या कॅलेंडमध्ये पुढील छायाचित्रे आहेत.
1. एस.बी.मुझुमदार, सिम्बायोसिसची पायाभरणी
2. महर्षि कर्वे, फर्गुसन महाविद्यालय
3. पंडिता रमाबाई, पुणे शहरात
4. घाशीराम कोतवालची टीम अमेरिकेला जाताना
5. ज्योत्स्ना भोळे, लक्ष्मी क्रिडा मंदिर
6. पंडित जसराज, जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व
7. मेलडी मेकर्स आर्केस्ट्रा
8. वसंत बापट, मॅजेस्टिक गप्पा
9. द.वा. पोतदार, केळकर संग्रहालय
10. बाबासाहेब पुरंदरे, शनिवार वाडा
11. स्वातंत्र्यवीर सावरकर, अभिनव भारतची सांगता
12. आप्पासाहेब भोसले, पुणे महानगरपालिका
मोठ्या आकारातील ऑफसेट छपाईतील कृष्णधवल छायाचित्रे आणि त्यांच्या खाली छायाचित्रातील दृश्याची थोडक्यात मराठी व इंग्रजीतून माहिती. ‘स्मरणरम्य पुणे 2022’ उर्फ ‘पुणे नोस्टाल्जिया 2022’ या द्वैभाषिक कॅलेंडरचे असे स्वरूप आहे. या कॅलेंडरचे हे सहावे वर्षे आहे. यंदा ‘पुणे आणि पुणेकर’ असा या कॅलेंडरसाठी विषय घेतला असून त्यासाठी माझ्या संग्रहातील फोटोंबरोबरच अनेकांकडून फोटो मागवण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.पेपर लीफ पुणे या प्रकाशन व छपाई करणाऱ्या संस्थेचे जतन भाटवडेकर यांच्या कल्पनेतून ‘स्मरणरम्य पुणे’ ही संकल्पना गेली पाच वर्षे आम्ही राबवत आहोत. त्यामध्ये माझे थोरले बंधू विजय सबनीस यांचाही मोलाचा वाटा आहे. ‘स्मरणरम्य पुणे’ व ‘पुणे नोस्टाल्जिया’ ही दोन्ही नावे विजय सबनीस यांनीच सुचवली असून, ती जुन्या पुण्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांना आवडली आहेत.
आतापर्यंत पुण्यातील स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, वास्तू, रस्ते, वाहने, वाहतूक, व्यवसाय आणि पुण्याचा निसर्ग- असे विविध विषय मध्यवर्ती संकल्पनेसाठी आम्ही राबवले आहेत. यंदा प्रथमच व्यक्ती, व व्यक्तींच्या संस्था हा गाभा पकडून ‘पुणे व पुणेकर’ हा विषय घेतला आहे. विसाव्या शतकातील हे कर्तृत्ववान पुणेकर असून त्यांनी पुण्याच्या सांस्कृतिक, साहित्य, संगीत, नाटक, शिक्षण, कामगार क्षेत्र तसेच सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. या फोटोंमधून त्यांच्या केवळ आठवणींना उजाळा मिळणार नसून त्यांच्या कर्तृत्वाचीही उजळणी होणार आहे. ‘पुणे आणि पुणेकर’ या विषयात अनेक पुणेकर हे मूळ पुणेकर नाहीत; पण त्यांची कर्मभूमी पुणे आहे. कोलकता, तसेच इंग्लंड व अमेरिका फिरून भारतात आलेल्या पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी काम करताना मुंबईपाठोपाठ पुण्याची निवड केली होती.
स्त्रीशिक्षणाचा वसा घेऊन पुण्यात भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची स्थापनाही 1896च्या सुमारास केली. याशिवाय दिनदर्शिकेत पुण्याबाहेरची महनीय व्यक्तिमत्त्वे दाखवताना त्यांचे तत्कालीन पुण्याचे संदर्भही समजावून घेता येतील. यात अभिनव भारत चळवळीला चालना देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही समावेश केला गेला आहे. विशेष म्हणजे यंदा अनेक दिग्गज पुणेकरांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. वसंत बापट यांची प्रातिनिधिक व्यक्तिमत्त्व म्हणून निवड केली आहे. कवी, प्राध्यापक, राष्ट्र सेवा दलातील समरगीते व देशभक्तीपर गीते लिहिणारे कवी बापटांची ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’सारखी प्रेरणादायी गीते अनेक पिढ्यांमधील मुलांनी तोंडपाठ केली आहेत. याशिवाय बाबासाहेबांचे अमोघ कार्यही अनेकांना प्रेरणा देणारे आहे. पुण्याचे वेगळेपण जपणारी अनेक मोठी माणसे शोधून काढताना आम्ही त्यांच्या आप्तांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून मिळालेल्या फोटोंमधील संबंधित महनीय व्यक्तीच्या जीवनातील क्षण अधिक बारकाव्यानिशी समजावून घेता आले. यात संगीत क्षेत्रात भरारी घेणाऱ्या ज्योत्स्ना भोळे दिसतील. पुण्यात चित्रपटसंगीत आणणारी ‘मेलडी मेकर्स’सारखी ऑर्केस्ट्रा संस्कृती प्रत्ययाला येईल.
वयाची पन्नाशी पूर्ण करत असलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या मैलाचा दगड ठरलेल्या नाटकातील कलावंत व पडद्यामागच्या रंगकर्मींचा एक ग्रू्रप अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायला मदत करेल. यासाठी नाटकातील नाना फडणिसांची भूमिका करणाऱ्या डॉ. मोहन आगाशे यांच्याकडून तेव्हाचे जुने संदर्भ गोळा करता आले. याशिवाय शास्त्रीय संगीतातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या पं.जसराज, पं.जितेंद्र अभिषेकी आणि पं.कुमार गंधर्व यांच्या ‘श्रेयस’ हॉटेलमधील एकत्र भोजनाचे छायाचित्र या दिनदर्शिका फोटो अल्बमचे एक वेगळे आकर्षण ठरेल. तसेच शिक्षणक्षेत्रात वयाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या सिंबायोसिस संस्थेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संस्थापक डॉ.शां.ब.मुजुमदार यांचा 1972 मधला फोटो तत्कालीन हनुमान टेकडीच्या परिसराची आठवण करून देईल. पुण्यातील औद्योगिक व कामगार क्षेत्रातील लढे देणारे अप्पासाहेब भोसले यांचा फोटोही या दिनदर्शिकेतील वेगळेपण जपणारा ठरेल.
तर असा हा गेल्या शतकातील पुणे व पुणेकरांबरोबरचा आठवणींचा फोटो-प्रवास तुम्हांला नक्कीच आवडेल. दिनदर्शिकेतील फोटो मिळवून देणाऱ्या सगळ्यांचेच ऋण मानून थांबतो.
(या कॅलेंडरची किंमत 200 रुपये असून, हे साधना मीडिया सेंटर, Ph. 020-24459635 येथेही उपलब्ध आहे.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या