डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

अर्थात ह्या नवशिक्षणात अभिप्रेत असणारी प्रश्नोत्तर पद्धती ही वडिलधार्‍यांनी प्रश्न विचारला रे विचारला की फाडफाड छापील उत्तरे देणारी प्रश्नोत्तर पद्धती नसून खोलात जाऊन विविध प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरे शोधायला प्रवृत्त करणारी पद्धत आहे. यात उत्तरे शोधायला फार फार तर वडिलधार्‍यांनी मदत करायची आहे. एखाद्या डाईवर सामान उचलणाऱ्या हमालाला सुरुवातीला वजन डोक्यावर घेईपर्यंत आपण हात लावतो तितकीच मदत अपेक्षित आहे आज शब्दाला प्रतिशब्द दिला म्हणजे उत्तर मिळाल्याची ढेकर देऊन हुशारीचे प्रमाणपत्र द्यायला पण मोकळे होतो, तशी ही प्रश्नोत्तर पद्धती नाही. मुलांची विचार करण्याची कुवत वाढवण्यासाठी ह्या प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब करायचा आहे. माणूस खरोबर काही शिकत असला तर तो स्वतःच्या विचार करण्याच्या शक्तीतूनच शिकतो. समोर उभ्या राहणार्‍या प्रश्नाला सर्जनशील वृत्तीने सामोरे जाणे म्हणजे विचार करणे.

शिक्षण म्हणजे शासन आणि शिक्षक यांचा आपसांतील मामला. त्यांचे ते पाहून घेतील. आपला त्यात काय संबंध? बाजारात तयार माल आला म्हणजे त्याची फार तर किंमत करू अशी वृत्ती सर्वत्र दिसत असताना पॅरागॉन टेक्स्टाईल मिलचे मालक, टेक्स्टाईल केमिस्ट आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट् श्री शांतिलाल मेहता, प्रॉडक्ट स्पेशालिस्ट, बिझिनेस कन्सल्टट आणि इंजीनियर पी के. साठे आणि इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट आणि बिझिनेस मॅनेजमेंट कन्सल्टंट् डॉ. श्री पारख यांनी शिक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे आणि आपले तत्संबंधीचे विचार नेटक्या भाषेत चयन करून प्रकाशित करावे ही एक आश्चर्याची तशीच आनंदाची गोष्ट आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित मंडळी ज्या साचेबंद पद्धतीने विचार करतात त्यापेक्षा ह्या मंडळींचा विचार वेगळा आहे. एवढेच नव्हे तर ह्या विचारांच्या अनुरोधाने काही प्रयोग करण्याची व त्यासाठी खर्च करण्याचीही त्यांची नियत आहे. ह्या प्रयोगांचे निष्कर्ष हाती यायचे तर त्याला काही अवधी लागणे अपरिहार्यच आहे, पण तत्पूर्वी शिक्षणविषयक नवा विचार प्रसूत व्हायला हरकत नाही, म्हणून हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे वाचनदेखील उपयुक्त ठरेल. शिक्षणाबद्दल आस्था असणार्‍या मडळींनी पुस्तक मिळवून अवश्य वाचावे.

मंगल स्वप्ने पाहणे- रंगवणे वेगळे आणि स्वप्ने पडणे वेगळे. पडलेली स्वप्ने अनेकदा क्षयकारी सुप्त मनातील खेळांना वाव करून देणारी आणि स्वास्थ्यकर निद्रेत विक्षेप करणारी असतात. पण जागेपणी रंगवलेली स्वप्ने ही शक्तिवर्धक, चैतन्यदायी आणि कर्तव्यपूर्तीसाठी केलेल्या धडपडीमुळे उत्साहवर्धक असतात. मंगल स्वप्ने रंगविणारी आणि त्यांना सगुण साकार, सत्य रूप यावे  म्हणून धडपडणारी माणसे समाजात किती आहेत ते त्या त्या समाजाच्या जिवंतपणाचे गमक असते. स्वातंत्र्योत्तर काळात जे परावलबनाचे आणि दास्याचे नवे पर्व लोककल्यानकारी राज्याच्या आवरणाखाली अवतरले आहे त्यात अशा मंडळींची संख्या कमी झाल असावी अशी शका अनेकांच्या मनांना चाटून जाते. अशा स्थितीत प्रयोगेच्छूक पॅरागॉनची मंडळी वाळवंटाटातल्या झर्‍यासारखी वाटतात.

शाळांवरची विलक्षण जबाबदारी

‘तेजस्विनी अधीतमस्तु’ असा घोष करता करताच अधीताचे म्हणजे शिक्षणाचे तेज प्रयोगशीलतेअभावी लोप पावल्यासार वाटत आहे. शिक्षण संवर्धनासाठी शासनाने जे संरक्षक कवच शिक्षणाभोवती उभे केले आहे त्याची संरक्षणक्षमता संशयास्पद आहे. पण स्वतंत्र प्रयोगांना अडथळा करण्याची त्यांची शक्ती मात्र निर्विवाद आहे. सार्वत्रिकतेच्या हव्यासाने शिक्षण स्वातंत्र्याला पारखे झाले आहे आणि परतंत्र शाळांनी स्वतंत्र वृत्तीचा नागरिक घडवण्याची एक विलक्षण जबाबदारी आजच्या शिक्षणक्षेत्रातील मंडळींवर येऊन कोसळली आहे!  शिक्षणात नवी आखणी-मांडणी उत्साहाने केली जात आहे. आणि साधनसामग्रीचा आवाका न घेता हूकमाने त्या आखणी मांडणीवर हुकुम भव्य रचना करण्याचा हव्यास धरला जात आहे. शासन आणि शिक्षक जे काही करीत आहेत त्यात सहभागी झालेला आणखी एक प्रवाह धंदेवाईक राजकारणी व समाजसेवकांचा आहे आणि अनेकांना मटका किंवा लॉटरी लागावा तशा या शिक्षणसंस्था वाटतात, असे एक चित्र समाजात उमटू लागले आहे. सत्तेची मधुरी असणारे सरकार, उपरे पण सत्तेने धुंद झालेले संस्थाचालक आणि लाचार, मुर्दाड शिक्षणसेवक यांच्या आश्रयाखाली खाजगी क्षेत्रातला आणि फसवेबाजीखाली सार्वजनिक क्षेत्रातला शिक्षण व्यवहार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मंडळी शिक्षणाबाबत काय म्हणतात ते जाणून घेण्याची उत्सुकता वाटावी हे साहजिक आहे.

इंग्रजीचे प्रस्थ

चाळीस पानांच्या या पुस्तिकेत एकूण आठ प्रकरणे असून चार प्रकरणे शांतिलाल मेहता यांनी तर एकेक प्रकरण साठे व पारुख यांनी लिहिले असून, दोन प्रकरणे प्रास्ताविक व परिशिष्ट साठी खर्ची पडली आहेत. परिशिष्टात शिक्षणाचा नवा विचार व प्रयोग करण्याला उपयुक्त मानक इंग्रजी पुस्तकांची माहिती असून, पुस्तकातल्या विवेचनातही त्यातल्या काही विचारांची नीटसपणे गुफण केलेली आहे. संदर्भासाठी दिलेली नऊही पुस्तके इंग्लंड-अमेरिकेत प्रसिद्ध झाली असून इंग्रजी भाषेच्या वाघिणीच्या दुधाचा हा प्रताप आहे की इथली  बहुतेक आम्लशिक्षित मंडळी ह्या एकमेव खिडकीतूनच जगाचे दर्शन घेतात आणि तेच त्यांना समग्र दर्शन वाटते.  भारतीय भाषांतून अशा सर्व मूलगामी विचारांचा परामर्श घेतला जात नाही. इंग्रजीचा वापर करण्यात इतर काय सोयी असतील त्या असोत, पण सर्वात मोठी सोय विचारांचे दारिद्र्य वा उथळपणा पारिभाषिक शब्दावलीच्या खाली झाकून टाकण्याची बर्‍याचदा सोय होते. पारिभाषिक शब्दवलीचे हे नेहमीच वैशिष्ट्य असते की अर्थाच्या गाभ्यापर्यंत पोचली की नाही याची उठाठेव करीत न बसताच समृद्धीची ढेकर देता येते!

आपले दारिद्र्य

शिक्षणाच्या दृष्टीने इतकी महत्वाची ही नऊ पुस्तके मराठी, गुजराथी, हिंदी अशा भारतीय भाषांत अद्याप उपलब्ध नसावी हे साहित्याच्या उणेपणाचे एक लक्षण समजता येईल. अपवाद फक्त जे. कृष्णमूर्ती यांच्या  ‘एज्युकेशन अँड सिग्निफिकांस ऑफ लाइफ' या पुस्तकाचा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी अनुवाद केलेले हे पुस्तक साधना साप्ताहिकात कमश: प्रसिद्ध झाले आणि पुस्तकागारात ते आता उपलब्ध आहे. एकट्या महाराष्ट्राचाच आपण विचार केला. तर जवळजवळ सर्व प्राथमिक शिक्षक, त्यांची प्रशिक्षण महाविद्यालये, माध्यमिक शाळांतील अर्धेअधिक शिक्षक आणि जिल्ह्यागणिक प्रशिक्षण महाविद्यालयातील बरीचशी महाविद्यालये या नव्या साहित्यापासून बहुधा दूरच असतील. किंबहुना कागदी काम हा कार्यक्षमतेचा एक बहुमुल्य नकली आणि फसवा असला तरीही बहुमूल्य निकष बनल्यामुळे शिक्षणात कर्मकांडाची बेसुमार वाढ झाली आहे आणि त्या काचामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित मंडळींनाही शिक्षणाचा विचार करायला फुरसतच ठेवली जात नाही! परिणामतः आमच्या शिक्षणातील जिवंत प्रवाहीपणा फार मर्यादित झाला आहे. नऊ वाधारभूत पुस्तकांचा परिशिष्टात समावेश आहे ती पुस्तके अशी :

(1) ग्रेट डायलॉग्ज ऑफ प्लेटो - न्यू अमेरिकन लायब्ररीचे 520 पानांचे प्रकाशन.

(2) सॉक्रेटस इन अ‍ॅन इंडियन व्हिलेज - एफ्. एल्. ब्रावने यांनी लिहिलेले 148 पानांचे ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रकाशन.

(3) ऑन विकमिंग ए पर्सन - कार्ल रॉजर्स मांनी लिहिलेले 400 पानांचे हयूटन मिफ्लिन कंपनीचे प्रकाशन

(4) पर्सन टु पर्सन - काल रॉजर्स आणि बेरीस्टव्हन्स यांनी संयुक्तपणे लिहिलेले 286 पानांचे न्यूयॉर्कच्या पॉकेट बुक्सचे प्रकाशन.

(5) लँग्वेज इन थोंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन-एम. आय. हायाकावा यांनी लिहिलेले 271 पानांचे हरकोर्ट, ग्रेस अ‍ॅन्ड जोवानो व्हिच यांचे प्रकाशन.

(6) द टिरनी ऑफ वर्डस् - स्टुअर्ट चेस यांचे 384 पानांचे हरकोर्ट, ब्रेस अ‍ॅण्ड वर्ल्डचे प्रकाशन.

(7) थिंक ऑन दीज थिग्ज - जे. कृष्णमूर्तीचे 262 पानांचे हर्पर अ‍ॅड रो कंपनीचे पेरिनियल लायब्ररी प्रकाशन.

(8) एज्युकेशन अ‍ॅण्ड सिग्निफिक ऑफ लाइफ जे. कृष्णमूर्तीचे 128 पानांचे बी. आय. प्रकाशन 

(9) टीचिंग अँज ए सबव्हजिज अ‍ॅक्टिव्हिटी - नेल पोस्टमन अ‍ॅण्ड चार्ल्स वाईगार्टनर यांचे 204 पानांचे पेंग्विन प्रकाशन

अशा सुमारे अडीच हजार पृष्ठांतील विचारांचा धागा हाती धरून नव शिक्षणासंबंधीची कल्पना चाळीस-बेचाळीस पानांत मांडू पाहणे हे एक मोठेच वैचारिक साहस म्हणावे लागेल. पण लेखकांनी ते केले आहे. त्यामुळे वाचकात मूळ पुस्तके पाहण्याची उत्सुकता तरी निर्माण होईल.

आशावादी पुस्तके

शिक्षण विषयक साहित्यसंग्रहात आपल्याकडे कोणती पुस्तके आहेत, कोणती नाहीत ते तपासून पाहता यावे आणि जी पुस्तके नसतील ती घेण्याची प्रेरणा मिळावी एवढयाच हेतूने ही जंत्री दिलेली आहे. आपल्या ग्रंथालयातील पुस्तके भवभूतीप्रमाणे मोठी आशावादी असतात. निरवधी काल आणि विपुल पृथ्वीवर कोणीतरी समानधर्मी केव्हातरी भेटेल या आशेवर ती जीवन धरून बसतात आणि त्याची ती आस बहुधा कधीतरी पूर्ण होतेच.

पुस्तकाची रचना

पुस्तक हा कारखाना नव्हे की तो किफायतीत चालण्यासाठी किमान दिवसाकाठी आठ तास तरी त्याचा उपयोग झाला पाहिजे! सांस्कृतिक क्षेत्रात अशी भौतिक अपरिहार्यता फारशी नसते. तेव्हा पुस्तकांइतकी अशा शिक्षण संस्थांनी बाळगायला हरकत नाही. ह्या नऊ पुस्तकांपैकी शक्य तेवढी पुस्तके त्यांनी एकत्र करून ठेवावी. त्या  नऊ पुस्तकांचे सोडा, पण ही बेचालीस पाने वाचणे पुष्कळांना शक्य होईल आणि परवडेलदेखील. पुस्तक अतिशय देखणेपणाने काढले आहे. व्हॉट चेंजेस पीपल्स अ‍ॅटिट्यूड्स-सम पॉप्युलर बिलिफ्स ट्रू और फॉल्स, क्वेश्चनिंग मेथड, नॉन-डायरेक्टिव्ह अ‍ॅण्ड नॉन जजमेंटल अ‍ॅप्रोच, जनरल सिमॅटिक्स, थोंट्स ऑफ जे. कृष्णमूर्ती, सायकॉलॉजिकल एज्युकेशन ही प्रकरणांची शीर्षके कुतूहल निर्माण करणारी आहेत.

एक जटिल समस्या

शिक्षणातून सभ्य, कर्तृत्ववान आणि प्रगल्भ असा नागरिक तयार व्हावा, अशी स्वभाविकच अपेक्षा असते. त्यामुळे तर एवढा खर्च शिक्षणासाठी केला जातो. एके काळी अशी श्रद्धा असे की, जो शाळा उघडतो तो तुरुंग बंद करतो! आज शिक्षण संस्थांचे साम्राज्य पसरलेले असतानाही तुरुंगांची, पोलिसांची आणि सेनादलाची संख्या जगभर वाढत आहे. एवढेच नव्हे तर शस्त्रास्त्रांची संख्या, खर्च आणि भीषणताही वाढत आहे. युनोस्कोचे म्हणजे आंतर राष्ट्रीय शिक्षण संस्कृती- विज्ञान संघटनेचे दुःख तर हे आहे की त्यांच्या कामासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नाही आणि शस्त्रास्त्रांची स्पर्धा मात्र वारेमाप उधळपट्टी करीत चालू आहे! 'शस्त्रास्त्रांवरील खर्चात फक्त एक टक्का कपात करून तेवढा पैसा तरी आम्हाला द्या!’ अशा विनवण्या त्यांना कोडगेपणाने नित्य कराव्या लागत आहेत.

शस्त्रास्त्रांवर जो अफाट खर्च केला जातो तो अशिक्षित, अज्ञानी, मागसलेली राष्ट्र करीत नसून जेथे शंभर टक्के लोक शिक्षित आहेत ती रशियश-अमेरिकेसारखी राष्ट्रच करीत आहेत! यांच्या मुळाशी कुशिक्षण हेच कारण आहे. वैफल्यग्रस्त सुखासक्त निरुद्यमी आणि हिंस्र अशा तरुणांचा समुदाय शिक्षण संस्थांतून बाहेर का यावा, ही आजच्या जगापुढली एक अत्यंत जटिल समस्या आहे. आजच्यासारखी साचेबंद कारखानदारी शिक्षणपद्धती याच्या मुळाशी असावी असा मग स्वाभाविकच संशय निर्माण होतो. मग शिक्षनाच्या चौकशा सुरू होतात. आपल्याकडेही डॉ. राधाकृष्णन समितीपासून (1951) तो तहत कोठारी आयोगापर्यंत ( 1966 ) अनेक चौकश्या झाल्या, ढीगभर अहवाल त्यांनी लिहिले, अनेक शिफारसी केल्या विद्यार्थ्यांची योग्य मानसिक तयारी होत नाही, असे खापर सर्वांनी एकमताने आजच्या शिक्षणावर फोडले. पण ही तयारी नेमकी कशी करून घ्यावी त्याबद्दल मात्र स्पष्ट, रेखीव, विधायक अशा फारशा व्यवहार्य सूचना त्यांनी केल्या नाहीत. डागडुज्या कशा  कराव्या आणि शिक्षणार्थ लागणार्‍या वर्षांचे वाटप कसे करावे एवढेच त्यांनी सुचवले.

आजची स्थिती

आपल्या परिस्थितीचे पुस्तकातले हे नेटके वर्णन पहा : स्वतंत्र विचार करण्याचे व प्रश्न विचारण्याचे त्राण विद्यार्थ्यांत नसते अर्धवट माहिती घेऊन मते बनवावी आणि पूर्वग्रह कवटाळून बसावे, असाच प्रकार आढळतो त्यांच्या वृत्ती जड, शिळावत असतात. जीवनाशी संबंधित गोष्टींबद्दल फारसा विचार ते करीत नाहीत. श्रमाबद्दल त्यांना तिटकारा वाटतो. महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल स्पष्ट आणि दृढ असा निर्णय ते कधी घेत नाहीत. आत्मविश्वासाचा त्यांच्यांत अभाव असतो, आणि हळवे, आरामप्रिय, सुखासक्त असे ते आढळतात.

"जगाबद्दलच्या त्यांच्या कल्पना अवास्तव असतात आणि त्यामुळे वास्तवाचे ज्ञान झाले की त्यांना धक्का बसतो आणि ते निराशाग्रस्त होतात. जीवन आणि समाज याबद्दलच्या त्यांच्या कल्पना धूसर आणि अस्पष्ट असतात. जीवनाची जिद्द त्यांच्यांत अभावानेच आढळते. जीवनाच्या क्रिया प्रतिक्रियांमधली विणता पाहण्याची रंगत त्यांच्यात दिसून येत नाही. लगेचच्या लगेच त्यांना कंटाळा येऊन भसतो. इतरांच्या अडीअडचणी आणि यातना या बाबत त्यांची मने बधिर झालेली असतात. जे तथाकथित त्याच्या आहारी ते पटकन जातात. राजकारणी, सत्ताधारी, विविध वाद यांच्याबरोबर वाहवत जाण्याची प्रवृत्ती असल्याने एकतर अविवेकी तीव्र प्रतिक्रिया किंवा मग मेंढंरांसारखे अनुयायित्व आणि सज्जन्य हिंस्र मथेफिरूपणा त्यांच्यांत आढळतो. वाचनात आणि पुस्तकात त्यांना गोडी वाटत नाही. स्वतःच्या बळावर काही शिकण्याचे त्राण ते गमावून बसलेले असतात. आत्मनिर्भरतेच्या आनंदाची त्यांना ओळखसुद्धा नसते. आत्मविकासाची ओढ त्यांना वाटत नाही निखालस अशा बुद्धिमत्तेचा, शहाणपणाचा आणि प्रगल्भतेचा दुष्काळ सर्वत्र आढळतो."

शिक्षणाकडून असलेल्या अपेक्षांच्या हे सर्व विपरीत आहे हे तर उघड आहे. 
मग यावर तोडगा?

जबर अंधश्रद्धा

म्हणून पुन्हा तोच निष्फळ पण परिचित मार्ग चोखाळायला लोक तयार असतात. 'सरकार, सरकार' असा टाहो फोडला जातो, पण वर निर्देश केलेली अवस्था सरकारनेच तर निर्माण केलेली आहे! पण त्या न पावणार्‍या देवाला भजण्याचा आमचा उत्साह काही कमी होत नाही. कारण शिक्षणापेक्षाही सत्तेवर आमची अंधश्रद्धा जबरदस्त आहे! परंतु पॅरागॉनच्या मंडळींना असे वाटते की स्वयंस्फूर्त असा नवशिक्षणाचा प्रयोग हाच यावर तोडगा आहे. शिक्षण असे असावे की जे नवविचाराला प्रवृत्त करील, प्रयोग करण्याचे वाण निर्माण करील अत्मशिक्षणाची सवय लावील, सहभागी होण्याला आणि वाटून घ्यायला तयार होईल. सद्य: स्थिती संबंधीचे हे जे पृथ:करण ते करमणूक म्हणून नव्हे तर त्यातून नवा मार्ग दिसावा या तळमळीने ते करू पाहत आहेत.

आज चाललेला उद्योग

आजचे शिक्षण हे स्मृतिप्रधान आहे. बुद्धिप्रधान नाही. स्मरणशक्तीच्या कसोटया लावून बुद्धिमत्तेचे शिफारसपत्र देणे म्हणजे गणिताची उत्तरपत्रिका तपासून भाषेतील कौशल्याची वाखाणणी करण्याइतके चमत्कारिक आहे, हेच मुळ ध्यानी येत नाही! त्यामुळे पाठांतरावर विलक्षण भर दिला जातो मुलां कडून रोज एक प्रतिज्ञा म्हणून घेण्याची कवायत यांत्रिकपणे शाळाशाळांतून करून घेतली जाते आणि त्यातून जीवनात मूल्य विषयक प्रेरणा आणि आचार संपन्नता निर्माण होईल, असा आशाळभूतपणा केला जातो. त्यातून एक फसवे आणि खोटे समाधान फुकटात पदरात पाडून घेण्याची आपली वासना असते. त्यामुळे डोक्यात माहिती कोंबून कोंबून विचारशक्ती बधिर करण्याचा प्रकार शिक्षणाच्या नावाखाली सुखेनैव चालू असतो. 

पॅरागॉनचे विश्वस्त उद्योगधंद्याशी संबंधित असल्याने त्यांचा निष्कर्ष असा आहे की आजच्या शिक्षणाची उत्पादकता अतिशय कमी आहे, कारण साधनसामग्रीची जी प्रचंड गुंतवणूक केली जाते, त्यातून त्या  प्रमाणात काहीच हाती लागत नाही! शिक्षणाची उत्पादकता कशी वाढवता येईल, ही चिंता त्यांना लागली आहे.  आणि त्यातून ते या विचाराला प्रवृत्त झाले आहेत. शस्त्रास्त्रांची उत्पादकता म्हणजे गुंतवणूक आणि उत्पादन यांच्यांतले प्रमाण जेवढे आहे तेवढेही शिक्षणाचे पडत नाही म्हणून शस्त्रास्त्रांसाठी जेवढा खर्च केला जातो तेवढा शिक्षणावर करण्याची सरकारची तयारी नसते! शिक्षणाची आज कारखानदारी झाली आहे. पण ही कारखानदारी दिवाळखोरीची आणि आतट्टपाची आहे आणि उद्योगधंद्यातल्या कोणत्याही माणसाला ती कधीच रुचणार नाही. कच्चा माल, यंत्रसामग्री तीच उपलब्ध आहे. तेव्हा तंत्रात सुधारणा करून प्रश्नोत्तर पद्धती, निदर्शक वा मार्गाला फाटा आणि भाषेचा विचार व कर्मावर होणार्‍या तिच्या परिणामाचे भान अशी काही दृष्टी बाळगली तर उत्पादकता सुधारण्याची त्यांना आशा वाटते.

ही वेगळी पद्धत

अर्थात ह्या नवशिक्षणात अभिप्रेत असणारी प्रश्नोत्तर पद्धती ही वडिलधार्‍यांनी प्रश्न विचारला रे विचारला की फाडफाड छापील उत्तरे देणारी प्रश्नोत्तर पद्धती नसून खोलात जाऊन विविध प्रश्न निर्माण करून त्यांची उत्तरे शोधायला प्रवृत्त करणारी पद्धत आहे. यात उत्तरे शोधायला फार फार तर वडिलधार्‍यांनी मदत करायची आहे. एखाद्या डाईवर सामान उचलणाऱ्या हमालाला सुरुवातीला वजन डोक्यावर घेईपर्यंत आपण हात लावतो तितकीच मदत अपेक्षित आहे आज शब्दाला प्रतिशब्द दिला म्हणजे उत्तर मिळाल्याची ढेकर देऊन हुशारीचे प्रमाणपत्र द्यायला पण मोकळे होतो, तशी ही प्रश्नोत्तर पद्धती नाही. मुलांची विचार करण्याची कुवत वाढवण्यासाठी ह्या प्रश्नोत्तर पद्धतीचा अवलंब करायचा आहे. माणूस खरोबर काही शिकत असला तर तो स्वतःच्या विचार करण्याच्या शक्तीतूनच शिकतो. समोर उभ्या राहणार्‍या प्रश्नाला सर्जनशील वृत्तीने सामोरे जाणे म्हणजे विचार करणे.

दयाळू आणि कनवाळू

पण आपण फार दयाळू आणि कनवाळू असतो सर्वचजण पालक, शिक्षक, पुढारी! विचार करण्याचे कष्ट उगाच कोनाला पडता कामा नयेत असा संकल्प ही वडीलधारी मंडळी करतात आणि नामदेव कुत्र्यामागे तुपाची वाटी घेऊन धावला, उगाच कोरडी रोटी खाल्ली तर त्याचे पोट दुखेल म्हणून, तसे जिथे कुठे प्रश्नाचा उद्भव झाला असेल, तिथे विचारांची आग भडकू नये म्हणून उत्तरांच्या पखाली घेऊन ही मंडळी धावत सुटतात! परिणाम एवढाच होतो की विचाराच्या आनंदाला पारखे झालेले समुदाय समुदाय अस्तीत्वात येतात. असले आज्ञाधारक पालक, शिक्षक, राज्यकर्ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. हुकुमशाही राजवटीत तर स्वतंत्र विचार करणारा दंडनीयच ठरतो, पण लोकशाही राजवटीत ही स्वतंत्र विचार करण्याची क्रिया कुंठित व्हावी यासाठी या विचार प्रचाराच्या सर्व साधनावर कब्जा करण्यात येतो आणि कानीकपाळी सतत उत्तरांचा मारा करून विचारशक्ती मूच्छित केली जाते, आणि त्यामुळे घर, शाळा आणि राज्य कसे शिस्तीने चालते! कुठे संघर्ष नाही, कसली भानगड नाही! लोकशाहीने भरजरी शोभिवंत कपडे लेवून हे सर्व करता आले तर सोन्याहून पिवळे; तसे न जमले तर जरब दाखवून आणि तेवढयानेही न भागले तर मुस्कटदाबी करून वा दंडाच्या धाकाखाली तसे करता आले तरीही ते तितकेसे वाईट नसते! शिक्षणाची प्रक्रिया हाती ठेवणासाठी शासनकर्ते म्हणूनच घडपडत असतात. त्यासाठी आराम आणि सुख यांची लाच द्यायला त्यांची अगदीच ना नसते. पण ह्याही पद्धतीत एखादा बुद्ध, एखादा टिळक, एखादा गांधी निघतो. स्वत:लाच प्रश्न विचारतो, स्वतः उत्तरे शोधतो. उत्तर शोधण्यासाठी यातना भोगतो, आणि परिणामतः जगाला चार पावले माणुसकीच्या मार्गावर पुढे घेऊन जातो.

यंत्राचा पुर्जा किंवा उपयुक्त पशु या पातळी वर माणूस येऊ नये, यासाठी ही सारी धडपड असते. त्यासाठी तो आत्मसंवाद, चिंतन किंवा स्वतःशी प्रश्नोत्तरी हा मार्ग अवलंबतो; कारण इतरांची बोलण्याची कुवत हिरावून घेतलेली असते. मग आत्मसंवाद करता करता तो आपल्या लोकांना बोलते करतो म्हणजे विचारांना प्रवृत्त करता. आणि मग भाषांच्या भिती ओलांडून तो विश्वसंवादही करू शकतो. संवाद किंवा प्रश्नोत्तर पद्धती ही शिक्षणाची सर्वोत्कृष्ट पद्धती होय; कारण ती विचारांना प्रवृत्त करते. ज्या  शिक्षणात या पद्धतीला वाव नाही आणि छापील उत्तरे पढवण्यावरच भर आहे, ती शिक्षणपद्धती  नवे जग निर्माण करण्याच्या लायकीची नाही! ह्यात जुन्याचा आणि अनुभवाचा अव्हेर नसून जुन्याला  एखाद्या बीजाप्रमाणे संबद्ध मनाने जमिनीत पेरायचे आहे आणि त्याच्या पोटातून अनेक कोंब फुटावे अशी योजना करायची आहे. तो दाणा नाहीसा झाला म्हणून उरबडवेपणा करावयाचे कारण नाही. आज छापील माणसांचे पेव फुटल्यासारखे दिसते, कारण प्रश्नोत्तर पद्धतीला आपण फाटा दिला आहे. या पद्धतीत आयोजक 'किंवा निर्देशक कमीत कमी बोलतो आणि इतरांना बोलायला प्रवृत्त करतो. उपलब्धाचा पायरीसारखा उपयोग करून तो वर चढतो, त्या पायरीचे उपकार मानीत तिलाच चिकटून बसत नाही. नव शिक्षणाच्या संदर्भात ग्रेट डायलोग्ज ऑफ प्लेटो' या ग्रंथाच्या वाचनाची शिफारस करण्यात आली आहे. ती छापील प्रश्नोत्तरे पाठ करण्यासाठी नव्हे, तर त्या पद्धतीचे रहस्य समजावे यासाठी.


या लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: इंग्रजी पुढारी पालक शिक्षक शासन शिक्षण English Leaders Parents Teachers Governance #Education weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते ( 251 लेख )

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके