डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जानेवारी महिन्यात कोकणात जाऊन आवर्जून पहावे असे झाड आहे उंडीचे. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन त्याच्या पूर्ण बहराचे महिने. शुभ्र पांढऱ्या रंगाची, अतिशय सुवासिक अशी त्याची फुले असतात. नखशिखांत सुंदर असलेल्या या झाडाची पानेसुद्धा अतीव सुंदर असतात. साधी, मोठी, संमुख, जाडसर, चकचकीत हिरवीगार, पानांवरच्या शिरा एखादे चित्र काढल्यासारख्या स्पष्ट, आणि उठावदार असतात. मध्यशिरेच्या दोन्ही बाजूला अगदी जवळजवळ, असंख्य, समांतर उपशिरा असतात, त्यामुळे या पानांकडेसुद्धा पहावेसे वाटते. त्याचे वनस्पतिशास्त्रीय नाव आहे कॅलोफायलम इनोफायलम. या नावातील अनुप्रासाकडे लक्ष वेधत महाजनसरांनी कॅलोफायलम या ग्रीक शब्दाचा अर्थ सांगितलाय, ‘सुंदर पाने असलेला’, फळांना ‘उंडले’ म्हणतात आणि महत्त्वाच्या उपयुक्ततेमुळं ते गोवा, कर्नाटक आणि कोकणात बाजारात विकायलासुद्धा येतात. 

मी दोन ‘जंगली’ माणसं पाहिली- श्री.द.महाजन आणि मारुती चित्तमपल्ली. त्यांच्याइतकं जंगली होऊन जगता आलं पाहिजे. हिंदीत जंगली ही शिवी असली तरी महाजनसरांनी असं असण्यातला गौरव मला शिकविला. सध्या तोच माझाही प्रयत्न आहे. मी एक पुष्पपरायण माणूस आहे- फूलवेडा. त्यातही अस्सल भारतीय आहे. पाश्चात्त्यांना रंगीबिरंगी फुलं आवडतात, तर भारतीयांना सुगंधी. सगळ्यात लहानपणी माझ्यावर संस्कार झाले ते फुलांचा वास घेऊ नये, असे. कारण फुले म्हणे देवपूजेसाठी असतात. सुदैवाने मी आठवीत असताना घराबाहेर पडलो, परभणीला आलो आणि आधीचे सगळे वाईट संस्कार झुगारले. त्यामुळे पौगंडवयाच्या सुरुवातीपासून फुलांचा गंध घेण्यास मी मुक्त  झालो. 

परभणीलाच मी रंगीत अशी विदेशी फुलं एकत्रित एका बागेत पाहिली. अण्णासाहेब गव्हाणेंच्या घराच्या डाव्या बाजूला नगरपालिकेची ही बाग होती. आता त्यांची ओळख ग्लॅडिओला, जिरेनियम वगैरे नावांनिशी आहे. तेव्हा ही नावं माहिती नव्हती, पण सुंदर रंगांनी मी वेडावलो होतो. म्हणजे मी केवळ गंधवेडाच नाही, तर रंगबावराही आहे. 

फुलांविषयी कविता लिहावी तर मख्दूम मुहिउद्दीन यांनीच आणि गद्य लिहावं हंगळहळ्ळीकर आणि डॉ.शरदिनी डहाणूकरांनी... ‘फुलं रंगांची कथा, फुलं गंधाची गाथा, फुलं लावण्याची लेणी, फुलं नाचणारी गाणी. फुलं प्रीतीचा आधार आणि फुलातून समर्पणही साकार. प्रेमभरली भेट फुलं, सत्काराला फुलं आणि पूजेला फुलं.... फूल नसेल तर पाकळी चालेल, अशी अवस्था. फुलं भक्तीचाही उत्सव. फुलांचं आख्यान- फूलच नायक, फूलच निरूपणकार. जीवनातील नाट्य समजावून सांगणारी. आजूबाजूच्या कशाचीही तमा न बाळगता, आकाशाकडून लाभणारं ऊन, पाऊस, चांदणं अंगावर झेलीत स्वत्व जपणारी. प्रत्येक ऋतूचा चरित्रग्रंथ उलगडून दाखवणारी. आपल्या आविर्भावांनी जीवनाचं वाहतेपण, गतिमानता प्रकट करणारी.’ जानेवारी हा खास गुलाबाचा महिना. आता गुलाबाचे फूल ओळखू येत नाही, असा जगात कोणी मूर्ख माणूस असेल, असे वाटत नाही. त्याच्या ओळखीच्या खाणाखुणा सांगणे म्हणजे भारतीय माणसाला अमिताभ बच्चनची ओळख करून देण्यासारखे आहे. गुलाब हा मुळात वेल होता. प्रयोग करणे याला अत्याचार मानायचे झाले, तर गुलाबाइतके अत्याचार कुणावरच झाले नाहीत. सुगंधी रानगुलाबाच्या वेलीला रोपटं बनविण्यात आलं. रानगुलाबाच्या वेलीला फक्त फळ येतं, बी येतं. सध्याच्या गुलाबांचे जगणे ‘सफळ’ नाही. त्याचे वंशसातत्य फक्त माणसावर अवलंबून आहे. 

कवी यशवंतांनी जसे ‘गुलामाचे गाऱ्हाणे’ मांडले, तसे गुलाबाने आपले गाऱ्हाणे या कवितेतून मांडले आहे- 

एका गोडशा वेलीशी 
तुम्ही खेळलात खेळ 
फळ नाही, बीज नाही 
आणि वाढविला घोळ 

माझ्या रूपाचे वैभव 
शत अंगाने वाढले 
पण रसिकाचे नाक 
मात्र उपाशी राहिले 

ला फ्रान्सच्यापासून 
माझी वाट लावलीत
पुढे फ्लोरिबंडाजाची 
नवी विपरीत रीत 

खऱ्याखुऱ्या निसर्गात 
आता कोण मला पाहे? 
माझ्या प्रकारागणिक 
फक्त शास्त्र, शास्त्र आहे 

नको नको रे माणसा 
पुरे तुझे हे विज्ञान 
माझ्या गुलाबी कळेला 
तुझे प्रेयस अज्ञान 

जानेवारी महिन्यात किती तरी झाडांना फुले येतात. निशिगंध त्यातील एक. हे एक कंदशाक असून त्याचे लहानलहान कांदे असतात. त्यापासून सरळ दांडा वर निघतो. उत्तरार्धात फुले येतात. पाने पातीरूप असतात. फूल बोटभर लांब असते. त्याला मध्यंतरी वळण असते. सहा पाकळ्या कर्ण्यासारख्या जुळलेल्या असतात. निशिगंधाच्या फुलाच्या आकारावरून वसंत बापटांनी ‘सुगंधाचे पेले’ अशी उपमा दिली आहे. निशिगंध हे रात्री दरवळणारे फूल असल्यामुळे, रवींद्रनाथांनी त्याला ‘रजनीगंधा’ हे नाव दिले. हिंदीत हेच नाव प्रचलित असून त्या नावाच्या सुंदर चित्रपटात या फुलांचा प्रतीकात्मक वापर केला आहे. फुलांचा तुरा (दांडा) येऊन सगळी फुले संपली, म्हणजे फुलदांडा मुळातून कापला पाहिजे; म्हणजे मग त्याचे कांदे वाढतात. 

जानेवारीत हमखास फुलणारे झाड आहे कण्हेरीचे. कण्हेरीच्या दोन पोटजाती आहेत. पांढरी कण्हेरी आणि गुलाबी कण्हेरी. आणखी दुहेरी फुलांची पण एक पोटजात आहे. कण्हेरीला शेंगा येत असल्या, तरी तिची लागवड मात्र काटकलमे करूनच होते. कण्हेरीचे खोड मनगटाएवढे जाड होऊ शकते. कण्हेरीची पाने राकट असतात, रखरखीत असतात. नरसाळ्याच्या आकाराची असणारी ही फुले किंचितसा सुगंध बाळगून असतात. कण्हेरी नखशिखांत विषारी आहे. तिला जनावरं खात नाहीत. त्यामुळे घराच्या कंपाऊंड वॉलच्या बाहेरच्या बाजूला लावायला हरकत नाही. जानेवारीत कण्हेर स्वत:हून फुलते; पण उन्हाळ्यात आणि इतर ऋतूंत जर भरपूर पाणी दिले, तर कण्हेरीला बारा महिने फुले येऊ शकतात. 

जानेवारीत मराठवाड्यातील शेतांतून फिरताना इंद्रजित भालेरावांची कविता तुम्हाला भेटेल- 

पिवळ्या हळदीसारखी 
वाळकाची फुलं 
जांभळ्या कुंकासारखी 
हरभऱ्याची फुलं
हळदीकुंकू मिसळल्यासारखी 
करडईची फुलं 

‘वाळुक’ या फळांचे मला भारी कौतुक. जानेवारीत शेतकऱ्याच्या स्वयंपाकघरात वाळकाला अनन्य स्थान आहे. त्याच्यासारखी खमंग थालिपीठं कशाचीच होत नाहीत. धपाटेसुद्धा. वाळकांना पीक म्हणून मुद्दाम कुणी लावत नाहीत. ज्वारीत, कापसात, इरवाड म्हणून फेकलेलं बी तुमच्या जिभेचा चवणा भागवतं. वाळकाचं छान लोणचं होतं, कायरस होतो. त्याच्या किसात डाळीचा भरडा घालून भाजी छान होते. इतकंच नाही, तर वाळकाच्या वाळवून ठेवलेल्या उसऱ्यांची भाजी उन्हाळ्यात भाज्यांच्या तुटवड्याच्या काळात कामी येते. जास्त वेळ वेलांना राहू दिलेल्या वाळकांची शेंदाडं खूप मधुर लागतात. 

शेतातून फिरताना हरभऱ्याचं झाड पायाला लागलं की, ते  झोंबतं. थंडीमुळे आणि मातीत वावरण्यामुळे जर पाय उलले असतील, तर जास्तीच झोंबते. कारण हरभऱ्याच्या झुडपावरील आंब! तस्सा उपटून टहाळ खायला लागतो, तर ही आंब हातांनाही झोंबते. अशा वेळी टहाळ खाऊ इच्छिणाऱ्यांनी काय करावं? मोटेचं किंवा इंजिनचं पाणी चालू असेल तर त्यात टहाळ बुडवावा आणि नंतरचा खावा. हरभरा आपल्याला डाळ तर देतोच, पण त्याचा पाला वाळवून साठवून ठेवलेली भाजी वर्षभर कामाला येते. वाळलेल्या हरभऱ्याच्या पानांत डाळीचं पीठ आहाटून (हाटून) पिठल्यासारखी भाजी करायची आणि तिला तांबूस-काळसर खरपूस झालेल्या लसणाची वरून फोडणी द्यायची. अहाहा! 


उसात, कापसात, ज्वारीत पेरलेल्या आंबाडीच्या पाट्याने जेवणाला अशीच खुमारी आणलेली असते. करडई आणि आंबाडी भाजी म्हणून लावत नाहीत, तर करडई तेलबिया व आंबाडी तागासाठी लावली जाते. आंबाडीच्या फुलाला लोकगीतात का कुठे, सुंदर डोळ्यांचे उपमान म्हणून गौरविल्याचे मी वाचले आहे. सुंदरच दिसते आंबाडीचे फूल. 
हुरडा पार्टीचे हेच दिवस. हुरड्यासाठी खास ‘नरमी’ची वेगळी ज्वारी लावलेली असे. आहारातून, गोवऱ्याच्या आगटीतून काढलेली कणसं हातावर चोळून तुम्हाला गरम हुरडा खायला देताना सालदार गड्याचे हात किती भाजत असतील! त्याच्या चेहऱ्यावर मात्र अन्नपूर्णेचे हास्य असते. हुरड्याबरोबर खाण्यासाठी खास चटण्या केलेल्या असत- विशेषत: खोबऱ्याची चटणी. तिळाचीही चटणी असे. शेतात या चटण्यांची चव काही औरच लागते! हुरडा झाला की गव्हाच्या ओंब्या... जानेवारी महिन्यात शेतात असे चवींचे उत्सव चालू असत. 

जानेवारीत शेतात तीळ, कारळं आणि हुलग्याचं पीक जोमात आलेलं असतं. तिळाचं फुल नाजूक, दिसायला सुंदर असतं. त्याला पाच पाकळ्या-प्रदले असतात. त्यातील दोन दिसायला गालासारखे, दोन वरच्या ओठासारखे आणि खालचे अधरोष्ठासारखे असते. म्हणून तिळाच्या फुलाला मुखाची उपमा देतात. तिळाच्या पिकाचा शेवट आमच्या अंगणात व्हायचा. सूर्याच्या दिशेने तिळाचे लांबट बोंड असलेले फळ ठेवून, तिळाच्या झाडाच्या छोट्या-छोट्या जुड्या करून वाळायला ठेवतात. पांढरा आणि काळा असे तिळाचे दोन प्रकार असतात. श्राद्ध पक्षात आणि अंत्यसंस्कार विधीत तिळाचे महत्त्व अनन्य आहे. त्यातूनच तिलांजली हा शब्द भाषेत आला. 

कारळं माझ्या लक्षात आहे ते त्याच्या सुंदर चटणीपेक्षा सुंदर-सुंदर पिवळ्या धम्म फुलांमुळे. मला पिवळी फुले फार आवडतात. गुलाम अलीच्या गझलेत ओळ आहे, ‘ऋत आयी पिले फूलोंकी, तुम याद आये!’ जानेवारी म्हणजे पिवळ्या फुलांचा ऋतू. गौरी-गणपतीच्या सणापासून कारळ्याला पिवळी फुले येऊ लागतात. सणावारांच्या दिवसांत फुलांचे हार करण्यासाठी कारळ्याची फुले वापरतात. छोट्या सूर्यफुलांच्या रूप-रंगाचे हे फूल. आणि सूर्यफूल? सूर्यफुलांनी बहरलेले विस्तीर्ण शेत पाहताना डोळे पिवळेपण पिऊन तर्रर्र होतात. व्हॅन गॉग उगाच नाही त्याच्यावर भाळला! 

जानेवारीत अनंतमूळ, ज्योतिष्मती, वाघळी, मडवेल, लोखंडी, सोनजाई आणि संक्रातवेल बहरताना पाहणे मौजेचे आहे. संक्रातीच्या सुमाराला बहरते म्हणून आपण संक्रातवेल हे नाव दिसले असले, तरी हा दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधून आलेला महावेल आहे. तेजस्वी नारिंगी रंगाची फुलं उद्यानाची शोभा वाढवणारी, वेधक अशी आहेत. बिग्नोनिया व्हेनुस्टा हे शास्त्रीय नाव. मोठमोठ्या पुष्पगुच्छांमध्ये, दाटीवाटीने येणाऱ्या तिच्या फुलांकडे लक्ष गेले की, तिथून आपली नजर हटतच नाही. 

संक्रातवेलावरून आठवले- मकरसंक्रात हा आपल्या नव्या ऋतुचक्राच्या संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे. संक्रात आपण तिथीप्रमाणे साजरी करत नाही. ती नेहमी 14 जानेवारीलाच (क्वचित 15 जानेवारी) येते. त्याचप्रमाणे मृग नक्षत्र 6 किंवा 7 जूनला सुरू होते. मृग नक्षत्र किंवा संक्रांत इंग्रजी तारखेनुसार आपण स्वीकारतो. इंग्रजी महिने आणि कालगणना सौर वर्षानुवर्ती आहे. म्हणून नवे ऋतुचक्रसुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसारच आपण ठरवून घेतले पाहिजे. 

माधव गडकरी एके ठिकाणी लिहितात की, 14 जानेवारी हा दिवस ‘भूगोलदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय ज्या कुणी घेतला असेल, त्याचे आपण अभिनंदन करावयास हवे. सूर्य 14 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करतो. सूर्य 14 जानेवारीस मकर वृत्तावर येतो की मकर वृत्त सोडतो, हा प्रश्न मी टेलिफोनवरून तिघांना विचारला. कुणालाही उत्तर देता आले नाही. 21 डिसेंबर हा सर्वांत लहान दिवस असतो, तर 21 जून हा सर्वांत मोठा दिवस. तेही अनेकांना माहीत नसते. सूर्याचे 14 जानेवारी रोजी उत्तरायण सुरू होते. पिके आणि फळे यांचा अभ्यास हाही भूगोलाचाच भाग आहे. पुण्यातील  पेरू अधिक गोड का लागतात, सातारा जिल्ह्यातील रामफळ चवदार का, नागपूरची संत्री अधिक गोड का, देवगडच्या आंब्याची खास चव कशामुळे- हे सारे ज्ञान माझ्या दृष्टीने पुस्तकी ज्ञानापेक्षा महत्त्वाचे आहे. 

जानेवारी हा ‘एकेक पान गळवया’ लागणारा महिना आहे. म्हणून जानेवारी हा ‘शिशिराचा दुसरा खंड’ आहे. शिशिर ऋतूला हिंदीत ‘पतझड’ असं नाव आहे. बहुसंख्य झाडांची पाने या ऋतूत गळून जातात आणि काहींचा तर नुसता सांगाडाच उरतो. शिरीषाची चिंचेसारखी बारीक- बारीक पाने गळण्याचा जानेवारी हाच महिना. रिठा, आपटा, पिंपळ, बूच यांचीही पानगळ जानेवारीत पाहायला मिळते. साधारणपणे डिसेंबरअखेरपासून ही पानगळ पाहायला मिळेल. जानेवारी आणि फेब्रुवारीत त्याचे प्रमाण भरपूर वाढते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला तर झाडांखाली पानांचा खच पडलेला दिसतो. 

मारुती चितमपल्लींनी पानगळीला सूक्ष्म शब्दरूप दिले आहे. ‘झाडांच्या सालींकडे, बुंध्याकडे एरवी नजर जात नाही, पण पानगळीमुळे उघड्या पडलेल्या फांद्यांच्या शिल्पाकडे आपले लक्ष प्रथमच जात असते. सारेच वृक्ष एखाद्या शिल्पाप्रमाणे उभे असतात. अर्जुन, मोवई, करू, धावडा, सालई आणि डिकामलाई या झाडांचे पांढरी साल असलेले बुंधे दिसू लागतात. खरबुजी असलेली चार उभी असते. सुसरीच्या पाठीपारखी पाल असलेली ऐनाची उंचच उंच झाडे उठून दिसतात. तिवस, बीजा, टेंभुर्णी, काकड व गरारी यांच्या सालीदेखील खरबरीत काळपट वर्णाच्या. बेहडा, पिंपळ, उंबर, मोह व सातवीण या झाडांच्या बुंध्यांना पंख फुटावेत असा आकार दिसू लागतो. कदंब, सावर आणि कळंबाचे सरळ खांब पार आकाशाला भिडलेले असतात...’ 

शिशिर ऋतू आणि पानगळ पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय होऊ शकेल काय? अमेरिकेत होतो. थंड प्रदेशांमध्ये होतो. तिथे थंडी पडायला लागली की, झाडे आधी आपल्या पानांचा रंग बदलतात आणि मग त्यांची पानगळ होते. त्याला ‘फॉलकलर्स’ म्हणतात. पानात क्लोरोफिल (हरितद्रव्य) प्रमाणेच हिरव्या रंगाबरोबरच इतरही रंगांचे पिगमेंट्‌स असतात. पिवळा, नारिंगी, लाल, जांभळा इत्यादी. बर्फवृष्टीमुळे आणि त्याचसोबत पडणाऱ्या तीव्र उन्हामुळे अमेरिकेत पानांवर तीव्र परिणाम होतो. आत एक रासायनिक क्रिया होते आणि झाडावर हिरव्याखेरीज सर्व रंगांची पाने दिसू लागतात. अमेरिकेत जे नोव्हेंबरमध्ये होते. ते कमी प्रमाणात आपल्याकडे जानेवारीत होते. जानेवारीत याच रासायनिक प्रक्रियेतून पानं रंगतात, पण अमेरिकेसारखी एकाच वेळेस आणि एकजुटीने नाही. शिशिर  ऋतू फॉलकलर्स पाहण्याचे आगळे सुख तिकडे देतो, इकडे मात्र तो उदास-खिन्न बनवतो. 

जानेवारीत आवर्जून पाहावे असे झाड म्हणजे ‘महारुख.’ ‘महावृक्ष’पासून ‘महारूख’ झालं असावं. प्रचंड उंच वाढणारा आणि खूप मोठा विस्तार असणारा हा वृक्ष नावाला साजणारा आहे. त्याची पानंसुद्धा मोठमोठी, संयुक्त, पंधरा-वीसच्या समूहाने येणारी असतात. जानेवारीत पानांचा हा सांभार महारुख उतरवून ठेवतो आणि लगोलग मोठमोठ्या पुष्पसंभाराने भरूनही जातो. सेलूला खूप महारुख आहेत. मीनाक्षी टॉकीज नव्याने निघाली तेव्हा महारुखचे मोठे झाड त्यांनी अकारण तोडले, याचा मला फार राग आला होता. पार डेप्युटी कलेक्टरपर्यंत मी लेखी तक्रार केली होती, भांडलो होतो. बदल्यात त्या टॉकीजवाल्यांना भरपूर झाडं लावायला लावली, तेव्हाच मी शांत झालो! त्याआधी त्याच्या सावलीत कॉलेजला येता-जाता मी खूप वेळ थांबत असे. त्याच्या हत्येचा खोलवर परिणाम माझ्या मनावर झाला, एवढे खरे.

मला पिवळ्या रंगांची फुले फार आवडतात. सोलापूरला सिद्धेश्वराच्या मंदिराजवळच्या तळ्यात सोनेरी कमळं होती, हे वाचून त्यांची कल्पना करण्यात मी वेडावून गेलो होतो. सर्वत्र दिसणारा पिवळ्या फुलांचा एक वृक्ष मला खुणवायचा, पण त्याचे नाव माहीत नव्हते. पुण्याच्या लोखंडे तालमीपासून ग्रंथालयाकडे जाताना त्या वृक्षाखाली मला त्याचे नाव आणि माहितीफलक सापडला. शेंगांच्या रंगावरून त्याला नाव दिले होते- ताम्रशेंगी. पुण्यात स्वत:चा फ्लॅट घेतला, तेव्हा हेच झाड निकटवर्ती होते. जानेवारीत त्याला सर्वाधिक बहर यायचा. अस्ताव्यस्त मांडणीमुळे हे झाड गबाळ राहणाऱ्या गोऱ्यापान मुलीसारखे वाटायचे. महाजनसरांचा विदेशी वृक्ष ग्रंथ आला, तेव्हा त्याचे नाव सयामी कॅशिया असल्याचे कळाले. ‘काशीद’ असेही त्याचे एक नाव. आपल्याकडे तो इतक्या प्रमाणात रस्त्यांच्या भोवती लावला गेला आहे की, डॉ.प.वि. वर्तकसरांनी विनोदाने त्याला ‘पीडब्ल्यूडी प्लँट’ असे नाव दिले आहे. फार शोधाशोध न करता सापडतो बिचारा. 

पिवळ्या रंगांच्या माझ्या स्वप्नपुष्पांत उल्लेख करावयाचा तो सोनसावर आणि पिवळ्या कांचनाचा. शिशिर ऋतूत फुलणाऱ्या झाडांचं विशेष कौतुक असतं, नाही का? झोपताना अंगावर आपण कमीत कमी कपडे ठेवतो, तसे जणू  शिशिर ऋतूत विवस्त्र होऊन झाडे झोपलेली असतात. जानेवारीत सगळी मंडळी अशी गाढ झोपेत असताना एक झाड फक्त अलार्म लावून उठल्यासारखे उठते. ते म्हणजे सोनसावर! पर्यटकांनो, तुम्हाला खास पर्यटनासाठी पुण्याला यायचे असल्यास जाने-फेब्रुवारीत पुण्याला सोनसावरांचा सुवर्णमहोत्सव पाहायला जरूर या. सकाळी नऊ- साडेनऊच्या सुमाराला खंडोबाचा डोंगर पहायला जा. तिथे दोनशेच्यावर सोनसावरीची झाडे तुम्हाला भेटतील आणि तुमचा जन्म धन्य होईल. पश्चिम महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यांत तो औषधालाही सापडणार नाही. सोनसावर आमच्या पुण्याची खासियत आहे! 

सावर या वृक्षाचं मूळ नाव शाल्मली. एरवी लालभडक रंगाच्या फुलांचा हा प्रचंड मोठा, वीस ते पंचवीस मीटर वाढणारा वृक्ष. त्याची साल करड्या रंगाची असून तिच्यावर तीक्ष्ण काटे असतात. त्याचे फळ म्हणजे बोंड असते. ते दहा ते बारा सेंमी लांब असते. त्यात सुंदर, अतीव मऊ-मऊ कापूस असतो. श्रीमंत लोक त्याच्या गाद्या-उशा करतात. मी एकदा-दोनदा त्यावर झोपलो आहे! अत्यंत औषधी झाड असून कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ काव्यात वणव्याच्या वर्णनात शाल्मलीची उपमा दिली आहे. 

कांचन म्हणजे सोने. कांचन नावाच्या सुंदर फुलांच्या झाडाच्या फुलांचा एक रंग पिवळाही आहे. पण सुवर्णकांचन हा त्यातल्या त्यात दुर्मिळ कांचन आहे. नांदेडला दिलीप गोगटे यांनी दुर्मिळ फुलांची एक बाग विकसित केली होती. तिथे पहिल्यांदा मी पिवळा कांचन पाहिला होता. गोविंदाग्रजांनी ज्या फुलांच्या नावे महाराष्ट्र ओळखला जावा, त्यात कांचनाचा उल्लेख केला आहे. ‘अंजन कांचन करवंदीच्या महाराष्ट्र देशा’. त्याचे पान मधोमध दोन भागांमध्ये विभागलेले असते, म्हणून संस्कृतात त्याला ‘युग्मपत्र’ असे नाव आहे. आपटा आणि कांचन यांचे कूळ एकच. जानेवारीत सर्व रंगांच्या कांचनाला फुले यायला लागतात, तो बहर एप्रिलपर्यंत टिकतो. मंद सुगंध असणारी कांचनाची गुलाबी-जांभळी अशा रंगाची जात असते. तिचेच प्रमाण मोठे आहे. औरंगाबादला फ.मुं.शिंदे यांच्या घराच्या कोपऱ्यावर जांभळा कांचन आहे. 

गोविंदाग्रजांच्या महाराष्ट्रगीतामधील झाडांच्या ओळीतील पहिले नाव आहे अंजन. कोकण आणि मावळात अंजन वृक्ष मोठ्या प्रमाणात दिसतात. मी एका जानेवारीत महाबळेश्वरच्या राज हॉटेलसमोर अंजन वृक्ष पाहिला, तेव्हा तो चांगलाच फुलला होता. छोट्या-छोट्या फुलांचे गुलाबी, निळे, जांभळे असे गोलसर गुच्छ दिसायला खूप सुंदर असतात. विदर्भातला अंजन काहीसा वेगळा आणि मोठ्या आकाराचा आहे. सह्याद्रीच्या कुशीतल्या अंजन वृक्षाला मेमेसायलॉन अँम्बेलॅटम असे वनस्पतिशास्त्रात नाव असून विदर्भातल्या अंजनाला हर्डविकीया बायनाटा असे नाव आहे. 

जानेवारी महिन्यात कोकणात जाऊन आवर्जून पाहावे असे झाड आहे उंडीचे. डिसेंबर आणि जानेवारी हे दोन त्याच्या पूर्ण बहराचे महिने. शुभ्र पांढऱ्या रंगाची, अतिशय सुवासिक अशी त्याची फुले असतात. नखशिखांत सुंदर असलेल्या या झाडाची पानेसुद्धा अतीव सुंदर असतात. साधी, मोठी, सम्मुख, जाडसर, चकचकीत हिरवीगार. पानांवरच्या शिरा एखादे चित्र काढल्यासारख्या स्पष्ट आणि उठावदार असतात. मध्य शिरेच्या दोन्ही बाजूला अगदी जवळ-जवळ असंख्य, समांतर उपशिरा असतात, त्यामुळे या पानांकडेसुद्धा पाहावेसे वाटते. त्याचे वनस्पतिशास्त्रीय नाव आहे कॅलोफायलम इनोफायलम. या नावातील अनुप्रासाकडे लक्ष वेधत महाजनसरांनी कॅलोफायलम या ग्रीक शब्दाचा अर्थ सांगितलाय, ‘सुंदर पाने असलेला’. फळांना ‘उंडले’ म्हणतात आणि महत्त्वाच्या उपयुक्ततेमुळं ते गोवा, कर्नाटक आणि कोकणात बाजारात विकायलासुद्धा येतात. उंडी दर्शनासाठी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यालगतचे प्रदेश पालथे घातले पाहिजेत. 

जास्वंदीचं फूल आणि झाड बहुतेकांना ओळखता येतं. आपण त्याला जानेवारीतच भेटण्याचे खास कारण आहे. ते पुढे येईलच. हे फुलाचे प्रसिद्ध झुडूप दीड पुरुष उंच वाढते. त्याची पाने हिरवीगार, मऊ व तकतकीत असतात. एखाद्या पानाच्या पाठीमागे बारीक लवीचे पुंज असतात. बारीकशी उपपर्णे असतात. पानांच्या बगलात फूल येते आणि एका बगलेत एकच फूल असते. बारमाही फूल देणारे, सदापर्णी आणि बहुवर्षायू असल्यामुळे त्यासाठी फार खस्ता खाव्या लागत नाहीत. पांढऱ्या, पिवळ्या आणि नारिंगी रंगातही त्याचा संकर आढळतो. जास्वंदीची फुले चुरडून काळ्या बुटाला लावल्यास त्यांना छान चकाकी येते. त्यावरून त्याला ‘शू-फ्लॉवर’ हे इंग्रजी नाव मिळाले आहे. पूर्व आफ्रिकेतून आलेली ‘गोंड्याची जास्वंद’ (लॅ.हिबिस्कस शायझोपेटॅलस) ही जात दिसायला अतिशय सुंदर असून अलीकडे सर्वत्र आढळते. निळी जास्वंद (लॅ.हिबिस्कस  रियाकस) ही मूळ चीनमधील जातही आता सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. 

मराठी माणसाने आणि त्यांच्या लाडक्या गणपतीने मात्र लालचुटुक जास्वंदीला डोक्यावर घेतले आहे. गणपती फक्त भाद्रपदात पूजला जाणारा देव नाही, तर प्रत्येक प्रसंगी त्याला अग्रपूजेचा मान असल्याने फूलसुद्धा त्याला सगळ्या ऋतूंत फुलणारंच लागणार ना? जास्वंद हे बारा महिने सारखेच फुलणारे फूल आहे. आपणदेखील ऋतुचक्राची सुरुवात जानेवारीपासून करतो आहोत. म्हणून ‘ओम नमोजी आद्या’ न्यायाने त्याची दखल जानेवारीतच घेत आहोत. मंगेश पाडगावकर, रवींद्र पिंगे यांच्या साहित्यात जास्वंदीचे उल्लेख येतात. इंदिरा संतांच्या ‘निराकार’ या कवितासंग्रहातील तिसरीच कविता ‘जास्वंद’ आहे. इंदिराबार्इंनी तिला रंगबावरी म्हटले. ‘फुलवा’ या पुस्तकात हेच शीर्षक घेऊन डॉ.शरदिनी डहाणूकरांचा लेख सजला आहे. 

लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकगीतात शिरलेल्या जास्वंदाला परकीय तरी कसं मानावं? ही ओवी पाहा... 

चांदीच्या ताटामंदी 
फूल दाशाळाचं लाल 
त्याच रंगाची चोळी 
धाडऽ बंधूऽ रायाऽऽ 

ही ओवी वाचून इंदिरा संत देव्हाऱ्यापाशी गेल्या. चांदीच्या ताम्हणात तिथलेच ताजे जास्वंदीचे (दाशाळाचे) फूल ठेवून पाहिले. त्या वेळी त्यांची आई देव्हाऱ्याच्या दोन बाजूला नंदादीपाच्या दोन समया लावीत असे. त्या दिव्यांच्या प्रकाशात ते ताम्हणातील फूल काय झळकत होते! त्यांना वाटले, ती ओवी म्हणणारी सुचवत आहे की- मी इतकी गोरीपान आहे, मला चोळीसुद्धा तसल्याच दाशाळाच्या पाकळीसारख्या खणाची हवी. असो. 

हुडहुडी भरणाऱ्या या हिवाळ्याच्या तीव्र महिन्यात कुणी महाबळेश्वरला जाऊ म्हटले तर? हूऽहूऽहूऽहूऽ! पण जायला हवे. प्रत्येक ऋतूत जायला हवे. या दिवसांत जाणे तर आर्थिक दृष्ट्या फार परवडेल. जायचं, जरूर जायचं. शांताबार्इंचं ‘जाईन विचारीत रानफुलां’ हे गाणं म्हणत म्हणत जायचं आणि मग तिथे कोणकोणते ‘सजण’ भेटतील, त्यांना पहायचं... 

रानफुलांच्या बाबतीत कास पठार हे अप्रतिम असले तरी तिथला सगळा सोहळा चार महिन्यांत संपतो. महाबळेश्वर-पाचगणीचे असे नाही. तिथं सगळ्या ऋतूंत वेगवेगळी रानफुलं पाहायला मिळतात. इतरही. जानेवारीत तुम्ही महाबळेश्वरला गेलात, तर अटकीच्या आणि कारवीच्या फुलांनी पार मेटतळ्यापर्यंतचं रान गच्च भरलेलं दिसेल. सोनकीची विफुल फुलं दिसतील. आंबुळकीची फुलं आकाराने इवलीशी, रंगहीन, या सगळ्या पसाऱ्यात फारशी उठून न दिसणारी; पण जवळ जाऊन पाहाल तर त्यांचे सौष्ठव मोहवून टाकणारे वाटेल. महाबळेश्वरला फार फुलझाडं नाहीत. रंगांचा चमचमाट नाही की, गंधाचा घमघमाट नाही. मग प्रश्न पडतो, की महाबळेश्वरला एवढा मध मधमाश्या मिळवतात कुठून? तर इथल्या झाडांत कीटकांना, पक्ष्यांना आकृष्ट करण्यासाठी म्हणूनचा भरपूर मध असतो, रस असतो. 

महाबळेश्वरला शिशिर ऋतू तुम्हाला उदास करून टाकत नाही. इथली झाडं पानगळती कधी करतात, आणखी त्यांना नवी पालवी कधी फुटते- हेच मुळी कळत नाही. म्हणून मी म्हणेन की, महाबळेश्वरच्या जानेवारीचा रंग हिरवाच आहे. करवंदीच्या, स्ट्रॉबेरीच्या जाळ्यांनीही तो परिधान केलेला असतो. सिल्व्हर ओकची पानं महाबळेश्वरला जरा जास्तच हिरवीकंच दिसतात. आपल्या शहरांतले सिल्व्हर ओक बारा महिने धुळीने माखलेलेच असतात! शेंड्यांची रुपेरी पानं इथं जरा जादाच रजतमहोत्सव साजरा करतात! जानेवारीत महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला फळांचा पहिलावहिला बहर येतो. सुरुवातीची स्ट्रॉबेरी तेवढी मधुर लागत नाहीत, तरी तिची टपोरी फळं आपलं लक्ष वेधून घेतात, एवढं नक्की. 

जानेवारीचा रंग हिरवा आहे, असं मी म्हणालो. हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमलीचे... शेतात जाऊन माजावर आलेली गव्हाची पिकं पाहा. त्यांच्यात शिरलेली एखादी वाऱ्याची झुळूक डोळ्यांनी अनुभवा. हिरवा रंग पिऊन डोळे बेहोश होतील. गहू आता पोटरीत आला आहे. लोंब्या बाहेर पडायच्या तयारीत आहेत- नव्हे, पडल्याही आहेत. वडाच्या झाडाचा हिरवा रंग पाहा. त्यावर आता लालचुटुक फळं आलीत. अक्षता पडाव्यात तशा त्यांतून बिया पडताहेत. बोरकर लिहितात- वडफळांच्या अक्षतांत कितलो येळ न्हायतं, न्हायतं हुपले कितले चंद्रलोक इंद्रनंदना... आणि बहिणाबाई लिहितात- ‘हिरवी हिरवी पानं, लाल फय जशी चोंच, जणू वडाच्या झाडाले, आलं पीक पोपटाचं!’ या ओळी वाचा नि पुन्हा वडाच्या झाडाकडे पाहा. आता ते पाचूचं लावण्य अधिकच सुंदर झालेलं दिसेल. 

Tags: शांता शेळके गोविंदाग्रज फ.मुं.शिंदे डॉ.प.वि. वर्तक कवी यशवंत शरदिनी डहाणूकर हंगळहळ्ळीकर मख्दूम मुहिउद्दीन अण्णासाहेब गव्हाणें मारुती चित्तमपल्ली श्री.द.महाजन विश्वास वसेकर जानेवारी नवे ऋतुचक्र Shanta Shelke Govindagraj F M Shinde Dr P V Vartak Kavi Yashvant Kavi Yashwant Shardini Dahanukar Makhdum Muhiddin Annasaheb Gavane Maruti Chittampalli S D Mahajan Vishwas Vasekar January Nave Rutuchakra weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके