डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

प्रत्येक राजकीय पक्षामध्ये संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणाची दृष्टी हवी. कुठल्याही पक्षाने स्वतःच्या संकुचित हितासाठी राष्ट्रहिताचा बळी देता कामा नये. पक्षातसुद्धा अंतर्गत गटबाजी नसावी आणि पक्ष सदस्यांनी व्यक्तिगत स्वार्थाच्या दुष्टचक्रात सापडता कामा नये. ही पथ्ये जर पाळली गेली, तर राजकारणाची आवश्यकता आजही कायम राहील व ते सदासर्वदा आवश्यक वाटेल. वास्तविक राजकारणात कुठलाच दोष नाही. जो दोष दिसतो तो स्वार्थपरायण होत चाललेल्या लोकांच्या मनोवृत्तीचा होय. 

आणीबाणीच्या काळातील निर्भय पत्रकार, भारतातील युवाशक्तीचे मार्गदर्शक व अ.भा.साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष यदुनाथ थत्ते यांचे एक आवडते गीत अलीकडे वारंवार मनात घोळत असते. या गीतातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत.

'अंधार फार झाला । पणती जपून ठेवा

शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे

हरणे जपून ठेवा । अंधार फार झाला'

यदुनाथजींच्या तपोमय जीवनाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांच्या धीर-गंभीर शब्दांनी सजलेले हे गीत श्रोत्यांच्या मनाला सहज भिडते व नकळत अंतर्मुख करीत असते. अंधाराचे हे गीत अलीकडे वारंवार मनात का घोळावे, या प्रत्राचे उत्तर शोधायला दूर जायला नको. दुर्दैवाने अशा एका विलक्षण राजकीय व सामाजिक परिस्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत, की जेथून चारी बाजूंना अंधाराशिवाय काही दिसेनासे झाले आहे ! 

कुठल्याही सुहृद व्यक्तीला व्यथित करणारी ही गोष्ट होय ज्यांची 98 वी जयंती अलीकडे साजरी झाली, पूज्य साने गुरुजींच्या जीवनात लोकशाही समाजवादा ला अनन्यसाधारण स्थान होते, हे अनेकांना ठाऊक आहे. निरवानिरवीच्या शेवटच्या पत्रातही गुरुजींनी भारतात लोकशाही समाजवाद येवो' ही अंतिम इच्छा प्रकट केलेली आढळते. 

भारतीय राजकारणात मात्र आज लोकशाही समाजवादाच्या अक्षरशः चिरफळ्या उडालेल्या दिसत आहेत! एक लोकसभा भंग पावलेली आहे. पण आगामी नवीन लोकसभा कोणत्या स्वरूपाची असेल, याची अंधुकशी यथार्थ कल्पना देशातील एकही व्यक्ती छातीठोकपणे मांडू शकणार नाही  केवळ राजकीय क्षेत्रात नव्हे, तर आर्थिक क्षेत्रातही अशीच अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आहे. आकाशाला भिडणारी महागाई, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी घातलेला हैदोस सर्वसाधारण नागरिकाला त्रस्त करीत आहे. कोट्यावधी रुपयांचे आर्थिक घोटाळे सी .वी.आय. आणि सुप्रीम कोर्टाच्या दारात घोटाळत आहेत. 

मालक मजुरांचे, शेतकरी-जमीनदारांचे संबंधही कमालीचे ताणले गेले आहेत. जमीनदारांची सेना अचानक दौडत गावात शिरावी आणि 50/60 गरीब शेतकऱ्यांचे बळी घेऊन जंगलात दिसेनाशी व्हावी. ही आजची भीषण वास्तवता बनली आहे ! शिक्षणाची उद्दिष्टे हरविल्यामुळे शिक्षण दिशाहीन व समाजमानसावर परिणाम करण्यास असमर्थ झाल्यासारखे दिसत आहे, भ्रष्टाचाराची व गुन्हेगारीची उदाहरणे डोळ्यांसमोर ढळढळीत दिसूनही न्यायालयात अनेक कारणांमुळे गुन्हे सिद्ध होत नाहीत. व परिणामतः न्यायसंस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत होत चालला आहे. 

टी.व्ही च्या वाढत्या आक्रमणामुळे सामाजिक व सांस्कृतिक जीवनमूल्यांना मोठा धोका निर्माण झालेला आपण पाहत आहोत. भोवतालच्या भयावह अंधाराची अशी किती तरी उदाहरणे देता येतील भौतिक अंधार नष्ट करण्याचे सामर्थ्य प्रकाशात असल्यामुळे, इवलीशी मिणमिणती पणती जशी उभ्या अंधाराला छेद देताना आपल्याला आढळते, त्याचप्रमाणे भोवतालच्या सामाजिक अंधाराला आव्हान देण्याचे सामर्थ्य आपल्या दृढ संकल्पशक्तीत आहे ही गोष्ट आपण विसरून गेलो आहोत. हे भान ज्या क्षणी आपल्याला येईल त्या क्षणी भोवतालचा अंधार वितळायला सुरुवात होईल.  

जनसामान्यांच्या संकल्पाची शक्ती गांधीजींनी पूर्णपणे ओळखली होती. मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, ग्रामोद्योग, बहिष्कार इत्यादी सोप्या व सर्वसुलभ उपायांनी गांधीजींनी सर्वसामान्यांतील ही ताकद जागृत केली व बलाढ्य ब्रिटिश सत्तेशी त्यांनी निर्णय लढा दिला, हे इतिहास आपल्याला सांगत आहे. गांधीजी, पंडित जी, जयप्रकाश किंवा एसेमनंतर गोरगरिबांशी किंवा राष्ट्रातील सर्वसामान्यांशी नाळ जोडलेले, समग्र राष्ट्राचा, विश्वास संपादन करू शकेल , असे नेतृत्व आपल्यात नाही . ही दुःखाची गोष्ट होय. भारतवर्षातील थोर संत व भक्ति वेदान्ताचे अलौकिक संत स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज (वृंदावन) यांना 1984 साली याच स्वरूपाचा प्रश्न विचारण्यात आला होता. 

प्रश्न असा होता स्वामीजी, आपल्या देशात एकीकडे सत्संग, संकीर्तन, यज्ञयाग चाललेले आढळतात तर दुसरीकडे आजची राजनीती (राजकारण) सर्व मानवी सद्गुणांची, मूल्यांची होळी करीत चालली आहे, अशा परिस्थितीत आम्ही काय करावे ? स्वामीजीचे उत्तर अतिशय मार्मिक व मूलगामी आहे. ते म्हणाले राजनीती किंवा राजकारण मूलतः चांगली वस्तू आहे , व लोकांच्या प्रवृत्ती, त्यांची अंतःकरणे नियंत्रित करण्यास तिथे साहाय्य मिळत असते. 'राजनीती' म्हणजे 'राजाची नीती' असा अर्थ नव्हे, राजनीती म्हणजे सर्व नीतींचा राजा.' परंतु राजकारण करणारे लोक ज्या प्रकारचे गोळा होतात. त्याप्रमाणे राजकारणाला स्वरूप येत जाते. म्हणून राजकारण पवित्र व शुद्ध अंतःकरणवाल्या लोकांच्या हाती राहायला हवे.

उदाहरणार्थ- गांधीजींनी राजनीतीबाबत जसे मार्गदर्शन केले होते. त्याप्रमाणे जर राजकारण होत राहिले, तर ते लोकहिताचे, सर्वांना कल्याणकारी ठरेल. परंतु राष्ट्रीयतेच्या नावाखाली इतर देशांबरोबर संघर्षाची, वैमनस्याची भावना जर बाळगली , किंवा राष्ट्रीयतेच्या नावाने इतर प्रांतांवर (राज्यांवर) जर अन्याय व्हायला लागले, तर राजनीती भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. देशातील प्रत्येक राज्याचे मंगल व्हावे , राष्ट्रीय एकता कायम राहावी, जातीयतेने डोके वर काढू नये, धर्माची किंवा संप्रदायाची संकीर्ण भावना राष्ट्रीयतेपेक्षा वरचढ होऊ नये, हाच राजनीतीचा, म्हणजे राजकारणाचा मूळ उद्देश असायला हवा. 

प्रत्येक राजकीय पक्षामध्ये संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणाची दृष्टी हवी. कुठल्याही पक्षाने स्वतःच्या संकुचित हितासाठी राष्ट्रहिताचा बळी देता कामा नये. पक्षातसुद्धा अंतर्गत गटबाजी नसावी आणि पक्ष सदस्यांनी व्यक्तिगत स्वार्थाच्या दुष्टचक्रात सापडता कामा नये. ही पथ्ये जर पाळली गेली, तर राजकारणाची आवश्यकता आजही कायम राहील व ते सदासर्वदा आवश्यक वाटेल. वास्तविक राजकारणात कुठलाच दोष नाही. जो दोष दिसतो तो स्वार्थपरायण होत चाललेल्या लोकांच्या मनोवृत्तीचा होय. 

या स्वार्थपरायण वृत्तीला लगाम घालण्यासाठी आणि सध्या दिसणारा संभाव्य भयानक विनाश टाळण्यासाठी, संपूर्ण प्राणिमात्रात जे एक ईश्वरी तत्त्व आहे, संपूर्ण मानवजातीत जी समानता आहे, राष्ट्रीयतेच्या भावनेत जी एकात्मता आहे, संघटनशक्ती आहे ती जागृत ठेवण्यासाठी समाजातील आध्यात्मिक वातावरण अधिकाधिक परिपुष्ट व्हायला हवे. ठिकठिकाणी सत्संगाचे , सामाजिक प्रबोधनाचे आयोजन व्हायला हवे, व्यक्तिगत किंवा पक्षीय स्वार्थामुळे कोणाचेही हित होत नाही. संपूर्ण व व्यापक हिताची दृष्टी बाळगली तर सर्वांचे कल्याण होत असते , ही गोष्ट लोकांना पटवून द्यायला हवी. ही दृष्टी बाळगणारे उत्तम नेतृत्व आज देशाला मिळण्याची नितांत गरज आहे. 

मी माझ्या जीवनात लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, श्रद्धानंदजी, लाला लजपतराय, सुभाषचंद्र बोस , जवाहरलालजी यांना पाहिले आहे. आजचे आमचे नेते या मंडळींसारखे जर प्रभावशाली झाले, शक्तिशाली बनले, स्वतः चांगल्या मार्गाने जात राहिले व दुसऱ्यांना चांगला मार्ग दाखवीत राहिले, तर अजूनही काही बिघडलेले नाही . अशाने राजनीती सुधारेल व राष्ट्राचेही कल्याण होईल. सगळ्या देशाशी आत्मैक्य (एकरूपता) साधुन देशाची सेवा केल्यानेच देशाचे व आपलेही मंगल होणार आहे. 

प्रत्येक लहानथोर व्यक्तीच्या जीवनात एक प्रचंड शक्ती दडलेली असते. या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हणा, अगर म्हणू नका. व्यक्तीला वाढविण्याचे, त्याच्या अंगभूत शक्तींचा विकास करण्याचे महान कार्य या शक्तीमार्फत अहोरात्र होत असते. आपली शारीरिक मानसिक व  बौद्धिक वाढ ही शक्ती प्रामाणिकपणे करीत राहते . चांगले-वाईट खरे- खोटे, हितकारक अहितकारक यांमधील फरक याच शक्तीमुळे आपल्याला कळतो. सत्याच्या मार्गावर अग्रेसर होण्याची सूचनाही ही शक्ती आपल्याला देत असते. परंतु महाभारतातील दुर्योधन म्हणत होता

'जानामि धर्म नच मे प्रयूत्तिः।
जानामिअधयं नच मे निवृत्तिः॥'

(मला धर्म समजतो, पण मी धर्माकडे वळू शकत नाही, आणि मला 'अधर्म' जाणवतो, पण मी अधर्म सोडू शकत नाही.) 

त्याप्रमाणे जर आपण हतबल झालो, तर असत्याचा आश्रय घेऊन भोवतालच्या अंधाराला आपण नळकत शरण जात असतो. भोवतालच्या अंधारावर जर मात करायची असेल तर आपली संकल्पशक्ती वाढविणे आज नितांत गरजेचे आहे. साने गुरुजींच्या जीवनाचा शोध घेतला तर आपल्याला आढळेल की, गांधीजी जसे देशातील सर्व सामान्यांशी एकरूप झाले होते, तीच शक्ती काही प्रमाणात गुरुजींमध्येही होती. आपल्या प्रचंड तळमळीने महाराष्ट्रातील विद्यार्थी, शिक्षकांशी, गोरगरिबांशी, किसान- कामगारांशी गुरुजी एकरूप झाले होते व म्हणून सभोवतालचा अंधार भेदण्याचे सामर्थ्य गुरुजींच्या विचारांत जेवढे आहे, तेवढे अन्यत्र आढळणार नाही.

गुरुजींच्या विचारांची पणती है आजच्या अंधाराशी लढण्यावे अमोघ व परिणामकारक शस्त्र आहे, ही गोष्ट आपण विसरता कामा नये. गुरुजींची ‘श्यामची आई', ‘गोड गोष्टी', 'सुंदर पत्रे जशी बालमनाला वेड लावतात , तद्वत त्यांची ‘भारतीय संस्कृती', ‘गोड निबंध', 'क्रांती' , ‘धडपडणारी मुळे’ इत्यादी पुस्तके तरुणांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटविणारी, त्यांची सामाजिक बांधिलकी परिपुष्ट करणारी आहेत. गुरुजींचे हे राष्ट्रीयतेचे विचार ग्रहण करून आपली जबाबदारी ओळखून, प्रत्येकजण सुबुद्धपणे वागेल; कर्तव्यबुद्धीने व जागरूकपणे मतदान करू लागेल ; भ्रष्टावाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध संघटितपणे उभा राहू लागेल तर भोवतालचा अंधार नाहीसा व्हायला वेळ लागणार नाही.' 

शरीरात जर प्रतिकारशक्ती असली तर बाहेरील रोगजंतुंचा आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही, असे वैद्यकशास्त्र आपणास सांगते. साने गुरुजींच्या विचारांची पणती जर आपल्या अंतःकरणात तेवत राहिली तर बाह्य अंधाराशी मुकाबला आपण नक्कीच करू शकू. 

‘अंधार फार झाला । पणती जपून ठेवा' 

यदुनाथजींच्या ह्या आवडत्या गीतातून हाच लाख मोलाचा संदेश आपल्याला मिळतो असे मला वाटते.

Tags: स्वदेशी सामाजिक परिस्थिती राजकीय यदुनाथ थत्ते अ. भा. साने गुरुजी यशवंत बळवंत क्षीरसागर अंधार फार झाला पणती जपून ठेवा Swadeshi Social Samajik Political Rajkiy Yadunath Thatte A. B. Sane Guruji Yashavant Balvant Kshirsagar Andhar Far Zala Panati Japun Theva weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके