डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नवीन वर्षानिमित्त प्रकट चिंतन

साधना साप्ताहिकातून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील लेखन प्रसिद्ध केले जाते; पण ती चौकट इतकी व्यापक आहे की, त्यात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या लेखनाला जागा मिळून जाते. मात्र दिवसेंदिवस ठळक होत चाललेला भाग असा की, साधना अंकांतून गतकाळातील आशय व विषय जास्त येत आहेत. अर्थात, आपले लेखक असोत वा वाचक, गतकाळात जास्त रममाण होतात हे खरे असले तरी, आपल्या समाजमनावर इतिहासाचे ओझे तुलनेने जास्त आहे आणि सभोवतालातून तो इतिहास पुन:पुन्हा चुकीच्या पद्धतीने उगाळला जात असतो. त्याला प्रत्युत्तर जाणे आवश्यक असते, अन्यथा नव्या पिढीसमोर चुकीचा इतिहास रेखाटला जातो आणि प्रत्येक नव्या पिढीला इतिहासाचे भान आपोआप येत नसते; नव्यानेच तो शिकावा लागत असतो.

प्रत्येक नवीन वर्ष येते तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या वाटचालीबद्दल काही विचार व भावना उफाळून वर येतात. बहुतांश वेळा त्या संमिश्र असतात. काहीसे समाधान, काहीसे असमाधान. त्याच वेळी आगामी वाटचालीचा विचारही मनात येतो. त्यात काही आव्हाने दिसतात, तर काही संधी. साहजिकच, काही निर्णय व निश्चय आकार घेतात, भावी नियोजनाला ते हातभार लावतात. व्यक्तीच्या आयुष्यात हे जेवढे खरे असते, तेवढेच किंबहुना अधिक खरे संस्थेच्या आयुष्याबाबत असते, असायला हवे. अन्यथा दीर्घकालीन व वर्धिष्णू अशी वाटचाल असंभव ठरते. साधनाच्या संदर्भातही असेच घडत आले आहे. अनेक लहान-थोरांनी कमी-अधिक योगदान देत साधनाला अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. येत्या 15 ऑगस्टपासून साधनाचे 75 वे वर्ष सुरू होणार आहे. म्हणजे 2022 हे वर्ष एक विशेष महत्त्वाचा टप्पा साधनासाठी ठरणार आहे.

मात्र मागील दोन वर्षे संपूर्ण जग कोविड 19 च्या सावटाखाली राहिले आहे. त्याचे सर्वच क्षेत्रांवर चांगले कमी आणि वाईट जास्त असे परिणाम झाले आहेत. माध्यम जगताबाबत ते जास्तच खरे आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत भारतात तरी प्रिंट आणि मुद्रित माध्यमांचाच विशेष बोलबाला होता, आणि प्रतिष्ठाही त्यांनाच होती. आता चित्र खूपच बदलले आहे, डिजिटल माध्यमाचा बोलबाला जास्त आहे आणि त्या माध्यमाची प्रतिष्ठाही हळूहळू वाढू लागली आहे, त्याला गांभीर्य प्राप्त होऊ लागले आहे. परिणामकारकता वाढू लागली आहे आणि प्रभावक्षेत्रही. आर्थिक बाबतीत स्वयंपूर्णता अद्याप दृष्टिपथात नाही, मात्र प्रिंट व इलेक्ट्रॉनिकच्या तुलनेत खर्च बरेच कमी आहेत आणि सुलभता व जलदता किती तरी जास्त आहे.

अशा पार्श्वभूमीवर योगायोग म्हणा किंवा काळाची पावले ओळखून दिलेला प्रतिसाद म्हणा, पण साधनाने तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2019 च्या जानेवारीपासूनच डिजिटल विस्ताराला प्रारंभ केला होता. साप्ताहिकाचे डिजिटल आर्काइव्ह तयार करायला सुरुवात केली आणि आतापर्यंत 1978 ते 2021 या 44 वर्षांचे आर्काइव्ह पूर्ण केले आहे. 1948 ते 77 या उर्वरित 30 वर्षांचे काम येत्या वर्षभरात पूर्ण झालेले असेल. साधना प्रकाशनाची सर्व पुस्तके इ-बुक स्वरूपात आणण्याचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेतले होते आणि सध्या उपलब्ध असलेली सर्व छापील पुस्तके इ-बुक स्वरूपात आणून किंडलवर उपलब्ध करून दिली आहेत. पूर्वप्रकाशित पण आऊट ऑफ प्रिंट असलेली पुस्तकेही आगामी वर्षभरात इ-बुक स्वरूपात  उपलब्ध होणार आहेत. आणि ऑडिओ बुक्सचे काम वर्षभरापूर्वी हाती घेतले होते, त्यालाही आता चांगलाच आकार प्राप्त होतो आहे. आतापर्यंत वीसेक पुस्तके ऑडिओ बुक स्वरूपात आणून स्टोरीटेलवर उपलब्ध करून दिली आहेत, आगामी वर्षभरात आणखी एवढीच येतील. अर्थातच, इ-बुक्स व ऑडिओ बुक्स या दोन्ही बाबतीत आमच्या नियोजनात आणखी इतके काम शिल्लक आहे की, ते पूर्ण करायला पुढील चार-पाच वर्षे तरी लागणार आहेत.

कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल अडीच वर्षांपूर्वी सुरू केले, त्यावर प्रामुख्याने मराठी लेख प्रसिद्ध होत आहेत. मात्र इंग्रजी लेखांचा विभाग आणि ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपातील मजकुराचेही विभाग आहेत. त्यामुळे साधना साप्ताहिक व साधना प्रकाशन यांच्यापेक्षा जास्त आशय-विषय हाताळण्याची व अधिक प्रभावी होण्याची क्षमता कर्तव्य साधनामध्ये आहे. तिथे काही चढ-उतार आले आहेत, पण दर्जा व ध्येय-धोरणे यात तडजोड होणार नाही, याची काळजी घेत आलो आहोत. तिथे अधिक वेळ, ऊर्जा, पैसा व मनुष्यबळ खर्च केले तर ‘स्काय इज द लिमिट’ अशी स्थिती येऊ शकते.

अर्थातच, सर्व प्रकारचे डिजिटल तंत्रज्ञान कमालीचे सुलभ व प्रचंड वेगवान करता येते. ते अंध व आक्रमक पद्धतीने वापरूनही खूप काही साधता येते, पण सर्जनशील व संयमित पद्धतीने वापरले तर चांगला परिणाम साधता येतो. तिथेही अंतिमतः ‘कंटेंट इज द किंग’ हेच खरे असल्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येतो आहे. त्यासाठी अभ्यासू व व्यावसायिक वृत्तीची गरज असते आणि त्या आघाडीवर मात्र सुलभ व वेगवान अशा हालचाली करता येत नाहीत. कारण यंत्र व तंत्र आणि माणूस यात जमीन अस्मनाचा फरक आहे तो आहेच. यंत्र तंत्र बनवणे, घडवणे व विकसित करणे हे काम गतिमान असू शकते, त्यांच्या आवृत्त्यामागून आवृत्त्या काढता येतात. माणसांबाबत ते शक्यच नसते. तिथेही बदल होतच असतात, करता येतात; पण ती गती तुलनेने मंदच असते.

परिणामी, यंत्र आणि माणूस यांच्यातील तिढा अधिकाधिक तीव्र होत जाणार, अधिकाधिक व्यामिश्र होत जाणार हे उघड आहे. त्यातून मोठीच आव्हाने उभी होत राहणार. आज जगभरात सर्वच क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाचा अभाव ही प्रमुख  समस्या झाली आहे. इथे ‘कुशल’ म्हणताना सर्जनशील, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हे तिन्ही आयाम अभिप्रेत आहेत. माध्यम जगतात तर ही समस्या अक्राळ-विक्राळ स्वरूपात आहे. उत्तम दर्जाच्या, अचूक व प्रवाही मजकुराची मागणी व त्याचा पुरवठा यात मोठी तफावत निर्माण होत आहे. चांगले लेखक व बातमीदार तर सोडाच चांगले अनुवाद करणारे, चांगले शब्दांकन करणारे, चांगले प्रूफ तपासणारे यांची मोठीच कमतरता आहे. ज्वलंत वा विशेष महत्त्वाचे विषय हाताळण्याची क्षमता असणारे तर आणखी कमी आहेत. संकलन, संपादन, अभ्यास, विवेचन, विश्लेषण, चिकित्सा या प्रत्येक पायरीवर अनेक माणसे उभी राहिली तरच माध्यमे समाधानकारक पद्धतीने काम करू शकणार आहेत. डिजिटल कल्लोळात टिकून राहण्यासाठी प्रिंट माध्यमांना याबाबत अधिक सजग राहावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर, साधना साप्ताहिकाची आगामी वाटचाल कशी दिसते आहे? एका मर्यादेनंतर अंकाचा दर्जा हा व्यवस्थापन, वितरण, विपणन व अर्थकारण यावरच अवलंबून असतो. त्या दृष्टीने आव्हाने बरीच आहेत आणि संधीही खूप आहेत. मात्र तो अतिव्याप्त आणि स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. म्हणून तो इथे केवळ अधोरेखित करून अंकाच्या आशय-विषयाबाबत कळीच्या ठरत असलेल्या काही मुद्यांचा ओझरता उल्लेख तेवढा करणे आवश्यक वाटते.

साधना साप्ताहिकातून प्रामुख्याने राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील लेखन प्रसिद्ध केले जाते; पण ती चौकट इतकी व्यापक आहे की, त्यात जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणाऱ्या लेखनाला जागा मिळून जाते. मात्र दिवसेंदिवस ठळक होत चाललेला भाग असा की, साधना अंकांतून गतकाळातील आशय व विषय जास्त येत आहेत. अर्थात, आपले लेखक असोत वा वाचक, गतकाळात जास्त रममाण होतात हे खरे असले तरी, आपल्या समाजमनावर इतिहासाचे ओझे तुलनेने जास्त आहे आणि सभोवतालातून तो इतिहास पुन:पुन्हा चुकीच्या पद्धतीने उगाळला जात असतो. त्याला प्रत्युत्तर जाणे आवश्यक असते, अन्यथा नव्या पिढीसमोर चुकीचा इतिहास रेखाटला जातो आणि प्रत्येक नव्या पिढीला इतिहासाचे भान आपोआप येत नसते; नव्यानेच तो शिकावा लागत असतो. शिवाय, ‘आज’ नीट समजून घेण्यासाठी व ‘उद्या’साठी ठोस पावले टाकण्यासाठी ते आवश्यक असते. हे सर्व खरे असले तरी, साप्ताहिकाच्या भावी वाटचालीसाठी गतकाळाला उजाळा देणाऱ्या लेखनाचे प्रमाण कमी करत जाणे आवश्यक आहे. आता ते प्रमाण एकूण मजकुराच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. हेच प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा कमी राहील असे नियोजन आम्ही करत आहोत.

यालाच जोडून दुसरा मुद्दा पुढे येतो तो असा की, दीर्घ लेख व गंभीर वैचारिक लेख हे साधनाचे वैशिष्ट्य पूर्वीपासून राहिले आहे, अलीकडच्या काही वर्षांत ते वाढले आहे. याचे कारण त्यासाठी तेवढी जागा देऊ शकणारी अन्य नियतकालिके फार नाहीत आणि तसा वाचकवर्ग असणारी नियतकालिकेही कमी आहेत. शिवाय, तशा लेखनाला जागा उपलब्ध करून दिली तर अनेक विषय सखोल व विस्तृत स्वरूपात ठसवता येतात, किंबहुना किती तरी नवे विषय पुढे आणता येतात. साधनाचे हे वैशिष्ट्य निश्चितच जपायला हवे, पण विशेषांक त्यासाठी पुरेसे आहेत. कारण अलीकडच्या काही वर्षात साधनाचे आठ ते दहा विशेषांक दरवर्षी येत असतात. मात्र नियमित अंकांत दीर्घ लेख कमी राहतील असे नियोजन करीत आहोत. आज वृत्तपत्रांत मोठ्यात मोठा लेख 1200 ते 1500 शब्दांचा असतो. साधनातील लहानात लहान लेख तेवढ्या शब्दांचा असतो. त्यामुळे साधनाच्या नियमित अंकात मोठ्यात मोठा लेख 2500 शब्दांचा असेल याची काळजी घेणार आहोत. अर्थात, आशय व विषय तेवढे महत्त्वाचे असतील तर अपवाद निश्चित केले जातील. पण ते कमीत कमी असतील. अर्थातच, कितीही मोठा व गंभीर विषय कमी शब्दांत व अधिक वाचनीय करता येतो, जर लेखकाने पुनर्लेखन करण्याची आणि संपादकाने लेखकाच्या संहितेवर काम करण्याची तयारी ठेवली तर!

तिसरा मुद्दा असा की, कोणत्या प्रकारचे लेखन वाचकांना साधनाकडून जास्त अपेक्षित आहे किंवा वाचकांना द्यायला हवे असे आम्हाला वाटते? त्याचे उत्तर असे पुढे येते की, राज्यस्तरांवरील घटना घडामोडींच्या संदर्भातील लेखन साधनातून वाचण्यात वाचकांना फारसा रस नाही, त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीवरील लेखनाची अपेक्षाही कमी आहे. मग जास्त अपेक्षा काय आहे तर, अन्य राज्यांत व राष्ट्रीय स्तरावर कळीच्या ठरत असलेल्या घटना घडामोडी व प्रश्न-समस्या यांवर विश्लेषणात्मक व कोंडी फोडणारे लेखन! मात्र त्यात अडचण अशी की, त्या प्रकारचे लेखन करणारे लोक मुळात मराठीत कमी आहेत, जे आहेत ते अतिरिक्त कामाच्या ओझ्याखाली असतात. तशा क्षमता असणारे पण वाचनीय लिहू न शकणारे असा एक वर्ग आहे तो वेगळाच. शिवाय, अन्य राज्यांत व प्रत्येक क्षेत्रांत सतत इतके काही बदल होत असतात की, ते पकडता येणे आणि उलगडून दाखवून त्यावर भाष्य करता येणे; हे काम राज्य स्तरावरच वावरणाऱ्यांना कठीण जाते. त्यामुळे, अशा विषयांवरील लेखन मिळवण्यासाठी अनुवाद, शब्दांकन, मुलाखती हे मार्ग जास्त प्रमाणात अवलंबावे लागतात. अर्थात, तसे केले तर कमी वेळात, कमी श्रमात व कमी खर्चात जास्त चांगले लेखन मिळवता येते. पण ते घडवून आणण्यासाठी अचूकता व परिपूर्णतेचा ध्यास आणि सतत शिकत राहण्याची वृत्ती असणारे लोक आवश्यक असतात.

चौथा मुद्दा असा की, पारंपरिक विषयांवर व पारंपरिक पद्धतीने लेखन मिळवता येणे तुलनेने सोपे असते आणि तसे लेखनही बरेच येत असते. मात्र शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन प्रादेशिक भाषांमध्ये मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वस्तुतः या प्रत्येक क्षेत्रांत नित्यनूतन असे सर्वेक्षण, संशोधन मोठ्या प्रमाणात चालू असते. त्यातील दर्जेदार म्हणावे असे कमी असते, पण जे असते त्यांचीही नीट दखल घेतली जात नाही. केंद्र सरकारचे विविध विभाग व देश-विदेशांतील संशोधन संस्था यांचे अहवाल हा उत्तम दस्तऐवज असतो. (राज्य सरकारे व विद्यापीठे इथले संशोधन मात्र खूपच कमी वेळा त्या दर्जाचे असते.) त्यांची चांगली ओळखसुद्धा त्या-त्या क्षेत्रांचे परिप्रेक्ष्य पाहण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, कृतिकार्यक्रम राबवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पण त्यांची उकल करून दाखवण्याबाबत आपल्याकडे बौद्धिक आळस वा अनास्था इतकी जास्त आहे की, ते संशोधन करणाऱ्यांचे श्रम वाया घालवण्यासारखेच असते. अशा विषयांवर साधनाला ठोस व सातत्याने काही करता येईल असाही प्रयत्न राहणार आहे.

वरील चार प्रमुख मुद्दे केवळ ओझरते मांडले आहेत. त्यांच्या अंतर्गत उपघटक अनेक आहेत. त्या सर्वांचा उहापोह करण्याची इथे गरज नाही. मात्र ज्या प्रकारचे व ज्या दर्जाचे लेखन प्रसिद्ध करीत राहावे, त्या प्रकारचे व त्या दर्जाचे लेखन येत राहते ही वस्तुस्थिती एका बाजूला असते. आणि अधिक वेगळे व कष्टदायक प्रयत्न करायला जावे, तर त्यातून इतके कमी हाती लागते की, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार या म्हणीचा प्रत्यय येतो. परिणामी, मनातले चिंतन आणि त्याचे प्रकटन, प्रत्यक्षातील कार्यवाही आणि तिची परिणामकारकता यांच्यात मोठ्याच गाळण्या लागत असतात. मात्र पुढे पाहिले तर बरीच वाटावळणे व चढण बाकी दिसते आणि मागे पाहिले तर बरीच वाटावळणे व चढण पार करून आलो आहोत असेही दिसते. त्यामुळे वाटते, पुढे तर जायलाच हवे. किंबहुना म्हणून तर काम करण्याची गरज आहे, म्हणून तर काम करण्यात मजा आहे!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके