डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

विज्ञानाने मानवतेचे भावात्मक उद्दिष्टही दिले!

त्यातील सर्वांत महत्त्वाचे तात्त्विक कारण असे होते की, (आपल्याला त्या वेळी  आणि आजही सम्यक्‌पणे न आकळलेले) मानवी बुद्धिमत्तेचे स्वरूप हे आपण  तयार करत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी हुबेहूब मिळते-जुळते असेल, हे वरील शास्त्रज्ञांचे गृहीतकच मुळात बिनबुडाचे होते! कुर्ट ग्योडेल यांच्या गणितातील अपूर्णतेच्या दोन प्रमेयांचा  आणि रिचर्ड फाईनमन यांच्या मानवी जाणिवेसंबंधीच्या गणिती व पुंजभौतिकी संशोधनाचा आधार घेत रॉजर पेनरोज या शास्त्रज्ञाने हे निर्विवादपणे सिद्ध केले. ही सिद्धता हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सापेक्षता सिद्धांत व पुंज सिद्धांताइतकाच महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.

 

1. संत गाडगेमहाराज हे ग्रंथरूपाने का होईना, पण मला भेटलेले पहिले खरेखुरे विज्ञानशिक्षक. नाशिकमध्ये शाळेत असताना आजोबांनी गाडगेमहाराजांचे चरित्र वाचायला दिले आणि तो क्षण माझ्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. गाडगेबाबांनी सांगितलेल्या कथांची मी भान हरपून पारायणे केली. त्यांच्या बिनतोड व विवेकवादी युक्तिवादांनी माझ्या मनाचा ठाव घेतला. असे निखळ बुद्धिप्रामाण्य मी पहिल्यांदाच वाचत होतो. मी आतून हललो. साठच्या दशकात नाशिक अद्याप उद्यमनगरी झालेली नव्हती. कर्मकांडे, बुवा-बाबा, नवस-सायास, दिवस-वार, श्राद्धविधी- अस्थिविसर्जन, इ.साठी लोक देशभरातून नाशिकला येत.  त्यात परिस्थितीजन्य भयगंड, अगतिकता, अंधानुकरण, रूढीप्रियता होती असे काही जाणती मंडळी सांगत; तर काही त्याचे जोरदार समर्थन करत. हे लोक इतक्या दूर यासाठी येतात, हे मनाला खटकत असे. पण गाडगेबाबांमुळे मला त्या सगळ्याकडे करुणेने पण चिकित्सकपणे पाहण्याची वेगळीच दृष्टी आता मिळाली होती. तिला मानवतावादी वैज्ञानिक दृष्टी म्हणतात, हे अर्थातच माहिती नव्हते. विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन यांचे अन्योन्य संबंध किंवा एकत्व हे काहीही माहीत नव्हते. शास्त्र नावाचा रुक्ष पुस्तकी विषय होता. तो जीवनाशी संबंधित आहे याचा थांगपत्ता नव्हता.

पण आता कोणत्याही बाबतीत कार्यकारणसंबंध सापडत नाही, तोपर्यंत मला चैन पडेना. असा संबंध दिसत नसताना मोठ्यांनी झापडबंदपणे करायला सांगितलेली प्रत्येक गोष्ट ‘का’ने प्रश्नांकित करायची खोड लागली- मग ते घर असो वा शाळा. अन्यायाविरुद्ध चिडचीड वाढली. दोघी बहिणींच्या वाट्याला नित्य येत असलेल्या मासिक पाळीच्या चार दिवसांचा कडकडीत बंदिवास-कम्‌-सोशल डिस्टन्सिंगमध्ये आतापर्यंत काही वावगे वाटले नव्हते. आता मात्र डोळे उघडले. मोठ्यांशी भांडून त्यांची संपूर्ण मुक्तता करण्यात मला यश आले. हा गाडगेबाबांकडून शिकलेल्या वैज्ञानिक ‘बंडखोरी’ने मला मिळालेला पहिला विजय. मोठ्यांशी हट्टी, पण अभ्यासपूर्ण व तार्किक वादविवादाअंती मिळवलेल्या या विजयाने मला अपूर्व आत्मविश्वास दिला. बहिणींना संचार व ‘सर्वस्पर्शी’ स्वातंत्र्य दिले. विज्ञानापुढे लहान-मोठे काही नसते, हे उमजले. या वृत्तीने मला पछाडल्यामुळे लहानसहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत घरातला नूरच पालटू लागला. वैज्ञानिक दृष्टिकोनाने शालेय वयात मला याहून जास्त काय द्यायला हवे होते? पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे विद्यापीठात गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे ‘लोकविज्ञान चळवळी’कडे आकर्षित झालो. चळवळीचा कार्यकर्ता होऊन लोक आणि विज्ञान यांच्या सीमारेषेवरील बुवाबाजीसकट अनेक प्रश्नांवर लोकजागरण, विधायक कृती व संघर्षात सहभागी झालो, त्याची ही पूर्वतयारी तर नसेल? 

2. शाळेत असताना प्रेतांची खूप भीती वाटायची. त्यातच मित्रांकडून स्मशानातल्या भूत-पिशाचांच्या गोष्टी ऐकल्या की, अगदी गाळण उडायची. पुढे शाळेतल्या स्काऊटिंगमध्ये एक मुलखावेगळे शिक्षक भेटले. विद्यार्थिप्रिय कमलाकर यार्दीसर. उत्कृष्ट चित्रकार, विनोदकार, निसर्गप्रेमी, वन-अभ्यासक, क्युरेटर, गिर्यारोहक आणि आणखी खूप काही. पुलं तर त्यांच्या प्रेमातच पडले होते. यार्दीसर आजही माझे आणि माझ्या वर्गमित्रांचे हीरो आहेत. पक्के रॅशनॅलिस्ट. आता वय झाले असले तरी रॅशनॅलिझमचा पीळ तसाच कायम आहे. स्काऊटिंगमध्ये समाजसेवेबरोबरच त्यांनी आम्हाला धाडसाचे आणि साहसाचे धडे प्रत्यक्ष अनुभवातून दिले. कडे चढायला लावले, जंगलात स्वत: गायब होऊन आम्हाला अन्न-पाण्यावाचून एकट्याने जंगलातल्या वाटा शोधताना तासन्‌तास हरवण्याचे रोमहर्षक अनुभव दिले. आठ-आठ दिवस जंगलात रात्रीची भटकंती, तंबूत मुक्काम, शेकोटी, आकाशदर्शन आणि असे खूप काही. नाशिकमध्ये आमच्या लहानपणी एक शिरस्ता होता. मोदकेश्वर मंदिर ही लक्ष्मणरेषा. लहान मुलांनी ती ओलांडायची नाही. तिच्यापुढे गोदावरीच्या जुन्या घाटावरून रस्ता स्मशानात जायचा. यार्दीसरांनी आमची चक्क रात्रीची स्मशान-सहल काढली! यार्दीसर म्हणाले, ‘‘बी ब्रेव्ह! तुम्ही स्काऊट आहात.’’ स्मशानातला तो अनुभव अपूर्व होता. जाण्यापूर्वीचे आणि नंतरचे आम्ही यात जमीन-अस्मानाचे अंतर पडले होते. यार्दीसरांनी प्रत्यक्ष स्मशानात आमच्या मनातल्या एकेका भयकारक गैरसमजुतीचा बुरखा विज्ञान सांगत-सांगत फाडल्यामुळे भूत-प्रेत-पिशाच यांच्या भीतीची जळून राख झाली ती कायमची. अशीच भयमुक्ती इतरही क्षेत्रांत विज्ञान देत आले आहे.

3. ऐन पस्तिशीत जनुकीय दृष्टिदोषाचे निदान होऊन अंधत्वाची संभाव्यता कायमची वाट्याला आली. पण त्यावर उपाय नसल्याने व त्यामुळे डॉक्टरही नसल्याने खचून न जाता आजवर संबंधित विज्ञानाचा नित्य अभ्यास करून, वैज्ञानिक पद्धतीने स्वत: प्रयोग करून, आपल्या दृष्टीतले काय गेले यापेक्षा काय शिल्लक आहे हे नेमके शोधत राहता आले. ‘आपल्याच वाट्याला हे का?’ याची दैववादी स्पष्टीकरणे शोधण्याऐवजी जनुकीय गुंतागुंतीचे यथाशक्ती आकलन करून त्या दोषाशी दैनंदिन जीवनात जुळवून घेण्याच्या अभिनव पद्धती शोधता आल्या, क्षमता मिळवता आल्या आणि अशा वैज्ञानिक पद्धतीमुळे आपण अपघातमुक्त जगू शकतो, हे उमजल्यामुळे चिंतामुक्त मानसिकता लाभली. यार्दीसरांचे ‘बी ब्रेव्ह’ हे शब्द विज्ञानामुळेच असे सार्थ होतात आणि साथ देतात.

4. शिकवायला मनापासून आवडायचे, म्हणून पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात भौतिक शास्त्राचा शिक्षक झालो. विषयाची जाण बऱ्यापैकी होती आणि शिकविण्याची हातोटीही. समजावून सांगण्याची हौस तर दांडगी होती. आपण केवळ विषयाचे शिक्षक नसून विद्यार्थ्यांचेही शिक्षक आहोत, याचे भान होते. आपले अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे म्हणून विद्यार्थ्यांशी प्रयोगशाळेत अनौपचारिक चर्चा करायचो. विशेषत: ग्रामीण आणि तिसऱ्या जगातील परदेशी विद्यार्थ्यांना आपला अधिक उपयोग व्हावा, म्हणून त्यांच्याशी सतत संवाद ठेवायचो. त्यातून लक्षात आले की, माझ्या मनातले ‘विद्यार्थी’ या मनुष्यमात्राचे प्रतिमान (मॉडेल) आणि प्रत्यक्ष विद्यार्थी यात बराच फरक आहे. मग ट्रायल अँड एरर पद्धतीने मॉडेलमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला. पण तो मार्ग वेळखाऊ असल्याचे लक्षात आले. दोन वर्षे त्यात गेली. मग या युवांच्या- म्हणजेच किशोरवय सरून उमलत्या प्रौढत्वाकडे झुकलेल्या मुलांच्या- मानसशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करायची सवय लावून घेतली. त्या वेळी इंटरनेट वा गुगल नव्हते. त्या वेळी मला मिळालेल्या पुस्तकांतील ते शास्त्र बरेचसे वर्तनवादी होते. तथापि, जेवढे नीट समजले, त्याचा जाणीवपूर्वक उपयोग करू लागलो. प्रयोगातून प्रचीती घेऊ लागलो.

या अभ्यासातून लक्षात आले की, विद्यार्थी म्हणजे आपली एकतर्फी भाषणे ऐकून घेणारी परीक्षार्थी यंत्रे नसतात. त्यांना परावलंबित्व नकोसे असते, त्यांना स्वदिग्दर्शित व्हायचे असते. शिकवून घेण्यापेक्षा स्वानुभवाने स्वत: शिकायचे असते. त्यांना आपण पूर्ण वाढ झालेले प्रौढ आहोत असे वाटत असते, त्यांना मोठ्यांचे हस्तक्षेप व सल्ले नको असतात.  इतरांनी- विशेषत: पालक व शिक्षकांनी त्यांना प्रौढासारखे वागवावे, त्यांची मते समजून घ्यावीत, त्यांचा आत्मसन्मान जपावा- ही त्यांची रास्त अपेक्षा असते. मौजेपार असलेल्या वास्तवाला त्यांना भिडायचे असते, आव्हानांना सामोरे जायचे असते, धाडस, साहस व परिवर्तनाचे आणि ते करणाऱ्यांचे आकर्षण त्यांना असते. स्वत:चे व सभोवतीच्या जगाचे स्वतंत्र आकलन करून घ्यायचे असते, बदलत्या परिस्थितीचे मूल्यमापन करत अर्थपूर्ण प्रतिसाद कसे द्यायचे याचे ज्ञान मिळवायचे असते. अंगभूत ऊर्जेने मोठी कामे करायची जिद्द असते. चार जीवाभावाचे मित्र जोडायचे असतात व कुटुंबीयांपेक्षा समवयस्क मित्रांशी अधिक घनिष्ठ नाते जुळवायचे असते. भिन्नलिंगी आकर्षणाचा परिपोष करत नव्या नात्यांचा केवळ शारीर नव्हे तर सामाजिक आशयही शोधायचा असतो. योग्य काय व अयोग्य काय, हे अनुभवाने जाणून घेत-घेत आत्मनियमनातून नैतिकतेचा शोध घ्यायचा असतो. व त्यातून समाजमान्य मूल्यांशी कधी सुसंगत वर्तन करायचे असते. तर कधी संघर्ष करायचा असतो, केवळ स्वत:च्याच नव्हे तर इतरांच्याही गरजांविषयी, भावभावनांविषयी संवेदनशील वर्तन करायचे असते, लहानपणीचा आत्मकेंद्रीपणा कमी करत वर्तनात परकेंद्रीत्वही  जोपासणे त्यांना आवडू लागते. इतरांसाठी मदतीचा हात स्वत:हून पुढे होऊ लागतो, इतरांवरील अन्यायाची चीड येते आणि समाजकार्यात सहभागी व्हावे, असे वाटते.

