डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

यशवंत सुमंत : एक अधुरी वैचारिक कहाणी

हे प्रकल्प अर्धवट राहून गेले. त्या अर्थाने त्यांचा वैचारिक प्रवास एका उंचीवर आला असताना अपूर्ण राहिला. तो केवळ कार्यकर्त्या, विविध चळवळीतील गट, प्राध्यापक-विद्यार्थी यांना अतिवेळ दिल्याने. पण प्रा.सुमंत म्हणायचे, ‘‘हे काम कोणीतरी केले पाहिजे, त्यांचे प्रश्न, शंका सोडवल्या पाहिजेत... संदिग्ध विचाराने समकालीन व्यामिश्र जगात आपले लोक टिकणार नाहीत. राज्यशास्त्र विभागातील इतर सहकारी वैचारिक लेखनाची परंपरा समर्थपणे चालवत असल्यानेच मी मोकळेपणाने राज्यभर फिरत असतो,’’

राज्यशास्त्र व सामाजिक शास्त्राचे अभ्यासक-विश्लेषक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक ही प्रा.यशवंत सुमंत यांची औपचारिक किंवा लौकिक ओळख. पण त्याहीपुढे जाऊन परिवर्तनवादी चळवळींशी सामाजिक शास्त्रे कशी जोडता येतील आणि राज्यातील कानाकोपऱ्यात समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी चाललेल्या विविध परिवर्तनवादी चळवळींच्या बाजूने सक्रिय वैचारिक हस्तक्षेप ही त्यांची खऱ्या अर्थाने अलौकिक ओळख सांगता येईल. ही अलौकिक ओळख जगताना ‘संवाद आणि समन्वय’ हे प्रमुख माध्यम त्यांनी वापरले. पण प्रत्यक्ष वैयक्तिक आयुष्य सार्वजनिक वैचारिक हस्तक्षेप आणि आपले वैचारिक लेखन यात त्यांना शेवटपर्यंत समन्वय साधता आला नाही. त्यामुळे त्यांचे अनेक संकल्पित लेखनप्रकल्प अर्धवट राहिले.

प्रा.सुमंतांची वैचारिक बैठक ही ‘लोकशाही समाजवादा’वर आधारित होती आणि त्याच्या मजबुतीचा पाया हा म.फुले, म.गांधी, डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय आहे असे ते मानीत. ह्या तीन विचारवंतांसोबतच मार्क्स, वि.रा.शिंदे यांचे विचार ते मूलभूत मानीत आणि या सर्वांच्या विचारांतून ‘बहुजनवादा’ची मांडणी करीत असताना, त्यांची समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थितीतील प्रासंगिकता प्रत्येक व्याख्यानात पटवून देत असत. ह्या सर्व विचारवंतांच्या भूमिकेतील समन्वय ते पुढे आणीत. ही विचारपरंपरा त्यांना कॉ.शरद पाटील, प्रा.य.दि.फडके आणि प्रा.राम बापट यांच्या विचारांतून मिळाल्याचे ते सांगत. ह्या तिघांना ते गुरु मानीत, पण या तिघांच्या विचारांपासून फारकत घेऊन पुढे जात त्यांनी आपली नवी मांडणी सुरू केली होती. गांधीवादाचा अतिआग्रह त्यांच्या विचारात असल्याचे आक्षेप घेण्यात येत असले तरी गांधी-आंबेडकर यांच्यातील साम्यस्थळे, त्यांच्यातील संवादाच्या जागा, चळवळीतील विविध गटांना समजावून सांगण्याचा निष्ठेने प्रयत्न ते करीत होते.

चळवळीचे एनजीओकरण होत असताना, चळवळ एक प्रश्नलक्षी होत असताना, चळवळीत सातत्याने फूट पडत असताना त्यामागील कारणे शोधण्यासोबतच त्यांच्यात संवाद वाढावा, आदिवासी-दलित-ओबीसी-मुस्लिम गटांनी काही मुद्यांवर तरी एकत्र यावे यासाठीचे प्रयत्न ते आणि त्यांचे चळवळीतील काही सहकारी करीत.  

सामाजिक चळवळीतील कुंठीतावस्था दूर करण्यासाठी, राजकीय व सामाजिक विचार समजावून सांगण्यासाठी व सामाजिक शास्त्रांशी सामाजिक चळवळींना जोडून घेण्यासाठी ते महाराष्ट्रातील गाव-तालुका-जिल्ह्यांपर्यंत सतत दौरे करीत. कोणीही कार्यकर्ता, संस्था-संघटना, अगदी नवीन प्राध्यापक त्यांना व्याख्यानाला बोलावीत असत आणि ते तिथे जात. ‘सतत प्रवास, अवेळी जेवण आणि कमी झोप’ हा गेल्या काही वर्षांतील क्रम त्यांना अकाली मृत्यूपर्यंत घेऊन गेला. ‘उपलब्ध असणारा विचारवंत’ ही त्यांची प्रतिमा तयार झाली असली तरी त्यासाठी त्यांना आपल्या ॲकॅडमिक करिअरचा त्याग करावा लागला.

सार्वजनिक हस्तक्षेपवादी भूमिकेस प्राधान्य दिल्याने वैचारिक लिखाणातील, अभ्यास विषयातील लिखाणात त्यांना शिस्त पाळता आली नाही. याचा अर्थ असा नव्हे की, त्यांनी लिखाण केले नाही. त्यांनी निरनिराळ्या वैचारिक-पुरोगामी नियतकालिकांतून विपुल लेखन केले. राजकीय व सामाजिक विचार व त्यांची प्रासंगिकता आग्रहाने मांडली. त्याचे सिद्धांतनही केले. त्यांचे वैचारिक लेखन विपुल असले तरी ते विस्कळीत आढळते. ‘शोधार्थी अभ्यास गटा’ने त्यांच्या विविध नियतकालिकांत प्रकाशित लेखांचा ‘समग्र सुमंत’ हा एक हजार पानी लेखसंग्रह संकलित केला होता, पण त्याचे मर्यादित वितरण करता आले. त्यांच्यात क्षमता असूनही ग्रंथरूपात अनेक गोष्टी आणता आल्या नाहीत. सेवानिवृत्तीनंतर त्यासंदर्भातील अनेक योजना त्यांनी आखल्या होत्या. विद्यापीठात दररोज सकाळी 11 वाजता चहाच्यावेळी मी व पांडुरंग भोये यांच्याबरोबर त्या योजनांविषयी ते चर्चा करीत. त्यातील काही संकल्पित प्रकल्पांची कल्पना देणे संयुक्तिक वाटते.  

1. आधुनिक महाराष्ट्रातील राजकीय विचार, या मालिकेतील काही विचारवंतांवर त्यांचे लिहून झाले होते. आणखी काही विचारवंतांवर लेखन करून त्याचे पुस्तक करायचे ठरले होते. म.फुले, लो.टिळक, न्या.रानडे, आगरकर, वि.रा.शिंदे, डॉ.आंबेडकर, वि.दा.सावरकर, विनोबा भावे, आचार्य जावडेकर या विचारवंतावर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी लिहून झाले होते.

2. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या सामाजिक-राजकीय इतिहासावर लेखन करण्याचे त्यांनी ठरवले होते.

3. ते सातत्याने अध्यापन करीत असलेल्या तौलनिक राज्यशास्त्र व विचारप्रणाली या विषयांची पाच-पाच प्रकरणे लिहून ती पुस्तकरूपाने आणण्याचाही संकल्प त्यांनी केला होता.

4. ‘मिळून साऱ्याजणी’त प्रकाशित झालेल्या स्त्रीवादावरील लेखमालेत काळा स्त्रीवाद, दलित स्त्रीवाद व इको फेमिनिझम ही प्रकरणे समाविष्ट करून स्त्रीवादावरील पुस्तक काढायचे राहून गेले.

5. ‘हर्मिस प्रकाशना’द्वारे त्यांचे म.गांधींची विचारसृष्टी हे पुस्तक येत्या 2 ऑक्टोबरला प्रकाशित करण्याचे ठरले होते. त्यात गांधींचे पर्यावरणविषयक विचार समाविष्ट करावयाचे राहून गेले. ‘धर्मचिंतन’ या पुस्तकात फुले व आचार्य जावडेकरांचे धर्मचिंतनविषयक विचार त्यांना समाविष्ट करावयाचे होते. गांधी व धर्मचिंतन ह्या दोन पुस्तकांना प्रस्तावना लिहायचेही राहून गेले.

6. विनोबांच्या संकल्पनेवरील ग्रामदानी गावांचा अभ्यासप्रकल्प अर्धवट राहिला. काही गावांना त्यांनी भेटी देऊन अभ्यास सुरू केला होता. गागोदे गाव ग्रामस्थांनी भांडवलदारांना विकण्यास काढल्याने ते अस्वस्थ झाले होते.

7. विस्कळित आणि ऱ्हासाकडे जाणाऱ्या ‘महाराष्ट्र राज्यशास्त्र परिषदे’त ऊर्जा आणण्याचे काम गेल्या काही वर्षापासून त्यांनी सुरू केले होते. जिल्हा-विभागीय स्तरांवर प्राध्यापकांच्या बैठका घेऊन प्राध्यापकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्यशास्त्रातील उपशाखानिहाय परिषदा भरवणे त्यांनी नुकतेच सुरू केले होते. परिषदेची नवीन पुनर्बांधणी करण्याचा त्यांचा विचार होता.

8. आंतरविद्याशाखीय अभ्यासवर्ग सुरू करण्याचा मानस त्यांनी नुकताच व्यक्त केला होता. 9. महाराष्ट्र, गुजरात व बिहार राज्याचे नेतृत्व आणि तेथील सामाजिक-आर्थिक-राजकीय विकास यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रकल्पही आता अर्धवट राहिला.

10. ‘नरेंद्र मोदींचा उदय आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची हत्या’ या पार्श्वभूमीवर सामाजिक-राजकीय विचार नव्या संदर्भात मांडण्याच्या हेतूने ‘विचारवेध’ संमलेन वेगळ्या स्वरुपात सुरू करण्यासंदर्भात प्रा.सुमंत व त्यांचे काही मित्र गंभीरपणे विचार करीत होते.

हे प्रकल्प अर्धवट राहून गेले. त्या अर्थाने त्यांचा वैचारिक प्रवास एका उंचीवर आला असताना अपूर्ण राहिला. तो केवळ कार्यकर्त्या, विविध चळवळीतील गट, प्राध्यापक-विद्यार्थी यांना अतिवेळ दिल्याने. पण प्रा.सुमंत म्हणायचे, ‘‘हे काम कोणीतरी केले पाहिजे, त्यांचे प्रश्न, शंका सोडवल्या पाहिजेत... संदिग्ध विचाराने समकालीन व्यामिश्र जगात आपले लोक टिकणार नाहीत. राज्यशास्त्र विभागातील इतर सहकारी वैचारिक लेखनाची परंपरा समर्थपणे चालवत असल्यानेच मी मोकळेपणाने राज्यभर फिरत असतो,’’ सरांनी राज्यशास्त्रच नाही तर सामाजिक शास्त्रे आणि परिवर्तनवादी चळवळी यांच्यात विद्यापीठे आणि महाविद्यालये, विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग व महाविद्यालयांचा राज्यशास्त्र विभाग आणि विद्यापीठे व सामाजिक चळवळी यांच्यात संवाद-समन्वय साधण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सार्वजनिक जीवनात संवाद व समन्वयाची भूमिका पुढे घेऊन जात राहणे, हीच प्रा.यशवंत सुमंत यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Tags: राजकीय विश्लेषक कार्य यशवंत सुमंत विवेक घोटाळे यशवंत सुमंत : एक अधुरी वैचारिक कहाणी Political Analyst Work Yashwant Sumant Vivek Ghotale Yashwant Sumant : Ek Adhuri Vaicharik Kahani weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विवेक घोटाळे

कार्यकारी संचालक, द युनिक फाऊंडेशन, पुणे
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके