डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

साने गुरुजींची पत्रकारिता

साने गुरुजींच्या पत्रकारितेची जातकुळी टिळक-आगरकरांच्या संयुक्त पत्रकारितेच्या जातकुळीची होती. मनाच्या उभारीच्या भांडवलावर त्या पत्रकारितेचा उदय झाला होता. पदरी भांडवल जमा झाले आहे, आपल्याला अनुकूल अशी मानसिकता समाजात निर्माण व्हावी, आपल्या हितसंबंधांची जपणूक व्हावी यासाठी ही पत्रकारिता जन्मली नव्हती! साने गुरूजींच्या पत्रकारितेला दास्यविमोचनाचा एकच ध्यास होता.

‘लिहिणे हो माझा थोडासा स्वधर्म आहे’ असे साने गुरुजी म्हणत. ती आपली जीवनवृत्ती आहे असे त्यांना वाटत नसे, तरीही त्यांनी नियतकालिकात आणि पुस्तकरूपाने जे लिहिले त्याचे वर्णन आचार्य विनोबांनी ‘अपरंपार’ या शब्दाने केले आहे. एका ठिकाणी साने गुरुजींनी आपला वर्ण कोणता त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्ञानाचे सत्र चालणारे आपण ब्राह्मण नाही, समाजधारणेला उपकारक असा व्यवसाय करणारे आपण वैश्य नाही, सतत लढाईसाठी शस्त्र परजून तयार असणारे आपण क्षत्रिय नाही किंवा निरंतर सेवारत असणारे आपण शूद्र नाही. आपला स्थिर असा कोणताही एक वर्ण नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचा अर्थ कोणतीही स्थिरवर्णाची पताका त्यांनी घेतली नाही. कारण अशा कोणत्याही जुन्या साच्यात बरसणारे त्यांचे व्यक्तिमत्वच नव्हते. त्यामुळे मूल्यमापनाचे प्रचलित निकष त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करण्याच्या दृष्टीने निरूपयोगीच आहेत. 

वात्सल्यभक्तीचा अभिनव असा वसा त्यांनी स्वीकारला होता आणि तोच त्यांच्याकडून साहित्य वदवत होता, आईला जसे प्रेमाचे भरते येते तसे त्यांना येई आणि त्यातून जे शब्द स्त्रवत ते साहित्याचे रूप घेत. वृत्तपत्रीय लिखाण माणजे घाईतले साहित्य (लिटरेचर इन हेस्ट), पण अनेक वेळा तेच असे असते की त्याला चिरमूल्य असते. किंबहुना भावनांचा पूर ओसंडू लागला म्हणजे शब्दांच्या भांड्यात तो साठवता साठवता पुरेवाट होते. हे घाईतले साहित्य कित्येक वेळा एखाद्या घटनेच्या संदर्भात कागदावर उतरते तेव्हा ते वृत्तपत्रीय लिखाण ठरते, पण त्यामागेही जीवनाचे सम्यक् दर्शन असते आणि मग ते वृत्तपत्रीय लिखाणही पुस्तकात संग्रहित होते. 

साने गुरुजींच्या वृत्तपत्रीय लिखाणाची सुरुवात होते ती हस्तलिखित 'छात्रालय’ दैनिकाचे संपादक म्हणून! एका चिमुकल्या विश्वासाठी हे हस्तलिखित दैनिक ते काढत. त्या लिखाणाला नीडही होते आणि आकाशही. नीड होते ते छात्रालयाचे, शाळेचे आणि आकाश होते ते अवघ्या विश्वाचे! त्यापाठीमागे 'जगात जे जे सुविचार वारे, मदीय माषेत मरेन सारे' ही जिद्द त्यामागे होती. छात्रालय दैनिकात, त्या चिमुकल्या विश्वात ज्या लहान मोठ्या घटना घडत आणि व्यक्तींचा संबंध येई त्यांची दखल घेतली जाई. त्यामुळे त्या विश्चात त्या दैनिकाबद्दल प्रचंड उत्सुकता असे. त्यावर विद्यार्थ्यांच्या उड्या पडत. आपल्याला छात्रालयात राहाता येत नाही याची खंत वाटून छात्रालयात नसणारी कित्येक मुले छात्रालय निवासी असल्यासारखीच वागत! हे छात्रालय दैनिक त्या चिमुकल्या विश्वात फार लोकप्रिय होते. कारण त्या संपादकाला आपल्या वाचकवर्गाची स्पष्ट जाण होती आणि मुख्य म्हणजे त्या वाचकाला आपल्याला कोणती दिशा दाखवायची आहे त्याचे भान होते. ह्या दैनिकातील मजकुराला शिळेपणा कसा तो येतच नसे, त्याची टवटवी कायम राही, कागद जो काय दगा देईल ती मर्यादा येऊन पडे, अन्यथा कालाचे निरवधित्व आणि पृथ्वीचे विपुलत्व हे त्याचे उडण्याचे क्षितिज होते. 

या ‘छात्रालय' दैनिकातूनच पुढे 'विद्यार्थी' या नियतकालिकाचा उदय झाला. ते छापले जाऊ लागले. त्याचा वाचकवर्ग व्यापक झाला. पण घटना इतक्या वेगाने घडत होत्या आणि इतक्या वजनदार होत्या की कागदाच्या माध्यमाला त्या पेलेनात. त्यांना आणखी चांगल्या मजबूत माध्यमाची गरज भासू लागली. असे सर्वश्रेष्ठ माध्यम स्वतःचे जीवन हेच असते. ते माध्यम सर्वात प्रभावी असते आणि त्याची समनुयोग शक्तीही मोठी असते. साने गुरुजी त्या माध्यमाकडे सहजी वळले. पुढे ‘विद्यार्थी’ मासिकाचे प्रकाशन बंद झाले आणि बंदीशाळेतच नवी शाळा सुरू झाली! साने गुरुजींमधला पत्रकार तिथेही जागाच होता. पत्रकाराने कोणतीही घटना दुर्लशू नये. साने गुरुजी धुळ्याच्या तुरुंगात असताना सर्वात महत्वाची घटना तिथे घडली ती म्हणजे विनोबाची तिथे झालेली गीतेवरील प्रवचने. साने गुरुजींनी ती प्रवचने टिपून घेतली. विनोबांच्या अनुमतीने साने गुरुजींच्या 'काँग्रेस' पत्रात प्रथम त्यांचे प्रकाशन झाले. सर्व भारतीय भाषांत पोचलेला व ज्याच्या लाखो प्रती विकल्या गेल्या असा तो आता अलौकिक ग्रंथ ठरला आहे! साने गुरूजींसारखा तत्पर आणि खंदा पत्रकार लेखक तिथे नसता तर हा अमोल ठेवा हाती लागता ना! एवढ्या एका प्रवचनमालेचे वृत्तलेखन जरी साने गुरुजींनी केले असते तरीही त्यांची पत्रकारिता धन्य झाली, अशी नोंद करावी लागली असती! 

साने गुरुजींच्या पत्रकारितेची जातकुळी टिळक-आगरकरांच्या संयुक्त पत्रकारितेच्या जातकुळीची होती. मनाच्या उभारीच्या भांडवलावर त्या पत्रकारितेचा उदय झाला होता. पदरी भांडवल जमा झाले आहे, आपल्याला अनुकूल अशी मानसिकता समाजात निर्माण व्हावी, आपल्या हितसंबंधांची जपणूक व्हावी यासाठी ही पत्रकारिता जन्मली नव्हती! साने गुरूजींच्या पत्रकारितेला दास्यविमोचनाचा एकच ध्यास होता. परदास्यविमोचनाबरोबरच स्वजनदास्यविमोचनाचीही तळमळ त्यापाठीमागे होती. परदास्यविमोचन त्या मानाने सोपे असते. कारण बोलून चालून तो परच असतो. स्वजनदास्याविरुद्ध लढणे त्या मानाने अवघड. कारण स्वजनांशी लढताना अधिक तारतम्य वापरावे लागते. स्वजनाला स्वजन ठेवून त्याच्या दास्याचा अंत करावयाचा असतो. स्वजनांविरुद्ध लढताना, धर्मक्षेत्रावर-कुरूक्षेत्रावर लढण्यासाठी आलेल्या अर्जुनाची, समोर सगेसोयरे पाहून जी अवस्था झाली तशी अनेकांची होते. आगरकरी बाणा नसेल तर ही दुसरी लढाई होऊच शकत नाही. पण तिसरी याहून बिकट लढाई स्वकामनांविरुद्ध करावी लागते. टिळक-आगरकरांचा नुसता समन्वयच गांधीविचारात नाही तर त्यातून तिसऱ्या लढाईच्या सामर्थ्याची बेगमी झाल्याचेही दिसते. ही तिसरी लढाई स्वकामनांविरुद्ध असते. साने गुरुजींच्या पत्रकारितेत या तिन्ही गोष्टी एकवटलेल्या दिसून येतील.   

1933 मध्ये साने गुरुजींची नाशिकच्या तुरुंगातून सुटका झाली आणि ते अंमळनेरला परतले. ऑक्टोबरचे दिवस होते. गुरुजी बाहेर आले तरी इंगज सरकारचा धिंगाणा तसाच सुरू होता. गुरुजींनी 26 जानेवारी 1934 रोजी, स्वातंत्र्यदिनी पुनरपी सत्याग्रह केला. त्यांना चार महिन्यांची सजा झाली. तुरुंगात त्यांचे अध्ययन आणि अध्यापन, वाचन आणि लेखन निरंतर चालूच होते. चार महिन्यांची सजा संपवून 1934 च्या जूनमध्ये ते बाहेर आले. त्यांना सतत हे जाणवत राहिले की आता आपली शाळा भिंती ओलांडून मोठी झाली आहे. वाणीचे साधन या नव्या मोठ्या शाळेला पुरेसे नाही. कारण आता पाठ्यक्रमात व तासांना हे शिक्षण जखडलेले नसून मुक्त करणारी विद्या समाजाला द्यायची आहे. पुस्तकांनी ते काम काही प्रमाणात होईल. पण प्रसंगानुरोधानेच जिवंत शिक्षण दिले जाऊ शकते आणि ते सतत द्यायचे तर त्याला वृत्तपत्रासारखे साधन हवे. अधूनमधून धुळ्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘स्वतंत्र भारत’ पत्रात ते लिहीतही, पण ते त्यांना पुरेसे वाटत नसे. फैजपूर काँग्रेसच्या वेळी ही जाणीव त्यांना प्रकर्षाने झाली. महाराष्ट्रातली 'केसरी' सारखी वृत्तपत्रे फैजपूरला खेड्यात भरणारे काँग्रेसचे अधिवेशन फजितपूर होईल असे भाकीत करत होती. त्यांना चोख जबाब देण्यासाठी हाताशी वृतपत्र असते तर किती छान झाले असते, असे त्यांना पुन्हा पुन्हा वाटे! स्वतः ते भिरभिर फिरून खेडोपाडी काँग्रेसचा प्रचार करतच होते, पण वृत्तपत्र हाताशी असते तर त्यात आणखी प्रखरता आणि व्यापकता आली असती. 

त्यानंतर आल्या निवडणुका. निवडणुका जिंकून जनता काँग्रेसच्याच पाठीशी आहे हे काँग्रेसला दाखवून द्यायचे होते. त्या वेळीही एखादे वृत्तपत्र आपल्यापाशी असते तर किती चांगले झाले असते, हा विचार त्यांच्या मनात वारंवार येई. शेवटी निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. जातिवादी शक्तींचा पाडाव झाला. मात्र सत्तेच्या लालचीने नको ती मंडळी काँग्रेसमध्ये शिरली व आपल्या हितसंबंधांच्या जपणुकीसाठी काँग्रेसची ओढाताण करू लागली! निवडणूक जाहीरनाम्यात गोरगरीब जनतेला जी आश्वासने दिली होती त्यांचे काय होणार? लोकमताचे दडपण नसेल तर सत्ताधारी मनमानी कारभार करू लागतील, अशीही शक्यता होती. निवडणुकांच्या वेळी जाहीरनाम्यात दिलेला शब्द पाळला गेलाच पाहिजे, असा साने गुरुजींचा आग्रह होता. हितसंबंधी लोकांनी ‘धीरे धीरे' चा जप सुरू केला होता. 

निवडणूक जिंकण्यासाठी ज्यांना साने गुरुजी हवे होते, त्यांना निवडणुकीनंतर ते गैरसोयीचे वाटू लागले! साने गुरुजींना ह्या ‘धीरे धीरे' वृत्तीची चीड यायची. जे करण्याचे जाहीरपणे आश्वासन दिले त्याबाबत अशी चालढकल काय म्हणून? ‘साने गुरुजी काँग्रेस सरकारला अडचणीत आणत आहेत’ असा कांगावा काही मंडळींनी सुरू केला. साने गुरुजी म्हणत की मी तर लोकशक्ती तुमच्या पाठीशी उभी करून तुमचे हात बळकट करत आहे. संबंधितांना काँग्रेसने सांगावे की आश्वासनांप्रमाणे आम्ही न वागू तर लोक आम्हाला खाली खेचतील. त्वरित आम्हाला पावले टाकलीच पाहिजेत. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने तातडीने अंमलात आणली तर लोकांचा काँग्रेसवरीस विश्वास वाढेल, काँग्रेस याच मार्गाने बळकट होईल. परदास्याशी ज्या निकराने लाई केली त्याच निकराने स्वजनांशी लढण्याचा बाका प्रसंग समोर उभा ठाकला! सत्ता-संपत्ती-संस्कृतीवाल्यांचा प्रचार मोडून काढणे हे सोपे काम नव्हे. विनोबांनी गीता प्रवचनांच्या संदर्भात केलेले विवेचन त्यांना आठवे. 

“असुरांच्या चरित्राचे सार ‘सत्ता, संस्कृती, संपत्ती' या तीन वस्तूंत आहे. आपलीच संस्कृती काय ती सर्वोत्कृष्ट व तीच साऱ्या जगावर लादली जावी ही महत्वाकांक्षा. आपलीच संस्कृती का लादली जावी तर म्हणे चांगली आहे. ती चांगली का, तर म्हणे ती आपली आहे!... ज्याप्रमाणे माझी संस्कृती सुंदर त्याप्रमाणे जगातली सारी संपत्ती घ्यावयास लायक मीच. सारी संपत्ती मला पाहिजे व ती मी मिळवणारच. ती संपत्ती का मिळवायची? तर बरोबर वाटणी करण्यासाठी. त्यासाठी मला सत्ता हवी. सारी सत्ता एका हाती केंद्रिभूत झाली पाहिजे. ही तमाम दुनिया माझ्या तंत्राखाली राहिली पाहिजे. स्व-तंत्राप्रमाणे म्हणजे माझ्या तंत्राप्रमाणे चालली पाहिजे. माझ्या ताब्यात जे असेल, माझ्या तंत्राप्रमाणे जे चालेल तेच स्वतंत्र!” अशा प्रकारे संस्कृती, सत्ता व संपत्ती या मुख्य तीन गोष्टींवर आसुरी संपत्तीत भर दिला जातो. काँग्रेस आसुरी संस्कृतीविरुद्ध लढण्यासाठी होती, पण तिच्यातच काही असुरांनी प्रवेश केला होता. त्या असुरांना उघडे करायचे तर हाती वर्तमानपत्र हवे. पण त्याची जमवाजमव कोण कशी करणार? शेवटी तो प्रसंगही आला. 

गिरणी कामगारांना योग्य ते वेतन मालकांनी द्यावे अशी कामगार कार्यकर्त्यांची मागणी होती. सरकारने एका तज्ञ समितीची त्यासाठी नेमणूक केली. त्यांनी प्रश्नाचा सांगोपांग विचार करून आणि सर्व संबंधितांच्या गाठीभेटी घेऊन बारा टक्के पगारवाढ मालकांनी द्यावी, अशी शिफारस केली. पण मालक पैशाच्या, संस्कृतीच्या आणि सत्तेच्या आसुरी तोऱ्यात! ते कांगावखोरपणे गिरण्या बंद करण्याच्या गोष्टी करू लागले! त्यांना सांगण्याचा परोपरीने केलेला प्रयत्न वाया गेला. प्रचार साधनांच्या जोरावर आपण मजुरांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहाणाऱ्या कामगारांना शरण आणू, कारण त्यांच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात आहेत, अशा मिजाशीत खानदेशमधले गिरणी मालक होते. साने गुरुजी कामगारांच्या बाजूने उभे राहिले. कामगारांनी वाढीसह दिला तरच पगार घ्यायचा असा निर्धार केला. त्यांनी काम बंद केले नाही. उत्पादनात खंड पडून गरिबांची लूट करण्याची गिरणीमालक व व्यापारी यांना आणखी एक संधी मिळू नये, हा समंजस विचार त्यामागे होता. संपाचा हा अभिनव प्रकार होता! मालक आपल्याच तोऱ्यात. कामगार स्वतःच्या खोड्यात अडकले असे त्यांना वाटले. साने गुरुजींना पुन्हा वाटले की आपल्या हाती या वेळी वर्तमानपत्र हवे होते. त्यामुळे कामगारांच्या मागे लोकशाही उभी करता आली असती आणि लोकमताचे नैतिक दडपण येऊन सरकारला कामगारांचा पक्ष घ्यावा लागला असता. 

आणि त्यांनी राष्ट्रीय सप्ताहाच्या पहिल्या दिवशी एप्रिल 6, 1938 ला ‘काँग्रेस' साप्ताहिक सुरू करण्याची घोषणा केली. साधनांची अमळनेरातच जुळवाजुळव केली. आपल्या वृत्तपत्राला त्यांनी नावच 'कांग्रेस' असे दिले. सर्वत्र रामनामाप्रमाणे ‘काँग्रेस’ या शब्दाचा गजर व्हावा अशी कल्पना ते नाव ठेवण्यामागे होती. विकणारी मुले ‘काँग्रेस’ पुकारा करतील आणि घेणारे लोकही ‘काँग्रेस’ म्हणून बोलावतील! गरीब दुबळ्यांचा उमाळा, विधायक दृष्टी, आबालवृद्ध सर्वांना वाचावासा वाटेल असा मजकूर आणि शैली, या भांडवलावर साप्ताहिक सुरू झाले. साने गुरुजींच्या गाठी ‘विद्यार्थी’ मासिकाचा अनुभव होताच. लोकांवर त्यांचा जबरदस्त विश्वास होता. 

आपल्या पहिल्या अंकाच्या संपादकीयात त्यांनी लिहिले, ‘तुरुंगातून सुटल्यापासून खानदेशात एखादे साप्ताहिक चालवावे असे मित्रांजवळ मी शतदा बोललो असेन... वर्तमानपत्र सुरू केले पाहिजे ही भावना एखाद्या वेळेस माझ्या मनात इतकी तीव्र होई की मी रात्रभर बसून साप्ताहिक लिहून काढत असे व उषःकाली स्वतःच्याच हृदयाशी ते धरून बसत असे’. अशा तळमळीचा पत्रकार अद्याप तरी कोणी निपजल्याचे माहीत नाही. 

साने गुरुजींच्या त्या साप्ताहिकाची जातकुळीच वेगळी होती. इतर पत्रांसारखे हे गल्लाभरू पत्र नव्हते. लोकशिक्षणाचे त्याचे ब्रीद होते. भावनेला हात घालणारे लिखाण त्यात असे. खेडोपाडी ते जाईल, बायाबापडे एकत्र जमून त्यांच्यापुढे त्याचे सामूहिक वाचन होईल, स्वातंत्र्य आणि न्याय याबद्दलच्या लोकांच्या जाणिवा प्रखर होतील आणि देशासाठी, जनतेसाठी काही करण्याची असोशी त्यांच्यात निर्माण होईल, अशी बलवत्तर आशा साने गुरुजींना होती. 'ये ह्रदयीचे त्या ह्रदयी' घालण्याची तळमळ त्यांच्याकडून सर्व लिहवीत होती. सामान्यांच्या मधले असामान्यत्व दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. 

त्यांनी पहिल्या अंकाच्या संपादकीयात पुढे लिहिले, ‘मजजवळ पैसाअडका नाही. दुसरा अंक कसा निघेल याची मला विवंचना आहे. परंतु मी आरंभ करत आहे. मी माझे हे पत्र भिक्षेवर चालवणार आहे. जी तूट येईल ती भिक्षेतून शक्यतो भरून काढायची. भिक्षेकऱ्याचे पत्र मरत नसते, कारण त्याला अनंत हातांचा नारायण देत असतो!’ केवढा दुर्दम्य जनतेवरील विश्वास! 

पहिल्या अंकातच त्यांनी राष्ट्रीय सप्ताहाची महती गाणारे एक गद्यकाव्य लिहिले आहे. त्यांच्या अनुपम शैलीचा तो एक नमुना आहे. ते लिहितात, ‘राष्ट्रीय सप्ताह म्हणजे पंजाबातील जालियनवाला बागेतील शेकडो हुतात्म्यांचे स्मरण. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे स्वातंत्र्याच्या सर्व साधनांची पूजा व प्रचार. ज्या ज्या गोष्टींनी राष्ट्राचे बळ वाढेल त्या त्या सर्व गोष्टी करू पाहाणे म्हणजे राष्ट्रीय आठवडा. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे त्याग, राष्ट्रीय सप्ताह म्हणजे खादी. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे हिंदु-मुस्लिम ऐक्य. हरिजन सेवा. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे दारुबंदी. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे विचार-प्रचार. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे निर्भयता. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे जातिभेदांचा अंत. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे खेडयांची सेवा. कामगार-किसानांची सेवा, राष्ट्रीय सप्ताह म्हणणे साक्षरता प्रसार. स्वच्छता प्रसार. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे स्वयंसेवक दले वाढवणे. वानरसेना वाढवणे. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे काँग्रेसचे लाखो सभासद नोंदवणे. झेंडा गावोगाव फडकवणे. राष्ट्रीय सप्ताह म्हणजे प्रभातफेऱ्या, पोवाडे, गाणी यांची मंगल दंगल!’ 

आपल्या बाळाचे कौतुक जसे एखाद्या आईने करावे, पुन्हा पुन्हा ओव्या गाव्या तसे आपल्या या ‘काँग्रेस' पत्राबाबत साने गुरुजींचे झाले होते. त्यांचे धोरण स्पष्ट होते, ‘हे पत्र जातिभेदाचे भूत गाडू पाहील. द्वेषाला शमवू पाहील. अहिंसा प्रचारील. सत् धर्माच्या कल्पना फैलावील. रुढींना जाळील. दंभ दुरावतील. जीवनात निर्मळपणा आणील, प्रेम आणील, कर्म आणील. खानदेशभर एक प्रकारचे नवचैतन्य हे पत्र निर्माण करू पाहील. हे पत्र निद्रितांना जागे करोल व जागृतांना कामास लावील. हे पत्र काँग्रेसप्रेमाने जनतेची ह्रदये उचंबळून सोडील. काँग्रेसच्या भक्तीने रंगलेले जीव ठायी ठायी आहेत, त्यांना जोडील... हे पत्र कोणाचे मिंधे नाही. कोणाचे बंदे नाही. या पत्राचे एकच दैवत म्हणजे काँग्रेस संस्था. काँग्रेस संस्थेचा निर्मळ आत्मा जनतेस दाखवून, त्या निर्मळ आत्म्याचे उपासक व्हा, असे हे पत्र आग्रहाने व प्रेमाने सर्वांना सांगेल. काँग्रेसचे जे स्वरूप मला दिसते, जे आवडते, तेच मी दाखवणार.’   

साने गुरुजींच्या विचारांचे क्षितिज केवढे विशाल आणि विश्वास किती अढळ होता ते अंकात रवींद्रनाथांचे त्यांनी जे अवतरण दिले त्यावरून दिसून येईल. रवींद्रनाथ म्हणतात, "तुझी हाक ऐकून कोणी येवो, न येवो, तू एकटा जा. तुझ्या हातातील दिवा टीकांच्या वाऱ्याने विझेल. श्रद्धेने पुन्हा पेटवून एकटा जा. रवींद्रनाथांचे हे शब्द ध्यानात धरून हे पत्र मी सुरू करत आहे."   

गुरुजींच्या साप्ताहिकाची सारी तऱ्हाच वेगळी! कागदावरून कागदावर प्रवास करणारे हे भांडवलदारी पत्र नव्हते, तर सामान्यांशी संबंध जोडणारे, त्यांच्या ह्रदयाची ओळख करून देणारे-घेणारे हे पत्र होते. पुढाऱ्यांचा उदोउदो करण्याऐवजी सामान्य कार्यकर्त्यांचे हृदयातील बोल सर्वांना ऐकवणारे हे पत्र होते. गुरुजी व त्यांचे साथीदार विविध आघाड्यांवर जे काम करत त्याचे प्रतिबिंब काँग्रेस पत्रात पाहायला मिळे. साने गुरुजींच्या काँग्रेस पत्राची लोक उत्सुकतेने वाट पाहात, कारण अनेक अकल्पनीय गोष्टी ते लोकांपुढे ठेवीत. 

‘काँग्रेसमातेचे परिभ्रमण’ हे सदर लोकांच्या हदयाचा ठाव घेई. अन्याय वेशीवर टांगणारे पत्र असे लोकांना वाटे. गुरुजींचे सारे तर्कशास्त्रच वेगळे असे. विनोबांनी म्हटले आहे, "परपीडक तो आम्हा दावेदार- अशी त्यांची मनोभूमिका होती - त्यामुळे त्यांचे रागद्वेषही प्रबळ होते. पण ते सारे देवाच्या चरणी (जनता जनार्दनाच्या) वाहिलेले होते." अशा नियतीचा दुसरा पत्रकार सापडणे कठीण. ते स्वतः गावोगाव जात. लोकांना भेटत आणि त्यांचा वृत्तान्त लिहीत. त्यामुळे पत्रातली टवटवी आणि ताजेपणा सतत टिकून राहात असे. साने गुरुजींनी कधी कोणाची भीड बाळगली नाही की भीती. त्यामुळे काँग्रेस पत्र सर्वत्र जाई. 

दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि इंग्रजांचे दमनचक्र फिरू लागले. लोकांच्या मनात स्वातंत्र्याची भावना चेतवणारे पत्र त्यांच्या डोळ्यांत सलत असले तर आश्चर्य नाही! साने गुरुजींच्या लिखाणाची भीती शासनाला वाटावी व त्यांच्यावर हल्ले चढवण्यासाठी त्यांनी बहाणे शोधावे, हे ओघानेच आले. हे तेजस्वी पत्रकारितेला शत्रुपक्षाने दिलेले प्रमाणपत्रच होते. गुरुजींचे लिहिणे आणि बोलणे त्यांना सलू लागले. त्यांनी काँग्रेस पत्राकडून जबरदस्त जामीन मागितला आणि ते पत्र छापणाऱ्या छापखान्यालाही वेठीस धरले!   

18 मार्च 1940 ला शेवटचा काँग्रेसचा अंक वाचकांना देऊन या पत्राने वाचकांचा निरोप घेतला! साने गुरुजींचे काँग्रेस पत्र हे वृत्तपत्रसृष्टीतील एक आगळेवेगळे आश्चर्य होते. या पत्रकारितेची जातकुळी व्यावसायिक पत्रकारितेपेक्षा वेगळी होती. हे पत्र जनाधारित तर होतेच, पण मूक जनतेला वाणी देणारेही होते.   

त्यानंतरचा काळ अत्यंत धामधुमीचा होता. कारागृहात गुरुजी तळमळत होते. पुढे सुटले आणि भूमिगत झाले. त्यांच्यातला पत्रकार त्या काळात सक्रिय होता. आता परकीय सरकारची सत्ता न जुमानता काम करायचे होते. 'काँग्रेस’ पत्राला जो जाच झाला तो भूमिगत कार्यकर्त्याला आता कोणी करू शकत नव्हते. या काळात ‘क्रांतीच्या मार्गावर’ नावाने साने गुरुजींनी जे लिखाण केले ते वृत्तपत्रसृष्टीत अद्वितीय गणले जाईल. 'भारत छोडो’ चळवळीचा त्यात घेतलेला आढावा अपूर्व म्हणावा लागेल.

भूमिगत असतानाच साने गुरुजींना अटक झाली आणि ते पुन्हा गजाआड गेले. भूमिगत असताना साने गुरुजींनी जी प्रेरक, उद्दीपक पत्रे पाठवली त्याच्या प्रती काढून त्याही लोकांत प्रसूत झाल्या. ही पत्रकारिता कुठे एकत्र केली गेली नाही, अन्यथा तोही एक वेगळा वाण आपल्याला पाहाता आला असता! खानदेशातीत शेतकरी व कामगार बांधवांना क्रांतीसाठी आवाहन करणारे एक पत्रक लाल रंगात साने गुरुजींनी काढले होते. त्यांची पत्रकारिताच त्यात दृग्गोचर होते. मात्र ही सर्व अनियतकालिके होती. भूमिगत अवस्थेत नियमित चालणारे पत्र काढणे अवघडच होते. तरीसुद्धा ही तेजस्वी पत्रकारिता त्याही काळात चालू होती. सरकारचे कायदे न जुमानता चालणारी पत्रकारिता! अश्रूंतून अंगार फुलवण्याचे सामर्थ्य असणारी पत्रकारिता. शब्दांचा प्रभाव शेवटी ऐहिकातून समूर्त-साकार झाला पाहिजे. साने गुरुजींचे काँग्रेस पत्रातील लिखाण लोकांना कर्माला उद्युक्त करणारे होते. 'गोड निबंध’ संग्रहाच्या रूपाने त्यातले काही लिखाण संग्रहित झाले होते. त्यातली विविधता आणि ह्रदयस्पर्शिता वाचकाला सहजच जाणवते.   

पत्रकाराची कसोटी पाहणारेही अनेक प्रसंग असतात. ‘भारत छोडो’ चळवळीला बदनाम करण्यासाठी सरकारने एक आरोपपत्र प्रसिद्ध केले. म. गांधींनी त्या चोपड्याला 'रॉटनहम बायबल' असे नाव उपरोधाने दिले आणि त्यातला प्रत्येक मुद्दा खोडून काढला. पण सरकार हट्टाला पेटले होते. त्यामुळे गांधीजींनी आपल्या जवळचे अखेरचे हत्यार वापरायचे ठरवले. उपासाचे हत्यार! पण सरकार बेगुमान बनले होते. दिवसागणिक गांधीजींची तब्येत खालावत होती. उपोषणाचे एकवीस दिवस तरी ते काढतील की नाही, याबद्दल लोक साशंक होते. जिवाची कालवाकालव करणारा प्रसंग! त्या अवस्थेत गांधीजींवर लेख लिहिण्याची सूचना साने गुरुजींना जयप्रकाशांनी केली! दुर्धर प्रसंग! अश्रुभिजल्या शब्दांनी गुरुजींनी तो लेख लिहिला. पण गांधीजी त्या दिव्यातून पार पडले. 

पुढे सरकारने भूमिगतांच्या धरपकडीची मोहीम सुरू केली. 18 एप्रिल 1943 रोजी साने गुरुजींना इतर सहकाऱ्यांबरोबर अटक झाली आणि गुरुजी पुन्हा गजाआड गेले. प्रसिद्ध महाराष्ट्र कटाच्या खटल्यात त्यांनाही गोवण्यात आले होते. जेलमध्ये त्यांच्यातला पत्रकार जागाच होता. आचार्य विनोबांची गीतेवरील प्रवचने त्यांनी जशी लिहून घेतली तशीच आचार्य जावडेकरांची गांधीजींवरील प्रवचनेही त्यांनी लिहून घेतली आणि पुढे पुस्तकरूपाने ती प्रसिद्ध झाली. वक्त्यांची भूमिका ज्याच्या नीट ध्यानी आली असा पत्रकारच हे करू जाणे. 

लढ्याचा भर ओसरला, सर्व स्वातंत्र्यसैनिक गजांआडून बाहेर पडले. 'भारत छोडो’ चळवळीत जे वीररसाचे प्रसंग घडले त्यांची महती गात साने गुरुजी भिरभिर फिरत राहिले. भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने वाटाघाटी सुरू झाल्या. लढाई जिंकणारे लोक पुष्कळदा मुत्सद्देगिरीच्या आघाडीवर पराभूत होतात, ह्याचे जागते भान नेत्यांना होते. जनतेचा कौल घेणाऱ्या निवडणुका आल्या. ‘भारत छोडो’चे समर्थन त्या निवडणुकीत जनतेने केले. देशात काँग्रेसची सरकारे वेगवेगळया राज्यांत अधिकारावर आली. बेचाळीस साली 'भारत छोडो' असे इंग्रजांना बजावणारा जो ठराव काँग्रेसने केला, त्या ठरावात आणि त्यावरील भाषणात नेत्यांनी अनेक आश्वासने दिली होती. किंबहुना तो स्वातंत्र्याचा जाहीरनामाच होता. त्या सर्वांचा आशय लोकशाही समाजवाद हाच होता. परंतु अनेकदा विजनात दिलेल्या आश्वासनांचे राजधानीत गेल्यावर विस्मरण होते!   

दुष्यन्त शकुंतलेची कहाणी प्रख्यात आहे. शकुंतलेला जीवनाची जोडीदार करण्याचे आश्वासन दुष्यन्ताने कण्व मुनींच्या आश्रमात दिले होते. पण राजधानीत गेल्यावर त्याला त्या गोष्टीची आठवण राहिली नाही! खुणेसाठी त्याने जी अंगठी दिली होती ती शकुंतला हरवून बसली होती जाणि त्यामुळे तिची फारच पंचाईत झाली! राजधानीतल्या दुष्यंतांना त्यांच्या आश्वासनांचे स्मरण देणारी अंगठी ठरावांच्या रूपाने जनतेच्या हाती होती. सत्ता-संपत्ती-संस्कृती ज्यांच्यापाशी होती ते आपल्या हितसंबंधांची जपणूक करण्यासाठी सर्व साधनशिबंदी घेऊन सज्ज होते. सत्ताधाऱ्यांना त्यांची भीड पडत होती. साने गुरुजींना पुन्हा वाटू लागले की आपले स्वतःचे एखादे पत्र असावे आणि गरीबदुबळ्यांची बाजू त्यातून नेटाने पुढे मांडावी.   

पुढे केव्हातरी जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार आले. लोकांच्या अपेक्षा आणखीनच वाढल्या. जातिवादी शक्ती डोके वर काढू लागल्या होत्या. त्यांना अंकुश लावण्यासाठीही वृत्तपत्राची फार निकड होती. साने गुरुजी आता मुंबईत आले होते. मुंबई या केंद्रातूनच सर्व गोष्टी ते करणार होते. वृत्तपत्राचेही ते एक मोठे केंद्र होते. बेचाळीसच्या चळवळीत अनेक तरूण साथीदार त्यांच्या भोवती गोळा झाले होते. त्या सर्वांना जोडणारा दुवा म्हणूनही वर्तमानपत्र उपयुक्त ठरले असते. साधनांची जमवाजमव करण्याचे त्यांच्या कितीदा तरी मनात आले, स्वातंत्र्याच्या त्या उषःकाली अनेक स्वप्ने साने गुरुजींना पडत होती.   

एवढ्यात त्यांच्या कानी आले असे की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला विनोबांसारखा महावैष्णव, महाभागवत जाऊ शकत नाही, कारण हरिजनांना तेथे प्रवेश नाही! गुरुजींना परमदुःख झाले. त्यांनी त्यासाठी उपवास करायचे घोषित केले. रुढींचे गंजलेले दरवाजे उघडण्यासाठी प्राणांचे तेल कोणी तरी द्यावेच लागते. ते द्यायला साने गुरुजी उत्सुक होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना गळ घातली की, सहा महिने उपवास पुढे ढकलावा आणि त्या अवधीत महाराष्ट्रभर अस्पृश्यता निवारणाची किती आवश्यकता आहे ते लोकांना पटवून द्यावे. साने गुरुजींनी ही सूचना मान्य केली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले होणे किती अगत्याचे आहे ते परोपरीने साने गुरुजी लोकांना समजावून सांगू लागले. पुन्हा एकदा त्यांच्या मनात आले की आपल्या हाती जर वृत्तपत्र असते तर आपण रान उठवले असते. रान तर ते उठवतच होते, कारण त्याचा झंझावती दौरा सुरूच होता. पण व्यक्तीला कितीही केले तरी स्थळकाळाच्या मर्यादा पडतात. वृत्तपत्राचे माध्यम त्याच्या पलीकडे जाऊ शकते. 

उपवासाची यशस्वी सांगता झाली. वाळवंटात रुतून बसलेला समतेचा रथ मंदिराच्या गाभाऱ्यात घेऊन जाण्याला वाव मिळाला. चोखामेळा जो वर्षानुवर्षे दर्शनाभिलाषेने पायरीवरच उभा होता त्याच्यासाठी वाट मोकळी झाली. अस्पृश्यता कायम ठेवून स्वातंत्र्याचे स्वागत करण्याचा जो नामुष्कीचा प्रसंग ओढवणार होता तो टळला. विनोबांसारख्या महावैष्णवाच्या, महाभगताच्या मार्गातील अडसर दूर झाला. दर साल दिंड्या-पताका घेऊन जे लाखो लोक पंढरपूरची भक्तीभावाने वारी करतात त्या भक्तिभावात सुजाणपणा आणण्याचा हा प्रयत्न होता. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' या ओळीचा गदारोळ करणारांना अर्थाचे साकडे साने गुरुजींनी घातले होते. पंढरपूरच्या विठाई माउलीचे दरवाजे उघडले की ह्रदयाचे दरवाजेही उघडतील अशी अटकळ त्यामागे होती. घ्या मंदिरात बंधू बंधू. व्हा प्रेमसिंधू सिंधू। मग दास्य सर्व हारे हारे, हरिजन घरात घ्यारे। सर्व प्रकारच्या दास्यान्ताचा प्रारंभ करणारा हा कार्यक्रम होता.   

स्वातंत्र्य दृष्टिपथात आले, पण प्रत्यक्ष व्यवहारात आणताना देशाची फाळणी झाली. जातीय वृत्तींना जणू उधाण आले होते. त्या जातीयतेविरुद्ध निकराने मोहीम चालवण्याची गरज होती. जातीयतेला प्रतिजातीयता हे उत्तर नसून, जातिभेदरहित नागरिकता जोपासणे हेच उत्तर असू शकते हे लोकांना पटवण्याची गरज होती. संकुचिततेची वाट धरली तर संकुचिततेकडे घसरगुंडी सुरू होईल आणि तिला धरबंध राहाणार नाही, हे उघड होते. पुन्हा साने गुरुजींच्या मनात आले की, हाती एखादे वृत्तपत्र असावे. स्वराज्य चिरस्थायी करायचे तर ते सुराज्यही करावे लागेल. 'स्वराज्याची तहान सुराज्याने भागत नाही' हे इंग्रजांना सुनावणे योग्यच होते, पण स्वराज्य सुराज्य नसेल तर ते टिकणार नाही, हेही आपल्या राज्यकर्त्यांना बजावणे आवश्यक होते. देशातील एकमताची सबब सांगून समतेची पावले टाकण्याचे नाकारणे अधिकच घातक ठरले असते. सुराज्याची पहिली कसोटी विषमतेचा निरास ही असते. पण विविधतेच्या नावाखाली विषमतेचा मुकाबला करण्याबाबत टाळाटाळ केली जाईल, अशी लक्षणे दिसत होती. विविधतेच्या नावाखाली जेव्हा विषमतेला संरक्षण मिळते तेव्हा ती विविधता वैराची जननी ठरते, हे सर्व लोकांना समजावणे आवश्यक होते आणि त्यासाठी वृत्तपत्राचे हत्यार साने गुरुजींना हाती हवे होते. 

आणि तो भयंकर दिवस उजाडला. महात्मा गांधींची एका माथेफिरू जात्यंधाने प्रार्थनेची वेळ साधून हत्या केली! सारे जग क्षणकाल स्तिमित झाले!! जातीयतेला प्रतिजातियतेने उत्तर देण्याचा उद्योग काही मंडळींनी आरंभला! साने गुरुजींना राहवले नाही आणि त्यांनी ‘कर्तव्य’ नावाचे सायंदैनिक सुरू केले. 'स्मरूनि हृदयी तूते । कर्तव्य निज चालवू ' अत्ता शिरोलेख आणि महात्मा गांधींचे चित्र असलेले दैनिक! कर्तव्याचे भान करून देण्यासाठी निघालेले सायंदैनिक. इतर सायंदैनिकांपेक्षा मुळातच वेगळे. सायंदैनिके मुख्यतः गुन्हेगारीच्या बातम्यांना प्राधान्य देतात आणि करमणुकीच्या जाहिरातीच्या पायावर जगतात. ‘कर्तव्य’ सायंदैनिकात यांपैकी काहीच नव्हते. 'बापूजींच्या गोड गोष्टी’ नित्य आळवणारे एक सदर अंकात होते. छोट्या छोट्या, तुमच्या माझ्या जीवनात नित्य घडणाऱ्या घटना, पण गांधीजींनी त्यांना आपल्या कृतिमय भावनेने कसे उजळून टाकले त्याच्या या हृदयस्पर्शी गोष्टी. प्रेरणा देणाऱ्या बातम्या असत, त्याही माथी भडकवणाऱ्या नव्हेत तर विचाराला आणि कर्माला प्रवृत्त करणाऱ्या. 

'कर्तव्य'च्या पहिल्या संपादकीयात साने गुरुजींनी लिहिले, '...आपण सारेच एका अर्थी महात्माजींचे मारेकरी आहोत. माझ्यामध्ये जातीयतेचे लेशभरही विष नाही, असे कितीजणांना म्हणता येईल? तुमच्या आमच्या मनातील जातीयतेची पुंजीभूत मूर्ती म्हणजे गोडसे! गोडसे तुमच्या-आमच्या सर्वांच्या ह्रदयात आहे. तो दूर करणे हे आता कर्तव्य आहे. शत्रू ह्रदयात आहे.... महात्माजींच्या पूज्य स्मृतीस स्मरून हे ‘कर्तव्य’ दैनिक या विचारांचा अखंड पाऊस पाडील. जातीय वृत्ती नष्ट करणे आणि लोकशाही समाजवाद आणणे ही दोन ध्येये माझ्यासमोर आहेत.’   

परंतु आधुनिक काळातील वृत्तपत्रे ही प्रचंड भांडवलावर चालतात. 'कर्तव्य' सायंदैनिकाजवळ ना मोठे भांडवल, ना स्वतःचा छापखाना, ना कार्यालय! दैनिकाचा पसारा मग कसा चालवणार? जाहिरातीच्या उत्पन्नावर वृत्तपत्रांची भरभराट होते आणि भांडवलदार उद्योगपतीच जाहिराती देऊ शकतात. अशा अवस्थेत दैनिकाचा कारभार रेटणे बिकट झाले आणि चार महिने चालून ‘कर्तव्य’ बंद पडले.   

साने गुरुजींचे धडपडणारे तरुण मित्र ‘प्रदीप’ नावाचे मासिक चालवत. त्यांनी 'प्रदीप' चे संपादक व्हायची साने गुरुजींना गळ घातली. त्या मासिकात ते सुरुवातीपासून लिहीत असत. 'माझी दैवते' म्हणून एक लेखमाला त्यांनी त्यात लिहिली व आपल्या मानवी व मानवेतर देवतांची हळूवारपणे ओळख करून दिली. 'मातेची विचारपूस' नावाचे सदरही ते मासिकात काही काळ लिहित. कर्तव्य दैनिकातून तीन पुस्तके सिद्ध झाली. ‘कर्तव्याची हाक' हे राजकीय लेखांचे पुस्तक, ‘श्रमणारी लक्ष्मी’ या लोकशाही समाजवादाची निकड स्पष्ट करणाऱ्या सत्यकथा आणि 'बापूजींच्या गोड गोष्टी' पुस्तकाचे सहा भाग. प्रासंगिक साहित्यातून चित्रसाहित्य कसे निर्माण होते त्याचे हे उदाहरण आहे. पुढे ‘प्रदीप' मासिकाचाही अस्त झाला आणि साने गुरुजींमधला पत्रकार बेचैन झाला. स्वतंत्र लोकशाही भारतात लोकशिक्षण फार महत्त्वाचे आणि वृत्तपत्र हे त्याचे प्रभावी साधन. ते हाती असणे फार आवश्यक. त्यासाठी साने गुरुजी तळमळत होते. आराखडे बनवीत होते. साधनांची जमवाजमव कशी करता येईल त्याची टिपणे करत होते. ‘कर्तव्य’ दैनिकाचे पुनरुज्जीवन आणि 'साधना' या नव्या साप्ताहिकाचा प्रारंभ, असे त्यांच्या मनात होते. पण एकदम असे काही न करता आधी ‘साधना’ साप्ताहिक सुरू करावे असा मित्रांचा सल्ला पडला. मग जमवाजमव सुरू झाली. ऑर्थर रोड रुग्णालयासमोर एक जागा नक्की करण्यात आली. छपाईचे यंत्र आणि टाईप खरेदी करण्यात आला आणि दुसऱ्या स्वातंत्र्यदिनाला, 15 ऑगस्ट 1948 रोजी ‘साधने’चा पहिला अंक प्रकाशित झाला. साने गुरुजींनी आपले मनोभाव संपादकीय म्हणून नोंदवले ते असे - 
‘वैरभाव नि विषमता नष्ट करण्याची थोर साधना आपल्याला करायची आहे. हे साधना साप्ताहिक या ध्येयाने जन्मत आहे. कितीतरी दिवस हे साप्ताहिक निघेल निघेल म्हणून मित्र वाट पाहात होते. मध्यंतरी सायंदैनिक ‘कर्तव्य’च क्षणभर जन्माला आले. ते बंद करून त्याचेच प्रातःदैनिक करण्याची आकांक्षा होती. स्वतःचा छापखाना असल्याशिवाय दैनिक काढणे अशक्य म्हणून त्या खटपटीला लागलो. कसाबसा छापखाना उभा केलेला आहे. परंतु दैनिक आज नीट सुरू करण्याइतकी शक्ती नाही. तेव्हा सध्या साप्ताहिक साधना सुरू करून समाधान मानत आहे. हे जर स्वावलंबी झाले, छापखानाही जरा वाढला, सुरळीत चालू लागला, साधनसामग्री जर वाढली तर ‘कर्तव्य’ दैनिक केव्हा तरी सुरू करण्याची मला तळमळ तर आहे. तोवर मित्रांनी या साप्ताहिकालाच आधार द्यावा नि प्रभूने आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना आहे. 

साधना साप्ताहिकाच्या स्वरूपाबद्दल त्यांच्या काही कल्पना होत्या. त्या मित्राच्या सहकार्याने पार पाडण्याची उमेद त्यांना होती. पण त्यांची लेखणी इतकी समर्थ होती की सर्व विषयांत तो अप्रतिहत संचार करू शकत होती. आपल्या साप्ताहिकाचे स्वरूप ते असे स्पष्ट करतात – ‘निरनिराळ्या भाषांतील मौल्यवान प्रकार तुम्हांला इथे दिसतील. भारतातील प्रांत-बंधूंची येथे प्रेमाने ओळख करून देण्यात येईल. देशातील नि जगातील नाना संस्कृतींचे रंग नि गंध दाखवण्यात येतील. नाना धर्मातील सुंदरता, उदात्तता यांची भेट होईल. शेतकरी, कामगार यांच्या जगातही आपण वावरू. त्यांचे प्रश्न चर्चू. त्यांची स्थिती समीशू. शिक्षणाच्या शेत्रातही आपण जाऊ. मुलांच्या संगतीत आपण रमू. ती आपल्याला गोष्टी, गंमती सांगतील. आपण त्यांना सांगू. समाजात अनेक अज्ञात माणसे सेवा करून समाजवृक्षाला ओलावा देत असतात. त्यांच्या हकीगती येथे येत जातील. कधी प्रश्नोत्तररूप चर्चा आढळेल. गंभीर विषयांवरचे निबंध येतील. सुंदर गोष्टी वाचायला मिळतील. कधी आपण साहित्याच्या मंदिरात दर्शनाला जाऊ. कधी विज्ञानाच्या पराक्रमी कथा ऐकू. कधी निर्मल समाजवादाचे उपनिषद ऐकू. मनात किती तरी आहे. जेवढे जमेल तेवढे करीन, गोड करून घ्या.’   

साने गुरुजींना, समाजाला किती आणि काय देऊ आणि काय नको असे होऊन जाई. नामधारी संपादक ते नव्हते. खरोखरच समाज सर्वांगी फुलावा ही त्यांना तळमळ होती. कित्येक वर्षांपूर्वी त्यांनी लिहिले होते- ‘मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञानसंपन्न नि कलामय व्हावा, सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा, हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार या माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.’   

आपल्या जीवितकार्याची इतकी स्पष्ट जाणीव मनोमनी बाळगूनच ते वृत्तपत्राच्या क्षेत्राकडे वळले होते. बाळाला पाहून आईला पान्हा आवरू नये, असे त्यांना व्हायचे! आलेला प्रत्येक लेख आपल्या स्पर्शाने अधिक मधुर, प्रभावी आणि वाचकप्रिय करावा ही त्यांची खटपट असायची. 'युवाचुंबक' ही पदवी त्यांना शोभून दिसती असती. सोपे करून सांगताना आशयघनता कमी होऊ नये, अशी ते दक्षता बाळगत. त्यांची फिरस्ती चालू असे. साधनेचा शेवटचा फॉर्म छपाईयंत्रावर चढला की दुसऱ्या अंकाची थोडीशी बेगमी करून ते लोकांत जात आणि मधमाशीप्रमाणे ठिकठिकाणाहून जमा केलेला पुष्परस ‘साधना’ साप्ताहिकाच्या पोळ्यांत मधाचे रूप देऊन ते वाचकांपर्यंत पोचवत. त्यांच्या भावशैलीचा स्पर्श शब्दाशब्दातून जाणवे. कधी सात्विक संतापाने आणि अन्यायाच्या चिडीने त्यांच्या लेखणीतून खळमळ जाळणारा लाव्हा वाहू लागे तर कमी अश्रूभिजल्या शब्दांनी अमित भावमळे बहरून येत. साहित्यातील विविध दालनांत त्यांचा सहज संचार असे. निबंध, कथा, कविता, नाट्य, चरित्र असे सर्व प्रकार त्यांनी सहज हाताळल्याचे दिसेल. कोणत्याही गोष्टीचा त्यांना कंटाळा नसे. सभांचे, परिषदांचे वृत्तांत ते लिहीत. होणाऱ्या भेटीगाठींची हकीगत लिहीत. पहिल्या वर्षानंतर आचार्य जावडेकरांचे लेख ते अग्रलेख म्हणून छापू लागले. रवींद्रनाथांच्या ‘साधना' या पुस्तकावर दोघांचा फार लोभ. साधनाचा गोषवाराच साने गुरुजींनी क्रमशः दिला. 'धडपडणारी मुले' ही कादंबरी साधनेत प्रकाशित झाली. ‘भारतीय नारी’चे मनोज्ञ चित्र एका लेखमालेतून त्यांनी सादर केले. भारतमातेशी केलेली हितगुजे सर्वसामान्यांच्या जीवनाचा ठाव घेत. सत्य-शिव-सुंदराचे संवर्धन आणि असत्य, विद्रूप आणि अकल्याणकारकाचा तिटकारा निर्माण करण्यासाठी शब्दशक्ती ते वापरत. अनेक थोर पुरुषांची पुण्यस्मरणे त्यांनी भावभक्तीने सादर केली. आन्तरभारती आणि विश्वभारती ही त्यांची दोन सूत्रे होती. प्रांतांचा भारताशी व भारताचा विश्वाशी प्राणमय संबंध जोपासला जावा, असा त्यांचा प्रयत्न होता. 

आपली पुतणी सुधा हिला निमित्त करून त्यांनी जी सुंदर पत्रे लिहिली, तो तर मुलांसाठी त्यांनी ठेवलेला अक्षय मेवाच होय. या पत्रांतून निसर्ग, संस्कृती, मानव यांच्यातील संबंधांचे जे मनोज्ञ दर्शन घडते ते विलक्षण वेधक आहे. म. म. दत्तो वामन पोतदार तर या सुंदर पत्रांची गणना 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या पुस्तकाच्या बरोबरीने करत. म. म. पोतदार हे साने गुरुजींचे गुरुजी होते. त्यामुळे त्यांच्या अभिप्रायाला विशेष महत्त्व आहे. साधना साप्ताहिकात गुरुजींनी विपुल लेखन केले. पण लिहिण्याचा त्यांचा आवाका एवढा मोठा होता की साधनेची पृष्ठांची मर्यादा त्यांना कित्येक वेळा अपुरी वाटे. साने गुरुजींची पत्रकारिता अनूठी होती. कुठल्याही रूढ साच्यात ती बसवणे अशक्यच नव्हे तर हास्यास्पद होते. भूतकालातील ग्राह्यांश जतन करत, वर्तमान वास्तवाला निर्भयपणे सामोरे जात आणि भविष्यात नजर रोखून साने गुरुजींनी आशावाद जोपासला, कारण त्यांची आस्तिक्य भावना फार उत्कट होती!

Tags: कर्तव्य दैनिक साधना साप्ताहिक काँग्रेस पत्र पत्रकारिता साने गुरुजी kartavya daily sadhana weekly congress journal journalism #sane guruji weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते ( 251 लेख )

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके