डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता : शिक्षणविषयक संपादकीय व स्फुट लेखन

पत्रकारितेमधील शिक्षणविषयक संपादकीय व स्फुट लेखनाचे हे स्वरूप शिक्षणाकडे पाहण्याच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनावर प्रकाश टाकते. त्यांनी शिक्षणाशी संबंधित मुद्दे हे केवळ शिक्षणक्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता, त्याला तत्कालीन समाजकारण, राजकारण व जातिव्यवस्थेशी संबंधित मुद्यांची जोड दिली होती. त्याद्वारे त्यांनी शिक्षण हा विषय अधिक व्यापकपणे हाताळला होता. अग्रलेखाच्या जोडीने ताज्या घडामोडींवर आधारित स्फुट लेखनच्या मदतीनेही त्यांनी शिक्षणाविषयीचा आपला विचार मांडला होता. त्या आधारे त्यांनी शिक्षणविषयक घटनांचा ताजेपणा व त्याच्याशी संबंधित साधक- बाधक चर्चा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. अशा लेखनासाठी त्यांनी वेळप्रसंगी अधिकृत आकडेवारीचाही वापर केला होता. ‘शिक्षण’ या विषयाची तत्कालीन व्याप्ती व त्याची परिणामकारकता वाचकांपर्यंत अधिक गांभीर्याने पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिल्याचेच त्यांचे हे लेखन स्पष्ट करते.  

पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाचा विचार करायचा झाल्यास, टोपणनावाने वाचकांचे पत्र लिहिणारा एक पत्रलेखक ते संपादक असा त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. कारण, स्वतःची नियतकालिके सुरू करण्यापूर्वीच्या काळातही डॉ. आंबेडकरांनी स्वतःला वृत्तपत्रांच्या दुनियेशी जोडून घेतलेले होते. ऑगस्ट 1917 मध्ये ते मुंबईला सिडनहॅम कॉलेजमध्ये अर्थकारण (पॉलिटिकल इकॉनॉमी) या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. 

याच काळात त्यांची माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांच्या संदर्भाने साऊथबरो समितीसमोर साक्ष झाली होती. त्या अनुषंगानेच डॉ. आंबेडकरांनी मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये टोपणनावाने एक पत्र प्रसिद्ध केले होते. दि.16 जानेवारी 1919 रोजी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी भारतातील स्वराज्यासाठी समाजातील उच्चवर्गाने दलितांना शिक्षण देत, त्यांच्या मनाची व सामाजिक दर्जाची उंची वाढविणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले होते. तसेच भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीविषयी ब्रिटिशांचे मतपरिवर्तन करण्यासाठी 1921 मध्ये लंडनमधील आपल्या वास्तव्यादरम्यान त्यांनी ‘लंडन टाइम्स’मध्येही एक लेखही प्रसिद्ध करवून आणला होता. डॉ.आंबेडकरांना देशातील अस्पृश्यांच्या शिक्षणाविषयी वाटणारी आत्मीयता आणि त्यासाठी त्यांना वाटणारी पत्रकारितेची उपयुक्तता स्पष्ट होण्यासाठी ही दोन उदाहरणे पुरेशी ठरतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्वतः सुरू केलेल्या, संपादक म्हणून काम पाहिलेल्या ‘मूकनायक’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या नियतकालिकांमधून शिक्षणाविषयी मांडलेली भूमिका समजून घेणे, हे त्यांचे शिक्षण आणि पत्रकारितेविषयीचे विचार जाणून घेण्यासाठी अधिक उपयुक्त ठरते. 

डॉ.आंबेडकरांनी सामाजिक समतेच्या प्रसारासाठी  

शिक्षणाला महत्त्व दिले होते. त्यासाठी स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार ही त्रिसूत्री त्यांनी सांगितली होती. या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ते विविध संस्था व नियतकालिकांच्या माध्यमातून कृतिशील राहिल्याचे याविषयीच्या पूर्वसाहित्याच्या अभ्यासातून समोर येते. दि. 20 जुलै 1924 रोजी स्थापन झालेल्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’च्या कार्यकारी मंडळाचे डॉ.आंबेडकर हे अध्यक्ष होते. बहिष्कृत समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, त्यासाठी वसतिगृहे व वाचनालये उघडणे हे या सभेचे उद्दिष्ट होते. सभेद्वारे ‘सरस्वती विलास’ नावाचे हस्तलिखित मासिक प्रसिद्ध केले जात असे. त्यांनी नव्या विद्यार्थ्यांना या हस्तलिखिताद्वारे सकारात्मक पद्धतीने पत्रकारितेची ओळख करून दिली होती. डॉ.आंबेडकर हे सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. शिक्षणाचा लाभ घेतलेल्यांना शिक्षणाच्या सक्तीची गरज नसल्याचे त्यांचे मत होते. आपल्या पत्रकारितेमधून त्यांनी शिक्षणाच्या विकेंद्रीकरणावर भर दिला होता. तसेच, उच्चशिक्षण व विद्यापीठीय व्यवस्थांविषयीच्या अपेक्षाही त्यांनी पत्रकारितेमधून व्यक्त केल्या होत्या. उच्चशिक्षण ही कोणत्याही एका वर्गाची मक्तेदारी नसावी, यासाठीची आग्रही भूमिका त्यांनी पत्रकारितेतून मांडल्याची नोंद डॉ.गंगाधर पानतावणे यांनी आपल्या संशोधनामध्ये केली आहे. 

डॉ.आंबेडकरांच्या पत्रकारितेच्या लेखनशैलीविषयी डॉ.रमेश हातोडे यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठी वृत्तपत्रीय लेखन : एक चिकित्सक अभ्यास’ या संशोधनामधून भाष्य केले आहे. हातोडे सांगतात की, साधार व मुद्देसूद मांडणी हे डॉ.आंबेडकरांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. डॉ.आंबेडकरांच्या लेखनामध्ये शब्द वा भाषासौंदर्यापेक्षाही विचारसौंदर्यावर अधिक भर होता. साधे व सोपे दृष्टांत वापरून सर्वसामान्य वाचकांना सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरित करण्याचे काम त्यांनी पत्रकारितेमधून केल्याचे हातोडे सांगतात. टीकाकारांना निर्भय व सडेतोडपणे उत्तरे देण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी पत्रकारितेमधून केले. ते टीका करताना द्वेषभावनेने नव्हे, तर सामाजिक हित लक्षात घेत लिखाण करत असत, अशी नोंद  हातोडे करतात. या पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेतून केलेले शिक्षणविषयक लेखन विचारात घेतले, तर त्यांच्या या शैलीचे प्रतिबिंब आणि त्यांची शिक्षणाविषयीची तळमळ या दोन्ही गोष्टी अनुभवता येतात. 

शिक्षणविषयक अग्रलेख 

डॉ.आंबेडकरांनी दि.31 जानेवारी 1920 रोजी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली होती. बहिष्कृत समाजाच्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून देणे, हा या पाक्षिकाचा उद्देश पहिल्याच अंकात प्रसिद्धीस देण्यात आला होता. ‘मूकनायक’मध्ये 14 फेब्रुवारी 1920 रोजी प्रसिद्ध झालेला ‘स्वराज्याची सर सुराज्याला नाही’ हा अग्रलेख त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या लेखामधून त्यांनी ब्रिटिश काळातील शैक्षणिक सुधारणांचा संदर्भ घेत त्यांची उपयुक्तता मांडली होती. स्वराज्य आणि सुराज्य या संकल्पनांचा आधार घेत, त्याचा शिक्षणाशी असणारा संबंध अग्रलेखातून मांडला होता. 

दि.3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ या दुसऱ्या पाक्षिकाची सुरुवात केली होती. आपल्या मतांचा प्रसार करण्यासाठी, विरोधकांच्या मतांचे व टीकेचे खंडन करण्यासाठी म्हणून हे पाक्षिक सुरू झाले होते. या पाक्षिकाच्या 15 जुलै 1927 रोजीच्या अंकामध्ये त्यांनी ‘आप घरीं बाटा, बाप घरींही बाटा’ या शीर्षकाचा अग्रलेख लिहिला होता. तत्कालीन मुंबई इलाख्यातील सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याविषयीचा हा लेख होता. त्यांनी शिक्षण खात्याची अधिकृत आकडेवारी वापरून प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या जातिनिहाय परिस्थितीचा आढावा या लेखामध्ये घेतला होता. मराठा व अस्पृश्य वर्गाची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी या लेखामध्ये केले होते. त्यासंदर्भातील काही गंभीर प्रश्न व त्याविषयीची त्यांची ठाम भूमिका या लेखात मांडली होती. शिक्षणाच्या विशेष संदर्भाने केलेले हे तुलनात्मक लेखन तत्कालीन परिस्थितीबाबत वस्तुनिष्ठपणे केलेले भाष्य ठरते. 

याच संदर्भाने 31 मे 1929 रोजी लिहिलेला ‘मुंबई इलाख्यातील प्राथमिक शिक्षणाची प्रगती’ हा अग्रलेखही त्यांच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे लेखन करण्याचा सवयीचा पुरावा ठरतो. त्यांची प्राथमिक शिक्षणाच्या कायद्यामधील दुरुस्त्यांसंबंधीची भूमिका ‘बहिष्कृत भारत’च्या या अग्रलेखामधून त्यांनी मांडली. शिक्षणाची जबाबदारी सरकारवर असल्याची जाणीव करून देण्यासोबतच त्यासाठीचे अर्थकारण कसे साध्य करता येईल, याचाही आढावा या लेखामध्ये घेण्यात आला होता. या दोन्ही लेखांच्या तुलनेमध्ये 3 फेब्रुवारी 1928 रोजी ‘बहिष्कृत भारत’मध्ये छापून आलेल्या अग्रलेखाचे उद्दिष्ट काहीसे वेगळे होते. ‘बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक ऋण नव्हे काय?’ हा अग्रलेख हे पाक्षिक सुरू राहण्यासाठी आग्रही भूमिका मांडणारा होता. त्यामध्ये या पाक्षिकाची गरज स्पष्ट करताना त्यांनी पाक्षिकातून मांडल्या जाणाऱ्या शिक्षणविषयक भूमिकांची उपयुक्तता स्पष्ट करून सांगितली होती. 

शिक्षणविषयक स्फुट लेखन 

डॉ.आंबेडकरांनी ‘मूकनायक’मध्ये ‘विविध विचार’ या सदरामध्ये 28 फेब्रुवारी 1920 रोजी लिहिलेल्या ‘टोणगे पान्हवतील काय?’ या स्फुट लेखामधून प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासाठीच्या कायद्याविषयीची भूमिका मांडली होती. त्यामध्ये कायद्याच्या संदर्भाने इंग्रज सरकार व भारतीय नेतेमंडळींकडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकांमधील परस्पर-विरोधाभासांवर थेट टीका केली होती. सक्तीचे शिक्षण केवळ मुलांना नव्हे, तर मुलींनाही मिळायला हवे, यासाठी ते आग्रही होते. सरकारच्या शैक्षणिक सुविधांवर असणारी उच्चवर्गीयांची मक्तेदारी थांबविण्यासाठी सक्तीच्या शिक्षणाचा पर्याय योग्य असल्याचे त्यांनी या लेखात म्हटले होते. या स्फुटामधून त्यांनी यासंबंधी ‘केसरी’ने घेतलेल्या तत्कालीन भूमिकेवरही थेट टीका केली होती. ‘बहिष्कृत भारत’मध्ये छापून आलेल्या ‘आजकालचे प्रश्न’ या सदरामधून 3 जून 1927 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘ब्राह्मणांच्या हातचे शिक्षण या काळात कोणासच चालणें शक्य नाही’ या लेखामध्ये त्यांनी मुंबई इलाख्यातील शिक्षण खात्याच्या अहवालाच्या संदर्भाने लेखन केले होते. शिक्षकी प्रशिक्षण घेण्यासाठी सरकारने ट्रेनिंग कॉलेजांमधून अस्पृश्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी या लेखातून त्यांनी केली होती. 

सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाविषयीच्या तत्कालीन कायद्यामध्ये सुधारणा करण्याबाबत त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भरलेल्या प्राथमिक शिक्षण परिषदेमध्ये विचारमंथन झाले होते. या परिषदेमधील चर्चेचे प्रतिबिंब 29 जुलै 1927 रोजी  ‘बहिष्कृत भारत’मधील ‘आजकालचे प्रश्न’ या सदरामध्ये उमटले होते. ‘सक्तीच्या प्राथमिक शिक्षणासंबंधी कायद्यांत आमूलाग्र सुधारणा करणे हा एकच उपाय’ या शीर्षकाखालील लेखामध्ये त्यांनी कायद्यामधील सुधारणेविषयी आशावादी भूमिका मांडली होती. 16 सप्टेंबर 1927 रोजी ‘आजकालचे प्रश्न’ या सदरांतर्गत लिहिलेल्या ‘उच्च शिक्षण ही एकाच वर्गाची मिरास होणे राष्ट्राच्या दृष्टीने मोठी घातुक गोष्ट’ या लेखामध्ये मुंबई विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारीच्या आधारे आपले विचार मांडले होते. उच्चशिक्षण हे विशिष्ट वर्गापुरते मर्यादित न ठेवता, ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचायला हवे, ही भूमिकाही या स्फुट लेखामधून समोर आली होती. तर 4 नोव्हेंबर 1927 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘... वगैरे सांप्रदायांप्रमाणे ब्राह्मण्य हा एक संप्रदाय आहे’ या स्फुट लेखनामध्ये त्यांनी शालेय पातळीवरील भेदाभेदावर भाष्य केले होते. मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या स्कूल्स कमिटीच्या संदर्भाने प्रसिद्ध झालेल्या या लेखातून कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये कोणासही मज्जाव नसावा व शिक्षणाचा सर्वांना सारखा उपयोग व्हावा, असा कॉर्पोरेशनने ठराव केलेला असतानाही शाळांमधून भेदाभेद होत असल्याची बाब त्यांनी समोर आणली होती. कमिटीच्या सदस्यांच्या बोलण्यात आणि वागण्यातून दिसणाऱ्या विरोधाभासावर त्यांनी थेट भाष्य केले होते. 

पुण्यातील म्युनिसिपालिटी निवडणुकीच्या संदर्भाने लेखन करताना त्यांनी ‘बहिष्कृत भारत’मधून 3 फेब्रुवारी 1928 रोजी ‘या संस्थांचा उपयोग अस्पृश्यांच्या हितसंवर्धनाकडे होईल किंवा नाही, हे प्रतिनिधींच्या लायकीवर व कार्यक्षमतेवर अवलंबून’ हा लेख लिहिला होता. शिक्षण समितीवर कोणाची नेमणूक व्हावी, यासाठी चाललेल्या तत्कालीन प्रयत्नांवर त्यांनी त्यातून भाष्य केले होते. 7 डिसेंबर 1928 रोजी ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये लिहिलेल्या ‘शिक्षण नसल्यामुळे जीवनाच्या शर्यतीत पुढे जाता येत नाही’ या लेखातून त्यांनी अस्पृश्यांची शिक्षणाविषयीची परिस्थिती मांडली होती. अस्पृश्यांना शिक्षण मिळत नसल्याने ते मागे पडत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली होती. त्यांना पुढे आणण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचे त्यांनी या लेखामधून सांगितले होते. 

त्यांच्या पत्रकारितेमधील शिक्षणविषयक संपादकीय व स्फुट लेखनाचे हे स्वरूप शिक्षणाकडे पाहण्याच्या त्यांच्या व्यापक दृष्टिकोनावर प्रकाश टाकते. त्यांनी शिक्षणाशी संबंधित मुद्दे हे केवळ शिक्षणक्षेत्रापुरते मर्यादित न ठेवता, त्याला तत्कालीन समाजकारण, राजकारण व जातिव्यवस्थेशी संबंधित मुद्यांची जोड दिली होती. त्याद्वारे त्यांनी शिक्षण हा विषय अधिक व्यापकपणे हाताळला होता. अग्रलेखाच्या जोडीने ताज्या घडामोडींवर आधारित स्फुट लेखनच्या मदतीनेही त्यांनी शिक्षणाविषयीचा आपला विचार मांडला होता. त्या आधारे त्यांनी शिक्षणविषयक घटनांचा ताजेपणा व त्याच्याशी संबंधित साधक-बाधक चर्चा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. अशा लेखनासाठी त्यांनी वेळप्रसंगी अधिकृत आकडेवारीचाही वापर केला होता. ‘शिक्षण’ या विषयाची तत्कालीन व्याप्ती व त्याची परिणामकारकता वाचकांपर्यंत अधिक गांभीर्याने पोहोचविण्यासाठी ते प्रयत्नशील राहिल्याचेच त्यांचे हे लेखन स्पष्ट करते. 

भारतीय वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाच्या संदर्भाने देशाचा स्वातंत्र्यपूर्व काळ हा मतपत्रांच्या प्रभावाचा काळ म्हणून विचारात घेतला जातो. त्या अनुषंगाने त्यांच्या पत्रकारितेमधील लेखनाचा हा आढावा आपल्याला त्यांचे वृत्तपत्रीय लेखन हे केवळ मतांवरच आधारित नसल्याचे सहजच लक्षात आणून देतो. त्यामुळेच अधिकृत आकडेवारीचा त्यांनी घेतलेला आढावा, त्याचा आपल्या वृत्तपत्रीय लेखनामधून केलेला वापर आणि त्या आधारे मांडलेल्या आपल्या भूमिका हे सगळे केवळ त्यांच्या मतांपुरते मर्यादित न राहता, त्यापलीकडे जात एक वस्तुनिष्ठ मूल्यमापनही ठरते. शिक्षणाविषयीची आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठी अग्रलेखासारख्या गंभीर लेखनप्रकाराचा त्यांनी केलेला वापर असो, की स्फुट लेखनाच्या माध्यमातून तत्कालीक संदर्भांचा दिलेला दाखला असो; त्यांचे पत्रकारितेमधील शिक्षणविषयक लेखन हे केवळ तत्कालीन संदर्भांपुरतेच मर्यादित न राहता, ते वस्तुनिष्ठतेवर आधारित आणि कालसुसंगत असे संदर्भ साहित्यही ठरते, ते यामुळेच. 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

योगेश बोराटे

सहायक प्राध्यापक, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे   


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके