डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'ज्या देशातल्या लोकांना आणि सार्वभौम संसदेला संरक्षणविषयक प्रश्नांबाबत पूर्णपणे व पद्धतशीरपणे अज्ञानात ठेवण्यात येते असा भारतावाचून दुसरा लोकशाहीप्रधान देश जगात नाही, आणि तरी नवल असे की भारताच्या संरक्षणाविषयी जेवढी माहिती जगातल्या इतर देशांना आहे तेवढी अन्य कोणत्याही देशाबद्दल नाही. 

लोकसभेतील विरोधी पक्षीय सभासदात प्रजासमाजवादी पक्षाच्या नाथ पैंचा अंतर्भाव होतो. त्यांना वक्तृत्वाची देणगीच लाभली आहे. त्यांची टीका प्रतिपक्षाला घायाळ करणारी असते. पण कोणत्याही प्रश्नाचा मूलग्राही दृष्टीने विचार करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या सूचना नेहमी विधायक असतात. कोणत्याही विषयावर ते बोलत असले तरी त्यांचे भाषण ऐकणे नेहमीच उत्साहवर्धक असते. मनात जराही द्वेषबुद्धी न बाळगता सत्ताधाऱ्यांवर कठोर प्रहार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 

सरकारी नोकरांचे ते नेते आहेत . त्यांच्या संपाचे त्यांनी काही वर्षांपूर्वी नेतृत्व केले व तो संप विफल ठरला . पण नंतर सरकारी नोकरांना अभय मिळवून देण्यासाठी लोकसभेत त्यांनी एक अत्यंत परिणामकारक भाषण केले व त्यात ते यशस्वी झाले. त्या भाषणात एकदा तर त्यांनी काँग्रेस खासदारांकडूनही टाळ्या मिळवल्या. पंतप्रधान नेहरूंनी आपल्याला स्वातंत्र्यापूर्वी कसे प्रभावित केले होते त्याची त्यांनी सभागृहाला आठवण करून दिली. 

तेव्हा काँग्रेसजनांनीही टाळ्या दिल्या आणि खुद्द नेहरूंनीही सरसावून बसत नाथ पैंचे शब्द काळजीपूर्वक ऐकून घेतले. तथापि लोकसभेतील त्यांचे सर्वोत्कृष्ट भाषण झाले ते नेफामधील पराभवाच्या चर्चेत. त्या भाषणात संरक्षणविषयक प्रश्नांतील आपल्या तयारीचाही त्यांनी प्रत्यय आणून दिला. लोकसभेचे अधिवेशन चालू नसले तरीही पुढील लोकसभेतील कामाची तयारी ते परिश्रमपूर्वक ते करीत असतात.

हिंदू (मद्रास)

-------

एका खात्याच्या प्रतिष्ठेपेक्षा भारताची प्रतिष्ठा श्रेष्ठ

हा धाडसी माणूस (डॅनियल वॉलकॉट) विमानातून उतरल्याबरोबर लपण्याच्या जागी जात नाही... तो थेट पोलीस स्टेशनमध्ये, सुरक्षा दलाच्या पुढे उभा राहतो आणि आपल्या विमानाला संरक्षण देण्याची विनंती तो पोलीस अधिकाऱ्यांना करतो. ते अधिकारीही एका चोरट्या व्यापाराच्या विमानाच्या संरक्षणासाठी दोन पहारेकरी बसवण्याचे सत्कृत्य करतात. 

त्याला हे धाडस करवले कसे ? कारण त्याची अशी प्रामाणिक समजूत आहे की ज्याला आपण बनवू शकणार नाही, लाच देऊ शकणार नाही असा माणूस या देशात सापडणे कठीण आहे. तो येतो, साथीदारांना भेटतो : विमान तळावर जातो; तेथील प्रवाशांत मिसळतो. हे कसे शक्य झाले? तेथील सुरक्षाधिकारी काय करीत होते ?

मंत्रिमहोदय, आपण विमानतळावर जाता तेव्हा व्ही.आय.पी. असूनही किती अडथळे आपल्याला ओलांडावे लागतात हे आपण जाणता. परंतु वॉलकॉट सहज विमानतळावरून बाहेर पडू शकतो. भारतातील प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याकडे जादूची किल्ली आहे. तो कोणतेही कवाड़ खोलू शकतो. ' (यावर श्री. गुलझारीलाल नंदा- तेव्हाचे गृहमंत्री- म्हणाले, श्री. नाथ पैंची गोष्ट असत्यावर आधारलेली आहे. तहकुबी सूचनेच्या दृष्टीने तर निव्वळ कुचकामाची आहे.) 

'ही घटना तडकुबीची सूचना मांडण्याच्या लायकीची नव्हती तर काय त्याबद्दल सरकारचे आभार प्रदर्शन करण्याची सूचना मांडायला हवी होती ? ज्या देशाला वॉलकॉट पळून जात असताना पहिल्या वेळी अडवता आले नाही, दुसऱ्यावेळी थांबवता आले नाही, तिसऱ्यांदा त्याने तुरी दिल्या तरी काही करता आले नाही, त्या देशाकडे एखादे आक्रमण थांबविण्याचे सामर्थ्य असेल काय?

माओ त्से तुंग भारताच्या संरक्षणविषयी एकदा म्हणाला होता, 'भारतीय सेना? म्हणजे शांततेच्या काळात अजिंक्य व युद्धाच्या काळात अदृश्य होते तीच काय?' या उद्गारातील सत्य वॉलकॉट मोठ्या नाट्यम पद्धतीने दाखवून देतो. म्हणूनच घटनेत झाली सर्व गुंतागुंत आणि त्यातून निघणारा संपूर्ण अर्थ जाणून घेऊन या समस्येला तोंड द्यावे अशी मागणी आहे. ही बाब वैयक्तिक प्रतिष्ठेची करू नये. कोणत्याही एका खात्याच्या प्रतिष्ठेपेक्षा भारताची प्रतिष्ठा श्रेष्ठ आहे आणि ती राखणे महत्त्वाचे आहे.' (वॉलकॉट प्रकरण)

-------

दोन सूत्रे

भारतावर होणाऱ्या परकीय आक्रमणांचा बंदोबस्त करण्यासाठी मी दोन सूत्रे मांडतो. पहिले सूत्र असे की, एकदा शत्रूने हल्ला केल्यानंतर आम्हाला सोयीस्कर व आम्ही निवडलेल्या ठिकाणी शत्रूवर मर्माघात करणे. कांजरकोटवरील हल्ल्याला कच्छच्या दलदलीत तोंड देत न बसता ती पंजाबच्या मैदानावर नेणे हा त्याचा अर्थ. दुसरे सूत्र असे की अलेक्झांडरपासून माओ त्से तुंगपर्यंतच्या सर्व आक्रमकांशी आपण आपल्या भूमीवर लढत राहिलो. ही परंपरा मोडून आपल्यावरील आक्रमणाचा प्रतिकार आक्रमकांच्या प्रदेशात शिरून केला जाईल.

(२९ मार्च १९६५)

------

संरक्षणाला पहिले स्थान

'ज्या देशातल्या लोकांना आणि सार्वभौम संसदेला संरक्षणविषयक प्रश्नांबाबत पूर्णपणे व पद्धतशीरपणे अज्ञानात ठेवण्यात येते असा भारतावाचून दुसरा लोकशाहीप्रधान देश जगात नाही, आणि तरी नवल असे की भारताच्या संरक्षणाविषयी जेवढी माहिती जगातल्या इतर देशांना आहे तेवढी अन्य कोणत्याही देशाबद्दल नाही. 

(संकलन : वासू देशपांडे) (६-४-१९६३)

Tags: वासू देशपांडे (डॅनियल वॉलकॉट) नाथ पै weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके