नामांतरासाठी करील प्राणत्याग
डोईला बांधून कफन
लढघास सिद्ध भीम तरुण
संग्राम होऊ दे मरणाशी
आम्ही गर्जून उठणार!
मेलेली जनावरे न ओढल्यास
हीन कामे बंद केल्यास
तळयाच्या पाण्यास स्पर्श केल्यास
आजही दंगली उसळतात गावोगाव!
पिसाट दंगलखोर
दलितांना काढतात जाळून
नष्ट केली जातात घरे
लाख मोलाची लुटली जातात शरीरे
बालकांची केली जाते हत्या
पुरुषांची केली जाते कत्तल
आम्हास वंद्य असणाऱ्या महापुरुषांचे
फोडले जातात पुतळे
काढले जातात डोळे
फोडली जाते तस्बीर
विरोधकांची काढली जातात आतडी बाहेर
योग्य मागणीसाठी केलेल्या मोर्चावर अन्
सत्याग्रहावर केला जातो गोळीबार!
दलितांची जाग
नव्हे ही आग
जाळून करील राख
नामांतरासाठी करील प्राणत्याग
डोईला बांधून कफन
लढघास सिद्ध भीम तरुण
संग्राम होऊ दे मरणाशी
आम्ही गर्जून उठणार!
Tags: दलितां विरुद्ध होत असलेली आक्रसताळपणाला दृष्टीत करून केलेली कविता A poetry defining on atrocities against Dalits weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या