निसर्गदत्त अशा उपजत प्रेरणेने परिपक्वतेकडे धावत निघालेल्या या युवा विद्यार्थ्यांविषयी इतके भन्नाट असे काही तरी शिकल्याचा अपरिमित आनंद या विज्ञानाने दिला. युरेका! केवळ निसर्ग-विज्ञानाचा अभ्यास केलेल्या मला हे सगळे फार-फार नवीन होते. या मनोविज्ञानाच्या माफक आकलनातून व उपयोजनातून मला विद्यार्थिप्रिय शिक्षक अशी जी ओळख मिळाली, त्यापेक्षा माझ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण खूप आनंददायी होत गेले याचे आजही मला अप्रूप आहे. हे विज्ञान मी अभ्यासले नसते तर? सर्व महाविद्यालयीन शिक्षकांनी हे विज्ञान आत्मसात केले तर?...

5. लोकविज्ञान चळवळीत काम करताना पर्यावरणीय अरिष्ट, दुष्काळ, ऊर्जासंकट, प्रदूषण, कुपोषण, नगदी पिकांचे व इतर उत्पादनांचे जल व ऊर्जा पदभार, जैवविविधतेचा ऱ्हास, लोकसमूहांच्या नैसर्गिक भांडवलाची लूट करणारी उत्पादननीती, विनाशकारी विकासनीती, अशाश्वत जीवनशैली, जल-जंगल-जमीन या संबंधीच्या जनआंदोलनांनी वेशीवर टांगलेले अस्तित्वाचे ज्वलंत प्रश्न, इ. अनेक समस्यांच्या संदर्भात आधुनिक बाजारू सभ्यतेची वैज्ञानिक चिकित्सा करावी लागली.

त्यातून हे लक्षात आले की- मुख्यत्वे अनावश्यक वस्तू व सेवांची मागणी, उत्पादन व पुरवठा अमर्याद वाढवत ठेवता येईल या भ्रामक अर्थविचाराचा, त्यासाठी रोजगार घटविणाऱ्या अत्याधुनिक औद्योगिक उत्पादनव्यवस्थेचा आणि तिला तात्त्विक समर्थन देणाऱ्या चंगळवादी जीवनदृष्टीचा प्रभाव वाढविला जात  आहे. ही सभ्यता यांत्रिक उत्पादनासाठी वापरलेल्या आधुनिक तंत्रविज्ञानाच्या पायावर उभी आहे. पण हे तंत्रविज्ञान ज्या विज्ञानाच्या उपयोजनातून अवतरले, त्या विज्ञानातील थर्मोडायनॅमिक्सच्या निसर्गनियमांच्या अभ्यासातून हे उमजले की- तंत्रविज्ञानाने जेव्हा आपण ऊर्जेच्या वापरातून नैसर्गिक कच्च्या मालाचे (जडपदार्थाचे) रुपांतर पक्क्या मालात करतो, त्या उत्पादनप्रक्रियेत कितीही काळजी घेतली तरीही काही जडपदार्थ व काही ऊर्जा अनिवार्यपणे वाया जातात. कारण त्या दोन्हींचे 100 टक्के उपयुक्त स्वरूपातील रूपांतर निसर्गत: अशक्य आहे. त्यामुळे कचरा, प्रदूषण व अनुपयुक्त स्वरूपातील उष्णता हे तीन पर्यावरणीय दुष्परिणाम अनिवार्यपणे निष्पन्न होतात. ही अनुपयुक्त व अप्राप्य ऊर्जा जागतिक तापमानवाढीत रोजच्या रोज घातक भर घालत राहते. या तीनही गोष्टींचा पुनर्वापर करणे किंवा त्यांची विल्हेवाट लावणे वा विघटन करणे अशक्य असते. या साऱ्याची पर्यावरणीय किंमत साऱ्या पृथ्वीवरील जीवसृष्टीलाही मोजावी लागते. पृथ्वीवर ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार होत आहेत. पक्का माल वापरून झाल्यावर किंवा नादुरुस्त व अनुपयुक्त ठरल्यावर त्याचीही त्यात भर पडते आहे. पृथ्वीवरील जमीन, नद्या, सरोवरे, समुद्र हे सारे कचराकुंड्या व गटारे होत आहेत आणि मृत होण्याच्या मार्गावर आहेत.

या परिस्थितीत मानवजातीसह सर्व जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे. कारण अमर्याद हव्यासापोटी होणाऱ्या उत्पादनातून बाहेर पडणारा कचरा, प्रदूषण व अपरिहार्यपणे उत्सर्जित होणारी घातक उष्णता आपल्या पोटात सामावून घेण्याची पृथ्वीची व वातावरणाची धारणक्षमता अमर्याद आहे, हे चंगळवादातील गृहीतक अशास्त्रीय आहे. त्यामुळे ही उत्पादनाव्यवस्था केवळ बळाचा वापर करून, शोषणाची परिसीमा गाठून व नैसर्गिक भांडवलाचा कायमस्वरूपी विनाश करून अगदी थोडा काळ चालू ठेवता येणार असली, तरीही तिचे अटळ असे आर्थिक-सामाजिकच नव्हे, तर अस्तित्वविषयक दुष्परिणाम सर्व जीवसृष्टीला भोगावे लागतील.

या परखड वैज्ञानिक चिकित्सेतून मला महात्मा गांधींची या ‘सैतानी सभ्यतेची’ सांस्कृतिक चिकित्सा नीट समजली. मानवाच्या अनिर्बंध वासनांच्या अखंड पूर्तीमध्येच मानवाचे सुख आहे, तेच मानवी जीवनाचे सार्थक आहे- या तत्त्वज्ञानाशी अहिंसक संघर्ष अटळ आहे, हे लक्षात आले आणि पर्यायांचा शोध घेताना संजीवक विकासासाठी नव्या ज्ञानाधिष्ठित व गांधीमार्गी सभ्यतेची निकड व यथार्थता पटत गेली. वैज्ञानिक चिकित्सेने मला असा गांधीमार्गाचा प्रकाश दिला आणि जीवसृष्टीच्या सुरक्षित भविष्यासाठी त्या मार्गावर कार्यरत होण्याची प्रेरणा दिली.

6. आतापावेतो परस्परपूरक असलेल्या संगणक व शिक्षण या माझ्या गेल्या सलग चाळीस वर्षांतील दोन कार्यक्षेत्रांपैकी संगणकक्षेत्राने आता मात्र  शिक्षणक्षेत्रापुढे काही गंभीर तात्त्विक आव्हाने उभी केली आहेत. प्रगत संगणकामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता, बुद्धिमान युवांना त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी ते तंत्रज्ञान प्रभावीपणे शिकवले पाहिजे, ही अपरिहार्यता एकीकडे; तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या विकासाने केवळ शारीरिक कामेच नव्हे तर मनुष्याची खास मक्तेदारी असलेली अनेक बौद्धिक कामेसुद्धा चलाख स्वयंचलित यंत्रणांच्या ताब्यात जात असल्याने,  नजीकच्या काळात युवांमधील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची संभाव्यता दुसरीकडे. त्यातच आपणच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रशिक्षित केलेले मूठभर युवा त्यांच्या ‘यशस्वी’ करिअरमधून कदाचित अधिकाधिक युवांना बेरोजगार बनवण्याचे इतिकर्तव्य पार पाडतील, हे तिसरे धर्मसंकट. सर्वसामान्यांच्या अनेक जटिल समस्या अल्प मुदतीत व खर्चात सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची संभाव्य अपरिहार्यता हा चौथा पेच!

मग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यापक आणि अगदी टोकाच्या प्रसारानंतरही युवांवर बेरोजगारीचे संकट यायचे नसेल, तर कोणत्या क्षमता विकसित करणारे शिक्षण त्यांना मिळाले पाहिजे? केवळ माझीच नव्हे, तर अनेकांची झोप उडवणाऱ्या या प्रश्नाचे अप्रतिम उत्तरही मला आधुनिक संगणक विज्ञानानेच दिले!

येथे मूलभूत प्रश्न असा आहे की संगणक मानवी जाणिवेची निर्मिती करू शकेल का? कृत्रिम बुद्धिमत्तेला मानवी बुद्धिमत्ता, विचारशक्ती, सर्जनशीलता, इ.ची सहीसही नक्कल करता येईल का? मानवी जाणीव कम्प्युटेबल आहे का?

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकात कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करून तिच्याकरवी माणसांची साधीसुधीच नव्हे तर अर्थपूर्ण संभाषण करणे, कविता करणे, चित्रपट दिग्दर्शन करणे अशी अतिसर्जनशील व गुंतागुंतीची कामे करवून घेण्याची स्वप्ने हर्बर्ट सायमन, मर्विन मिन्स्की आदी मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी पाहिली. त्या स्वप्नांचा बराच बोलबालाही झाला. आजही जनमानसावर त्यांचा प्रभाव आहे. ॲलन ट्युरिंग या गणितज्ञाने तर मानव व संगणक यांच्या वर्तनातला फरक ओळखताच येणार नाही, असे भाकीत केले. यासाठी त्याने रचलेली ‘ट्युरिंग टेस्ट’ गाजली. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाला मानवी बुद्धिमत्ता हस्तगत करण्यात हे अपयश येण्याची अनेक कारणे होती. त्यातील सर्वांत महत्त्वाचे तात्त्विक कारण असे होते की, (आपल्याला त्या वेळी आणि आजही सम्यक्‌पणे न आकळलेले) मानवी बुद्धिमत्तेचे स्वरूप हे आपण तयार करत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेशी हुबेहूब मिळते-जुळते असेल, हे वरील शास्त्रज्ञांचे गृहीतकच मुळात बिनबुडाचे होते! कुर्ट ग्योडेल यांच्या गणितातील अपूर्णतेच्या दोन प्रमेयांचा आणि रिचर्ड फाईनमन यांच्या मानवी जाणिवेसंबंधीच्या गणिती व पुंजभौतिकी संशोधनाचा आधार घेत रॉजर पेनरोज या शास्त्रज्ञाने हे निर्विवादपणे सिद्ध केले. ही सिद्धता हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातला सापेक्षता सिद्धांत व पुंज सिद्धांताइतकाच महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. (हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)

मानवी प्रतिभा, सर्जनशीलता, प्रज्ञा, अंतर्दृष्टी, अंत:प्रेरणा, इच्छाशक्ती, बाह्य संवेदनेला देण्याच्या प्रतिसादातील निवडीचे स्वातंत्र्य, प्रेम, विवेक, उत्स्फूर्तता, इत्यादी क्षमता संगणकीय अल्गोरिदम्समधून निर्माण करता येणार नाहीत- हे सिद्ध झाल्यावर मात्र संशोधकांनी संगणकातून मानवी बुद्धिमत्तेची कॉपी करू पाहणारी ‘कृत्रिम’ बुद्धिमत्ता विकसित करण्याचा नाद सोडून देऊन  गुणात्मक दृष्ट्या भिन्न अशी ‘नमानवी’ बुद्धिमत्ता  विकसित करायला सुरुवात केली. तिलाही सार्वत्रिक संकेताने कृत्रिम बुद्धिमत्ता असेच म्हटले जाते. येथे तिला नमानवी असे संबोधण्याचे कारण हे की, संगणक या बुद्धिमत्तेच्या वापरातून जे व्यामिश्र वर्तन करतात किंवा गुंतागुंतीच्या समस्या ज्या प्रकारे सोडवतात, त्यामागील तर्कात मानवी बुद्धिमत्तेने सुरुवातीस दिलेल्या बीज आज्ञावलीतील  तर्काचा अंश  सहजासहजी सापडत नाही. कारण या संगणकांना स्वत: शिकत राहणाऱ्या, स्वत:त दुरुस्त्या करणाऱ्या आणि स्वत:च स्वत:ला सुधारत जाणाऱ्या प्रक्रिया अमलात आणण्याची फक्त बीज आज्ञावली माणसाने शिकवलेली असते. प्रचंड डेटावरील अशा मशीन लर्निंगची, स्वयंदुरुस्ती व स्वयंसुधारणांची क्षणार्धात कोट्यवधी आवर्तने पूर्ण करून संगणक जी उत्तरे काढतात आणि मानवाला अवगत नसलेल्या अचाट क्षमता प्रदर्शित करतात, त्याने आजच आपण आश्चर्यचकित होत आहोत.

विसाव्या शतकाने औद्योगिक क्रांतीद्वारे माणसाला यंत्रवत्‌ करण्याचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे यंत्रांकडून मानवी बुद्धिमत्तेची कामे करवण्याचा प्रयत्न केला. पण एकविसाव्या शतकाने मात्र आपल्याला योग्य दिशा दाखवली. ती अशी की- ज्या गोष्टी वस्तुनिष्ठतेतून यंत्रांना उत्तम जमतात, त्या यंत्रांना करू द्या आणि ज्या गोष्टी व्यक्तिनिष्ठतेतून केवळ माणसांनाच जमू शकतात, त्या माणसांनाच करू द्या. यंत्रे आणि माणसे यांच्या क्षमता बऱ्याचशा भिन्न पण परस्परपूरक असल्याने मानवी समाजाच्या हितासाठी त्या दोहोंची निकोप व टिकाऊ अशी भागीदारी यशस्वी करा. या भागीदारीचे स्वरूप कसे असेल? तर मानवी बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने आपली नसलेली कामे करण्यास नमानवी बुद्धिमत्तेला तिचा अधिक विकास करून भाग पाडत राहील. जर माणसे अशी काही त्यांची नसलेली कामे करीत राहिलीच, तर नमानवी बुद्धिमत्ता ती त्यांच्यापासून हिरावून घेत राहील आणि माणसांना आपल्या निसर्गदत्त सर्जनशीलतेचे परमोच्च शिखर गाठण्यासाठी आव्हान देत राहील. ( या संदर्भात विस्तृत लेख साधना युवा दिवाळी अंक 2015 मध्ये मी लिहिला आहे.)

‘माणसे आश्चर्यकारक रीत्या मंद वेगाची, चुका करणारी पण बुद्धिमान (सर्जनशील) आहेत! संगणक आश्चर्यकारक रीत्या वेगवान, अचूक पण मठ्ठ (असर्जनशील) आहेत!! मात्र भविष्यात माणसे आणि संगणक एकत्रितपणे आश्चर्यकारक गोष्टी करू शकतील!!!’ हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे विधान वरील विवेचनासंदर्भात ‘आश्चर्यकारक रीत्या’ अचूक आणि दूरदृष्टीचे होते, हे अभ्यासाअंती उमजले.

या वैज्ञानिक आकलनावरून हे लक्षात आले की- आता या नव्या जगाला सामोरे जाण्यासाठी आणि त्यात नेतृत्व करण्यासाठी आपल्या मुलांचे शिक्षण हे घोकंपट्टी व पोपटपंची या वस्तुनिष्ठ यांत्रिकतेऐवजी वर उल्लेखिलेल्या निखळ व्यक्तिनिष्ठ व सर्जनशील मानवी क्षमतांच्या विकासावर  केंद्रित करायला हवे. वर्तनवादी शिक्षणाकडून ज्ञानरचनावादी शिक्षणाकडे जायला हवे. अत्याधुनिक यंत्रांशी सुयोग्य आणि समुचित भागीदारी करणारा असा अधिक परिपूर्ण, सर्जनशील, विवेकी, सुसंस्कृत व पर्यावरणस्नेही माणूस बनवणे आता अपरिहार्यच नव्हे, तर श्रेयस्कर आहे आणि शक्यही आहे.  ते आता शिक्षणाचे कालसुसंगत उद्दिष्ट असायला हवे. आधुनिक संगणक-विज्ञानाने मला आणि जगाला बेरोजगारीमुक्त शिक्षणाच्या ज्ञानात्मक व बोधात्मक उद्दिष्टांबरोबरच मानवतेचे भावात्मक उद्दिष्टही दिले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

विवेक सावंत,  पुणे
md@mkcl.org

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात