डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी..

संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 29 डिसेंबर 1965 रोजी, मद्रास येथे केलेल्या भाषणातील हा काही भाग आहे. ‘भूमिका’ (रोहन प्रकाशन, पुणे) या पुस्तकात ते भाषण समाविष्ट केले आहे. या आठवड्यात यशवंतरावांची 108 वी जयंती साजरी झाली आणि गेल्या काही महिन्यांपासून  भारत-चीन संबंधात असलेला तणाव, हे निमित्त साधून हा भाग येथे प्रसिद्ध करीत आहोत.

1962 मध्ये जे घडले, त्याचे स्वतंत्र महत्त्व आहे, असे मी मानतो. कारण त्या घटनेने भारताच्या केवळ संरक्षणविषयक समस्येच्या दृष्टीनेच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही दीर्घकालीन परिणाम घडवून आणला. त्या वेळी चीनने सीमावाद उकरून काढून भारतावर आक्रमण केले. चिनी सैनिक नेफा-लडाखमध्ये घुसले आणि एके दिवशी सकाळी अचानक चीनने आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे त्याने आपले सैन्य मागे घेतलेही.

20 नोव्हेंबर 1962 ची रात्र अजूनही आपल्याला आठवते. त्या वेळी चीनने एकतर्फी माघारीची घोषणा केली. त्याच दिवशी मी मुंबईहून संरक्षणमत्री पदाची वस्त्रे घेण्यासाठी दिल्लीस गेलो. चीनबरोबर लढण्यासाठी माझी संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. चीनबरोबरची लढाई आता उरलेलीच नाही, हे मला दुसऱ्या दिवशी सकाळी समजले. मी दिल्लीस गेलो, म्हणून लढाई थांबली असे मला म्हणायचे नाही; परंतु तसे घडले हे मात्र खरे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की चीनने आक्रमण का केले आणि नंतर एकतर्फी माघार का घेतली? व्यापलेला सगळाच प्रदेश चीनने सोडलेला नाही. अजून लडाखचा काही भाग त्याच्याच ताब्यात आहे. यामागचे कारण समजावून घेतले पाहिजे. चीन काही गमतीकरिता आलेला नव्हता, किंवा हिमालयाची सहल करण्याकरता त्याने आपल्या सैन्यास धाडले नव्हते. चिनी सैनिक शस्त्रास्त्रे घेऊन आलेले होते. त्यांच्यापाशी तोफखाना होता. ते आपल्या लोकांशी लढले. त्यांनी आपली शक्ती दाखवली. आपल्यापाशी सामर्थ्य आहे हे त्यांना कळून आले; पण या आक्रमणामागचा उद्देश कोणता होता? ज्या देशाबरोबर आपल्याला युद्ध करावे लागते, त्याचा राजकीय उद्देश समजावून घेतल्याशिवाय आपल्याला लढता येत नाही. म्हणून आक्रमणामागचा चीनचा उद्देश समजावून घेतला पाहिजे.

मला असे वाटते की, या आक्रमणामागे चीनचे दोन-तीन हेतू असावेत. ज्या जगात आपण राहतो, त्या जगात राजकीयदृष्ट्या चीन महत्त्वाचा आहे, भारत नव्हे, हे आफ्रिकी-आशियाई इत्यादी देशांना कळावे, हा चीनचा एक हेतू असावा. लष्करीदृष्ट्या चीन बलवान आहे, भारत नव्हे, हे जगाला दाखवून द्यायचे असावे आणि आपले आर्थिक विचार, आर्थिक सिद्धता आणि आर्थिक साधनसंपत्ती यांच्यावर एक प्रकारचा ताण पडावा, हा त्याचा दुसरा हेतू असावा. कारण तोपर्यंत आपण आपल्या आर्थिक विकासावर विशेष भर देत होतो. आपण आपली आर्थिक साधनसामग्री वाढविली, आर्थिक बाबतीत देश स्वयंपूर्ण केला, तर आपली संरक्षणक्षमता वाढवू शकू, असे आपण मानत होतो.

आक्रमण करून भारताची आर्थिक ताकद खच्ची करावी, असे चीनला वाटत असले पाहिजे. भारताला अलिप्ततावाद सोडायला भाग पाडावे, हा त्याचा तिसरा हेतू असावा, असेही मला वाटते. अमेरिका आणि रशिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या शीतयुद्धापासून आपण अलिप्त रहावे आणि या दोन्ही गटांतील राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवावेत, ही भारताची भूमिका चीनला रुचण्यासारखी नव्हती.

चीनच्या 1962 मधील आक्रमणाने अनेक राजकीय प्रश्न स्पष्ट केले आहेत. शीतयुद्ध हे दोन लष्करांतील युद्ध नसते. जागतिक वर्चस्वासाठी धडपडणाऱ्या दोन भिन्न विचारसरणींमधील ते युद्ध असते. अशा युद्धाचे नेतृत्व आपल्याकडे यावे, अशी चीनची आकांक्षा आहे. या आकांक्षेबरोबरच त्याला आणखी एका महत्त्वाकांक्षेने ग्रासलेले आहे. साऱ्या जगाचे नाही, तरी निदान आशियाई-आफ्रिकी देशांचे राजकीय नेतृत्व आपल्याकडे यावे, असे चीनला वाटते.

पाकिस्तानने भारताबाबत सतत शत्रुत्वाचीच भूमिका घेतलेली आहे. पाकिस्तानच्या दृष्टीने काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक विवाद्य प्रश्न आहे. काश्मीरचा भूभाग हा आमच्या दृष्टीने निश्चितच जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो आमचा आहे. आमच्या भूमीचा इंच अन्‌ इंच भाग आम्हांला प्रिय वाटतो; परंतु भारत-पाकिस्तान वाद केवळ काश्मीरपुरताच मर्यादित नाही. भूभागापेक्षाही अधिक महत्त्वाच्या गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. आपल्या लोकशाहीवादी राष्ट्रीय जीवनाशी तो प्रश्न निगडित आहे. खरे आव्हान तेच आहे.

आजचा भारत कसा आहे? भारत जर लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष राहणार नसेल, तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही, ही गोष्ट आपण नीट समजावून घेतली पाहिजे. आपल्या संरक्षणाच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहे. त्यासाठी आपल्याला भारताच्या गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली पाहिजे. गेल्या हजार वर्षांचा भारताचा इतिहास हा भारतावर झालेल्या आक्रमणांचा इतिहास आहे. पूर्वीच्या काळी वायव्येकडून ही आक्रमणे झाली. टोळ्यांमागून टोळ्या, सैन्यांमागून सैन्ये येत होती आणि भारत पादाक्रांत करू पाहात होती. नंतर पश्चिमेकडून सागरी मार्गाने आक्रमणे झाली. या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी भारत पराभूत झाला, ही वस्तुस्थिती मान्य केलीच पाहिजे.

आपण का पराभूत झालो? आपल्या देशात प्रतिकाराची परंपराच नव्हती का? आपल्या देशात रणधुरंधर नव्हते का? तसे मुळीच नव्हते. उलट या भूमीने अनेक पराक्रमी वीर आणि शूर योद्धे यांना जन्म दिलेला आहे, अशीच इतिहासाची साक्ष आहे. हा देश त्यागामध्ये कधीही उणा पडलेला नाही. तशी बुद्धिवंतांचीही कधी वाण नव्हती. तरीही आपण पराभूत झालो, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच. मग असे का झाले? आपण चंद्रगुप्त, अशोक, चाणक्य आणि विजयनगर यांच्या परंपरा सांगतो. त्या परंपरा असूनही आक्रमकांसमोर आपल्याला नमते घ्यावे लागले. आपल्यापाशी शूर सैनिक होते, मोठे सैन्य होते, पराक्रमाचा वारसा होता आणि तरीही आपण आक्रमकांपुढे नमलो, याचे कारण आपण एक राष्ट्र नव्हतो. 1962 मध्ये नेफा विभागात आक्रमकाला यशस्वी रीतीने रोखले, हा गेल्या हजार वर्षांच्या इतिहासातील पहिला प्रसंग आहे. 1965 मध्ये पाकिस्तानच्या सुसज्ज लष्कराने आपल्यावर चाल केली. सुरुवातीला त्याला थोडेसे यशही मिळाले, परंतु नंतर आपण आक्रमकांना रोखले आणि त्यांचा पराभवही केला. याचे कारण आजचा भारत हा लोकशाहीवादी देश आहे. सर्व प्रांतांतील सर्व धर्मांचे, सर्व भाषिक गटांतील भारतीय एक होऊन आक्रमकांविरुद्ध उभे ठाकले.

हा नवा भारत काही विशिष्ट मूल्यांवर उभा आहे. ही कोणती मूल्ये आहेत? लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता ही ती मूल्ये आहेत. पंजाब, काश्मीर, राजस्थान आणि सिंध येथे कोण लढले? ते केवळ सिंधी किंवा पंजाबी किंवा काश्मिरी नव्हते. पंजाब, काश्मीर, राजस्थान येथील भूमीवर केवळ पंजाबी, काश्मिरी आणि राजस्थानी लोकांचे रक्त सांडलेले नाही. तामिळ लोकांचे रक्त तेथे सांडले, केरळीयांचे सांडले, कर्नाटकीयांचे सांडले, गुजरात्यांचे सांडले. म्हणून मी म्हणतो, की भारताचा नवा इतिहास लिहिला जात आहे, तो केवळ शाईने आणि लेखणीने लिहिला जात नाही. तलवार आणि रक्त यांनी तो लिहिला जात आहे. तलवार आणि रक्त यांनी लिहिला जात असलेला इतिहास हा खराखुरा आधुनिक इतिहास आहे. आपल्याला असा इतिहास घडविणारा भारत हवा आहे.

पाकिस्तानचे आक्रमण हे केवळ भारताच्या विशिष्ट भूभागावरचे आक्रमण नव्हते. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या मूलभूत मूल्यांवरच हे आक्रमण करण्यात आले होते, म्हणून आपण कशासाठी लढत आहोत, हे नीट समजावून घेतले पाहिजे. तसेच आपण कोणाविरुद्ध लढत आहोत, याचाही बोध व्हावयास हवा.

एक हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका चिनी युद्धवेत्त्याने- चीनमध्ये असे अनेक युद्धवेत्ते होऊन गेले- अत्यंत मार्मिकपणे असे म्हटले आहे, की ‘तुम्हाला जर शत्रूचा पराभव करावयाचा असेल, तर प्रथम शत्रू समजावून घ्या.’ म्हणून आपणही आपला शत्रू कशासाठी आपले शत्रुत्व करीत आहे, हे जाणून घेतले पाहिजे. चीनला केवळ दक्षिण आणि आग्नेय आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण आशियाई-आफ्रिकी देशांमध्ये राजकीय वर्चस्व प्रस्थापित करावयाचे आहे. त्या दृष्टीने भारत हा आपल्या मार्गातील मुख्य अडसर आहे, असे त्याला वाटते. कारण चीनच्या विचारसरणीपेक्षा भिन्न विचारसरणी भारताने अंगिकारली आहे. चीनच्या विचारसरणीला आपण खराखुरा पर्याय शोधून काढला आहे.

आज आपल्याला ज्या दोन देशांशी मुकाबला करावा लागत आहे, त्या दोन्ही देशांत हुकूमशाही आहे. पाकिस्तानात धर्माधिष्ठित हुकूमशाही आहे, तर चीनची साम्यवादी हुकूमशाही आहे. या दोन्ही हुकूमशाही राजवटींना भारताचे खरे सामर्थ्य कळूच शकत नाही. भारत हा एक दुर्बल देश आहे असेच ते मानतात. लोकशाहीचे सामर्थ्य काय असते, हे त्यांना उमगून येत नाही. त्यात त्यांचाही काही दोष नाही. गेल्या जुलै-ऑगस्टमधील परिस्थिती ध्यानात घ्या. त्या वेळी भारतापुढे अनेक अडचणी होत्या. अन्नधान्याची टंचाई होती. ठिकठिकाणी निदर्शने होत होती. पंजाबमध्ये संत फत्तेसिंगांनी आमरण उपोषणाची धमकी दिली होती. मुंबईत हरताळ आणि संप घडून येत होते. दिल्लीत संसदेसमोर मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. भारताचे विघटन होते की काय, अशी भीती वाटावी, अशी त्या वेळची परिस्थिती होती. आपल्याला लोकशाही पचली आहे किंवा नाही, अशी शंका व्यक्त केली जात होती. काय होणार आहे, हे कोणीच सांगू शकत नव्हते.

6 सप्टेंबरला भारतीय सैन्याने लाहोरची दिशा धरली आणि परिस्थिती एकदम बदलली. निदर्शने आणि हरताळ यांची भाषा ऐकू येईनाशी झाली. निदर्शनाची आणि उपोषणाची भाषा बंद पडली. हा खरा लोकशाहीचा अर्थ आहे. म्हणून आपण देशाची बांधणी करताना आपल्याला प्रिय असलेल्या मूल्यांचेही जतन करीत आहोत. भारताचे हे खरे चित्र आपण नेहमीच आपल्या डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे. दुर्दैवाने पाकिस्तानला या चित्राचा अर्थ कळूच शकला नाही.

आपण चीनकडून एक धडा शिकलो, तो पाकिस्ताननेही ध्यानात घेतला पाहिजे. चीन आणि भारत मित्रभावाने नांदतील, असे आपण 1962 पर्यंत गृहीत धरून चाललो होतो. 1958-59 मध्ये चौ एन-लाय मुंबईला आले होते, त्या वेळी मी द्वैभाषिक मुंबई राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी त्यांच्या स्वागताला गेलो, तेव्हा मी त्यांच्यावर प्रेमपूर्ण पुष्पहारांचा वर्षाव केला. त्यांनी आपला हात उंचावून म्हटले, ‘हिंदी चिनी भाई भाई!’ मीही तसेच म्हटले. त्यांची ती घोषणा खरी आहे, अशीच आपली कल्पना झाली. तसे होणे स्वाभाविकही होते. कारण हातात पुष्पगुच्छ आणि अंत:करणात मैत्री ठेवून आपण मित्रांचे स्वागत करीत असतो. परंतु नंतर आपल्याला कळून आले, ‘भाई भाई’ म्हणविणाऱ्या या लोकांच्या हातात तलवारी आहेत आणि हृदयात विष आहे.

Tags: भूमिका भाषण यशवंतराव चव्हाण आशिया आंतरराष्ट्रीय अर्थकारण भारत चीन indian army china pakistan speech yashwantrao chavhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Saurabh- 24 Mar 2021

    खुप सुंदर व समयोचीत लेख.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके