डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

वर्षातून तीन वेळा बहरणाऱ्या कमलपुष्पाचा हा मधला हंगाम. देवीचे भोगाव नावाच्या गावाला लागून कमळांचे तळे आहे. भोगाव आणि कमळाला माझ्या भावविश्वात विशेष स्थान आहे. त्यामुळे कमळ म्हटले की, मन हुरहुरते. गावाजवळ तळे असणे आणि त्यात कमळं असणे- किती सुंदर, नाही का? अशा गावात मी सबंध वर्षभर राहिलो आहे, हे माझे भाग्य. कमळाचे म्हणजेच कमलपुष्पाचे आठ रंग आढळतात. त्यावरूनही त्याला नावे पडली आहेत. निळ्या रंगाच्या कमळाला नील कमल, नीलोत्पल अशी नावे आहेत. हिंदीत सुंदर चित्रपटगीतं लिहिणाऱ्या कवीचे नाव आहे इंदिवर. इंदिवर म्हणजेच नील कमल. पांढऱ्या रंगाच्या कमळाचे नाव आहे पुण्डरिक. पिवळ्या रंगाच्या कमळाचे नाव आहे सुवर्णकमळ. सर्वोत्कृष्ट चित्रपटाला देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कारात एक सुवर्णकमळ देतात! प्रत्येक रंगाच्या पुन्हा कथा आहेत.

 

इंग्रजी आणि मराठी महिन्यांचा कितीही घोळ झाला तरी ऑगस्ट आणि श्रावण यांची संपूर्ण ताटातूट कधीच होत नाही. शिवारात, शेतात आणि घर-अंगणातही ‘बरखा बहार’ आलेली असते. एका अर्थाने हा प्रेमिकांचा ॠतू असतो. पावसाकडून आपले निरनिराळे स्वार्थ या मंडळींना साधून घ्यायचे असतात. ‘रुक रुक के बरस के वो आ सके और आने के बाद इतना बरस के वो जा न सके...’ वगैरे. बेडूक, मोर यांच्याशिवाय कविजनांचा हा आवडता ॠतू आहे. पावसाइतक्या कविता मराठीत तरी कुठल्याच ॠतूबद्दल लिहिल्या गेल्या नसतील. उदाहरणार्थ- मोरोपंत, अनिल, इंदिरा संत, बोरकर, ग्रेस यांच्या कविता. पावसाळा आला की, जमिनीतून अंकुर बाहेर यावेत तशा पाडगावकरांना कविता सुचायच्या. पावसाची रिमझिम सुरू झाली की, एखाद्या मोठ्या दैनिकाला पावसाच्या कविता पानभर देण्याची बुद्धी होते आणि त्या नव्या-जुन्या कवितांत आपण हरखून जातो. रेडिओ लावला की, विविध भारतीवर सगळ्या पावसाच्या गाण्यांचाच एक कार्यक्रम असतो. ‘श्रावणझड’ बाहेरी, अंतरी मी भिजलेला’ अशी आपली अवस्था असते. असे होण्यासाठी आपल्या संवेदनाची पंचद्वारे उघडून पाऊस ‘आत’ घेण्याची तरल मानसिकता मात्र हवी.

अशाच एका ऑगस्ट महिन्यात कवी बोरकरांचे पाडगावकरांना पत्र जाते, ‘लवकर गोव्यात येऊन जा. इकडे सर्वत्र हिरवा ऑर्केस्ट्रा बहरला आहे.’ खरोखर पावसाळा म्हणजे हिरव्या रंगाचा महोत्सव आहे. याच बोरकरांनी कविता लिहिली- ‘बांगड्या बघा या, श्रावण लावण्यराज लागला खुलाया’! ऑगस्ट महिन्यात दहावीच्या मुलींना पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगितला की, त्यात एक वाक्य हमखास येते, ‘संपूर्ण सृष्टीने जणू हिरवा शालू  पांघरला आहे.’ या उपमेचा लिहिणाऱ्याला कंटाळा येत नाही आणि वाचणाऱ्यालाही, इतकी ती आर्ष आणि सुंदर आहे. लग्न कितीही घाईत झाले, तरी आंतरपाटासमोर उभी असलेली नवरी हिरवा शालू पांघरलेलीच असणार. सृजनाचा रंग आहे हा आणि ऑगस्ट सृजनाचा महिना असतो. सगळीकडे हरित तृणांच्या मखमालीचे हिरवे गालिचे पसरणारा. मन कसे तृप्तीने मोहरून आलेले असते.

ऑगस्ट महिना आणखी एका वैयक्तिक कारणासाठी माझा आवडता आहे. असं म्हणतात की, संपूर्ण पावसाळाभर देव झोपलेले असतात. ते पाहून ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेला देवांची झोपमोड न करता मी आईच्या कुशीतून हळूच बाहेर आलो आणि त्यानंतर आयुष्यभर कधी देवांच्या समोर गेलो नाही. हिंदुस्थानात राहण्यामुळे देव-देवळांच्या ठेचा वारंवार लागत गेल्या, पण एकाही देवाला कधी ‘हाय-हॅलो’ केले नाही. आई, आज्जीपासून सगळ्यांचा देवलसेपणा मात्र एन्जॉय केला- विशेषतः श्रावणात. वडाच्या झाडाला बांधलेल्या तीस-तीस फूट उंच झोक्यांची भीती वाटायची म्हणून नागपंचमीला कधी झोके खेळलो नाही आणि बहीण नसल्यामुळे कोणत्याही राखीपौर्णिमेला या मनगटावर कधी राखी बांधून घेतली नाही. नास्तिक असल्याचे पाहून सगळे सण माझ्याकडे पाठ करून निघून गेले. त्यामुळे सृष्टीबरोबर आगळा निसर्गोत्सव साजरा करायला मी कायम मोकळाच होतो. त्यामुळे मी घरात कमी अन्‌ शेतात जास्त असायचो.

शेतात अबक पेरणीची खरिपाची पिके बहरलेली असत. मराठवाड्यात मूग आणि बाजरी मोठ्या प्रमाणात पेरली जाते. शेतमजुरांच्या घरातली ज्वारी संपते तेव्हा महिना-दोन महिने मुगाचीच भाकरी खाल्ली जाते, एवढे मुगाचे महत्त्व. तूर आणि कापसाचे पीकही चांगलेच फोफावलेले असते. कापसाच्या पिकात तुरीचे पाटे घातलेले. लाकडी छतात जशी ठरावीक अंतराने तुळई किंवा नाट असते, तशा तुरीच्या रांगा दिसत. ज्यातून ताग निघतो, ते अंबाडीचे पीकही कापसात पेरलेले असे. मधेच उंच वाढणारी अंबाडी. मला तिचे फूल फारच सुंदर वाटायचे. गे्रसच्या शब्दांत बदल करून म्हणायचे झाल्यास, ‘शपथेवर मज आवडती अंबाडीचे व्याकूळ डोळे’. ही अंबाडी कोवळी असताना तिची पानं तोडून छान भाजी होते. अंबाडीची भाजी गरम-गरम, दोन-चार भाकरी नरम-नरम. तिळाचे पीकही याच काळात घेतले जायचे. आजीचा आग्रह असायचा- कापसाच्या ढेल्यात चवळी, गवारी, भेंडी या भाज्या लावण्याचा. त्याप्रमाणे त्या आढळायच्या. माझ्या लहानपणी सोयाबीन नावाचे पीक नव्हते. आता खरिपात सोयाबीन घेतात म्हणे. मी शेतातलं सोयाबीन कधी पाहिलंच नाही. अंबाडीप्रमाणे कापसाची पिवळीधम्म गेंदबाज फुलं मोठी सुंदर दिसतात. काढणीनंतर कापसाच्या शुष्क काड्यांना पऱ्हाट्या म्हणत, तर तुरीच्या शुष्क काड्यांना तुऱ्हाट्या!

सुगरण बायका अंबाडीची भाजी शेतातून स्वतःच्या हाताने खुडून आणतात. खुडताना एकेक कोवळे पान, त्याचे देठ मुळीच येऊ न देता खुडावे लागते. कारण देठ शिजत नाहीत. कण्या घालून शिजवलेली भाजी बेहतरीन होते. या भाजीला तेल खूप लागते, त्याच्याशिवाय मजा नाही. पानांना सुंदर हिरवा रंग असतो. अंबाडीपेक्षा कोथिंबीरचा हिरवा रंग मला आवडतो. एका लोकगीतात हिरव्या बांगड्यांना उपमा दिली आहे, ‘हौसेनं भरला गं हाती कोथिंबिरीचा चुडा!’ ऑगस्ट महिन्यातले हिरव्या रंगाचे माहात्म्य गावे तेवढे कमीच!

घरातदेखील एक छोटेखानी निसर्ग असतो. अंगणात आणि परसात. देवपूजेला शोभिवंत आणि उपयुक्त फुलझाडं असतात; तर कढीपत्ता, शेवगा, लिंबोणी यांसह भाजीपाला असतो. ही असते माझ्या आईची बागशाही. अंगणात तुळशीवृंदावन असते. निरनिराळी फुलं- विशेषतः मोगरा असतो. माझ्या लहानपणी एक दुपारतीचं, क्षीण लाल रंगाचं, रूपानं अत्यंत साधारण असं एक झाड अंगणात असायचं. बहुसंख्य फुलं सकाळीच फुलतात. सकाळी देवाला करायची ती भूपाळी, काकड आरती. रात्री करायची ती शेजारती. पण दुपारी? दुपारी हे एकच फूल उमललेलं असायचं. धुपारती म्हणजे दुपारच्या पूजेच्या वेळी, म्हणून त्याला महाप्राण काढून नाव मिळालं- दुपारती. समोरची फुलबाग आणि मागची परसबाग याची निगराणी मोठ्या प्रेमानं, भल्या सकाळी उठून माझी आईच करायची. मी झोपेतून उठायच्या आत तिचं सडा-सारवण आणि बागेत काम करणं आटोपलेलं असायचं. बागशाही हा सुंदर शब्द मला लोकगीतात भेटला. घरातलं प्रत्येक काम आवडीनं करणं हेच तिचं राज्य असायचं. तिथं फक्त तिची सत्ता चालायची, सासूची नव्हे.

सकाळी उठूनऽ कामाची घाई घाई

काम नव्हंऽ बाई माझी ती बागशाही!

या बागशाहीची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणजे माझी आई! अर्थात ग्रामीण स्त्री.

पावसाळा आला की सगळ्यात आधी मला कदंब पाहायचा असतो. ऑगस्ट हा कदंबाच्या फुलण्याचा महिना. कदंबाविषयी वाचले खूप, पण साठ वर्षे मराठवाड्यात राहणाऱ्याला तो दिसणार कसा? तरी या पठ्ठ्याने मराठवाड्यातच कदंबाचे झाड शोधले. जालन्याहून औरंबादला जाताना चिखलठाण्याच्या अलीकडे उजव्या हाताला मी स्वतः त्याला शोधून काढला. तो आनंद अवर्णनीय होता. साठीनंतर पुण्याला आलो आणि कदंबतृप्त झालो. त्याआधी अठ्ठावन्न वर्षांपर्यंत नोकरी केलेल्या माझ्या महाविद्यालयात निरोप सभारंभाच्या दिवशी कदंबाची दोन झाडं लावून आलो. नूतन महाविद्यालयातला हा कदंब दोन मजल्याच्या इमारतीपेक्षा उंच गेला आहे. फक्त त्याच्या खालून यमुना वाहत नाही, एवढीच आता खंत आहे. पुण्यात आता खूप कदंब आहेत. वीस-पंचवीस मीटर उंच वाढू शकणारा, भरदार पर्णसंभार असलेला आणि नारंगी रंगाची गोल गोटीदार सुवासिक फुलं म्हणजे सौंदर्याची परिसीमा! पाऊस आला की, लगेच त्याला पाहायला जा. फार थोडा काळ याचा बहर राहतो. उशीर झाला तर फुलांच्या जागी लटकणाऱ्या फळाच्या काळ्या, शुष्क गुंड्या पाहाव्या लागतील!

मी मोठा प्लॉट घेऊन पहिले घर बांधले, तेव्हा मला झाडांची घाई झाला होती. म्हणून मी बकाना नीम आधी लावला. कडुलिंबाशी त्याचे पुष्कळ साम्य असले, तरी अनेक बाबतींत तो वेगळाही आहे. त्याची पानं बायपिनेट किंवा ट्रायपिनेट असतात. फुलं निळसर-जांभळट पांढरी असतात. फळं गोल आकाराची असतात. एवढा फरक असल्याने चटकन ओळखू येतो. ऑगस्ट महिन्यात बोराच्या झाडाला हिरवट पिवळसर फुलं येतात. सागवानाची फुलंही पाहण्यासारखी असतात. फुलकोबीच्या मोठ्या गड्ड्यासारखी झुबक्या-झुबक्यांनी ती दिसतात. श्री क्षेत्र माहूरच्या डोंगरावर त्यासाठी जायला पाहिजे. शंकासुर म्हणजे छोटासा गुलमोहरच. पावसाळा आणि वसंत ॠतूत फुलत असला, तरी वर्षभर तो सुंदर फुललेला दिसतो. त्याचे लांबलचक पुंकेसर मोराच्या तुऱ्यासारखे दिसतात, म्हणून याचे नाव पिकॉक फ्लॉवर असं अर्थपूर्ण नाव आहे. याच काळात कुंतीचा छोटेखानी, नखशिखान्त सुंदर असणारा वृक्ष पाहायला हवा. रातराणी, बकुळ व पारिजातक यांचा एकत्र परिमळ कुंतीच्या फुलांत जरूर अनुभवायला हवा. कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये किंवा पुण्यात खुन्या मुरलीधर मंदिराच्या बागेत सुंदर फुललेले वृक्ष दिसतील.

मुचकुंद हे एक देखणेबल आणि सखोल हुंगणेबल झाड आहे. पानाच्या मोठ्या आकारावरून ते सहज ओळखता येते. अनेक उद्यानांमध्ये कित्येक वर्षांपासून ते लावलेले दिसेल. कोल्हापूरचे टाऊन हॉल गार्डन, मुंबईचे जिजामाता उद्यान, पुण्याचे एम्प्रेस गार्डन वगैरे. तुळशीबागेत फार मोठा मुचकुंद आहे. पावसाळ्यात त्याला मोठी पांढरी, सुगंधी आणि रूपवान फुलं येतात- मार्चपर्यंत राहतात.

ऑगस्टमध्ये फुलणारे आणखी एक गमतीचे झाड आहे- भद्राक्ष. छोट्या-छोट्या पिवळ्या फुलांच्या तुऱ्यांनी नटलेले हे झाड बागेत शोभून दिसते. याच्या फळाशी रुद्राक्षाचे साम्य असल्याने आणि इतर काहीच न सुचून याचे नाव भद्राक्ष पडले असावे.

नुसतं पानांचं सौंदर्य पाहायचं असेल, तर ऑगस्टसारखा महिना नाही. विपुल पावसामुळे झाडं आतून तीव्रतेने हिरवाई प्रक्षेपितात. शिवाय झाडांवरची धूळ पावसाने धुऊन निघाल्यामुळे रस्त्याकाठची सगळीच झाडे त्यांच्या मूळ रंगात येतात. गुलमोहर, बाभूळ यांच्या पानांचा तसेच साग, बांबू यांच्या नव्याने फुटलेल्या पानांचा रंग उत्कट दिसतो.

हिरवेपणाच्या निकषावर माझे एक आवडते झाड आहे, हिवर. बाभळीइतक्या मोठ्या प्रमाणात हे झाड सर्वत्र पाहायला मिळतं. बाभळीची साल काळपट तपकिरी रंगाची असते, तर हिवराची पांढरट पिवळी असते. ‘गोईण’ नावाच्या सुंदर पुस्तकात सासऱ्याच्या वाईट नजरेपासून सुनेला हिवराच्या झाडाने कसे वाचवले, याची गमतीदार गोष्ट दिली आहे. आदिवासी स्त्रिया झाडांना आपली मैत्रीण मानतात. मैत्रिणीसाठी आदिवासी भाषेत शब्द आहे- ‘गोईण’.

महाराष्ट्रात खऱ्या बदामाचे एकही झाड नाही. जागोजागी, रस्त्याच्या दुतर्फा विपुल प्रमाणात (खरं तर नकोइतका) दिसतो तो आहे खोटा बदाम- टरमिनालिया कटाप्पा. आपण खातो ते खरे बदाम आपल्या देशात पिकत नाहीत. जे येतात ते इराण आणि उत्तर अमेरिकेतून. मला खोटा बदाम आवडतो तो जानेवारी-फेबु्रवारीत पानगळीच्या वेळी, त्याचा रंग बदलतो तो पाहताना गळण्यापूर्वी’ नावाची बोरकरांची कविता या खोट्या बदामाविषयीच असावी. आपल्या देशात अमेरिकेसारखे पानगळीचे सौंदर्य नाही. खोटा बदाम हे ‘पर्णांचा वर्णोत्सव’ दाखवणारे झाड आहे. त्याचे एखादे तरी पान बाराही महिने लालभडक, किरमिजी लाल किंवा भगवे लाल झालेले पाहायला मिळेलच. ऑगस्टमध्ये याला हिरवे बदाम येतात, रस्त्यावर पडतात. कुणी खात नाहीत आणि खाऊही नयेत.

निसर्गप्रेमात देशीवाद आणणाऱ्यांसाठी उत्तम व सणसणीत उत्तर आहे- हादगा. मराठी संस्कृतीमध्ये कुमारिकांच्या भावविश्वामध्ये ‘हादग्याची गाणी’ किती महत्त्वाची, सखोल रुजलेली आहेत; नाही का? शैला लोहियांच्या ‘भूमी आणि स्त्री’ या लोकसाहित्याच्या ग्रंथात वाचा. लोकसाहित्य म्हणजे दोन्ही अर्थाने ‘अपौरुषेय’ वाङ्‌मय. ‘भोंडला’ किंवा ‘भुलाबाई’चा उत्सव आश्विन महिन्यात मुली साजरा करतात, त्यात ही हादग्याची गाणी असतात! स्त्रियांना माहेरचा विसर कधीच पडत नाही. माहेर आणि सासर या दोन टेकड्यांतून वाहणाऱ्या नदीसारखे त्यांचे जीवन असते. हादग्याची गाणी या दोन्ही काठांवरून फुलत जातात. हादगा हे झाड आपल्या लोकसंस्कृतीत इतके प्राचीन आहे. हे झाड मूळचे आपल्या देशातले नाही, ही वस्तुस्थिती स्वीकारणे अवघड जाणारे आहे. पण ती वस्तुस्थिती आहेच.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटी हे झाड फुलत जाते. हे फूल चार ते आठ सेंमी लांबीचे, पिवळसर पांढरे, गुलाबी किंवा जांभळट असते. त्यांची भाजी आणि भजी करतात. ‘फुले पितरांच्या पिंडपूजेला विशेष प्रशस्त मानतात.’

हादग्याचे एक नाव अगस्ता आहे. त्याचा अगस्ती-ॠषीशी काही संबंध नाही. अगस्ती दिशा म्हणजे दक्षिण दिशा. त्या दिशेकडील मलेशियापासून उत्तर ऑस्ट्रेलियापर्यंतचा भाग हे हादग्याचे मूळ वसतिस्थान असल्यामुळे त्याला ‘अगस्ता’ हे नाव पडले असावे. त्याचं सोपं रूप झालं हादगा. याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे सेस्बानिया ग्रँडिफ्लोरा. सेस्बानिया हे प्रजातिनाम हादग्याच्या अरबी नावावरून तयार केलं गेलंय. गँडिफ्लोरा म्हणजे मोठी फुले असलेला. ‘विदेशी वृक्ष’ या ग्रंथात अशा रीतीने हादग्याचा समावेश करताना त्याचे ‘विदेशीयत्व’ पटवून दिल्यानंतर ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री.द.महाजन कळवळून म्हणतात- ‘ज्या काही थोड्या विदेशी वृक्षांना भारतीयत्व द्यायला हरकत नाही, त्यात हादगा निश्चित!’

बहर म्हणजे वास्तविक वसंत. तरीही ‘बरखा बहार’ शब्द का तयार झाला? पावसाळ्यात फुलण्याचा एक आगळा वसंत असतो, म्हणून कदाचित. ऑगस्ट महिन्यात आवर्जून अनुभवावी जाईची बरखा बहार. जुई आणि जाईत फरक करता आला पाहिजे. जाईची पाने संयुक्त आणि जुईपेक्षा जास्त काळसर असतात. जाईला हिंदीत चमेली म्हणतात. हा एक बहुवर्षायू वेल असून मांडवावरही तो छान फुलतो. पुण्याच्या अहल्यादेवी शाळेच्या गेटवर याचा छान लोखंडी मांडव घातलेला आहे. ‘इक चमेली के मंडुवेतले’ जाण्याचे सुख तिथे आहे. या मांडवाला गदिमांनी ‘जाईचे स्नानगृह’ म्हटले आहे. किती सुंदर कल्पना!

रिमझिम पाऊस पडतो बाई

भिजतो मांडव, भिजते जाई

पानोपानी ओली सळसळ

करी गुदगुल्या वारा अवखळ

कळीकळीचे शहराते दळ

सुगंध आतील देत जांभई

शुभ्रता आणि सुगंध हे जाई-जुईप्रमाणे बासमती तांदळाचे वैशिष्ट्य. म्हणूनच का कवी बोरकरांनी लिहिले असेल- आणि मग ‘सेवीन मी जाई-जुईचा गे भात?’

अबोली फुललेली पाहावी याच महिन्यात. या फुलांच्या रंगावरून त्या प्रकारच्या रंगच्छटेला किंवा रंगालाही अबोली रंग हे नाव पडले. हा नेमका रंग बायकांना जास्त कळतो! कोरांटीसारखे हे झुडूप सुमारे साठ सेंमी उंच, लहान, बहुवर्षायू असून मूळचे श्रीलंकेतले आहे. याचे फूल मुखाकृती असते. गंध म्हणजे वास्तविक फुलाची बोली. अबोलीला गंध नसतो, म्हणजेच बोलता येत नाही- म्हणून ती अबोली. कोकणातले हे लाडके फूल आहे. गोव्यात आणखी दोन रंगांची अबोली भेटते. त्यातल्या फिकट पिवळ्या रंगाच्या अबोलीला ‘पिश्शी’ अबोली, तर भगव्या रंगाच्या अबोलीला ‘रतन अबोली’ म्हणतात. अंबाड्यात माळलेल्या रतन अबोलीच्या वेणीला बा.भ.बोरकरांनी उलट्या चंद्रकोरीची उपमा दिली आहे. ‘भगवी रतन अबोली वेणी अस्त उमथी कोर.’ अबोलीवरच्या आपल्या लेखाला शरदिनी डहाणूकरांनी ‘उगवतीच्या दीपकळ्या’ असे सुंदर आणि अन्वर्थक शीर्षक दिले आहे.

‘इश्क आणि मुश्क (म्हणजे मिशी) छुपाये नहीं छुपते’ अशी हिंदीत ‘कहावत’ आहे. ही कल्पना घेऊन मराठीत गाणं आहे, ‘लपविलास तू हिरवा चाफा, सुगंध त्याचा लपेल का? प्रीत लपवुनी लपेल का?’ ऑगस्ट महिन्याचा काळ हिरव्या चाफ्याच्या बहरण्याचा आहे. उग्र सुवासिकता असणारी लता ऑगस्टमध्ये फुलते. तिची पाने गुळगुळीत व चकचकीत असतात. दाट पालवीमुळे फुले दिसून येत नाहीत. फुलांचा रंगही पानात लपून जावा असाच पोपटी असतो. फुलाच्या देठाच्या आरंभी एक आकडी असते. तिने आधार पकडून ही वेल वर चढते. बहुवर्षायू, महाप्रचंड असणारी, लांबून एखाद्या झाडासारखी दिसते.

ऑगस्ट हा नाना प्रकारच्या वेलींच्या बहरण्याचा महिना आहे. मराठवाड्यात काटेरिंगणी नावाचा वेल विपुल प्रमाणात दिसतो. तिला ‘बिरबैंगण’ असेही म्हणतात. कानवेल किंवा खरचुंडी नावाची वेल, तिची सेरोपेजिया बल्बोझा प्रॉपर ही जात ऑगस्टमध्येच फुलते. गणेशवेल नावाची सुंदर, नाजूक वेल पुष्कळदा कुंपणावर आपोआप, न लावता आलेली, बहरलेली दिसते- गणपतीच्या काळात, म्हणून ही गणेशवेल. गारवेल हाही असाच सुंदर दिसणारा, पावसाळ्यात आणि क्वचित वर्षभर फुललेला दिसतो. गणेशवेलीचे फूल तांबडे असते, तर गारवेलीचे जांभळे-निळे! अनंतमूळ, करटुली, कडू करांदा, पिंपळी, पॅशनफ्रूट, भुई कोहळा, बदकवेल, रानजाई, लांबतानी, शिवलिंगी, वुडरोझ या ऑगस्टमध्ये बहरणाऱ्या काही वेली. शतावरी ही आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानली गेलेली वेल अलीकडे खूपच प्रचलित झाली आहे. दिसायला नाजूक आणि सुंदर असल्यामुळे दारावर तोरणासारखा लावलेला तिचा वेल माझे वनस्पती-गुरू डॉ.विनायक कोठेकरांकडे मी पाहिला आहे. शतावरीचे फूल पांढरे आणि सुवासिक असते.

तोंडले या वेलभाजीचा काही लोक विनाकारण तिरस्कार करतात. तो खाणारा माणूस निर्बुद्ध होता, ही ‘सरासर झूठ’ अफवा आहे. तोंडल्याची भाजी छानच असते. मी लोणचे मसाला वापरून त्याचे लोणचे करत असतो. कुर्रूम कुर्रूम दाढेखाली छान लागते. तोंडल्याच्या पिकलेल्या फळांना सुंदर गुलाबी रंग येतो. लालचुटूक अधर असणाऱ्या सुंदरीच्या अधरोष्ठाला पिकलेल्या तोंडल्याची उपमा देतात. तोंडल्यासाठी कोंकणीत ‘तेंडले’ असा शब्द असल्यामुळे विजय किंवा सचिनच्या गावाला ‘तेंडुले’ नाव पडले असावे. या कारणासाठी तरी महाराष्ट्राने तोंडल्याचे ॠणी असले पाहिजे.

जिरायती आणि बागायती या दोन्ही प्रकारच्या शेतांमध्ये पिकांना फुलं आलेली असतात. कारळ्याला पिवळी फुले आलेली असतात. महालक्ष्मीच्या सणाला खूप फुलं लागतात, त्या वेळी ही फुलं उपयोगी पडतात. कारळ्याची चटणी छानच होते. तिळाला फुलं आलेली असतात. हे तेलबियांचे झाड. केळीला कडक थंडी सहन होत नाही. उष्ण हवा आणि भरपूर पाणी तिला लागते. कोकणातली केळी वैशिष्ट्यपूर्ण असतात. तिच्या फुलाला कंबळ म्हणतात. ‘दारात लावलेल्या केळीच्या फुलात सूर्य उगवला’ असे कोकणात लोकगीत आहे.

खास कोकणातले आणखी एक सुंदर फूल म्हणजे सुरंगी. सुंदर केशरी परागांची व पांढऱ्या पाकळ्यांची नखाएवढी फुलं, पण जबरदस्त मोहक असतात. मी मराठवाड्यातील असल्यामुळे ‘वळेसर’ हा शब्द माझ्या साहित्यात कधी येऊ शकला नाही; पण सुरंगीच्या वेळीच फक्त तो वापरतात, हे मला माहीत आहे. स्त्रियांच्या तर डोक्यावरच हे फूल बसले आहे. बोरकर लिहितात,

प्रीतीचा गे दूत माझा हा सुरंगीचा सर

खोवुनी तू कुंतली गे गोविले अभ्यंतर

ऑगस्ट महिन्यात सह्याद्री परिसर, मावळ आणि कोकण भागात पाहावे असे सुंदर फूल आहे कळलावीचे. तिची फुलं अग्नीच्या रंगाची असल्यामुळे तिचे संस्कृत नाव अग्निशिखा आहे, तर इंग्रजी नाव ग्लोरी लिली! कळलावीची पानं तर फारच वैशिष्ट्यपूर्ण असतात. एका पेरावर तीन. हिरव्या  रंगाची, सहा सुट्या पाकळ्या असणारी फुलं सुरुवातीला हिरवी असतात. नंतर सरड्यासारखा रंग बदलून तो पिवळा, नारिंगी आणि लालबुंद होत जातो. कळलावी या नावाचा भांडाभांडीशी मात्र काहीही संबंध नाही हं! प्रसूतिपूर्व कळा म्हणजे वेणा! या वेणा येताना, कळा येताना या वेलीच्या कंदाचा औषधासारखा वापर होतो, म्हणून ती ‘कळलावी’. कळलावीसाठी बचनाग आणि खड्यानाग असेही नाव आहे. अशी अनेकानेक, इतरत्र दुर्मिळ असणारी फुलं पाहायला ऑगस्ट महिन्यामध्ये कोकणात जरूर जायला पाहिजे. सोनटक्का, कळलावी, सुरंगी, रतन अबोली अशा पुष्पांनी सुरम्य झालेला कोकण खरोखर श्रीमंत आहे!

ऑगस्टमध्ये जर पावसाची झड चालू असेल, तर कास पठारावर फुले उमलत नाहीत. पण चार-पाच दिवस जरी पाऊस थांबला, तरी या दिवसांत कास पठारावर काही वैशिष्ट्यपूर्ण फुले पाहायला मिळतील. कास पठारावरील पुष्पमहोत्सवाच्या तीनही महिन्यांत मोठ्या संख्येने फुलणारा म्हणजे तेरडा. बाल्सम कुटुंबातील ही छोटेखानी वनस्पती संपूर्ण सह्याद्रीभर पावसाळ्यात असते. तेरड्याचे प्रकार अनेक, तसेच त्याचे रंगही अनेक. तेरडा आणि सरडा यांत नुसता अनुप्रास नाही, तर रंगबदल हे वैशिष्ट्य आहे. मराठवाड्यात तेरड्याला ‘गुलछबू’ हे सुंदर नाव आहे. साधा हळुवार स्पर्श झाला तरी त्याच्या बिया तडतड असा हळुवार आवाज करीत फुटतात. का कुणास ठाऊक, पण लावणीकारांनी तेरड्याला ‘इश्कपेच’ असे नाव दिले आहे. मजेशीर आहे नं? मला गुलछबूतला गुलाबी रंग विशेष आवडतो.

ऑगस्टपासून कास पठारावर ‘हळुंदा’ नावाचा गच्च हिरव्या पानांचा आणि लाल-जांभळ्या फुलांचा वेल बहरायला लागतो. त्याचे शास्त्रीय नाव ‘व्हिग्रा वेक्सिलाटा’ आहे. रानपावटा असेही त्याचे नाव आहे. त्याचे (परागीभवनाच्या अजब तऱ्हेच्या विज्ञानामुळे) ‘हत्तीची सोंड’ असे नाव का पडले, ते समजून घेणे रंजक आहे. कास पठारावरील कंदीलपुष्प ‘सेरोपेजिया’ ही वनस्पती याच कारणाने रंजक आहे. कंदीलपुष्पाचे सत्तरपेक्षा जास्त प्रकार आहेत. सह्याद्रीवर वीस प्रकारची कंदीलपुष्पे सापडतात. चिमिन नावाचे फूल त्यांच्या निखळ, निव्वळ शुभ्रतेसाठी देखणे आहे.

वर्षानुवर्षे नव्हे, शतकानुशतके आपल्या मातीत उगवणाऱ्या-वाढवणाऱ्या-फुलणाऱ्या झाडांना विदेशी म्हटले की, मला फार राग येतो. गाजर गवत, वेडी बाभळ, निलगिरी यांसारख्या आपल्या पर्यावरणाला घातक असणाऱ्या काही अपवादांना वगळून टाका. त्यांच्या समूळ विनाशाच्या काही योजना आखा, पण बाकीच्यांना विदेशी म्हणून हिणवू नका. आपण तरी काही सहस्रकांपूर्वी विदेशातूनच  भारतात आलोत ना? असो. तर, अशा काही आपल्याशा, ऑगस्ट महिन्यात आपले लक्ष वेधणाऱ्या मित्रांचा थोडा परिचय करून घेऊ.

कोणत्याही सुंदर बागेत गेलं की, आपलं लक्ष वेधून घेणारं एक झाड आहे ‘ट्रॅव्हलर्स ट्री’ नावाचं. ताडमाडाच्या पाम कुळाशी नातं सांगणारा हा वृक्ष केळीसारख्या दिसणाऱ्या भरगच्च पानांचा सुंदर पिसारा फुलवून एखाद्या मोरासारखा ताटवा घेऊन उभा असतो. लांब-सडक देठामध्ये चक्क पिण्याचे पाणी असते. आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात वाटसरूंना प्यायला पाणी देण्याच्या त्याच्या या गुणामुळेच त्याचे ट्रॅव्हलर्स ट्री असं नाव पडलंय. बागेत दिसणारं आणि मोराशी नातं सांगणारं आणखी एक झाड- मोरपंखी. चीनमध्ये मूळ असल्यामुळे त्याचे नाव चायनीज थूजा असं आहे. चीनमधून आलेला आणखी सुंदर एक पामवृक्ष आहे- फाउंटन पाम. नारळ आणि सुपारी किंवा शिंदी यांच्या कुळातला हा वृक्ष दहा ते पंधरा मीटर सरळ उंच वाढतो. आमच्या सेलूला- कशी कुणास ठाऊक- गोंधळी गल्लीत याची दोन झाडे छान वाढलेली आहेत. बी कवींनी ज्याच्यावर कविता लिहिली, तो चाफा दक्षिण अमेरिकेतून आपल्या देशात आलाय, यावर विश्वास ठेवणे कठीण. याचे कधी कधी त्यालाही वाईट वाटत असावे, म्हणून तर ‘चाफा खंत करी, काही केल्या बोलेना’ असे बी कवी म्हणतात. असो. तांबडा चाफा हा एक पानझडी, छोटा वृक्ष किंवा मोठे झुडूप. तो पावसाळ्यात फुलत राहतो आणि त्याच्या अवर्णनीय सौंदर्याने खुलून दिसतो. उष्ण कटिबंधीय भारतात तो सर्वत्र आढळतो.

समुद्रकिनारी, बागबगीच्यात किंवा मोकळ्या आवारात आढळणारा सुरू किंवा कॅश्युरिना हा वृक्ष मूळचा ऑस्ट्रेलियातला आहे. इंग्रजी राजवटीत तो आणवला गेला. मराठीत याचे एक नाव ‘खडशेरणी’ असे आहे. समुद्रकिनाऱ्यावर त्याचे जंगल झालेले आढळते. कोणालाही नावानिशी ओळखू येईल, असं हे सर्वपरिचित झाड आहे. मला त्याचा पिवळाधम्म रंग आवडतो, पण सुरक्षित अंतर राखूनच प्रेम करावं असं झाडं आहे बिट्टीचं. कण्हेरीच्या कुळातली असल्यामुळे तिला पिवळी कण्हेर असंही म्हणतात. पण फूल कण्हेरीपेक्षा वेगळं, नरसाळ्याच्या आकाराचं असतं. ‘थेवेशिया पेरुव्हियाना’ असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. अत्यंत अनाग्रही आणि कुठल्याही परिस्थितीत रमणारं हे झाड दक्षिण भारतात फारच रमलंय. सगळ्याच कण्हेरींप्रमाणे हे अतिशय विषारी असं झाड असल्यामुळे त्याला गुरंही तोंड लावत नाहीत. रस्ता दुभाजकावर रांगेने लावलेली ही झाडे रस्त्याची शोभा वाढवितात.

वर्षातून तीन वेळा बहरणाऱ्या कमलपुष्पाचा हा मधला हंगाम. देवीचे भोगाव नावाच्या गावाला लागून कमळांचे तळे आहे. भोगाव आणि कमळाला माझ्या भावविश्वात विशेष स्थान आहे. त्यामुळे कमळ म्हटले की, मन हुरहुरते. गावाजवळ तळे असणे आणि त्यात कमळं असणे- किती सुंदर, नाही का? अशा गावात मी सबंध वर्षभर राहिलो आहे, हे माझे भाग्य. कमळाचे म्हणजेच कमलपुष्पाचे आठ रंग आढळतात. त्यावरूनही त्याला नावे पडली आहेत. निळ्या रंगाच्या कमळाला नील कमल, नीलोत्पल अशी नावे आहेत. हिंदीत सुंदर चित्रपटगीतं लिहिणाऱ्या कवीचे नाव आहे इंदिवर. इंदिवर म्हणजेच नील कमल. पांढऱ्या रंगाच्या कमळाचे नाव आहे पुण्डरिक. पिवळ्या रंगाच्या कमळाचे नाव आहे सुवर्णकमळ. सर्वोत्कृष्ट चित्रपटाला देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पुरस्कारात एक सुवर्णकमळ देतात! प्रत्येक रंगाच्या पुन्हा कथा आहेत. कामदेवाच्या म्हणजेच मदनाच्या बाणाने जखम झाल्याने महादेवाच्या रक्ताचे थेंब काही कमळांवर पडले आणि ती ‘रक्तकमळे’ झाली. आरक्त कमळ हे लक्ष्मीचे आसन असते, तर शुभ्र कमळ सरस्वतीचे. संस्कृत आणि प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक मराठी कवितेत कमळाला जेवढे स्थान मिळाले आहे, तेवढे कोणत्याच फुलाला नाही. हिंदू मुला-मुलींची नावे कमळावरून जेवढी आहेत तेवढी कोणत्याच फुलावरून नाहीत. सांगू? अरविंद, राजीव, पद्‌मपाणी, पंकज, नीरज, नलिनी, मृणाल, पुंडरिक, उत्पल, इंदिवर... पुरे?

कमळासारखे सुंदर फूल नाही. विस्तीर्ण अशा जलाशयात फुललेली हजारो कमळं पाहणे यासारखा नवलनयनोत्सव नाही. फक्त अट एकच आहे की- आपण त्याला आपल्या अंगणात आणू शकत नाही, तर त्याला मोठ्या संख्येने पाहायला आपल्याला घरापासून दूर जावे लागते. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराभोवती असणाऱ्या तळ्यात पूर्वी शेकडो सुवर्णकमळे होती. ज्यांनी ती पाहिली, ती किती भाग्यवान माणसं होती! कमळाएवढे सुंदर प्रतीक आणि प्रतिमा कवितेत डोलण्याचे भाग्य एकाही दुसऱ्या फुलाला लाभले नाही. ‘समिधा’ या कवितासंग्रहात कुसुमाग्रजांनी जीवनावरचे भाष्य करताना कमळाचे रूपक वापरले आहे. जी.ए. कुलकर्णींना पूर्वी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रखमाकाकू आठवतात, त्यांच्या तोंडी असलेल्या (महान कवितेच्या तोडीस तोड असणाऱ्या) या ओवीमुळे. स्वतंत्रपणेसुद्धा ही ओवी कमलवेडाने आपल्याला झपाटून टाकणारी आहे-

तिचे डोळे ग निळ्या कमळीचे फूल

त्यात आत आहे ग, माहेराची सांजसाऊल!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Vishal Shinde- 10 Oct 2020

    माहितीपूर्ण लेख परंतु फोटो कदंबचा नसून कळमचा आहे

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात