ठाऊक, गोविंदफळ असेही नाव पडले आहे. आषाढी एकादशीला माझ्या गावापासून दोन किलोमीटर लांब असणाऱ्या महादेवाला जाताना काटेरी कुंपणावरचा हा काटेरी वेल हमखास भेटायचा. द्वादशीचे पारणे सोडताना हा भाजीत आवर्जून घालणे, हे चालत आलेले कर्मकांड आहे. नंतर मात्र वर्षभर त्याचे नाव निघायचे नाही आणि इतर फळभाज्यांमध्ये मिसळलेले एक वाघाटे चवीवरून ओळखताही यायचे नाही.


प्रा. व. बा. बोधे यांच्या रसनेला आलेला वाघाट्याचा अनुभव त्यांनी शब्दबद्ध केला आहे. तो असा : वाघाटे उग्र, कडवट पण चवीला भन्नाट. काटे चुकवत काढावं लागतं. त्याचा वेलही सापासारखा झाडाच्या शेंड्यापर्यंत जातो. काटा तर लय आगाग करणारा. वाघाट्यासारखे चवदार फळ नाही. बेंदाडात लय वाघाटी. मी टोपी भरून आणायचो. आई शेजाऱ्यापाजाऱ्यांना द्यायची. वाघाटी वरुट्यानं फोडायची, मग तेलात परतायची. चटणी-मीठ टाकायचं. कडवटपणा कमी करण्यासाठी चिंच टाकायची. कधी गूळ घालायचा. लालभडक तवंग आलेलं वाघाट्याचं कालवण मटणाला मागं सारायचं.


उन्हाळ्यात खाल्लेल्या टरबुजाच्या खूप आठवणी माझ्या लहानपणात आहेत. पाथरी तालुक्यातील कानसूर हे माझ्या मावशीचे गाव. कानसूर हे गोदावरीच्या काठी आहे. तिथे गोदावरीला गोदावरी कोणीच म्हणायचे नाही, गंगाच म्हणायचे. परभणी जिल्ह्यात गंगा हे दिशावाचक नाव आहे, हे वाचून आश्चर्य वाटेल. सेलूच्या कोर्टात मी समोरासमोरच्या चार भिंतींवर न्यायाधीशांना दिसतील अशी नावे वाचली. खाल्लाकडं, वरलाकडं, डोंगराकडं आणि गंगंकडं. खेड्यातील माणसांना याच दिशा कळतात. असो.


कानसूरला गोदावरीच्या पात्रातील वाळवंटात लावलेल्या टरबुजाच्या वाड्या मी पाहिल्या आहेत. त्याच्या केसाळ कांड्यांवरून हात फिरवला पाहिजे. टरबुजांवरून हात फिरवणे, हीसुद्धा सुखद स्पर्श-संवेदना असते. त्याच्या आतला गोड, गार, गुलाबी गर खाताना मला अजूनही दहा वर्षे वर्गात शिकवलेल्या गौरी देशपांडे यांच्या ‘कलिंगड’ या कथेची आठवण होते. कलिंगडापेक्षाही गोड आहे ही कथा.


आमच्या घरात टरबूज ऊर्फ कलिंगडातला गर खाऊन सालपटं फेकून देत नाहीत. हरभऱ्याची भिजवलेली डाळ आणि कांदा घालून त्यांची चवदार भाजी होते. टरबुजाच्या मानाने खरबूज तितकेसे आवडत नाहीत. टरबुजांच्या फोडींवर साखर पेरता येते. पेरलेली साखर टरबुजाच्या लालिम्यावर चमकतेही छान आणि टरबुजाच्या माफक गोडव्याला अजून गोड बनवते. हा प्रयोग कुणी खरबुजांवर केल्याचे खाण्यात, पाहण्यात किंवा ऐकिवात नाही.


एप्रिल महिन्यात रामनवमी येते आणि हनुमान जयंतीही. रामफळ रामनवमीच्या सुमारास पिकते, म्हणून त्याला हे नाव मिळाले असावे. कृषी विद्यापीठांनी रामफळ अन्‌ सीताफळ यांचा म्हणे संकर केलाय आणि त्याला नाव दिलंय हनुमानफळ.


तुमच्या घरात जर पंचांग नावाची पुस्तिका असेल, तर चैत्र महिना काढून पाहा. शुक्ल पक्षातील अनेक तिथींसमोर अमुक देवाला दवणा वाहणे, तमुक देवाला दवणा वाहणे असे आणि पौर्णिमेला सर्व देवांना दवणा वाहणे- असं लिहिलेलं असेल. त्यातही रामनवमीच्या पूजेत दवण्याला महत्त्वाचे स्थान आहे.


सुमारे पंधरा ते तीस सेंमी उंच व सरळ वाढणाऱ्या या शाखायुक्त व लवदार सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड महाराष्ट्रात जेजुरी व आळंदी भागात विशेषत्वाने केली जाते. दवण्याच्या खालच्या, मधल्या व वरच्या पानांच्या आकारात फरक असतो. खालून वर पानांची विभागणी कमी होत जाते. फुलोरे गोलसर, पिवळट हिरवे, लहान व मंजिरीत मार्च-एप्रिलमध्ये येतात. दवण्याचा समावेश सुगंधी वनस्पतीत होतो. दवणा तेल पिंगट, दाट, सुगंधी असून उच्च प्रतीच्या अत्तरात वापरतात.


आपल्या ऋतुचक्रात आपण शेती आणि वनस्पतीसृष्टीशी निगडित असणाऱ्या आपल्या खाद्यसंस्कृतीचाही विचार करणार आहोत, अर्थात फक्त शाकाहाराचा. शाक म्हणजे भाजी. भाज्यांचा या दृष्टीने विचार करता, शाकाहारात दडलेली विविधता मोठी वेधक आहे. ऋतुमान, तिथीप्रमाणे येणारे विविध सण आणि दिवसाच्या विविध वेळा यांची अप्रतिम सांगड घातलेली आपल्या खाद्यसंस्कृतीत दिसते. चार हजार वर्षांपूर्वीची शाकाहाराची परंपरा असलेले राष्ट्र म्हणून भारत देश जगभर प्रसिद्ध आहे. पूर्वी मानवाचा आहार म्हणजे झाडांची कंदमुळे, पाने-फुले, बिया, फळे असाच असायचा. डॉ. भालचंद्र नेमाडे एका भाषणात असं म्हणाले होते की- पूर्वीचा माणूस स्वयंपाक असा करतच नसे. दिवसभर भटकता झाडांचे जे-जे मिळाले ते, जसजसे मिळत जाईल तसतसे खात जायचा. त्यामुळे दिवसभरात सुमारे दीडशे प्रकारच्या वनस्पती रोज त्याच्या पोटात जायच्या. आता आपल्या आहारात गहू, तांदूळ, तूर, मूग, ज्वारी एवढ्याच वनस्पती राहिल्यात. आपण रोज कुकर लावतो. त्यात तांदूळ आणि डाळ शिजते. शिवाय पोळी किंवा भाकरी. बस! रोजचे जेवण असे मर्यादित वनस्पतींचे झाले आहे. म्हणून आपला महाराष्ट्र ‘राकट, कणखर आणि दगडांचा देश’ उरलेला नाही. आपण जरा आपल्या ऋतुचक्रातून वनस्पतींचे हे प्रमाण वाढवत-वाढवत नेऊ या.


एप्रिल महिन्यात मराठवाड्याच्या ग्रामीण भागात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे प्रमाण जवळजवळ शून्यावर आलेले असते. शेती प्रामुख्याने जिरायती- म्हणजे कोरडवाहू- असल्याने हिरवाई फारशी कुठे दिसत नाही. महानोरांच्या कवितेत दुष्काळाच्या चित्रणात आलेली असतात तशी उजाड, भकास राने दिसतात. स्वयंपाकघरातसुद्धा भाज्या अशा दिसत नाहीत. अशा वेळी कल्पक गृहिणींनी वाळवून ठेवलेल्या भाज्या बाहेर काढल्या जातात. त्यात हरभऱ्याच्या पानांची भाजी प्रमुख असते.


हरभरा हे रब्बीचे पीक. उन्हाळ्याच्या तोंडाशी घरात, गोदामात, बाजारात येणारे. या हरभऱ्यावर आंब पडण्यापूर्वी त्याचा कोवळा पाला खुडून वाळवलेला असतो. त्याची पिठल्यासारखी केलेली भाजी छान लागते. त्यात शेंगदाणे टाकणे आणि वरून लसणीची फोडणी देणे आवश्यक. फोडणीतला लसूण खमंग आणि स्वादिष्ट लागायचा असेल, तो करपूरन काळसर लाल व्हायला हवा. ही फोडणी पुन्हा तयार झालेल्या भाजीवर वरून टाकायला हवी. एरवी लसूण टाकला आहे, असं मुद्दाम सांगावं लागतं आणि सांगितलं, तरी जिभेला ते पटत नाही. उन्हाळ्यात वाळकाच्या वाळवून ठेवलेल्या उसऱ्यांचीही भाजी करतात. भाकरी कशाबरोबर तरी लावून खावी लागते ना! काही नसेल तर तेलात दाण्याचा किंवा तिळाचा कूट टाकून केलेला भुरकाही चालतो. त्यात करपून लाल-काळा झालेल्या लसणाची भूमिका मात्र महत्त्वाची.


अंबाडीची भाजी शेतात वाढायला फार पाणी मागत नाही. उसात हरवाड म्हणूनही ती टाकलेली असते. कापसाच्या ढेल्पातदेखील ती टाकतात. चवीला आंबट, तिखट व कडवट असते. या भाजीवर अनेकदा लिहून मला कंटाळा आलाय. करणाऱ्याच्या सुगरणपणावर तिची श्रेष्ठता ठरते. उन्हाळ्यात पर्याय नसल्यामुळेही ती खातात. ती नियमितपणे मात्र खाऊ नये. तोंड येऊ शकते, रक्तपित्ताचा त्रास होऊ शकतो. अंबाडीची जून झालेली भाजी अजिबात खाऊ नये. त्यामुळे पोटदुखी, शौचाला खडा होणे, वगैरे त्रास होऊ शकतो.


मी एक खवैय्या आहे- उत्तम खवैय्या! आठवी ते एम.ए. अंतिम असा दहा वर्षे स्वत:चा स्वयंपाक स्वत: केला, तो गरीब परिस्थितीमुळे नव्हे; तर आपल्या हाताने नानाविध पदार्थ करून खाता यावेत, म्हणून. माझा हा पैलू प्रकाशात येईल, तेव्हा कुणी तरी माझी मुलाखत घ्यायला येईल. तेव्हा ते मला प्रश्न विचारतील, ‘तुमचा सर्वांत आवडता खमंग पदार्थ कोणता?’ त्याला उत्तर असेल- ‘कोहळ्याचे वडे’.


कोहळा हा अतिशय गुणवंत पण उपेक्षित आणि दुर्दैवी माणूस आहे. म. वि. आपटे यांच्या ‘वनश्रीसृष्टी’ या महान ग्रंथात कोहळ्याबद्दल त्यांना मोठ्या मुश्किलीने चार-सहा ओळी खरडता आल्या. शिवाय म्हणाले की, ‘कोहळ्याचे फूल पाहण्यात आले नाही, म्हणून चित्र देता आले नाही.’ वा रे वा! हे काय कारण झाले? वेलभाज्यांमध्ये हा सर्वांत मोठा वाढणारा वेल. विहीर खांदली तेव्हा खूप मुरूम व खडक निघाला. त्याचा वीस बाय तीस असा प्रचंड मोठा ढीग. त्यावर सोडलेले कोहळ्याचे वेल आणि त्याला लागलेली बेसुमार फळे अजून माझ्या डोळ्यांसमोर आहेत. कोहळा वर्षभर ठेवूनही छान राहतो. त्याला शेणाच्या गोवऱ्यांच्या राखेत ठेवतात. तो इतक्या मोठ्या आकाराचा असतो की,  चार घरी वाटण्याला पर्यायच नसतो. खेड्यात मुद्दाम तो कुणी लावत नाही. म्हणून असाच कुणी आणून दिला तर, माझा आनंद गगनात मावत नाही. साठ वर्षे कोहळ्यासाठी हपापलेपणाने काढून झाली नि पुण्याला आलो. तर, इथे चक्क मंडईत विकायला कोहळा! पुण्यासारखे महान शहर नाही, जिथे कोहळा बारा महिने मिळतो.


गंमत म्हणजे, प्रत्यक्ष व्यवहारात लोकांना आवळा देऊन कोहळा काढण्याची कला अवगत झालेली असते. द्यायचा आवळा माहीत असतो, पण काढायचा कोहळा पाहिलेला नसतो. कोहळ्याविषयी आणखी एक गैरसमज म्हणजे, त्याच्या पृष्ठभागावर जो मेणचट पावडरीचा थर असतो, त्याच्यावरून फिरवलेला हात जर आपल्या केसांवरून (चुकून) फिरला तर म्हणे, आपले केस पांढरे होतात. मराठवाड्यात त्याची कोवळी फळे अशी मिळत नाहीत. त्यामुळे कोणी फुकटचा जून कोहळा आणून दिला, तर त्याचे करायचे काय- हा प्रश्न असतो. पेठा करायचा, तर आग्य्राला जावे लागते! खराखुरा सुंदर उपयोग करायचा, तर विश्वास वसेकरांची आपली ओळख नसते. तेव्हा अनेक जण ‘आम्हाला नको’ म्हणून घरी चालून आलेली कोहळ्याची मोठी फोड परत करतात!


दूध फटने का गम उसे सताता है

कलाकंद बनाने का हुनर जिसे नहीं आता है ।


तर, आता जगातला सर्वांत खमंग पदार्थ. उदडाची डाळ आदल्या दिवशी भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी कोहळा किसायचा. त्यात खूप पाणी असतं. कीस पिळून बाजूला ठेवायचा. उडदाची डाळ मिक्सरमधून ओबडधोबड काढायची. खरं तर पाट्या-वरवंट्याची मजा मिक्सरमधून मिळत नाही. कीस, वाटलेली डाळ, त्यात थोडी मेथीची पाने, कोथिंबीर, हिंग, जिरे, धने वगैरे टाकायचे आणि तिखट, मीठ, हळदही अर्थात. त्याचे वडे तळून काढायचे. आहाहा! पृथ्वीतलावरची सगळी खमंगाई त्यात  उतरलेली असते. मग हे गरमागरम वडे गरम-गरम भातात कालवून खायचे. त्या दिवशी दुसरे काहीच खायचे नाही. वरण, पोळी, चटणी इत्यादी काहीच नाही. वनपीस ॲटम. मग दिवसभर इतकी सुंदर तहान लागते म्हणता! समुद्राचं पाणी प्यायलात, तरी ते शहाळ्यासारखं मधुर लागेल आणि सारखं पाणीच पीत राहावं, असं वाटेल. अर्थात चवीचा उत्सव साजरा करणे, हा आपला मुख्य हेतू. कोहळा अत्यंत पौष्टिक असतो, ही बाब आनुषंगिक आणि गौण!


आता उरलंय कोहळ्याचं पाणी. त्यात उडदाच्या डाळीचा भरडा, कीस, मेथी, कोथिंबीर, तिखट, हळद इत्यादी हवेच. फक्त कुठल्याही परिस्थितीत त्यात मीठ टाकायचे नाही. हे वडे प्रखर उन्हात वाळवायचे, दोन-तीन दिवस. ऊन कमी असेल, तर ओले वडे तिथेच विटतात! त्यांना खण्णक वाळेपर्यंत सारखं प्रखर उन्हात ठेवायचं. या वड्यांची भाजी बारा महिने करता येते. अतिशय खमंग लागते. भाजी करताना आधी वडे तेलात चांगले परतायचे नि मग पाणी टाकायचे. मग मीठ. उन्हाळ्यात भाज्यांच्या दुष्काळात या वड्यांची भाजी छानच लागते. इति कोहळा पुराणम्‌. चुकलो, इति कुष्मांड पुराणम्‌!

Tags: सदर एप्रिल नवे ऋतुचक्र विश्वास वसेकर sadhana series april nave rutuchakra vishvas vasekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात