डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

फुले-आंबेडकर स्मृती व्याख्यान : दहशतवाद

नाशिकमधील सर्व समतावादी संघटना-संस्थांच्या वतीने फुले-आंबेडकर स्मृतीशताब्दी वर्षातील कार्यक्रमांचा एक भाग म्हणून नुकतीच 'फुले-आंबेडकर स्मृति व्याख्यानमाला' आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत 'दहशतवाद’ या विषयावर डॉ. य. दि. फडके यांनी व्याख्यान दिले. त्याचा सारांश खाली देत आहोत.

जगातील बहुसंख्य राष्ट्रांत आज दहशतवादी चळवळींनी मूळ धरले आहे. दहशतवाद हे दुबळ्या माणसांच्या हातातील शस्त्र असून प्रस्थापित राज्यसंस्थेविरुद्ध सांसदीय मार्गांचा अवलंब न करता हत्यारांच्या वापराने बंड करण्याची प्रवृत्ती म्हणजे ‘दहशतवादी कृत्ये’. दहशतवाद ही व्यापक संकल्पना आहे. दहशतवाद्यांच्या सर्व कृती या पूर्वनियोजित व पद्धतशीर असतात. निरपराध लोकांना मारणे हा जरी त्यांचा मूळ उद्देश नसतो तरी सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी, लोकांमध्ये धास्ती निर्माण करण्यासाठी दहशतवादी निष्पापांचे बळी घेतात.

राजकीय दहशतवाद, प्रायोजित दहशतवाद, धर्माधिष्ठित दहशतवाद, 'नार्को' दहशतवाद (मादक द्रव्यांच्या चोरट्या व्यापारातून होणारा दहशतवाद) हे दहशतवादाचे काही प्रकार असून नव्या प्रकारच्या आजच्या ‘आधुनिक दहशतवादात’ जिवावर उदार होऊन तरुण दहशतवादी कृत्ये करण्यासाठी पुढे येत आहेत, ही घटना गंभीर आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारक आणि आजचे दहशतवादी यांच्यात साधर्म्य आहे, हा काहींचा युक्तिवाद फसवा आहे. क्रांतिकारकांनी निरपराधी लोकांना कधीच वेठीस धरले नव्हते. आजचे दहशतवादी मात्र अपराधी-निरपराधी यांच्यात कोणताच भेदभाव करीत नाहीत.

अमाप प्रसिद्धीसाठी काही तरुण आज दहशतवादी कृत्ये करण्यास पुढे सरसावत आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे. आज वृत्तपत्रे, दूरदर्शन यांसारखी प्रभावी प्रसारमाध्यमे दहशतवादी कृत्यांना कव्हरस्टोरी, दहशतवाद्यांच्या मुलाखती यांसारख्या स्वरूपात अमाप प्रसिद्धी देत आहेत. वर्तमानपत्रे आणि दूरदर्शन हे आपल्या वाचक-प्रेक्षकांसाठी दहशतवाद्यांनी केलेल्या हत्या हे सवयीचे भाग करून टाकीत असून त्यामुळे माणसाची संवेदनक्षमता बोथट बनत चाली आहे. याचे विपरीत परिणाम समाजात दिसत असून दहशतवादी कृत्यांच्या प्रसिद्धीत प्रसारमाध्यमांनी अधिक जबाबदारीची भूमिका घेण्याची गरज आहे. दहशतवादी आपल्या कृत्यातून ‘राज्यांतर्गत राज्य’ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्या भागात आपली राजवट चालवून तेथील सत्ता ताब्यात घेतात. या प्रयत्नांना यश मिळू लागले की नव्या स्वतंत्र देशाची मागणी करतात. दहशतवाद हा अघोषित युद्धाचा प्रकार आहे. पाकिस्तानने पंजाब, काश्मीरमधील दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत पुरवून भारताविरुद्ध असे अघोषित युद्ध पुकारले आहे. आज जगात अणुबाँबचा वापर करून किंवा पारंपरिक शस्त्रांचा वापर करून युद्ध करणे कोणत्याही राष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळे जगातील अनेक राष्ट्रे दहशतवाद्यांमार्फत आपल्या शत्रूशी या नव्या अघोषित प्रकाराने युद्ध करीत आहेत.

जगातील अनेक देशांतील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे, साधनसामग्री, पैसा पुरविण्याचे व वेळप्रसंगी आश्रय देण्याचे काम 'पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशन' ही मुळातील दहशतवादी संघटना करीत असून आंतरराष्ट्रीय दहशतवादास खतपाणी घालण्यात पीएल्ओचा मोठा वाटा आहे. जागतिक युद्धशास्त्राप्रमाणे युद्धांचे पाच प्रकार मानले जातात. सर्वंकष युद्ध, महायुद्ध, मर्यादित युद्ध, यादवी युद्ध, गनिमी कावा पद्धतीचे युद्ध, हे युद्धाचे पाच प्रकार असून सर्वंकष युद्ध वगळता उर्वरित युद्धांचा जगातील काही राष्ट्रांनी अनुभव घेतला आहे. सर्वंकष युद्ध झालेच तर त्यात दोन्ही बाजूंकडून क्षेपणास्त्राचा वापर केला जाईल व त्याचे दुष्परिणाम मानवजातीला दीर्घकाळपर्यंत भोगावे लागतील, हे सर्वजण जाणत आहेत आणि म्हणूनच अघोषित युद्धाच्या या नव्या सहाव्या प्रकाराने राष्ट्रे एकमेकांशी लढत आहेत.

आज उग्र रूप धारण केलेल्या पंजाब, काश्मीर समस्येमागची कारणे भूतकाळात आहेत. पंजाब भाषिकांचे स्वतंत्र राज्य असावे या मागणीसाठी तारासिंग, फत्तेसिंग यांनी अगोदर सनदशीर मार्गांनी चळवळी सुरू केल्या. 1965 सालच्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धाच्या वेळी देशहित लक्षात घेऊन त्या स्थगितही ठेवल्या गेल्या. मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची मागणी 1960 मध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीतून थोडीफार तरी साकार झाली. पण पंजाबी भाषिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. 1966 ला पंजाबची फाळणी होऊन पंजाब, हरियाणा ही दोन वेगळी राज्ये केली गेली. पण त्यातही तालुका-जिल्हा हा घटक न मानता खेडे हा घटक धरून हे विभाजन व्हावे, ही पंजाबी लोकांची मागणी नाकारली गेली. याचा परिणाम, काही पंजाबी भाषिक भाग हरियाणात समाविष्ट केला गेला. चंदीगड पंजाबला द्यायचे ठरले असताही ते दिले गेले नाही. या सर्व घटनांमधून आपल्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे ही भावना तेथील जनतेत वाढीस लागली.

1961 व 71 च्या जनगणनेच्या वेळी पंजाबातील हिंदुंनी आर्य समाजाच्या आदेशानुसार आपली मातृभाषा पंजाबी नसून हिंदी आहे असे स्पष्टपणे नमूद केले. यातून हिंदू-शिखांमधील वेगळेपणाची भावना जोर धरू लागली. आनंदपूरसाहेब ठरावातील पंधरा मागण्यांपैकी काही अगदी किरकोळ असताही स्वीकारल्या गेल्या नाहीत. अमृतसर एक्स्प्रेसचे नाव बदलून ते सुवर्णमंदिर एक्स्प्रेस ठेवावे, अमृतसरमध्ये धूम्रपान, मद्यपान विरोधी कायदा लागू केला जावा, या मागण्याही अव्हेरल्या गेल्या.

पंजाब समस्येचे मूळ आर्थिक प्रश्नात आहे. पंजाबात नवीन उद्योगधंदे काढून रोजगार निर्माण केला जावा, साखर कारखाने, कापड गिरण्यांना परवानगी दिली जावी, या मागण्याही 'ते सीमेवरचे राज्य आहे' असे सांगून फेटाळल्या गेल्या. पण त्याच वेळी गुजरात, राजस्थान या सीमेजवळील राज्यांत मात्र सरकारने मोठमोठे सार्वजनिक प्रकल्प उभारले. यातून पंजाबातील लोकांची अन्यायाची भावना तीव्र बनत गेली व पुढे रोजगार नसलेला तरुणवर्ग दहशतवादी गटात सामील झाला.

राजकीय लाभापोटी देशातील काही राजकीय पक्षांनी (मुख्यतः काँग्रेसने) पंजाब, काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाममधील दहशतवादी गटांना प्रोत्साहन दिले व मग दिवसेंदिवस हे गट प्रबळ बनत गेले. राजकीय पक्षांच्या या चुकांचे परिणाम देशाला दीर्घकाळपर्यंत भोगावे लागतील. राजकीय नेत्यांनी जर वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेतली असती तर नंतर आलेला कडवटपणा टाळता आला असता. केवळ लष्कराचा वापर करून दहशतवादाची ही समस्या सुटणार नसून एकीकडे मर्यादित लष्कराचा वापर तर त्याचबरोबर दुसरीकडे वाटाघाटी करूनच या समस्येचा प्रभाव कमी करता येईल. दहशतवादाच्या समस्येचे समूळ उच्चाटन नजीकच्या काळात तरी शक्य नाही असे दिसते.

मध्ययुगात वावरणारे काही भारतीय राजकीय नेते भारताने पाकिस्तानमधील प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त करावीत, एकदाचे युद्ध होऊच द्यावे, या प्रकारच्या वल्गना आज करीत आहेत. पण या मंडळींना नव्या युद्धशास्त्राची पूर्ण माहिती नाही. अशा युद्धाचे संभाव्य परिणाम काय होतील याची त्यांना कल्पना नाही. युद्धाने प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिकच बिकट बनतील. दीर्घकाळच्या युद्धाचा भारताला अजून अनुभव नाही. येथील सैन्य व नेतृत्वाची युद्धकाळात कसोटी लागलेली नाही. आज जर युद्ध झालेच तर विजयासाठी देशाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.

Tags:  डॉ. य. दि. फडके पंजाब दहशतवाद य दि फडके Punjab terrorism dr. y d phadke weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके