डिजिटल अर्काईव्ह

सर्वधर्म परिषदेपूर्वी विवेकानंदांनी अमेरिकेतील शेवटचे भाषण ‘अमेरिकन सोशल सायन्सेस’च्या वार्षिक अधिवेशनात दिले. त्याचे शीर्षक आहे, ‘हिंदुस्थानच्या इतिहासातील इस्लामचे योगदान’. या भाषणाची प्रत उपलब्ध नाही. मात्र मानवेंद्रनाथ रॉय यांनी याच शीर्षकाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेय आणि ते त्या भाषणातील मुद्यांवर आधारित आहे, असे काही जण मानतात. 10 ऑक्टोबर 1897 रोजी अखंडानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आपल्या मठात ब्राह्मण, दलित यांच्याबरोबर मुसलमान आणि ख्रिश्चन मुलांनाही प्रवेश दिला पाहिजे.  

विवेकानंदांनी इस्लामचा गौरव केलाय. आज जगाला सर्वधर्म समभाव व सर्वधर्म सद्‌भाव याची गरज आहे, हे सांगितले आणि भारताचा अभ्युदय करावयाचा असेल, तर हिंदू-मुसलमान सहकार्य नव्हे तर हिंदू-मुसलमान समन्वय हवा अन्‌ तो कसा करता येईल, हे सांगितले. ही सारीच मांडणी नेमकी आणि भेदक आहे. अनेकांना आजही ती कदाचित दाहक वाटेल. प्रश्न सोडवायचा असेल; तर प्रश्न जिथून निर्माण झाला, तिथून सुरुवात करावी लागते. विवेकानंदांनी सांगितले, ‘‘या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. ते आपले अभागी भाऊ आहेत आणि दलितांबद्दल आपल्या मनात जी कणव आहे, ती धर्मांतरित मुसलमान व ख्रिश्चन यांच्याबद्दलही असावयास हवी.’’ नोव्हेंबर 1894 मध्ये दिवाणजी (म्हणजे हरिदास बिहारीलाल देसाई) यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘भारतात गरिबांमधून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मुसलमान झालेले का आढळतात? केवळ तलवारीच्या जोरावर त्यांचे असे धर्मांतर घडवून आणले गेले, असे म्हणणे म्हणजे महामूर्खपणाच होय. त्यांनी धर्मांतर केले जमीनदारांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी, पुरोहितांच्या हातून मुक्त होण्यासाठी, स्वाधीनतेसाठी. म्हणूनच बहुसंख्य जमीनदार असलेल्या बंगालमध्ये मुसलमान किसानांची संख्या हिंदू किसानांपेक्षा अधिक आढळून येते. या लाखो अवनत व दलित नर-नारींच्या उद्धाराची चिंता आहे कुणाला?’

असेच विचार त्यांनी 20 सप्टेंबर 1892 रोजी खेत्रीनिवासी पंडित शंकरलाल शर्मा यांना पत्र पाठवून सांगितले. त्या पत्रात ते म्हणतात, ‘ज्या ठिकाणी ब्राह्मणच संपूर्ण जमिनीचे मालक असून, तेथील साऱ्या स्त्रिया एवढेच नव्हे, तर राजवंशातील स्त्रियादेखील ब्राह्मणांची उपपत्नी होऊन राहण्यात मोठा सन्मान मानतात. जिथे पुरोहितांचा अत्याचार भारतात सर्वांपेक्षा जास्त आढळतो, त्या त्रावणकोर प्रांतात जवळजवळ एकचतुर्थांश लोक ख्रिस्ती बनले आहेत आणि मी त्यांना दोष का देऊ?’ खरं तर विवेकानंद जे सांगतात, त्याची अंधुक किंवा एकांगी जाणीव रामदासांनाही आहे. दासबोधात ‘कित्येक तुरुक होती आपुल्या इच्छेने’ याची ते नोंद करतात. मात्र यामागच्या कारणांचा शोध आणि बोध घेत नाहीत. याउलट, धर्मांतरामागची ही कारणे सांगताना धर्म बदलूनही दलितांची स्थिती सुधारली नाही, सुधारणार नाही व याची दाहक जाणीव विवेकानंदांना आहे. दि.29 मार्च 1894 रोजी अमेरिकेतून केरळचे धर्मगुरू रेव्हरंड आर.ह्यूम यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केलेले नाहीस; त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केले आहेस.’

धर्मांतरित दलितांची स्थिती सुधारावयाची असेल, तर घरवापसीचा कार्यक्रम विवेकानंद सांगत नाहीत; कारण घरवापसीनंतर ते पुन्हा त्याच पददलित जातीत प्रवेश करणार आहेत. घरवापसी न करता धर्मा-धर्मातील आपले विशेषाधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण करण्यात येणारी तेढ थांबवली पाहिजे हे त्यांनी ओळखले होते. त्यांनी पहिली गोष्ट ही सांगितली की, इतर धर्मीयांवर खोटे आरोप करू नका. स्वत:ला तपासा. हे विवेकानंद फार ज्वालाग्राही शब्दांत सांगतात. वराहनगर मठातील त्यांचा मित्र राखाल (जे पुढे ब्रह्मानंद झाले) यांना 1895 मध्ये पत्र पाठवून ते सांगतात, ‘‘ढोंगी साधू-संन्यासी व विविक्षित वर्गातील ब्राह्मण यांनी या देशाला विपत्तीच्या खाईत लोटले आहे. त्यांचे मोठ-मोठे मठ आहेत, तिथे चमचमीत भोजन दिले जाते; तर दुसरीकडे देशातील एक-चतुर्थांश माणसे भुकेने तडफडून मरताहेत. आठ वर्षांच्या मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय आणि याला विरोध केला तर ‘तुम्ही आमचा धर्म बुडवत आहात’, अशी ओरड केली जाते. मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न करणाऱ्या लोकांना कसला आलाय धर्म? काही जण म्हणतात, ‘मुसलमान राजवटीत मुलींचे रक्षण करण्यासाठी बालविवाह सुरू केले.’ अरे, किती खोटे बोलाल? गुह्यसूत्रे, सर्व ब्राह्मणग्रंथ यांनी बालविवाहाचा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या खरेपणाबद्दल सर्व भाष्यकारांनी ग्वाही दिली आहे.’’

विवेकानंद इथेच थांबत नाहीत. ‘इस्लाममधील चांगल्या गोष्टींचे मोकळ्या मनाने स्वागत करा’ म्हणून सांगतात. 19 नोव्हेंबर 1894 रोजी न्यूयॉर्कहून आपल्या सर्व शिष्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ते सांगतात, ‘मुसलमानांनी हिंदूंवर विजय मिळवले. कसे शक्य झाले ते मुसलमानांना? भौतिक सभ्यतेबाबतचे हिंदूंचे घोर अज्ञान हे त्याचे कारण आहे. शिंप्यांनी शिवलेले कपडे घालायलासुद्धा हिंदूंना कुणी शिकवले असेल, तर ते मुसलमानांनी! रस्त्यातल्या धुळीने माखलेले अन्न खाण्यापेक्षा स्वच्छ रीतीने अन्न कसे खावे हे जर हिंदू लोक मुसलमानांकडून शिकले असते, तर किती बरे झाले असते.’ मात्र हे सारे सांगत असतानाच हिंदू-मुसलमान दोघेही एकमेकांपासून शिकताहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे आणि त्याच वेळी या दोन्ही धर्मांनी धर्मग्रंथांच्या पलीकडे गेले पाहिजे, हे त्यांनी सांगितले. हे सहज शक्य आहे, कारण धर्म ग्रंथांवर अवलंबून नाहीत, तर ग्रंथ हे धर्मावर अवलंबून आहेत. धर्मातील मूलभूत शाश्वत तत्त्वे सांगण्यासाठी ग्रंथ निर्माण झाले. ते जर काळाच्या एका चौकटीत बंदिस्त असतील; तर धर्मातील मूलभूत शाश्वत तत्त्वे आजच्या काळात, आजच्या संदर्भात सांगण्यासाठी त्यांनी बदलले पाहिजे.

दि.10 जून 1898 रोजी अलमोरा येथून सर्फराज मोहमद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी कळविले, ‘आमच्या वेदांतातील सिद्धांत कितीही सूक्ष्म आणि सुंदर असले, तरी समतेचा संदेश सर्वप्रथम व्यवहारात आणला तो इस्लामनेच. मात्र जिथे वेद नाहीत, कुराण नाही व बायबलही नाही, अशा ठिकाणी आपल्याला मानवजातीला घेऊन जायचंय आणि हे काम आपणाला वेद, कुराण व बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’ ‘धर्मग्रंथांचा आधार घेऊन आजच्या काळाला सुसंगत अशा प्रकारे आपणाला धर्मग्रंथांच्या बाहेर जावे लागेल. यासाठी माझा देश हा पथदर्शक आहे’, असा त्यांचा विश्वास आहे. इस्लामपासून समतेचा संदेश हिंदू धर्म शिकतोय हे सांगत असतानाच, ‘भारताचा भावी काळ’ या विषयावर भाषण देत असताना, ‘इंग्रजांचे व मुसलमानांचे शासन जातिव्यवस्थेची तीव्रता कमी करण्यास उपयोगी पडले’ याचे त्यांनी स्मरण करून दिले. मात्र त्याच वेळी हा एकमार्गी प्रवास नाही तर दोन धर्मांचे सुखद असे आदान-प्रदान भारतात झालेय, हे त्यांनी अमेरिकेत सांगितले.

बोस्टन येथील ‘ट्वेंटिएथ सेंच्युरी हॉल’मध्ये झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितले, ‘‘वेदांतातील धार्मिक उदारतेचा इस्लाम धर्मावर भारतात बराच प्रभाव पडला आहे. इतर देशांतील इस्लाम धर्मापेक्षा भारतातील इस्लाम धर्म अगदी वेगळा आहे. दुसऱ्या देशातील मुसलमान भारतात येऊन ‘काय तुम्ही या काफिरांबरोबर राहता?’ अशी आपल्या धर्मबांधवांना चिथावणी देतात, तेव्हाच काय ते उत्तेजित होऊन दंगे करतात.’’ म्हणजे भारतात हिंदू-मुसलमान सद्‌भाव हवा असेल, तर जगभर ख्रिश्चन-इस्लाम यांचे झगडे होऊन त्याचे पडसाद भारतात उमटणार नाहीत, हे पाहिले पाहिजे. दोघांना एकमेकांची शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने समजावून दिली पाहिजेत, याचे भान विवेकानंदांना आहे. ३ ऑगस्ट 1895 रोजी अमेरिकेत ‘हॉल ऑफ पीस’मध्ये विवेकानंदांनी महंमद पैगंबरांवर भाषण दिले. मिसेस ओली बूल त्या वेळी उपस्थित होत्या. त्यांनी लिहिलेय, ‘हा विलक्षण अनुभव होता. ख्रिस्तीधर्मी श्रोत्यांसमोर एका हिंदूने महंमद पैगंबरांचे मोठेपण समजावून दिले. विवेकानंदांनी मुख्य धडा शिकविला तो हा की, सर्व धर्मीयांच्या प्रेषितांचा आपण सन्मान केला पाहिजे. एक प्रेषित या नात्याने महंमद पैगंबरांनी आपणाला काय दिले, हे त्यांनी श्रोत्यांना पटेल अशा शब्दांत समजावून दिले.’

मृत्यूपूर्वी केवळ दोन वर्षे आधी सॅन फ्रॅन्सिस्को उपनगर क्षेत्रात 25 मार्च 1900 या दिवशी महंमद पैगंबरांचे मोठेपण समजावून देत त्यांनी असेच भाषण दिले. अमेरिकेतील एका प्रमुख चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंसमोर भाषण देताना विवेकानंद म्हणाले, ‘‘तुम्ही इस्लामचा सर्वाधिक द्वेष करता. तुमच्या दोन धर्मांच्या संघर्षातून एक महाभयानक प्रलय होईल. इतर धर्मांना नकळत त्यात सामील व्हावे लागेल. एकमेकांना समजावून घ्या. एखादा निग्रो गुलाम मुसलमान झाला, तर तो इराणच्या बादशहाचा जावई होऊ शकत होता. मात्र युरोप आणि अमेरिकेत मी भाषणे देत हिंडलोय. तुमच्या एकाही चर्चमध्ये धर्मांतरित निग्रो ख्रिश्चन का दिसत नाही? आपण एकमेकांना समजावून घेऊन आदान-प्रदान करणार आहोत, की झापडबंद वाटचाल करणार आहोत?’’ 17 नोव्हेंबर 1897 रोजी लंडन येथे भाषण देताना त्यांनी ते नेमक्या भेदक शब्दांत मांडले. ते म्हणाले, ‘‘खरी अडचण समजावून घ्या. बायबल आणि कुराण यांच्यामध्ये पडून कोणी निवाडा करू शकणार नाही. कारण भांडणच मुळी या दोघांचे आहे. तिसरा कोणता धर्म यात पडला, तर एवढेच होईल की, भांडण आता तिघांचे होईल. हे भांडण मिटवायला सर्वसंमत अशी एखादी शक्ती हवी आणि बुद्धीपेक्षा सर्वसंमत अशी कोणती गोष्ट असू शकेल? धर्माचे म्हणणे आपण बुद्धीच्या निकषावर पारखूनच घेतले पाहिजे.’’ मात्र हे सारे सांगत असतानाच आपला देश त्यांच्या कायम लक्षात आहे.

सर्वधर्म परिषदेपूर्वी विवेकानंदांनी अमेरिकेतील शेवटचे भाषण ‘अमेरिकन सोशल सायन्सेस’च्या वार्षिक अधिवेशनात दिले. त्याचे शीर्षक आहे, ‘हिंदुस्थानच्या इतिहासातील इस्लामचे योगदान’. या भाषणाची प्रत उपलब्ध नाही. मात्र मानवेंद्रनाथ रॉय यांनी याच शीर्षकाचे इंग्रजी पुस्तक लिहिलेय आणि ते त्या भाषणातील मुद्यांवर आधारित आहे, असे काही जण मानतात. मात्र, हिंदू-मुसलमान प्रश्नांची केवळ वैचारिक मांडणी करून विवेकानंद थांबत नाहीत. 10 ऑक्टोबर 1897 रोजी अखंडानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘आपल्या मठात ब्राह्मण, दलित यांच्याबरोबर मुसलमान आणि ख्रिश्चन मुलांनाही प्रवेश दिला पाहिजे. ही सारी मुले एकत्र बसून जेवण करतील. मात्र त्यांच्या जुन्या सवयीप्रमाणे त्यांना थोडे वेगवेगळे अन्न द्या.’ आणि आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात खूप आजारी असतानाही, अंगात ताप असतानाही ते अंबाल्याला गेले. ‘आर्यसमाजी व मुसलमान यांच्यातला दुरावा कमी करा’, म्हणून त्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवर्जून सांगितले आणि अंबाल्यात एक हिंदू-मुसलमान प्रशाला होती, त्या शाळेला मुद्दाम भेट दिली.

Tags: दत्तप्रसाद दाभोलकर मुस्लिम विवेकानंद Dattaprasad Dabholkar हिंदू मुसलमान Hindu Musalman Muslim Vivekanand weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके